शिंदेंसोबत गेलेले ते १२ खासदार आणि त्यांची कारणं पाहिल्यास सगळं ‘गणित’ कळून येईल

खूप दिवसांपासून चर्चा होती की आमदारांपाठोपाठ खासदार बंडाच्या तयारीत….त्या चर्चाना शेवटी ब्रेक लागल्याचं दिसून येतंय. आधीच खरी शिवसेना कुणाची हा वाद असतांना एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला जोरदार धक्का देत शिवसेनेच्या एकूण १९ खासदारांपैकी १२  खासदारांची लोकसभेच्या सभापतींपुढे परेड केलीय.  तसेच शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी १८ खासदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा देखील एकनाथ शिंदेंनी केलेला आहे. 

मात्र शिंदेंच्या गटात सामील झालेले ते १२ खासदार कोण आहेत ? आणि त्यांनी शिंदे गटात सामील होण्याचं मुळात कारण काय असू शकतं त्याचाच सविस्तर आढावा घेण्याचा हा प्रयत्न..

१. श्रीकांत शिंदे.

एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या खासदारांमध्ये अर्थातच पहिला क्रमांक त्यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे.  

कल्याण मधून श्रीकांत शिंदे यांनी ५ लाख ५९ हजार ७२३ मतं मिळवत विजय मिळवला होता. तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील आहेत त्यांना २ लाख १५ हजार ३८० इतकी मते मिळालेली.

महाविकास आघाडीतील नाराजी त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे.  “ज्या-ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम आहे. त्या-त्या ठिकाणी शिवसेनेचे खच्चीकरण होत आहे” असा आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेला शिवाय सेनेच्या आमदारांसोबत निधीवाटपात भेदभाव होत असल्याचा मुद्दा देखील ते वारंवार दाखवून देत होते.

शिंदेंच्या बंडाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं खासदारांना तातडीनं मुंबईत बोलावलं होतं त्यावेळी सर्वात पहिले नॉट रिचेबल राहणारे खासदार श्रीकांत शिंदेच होते. त्यादरम्यान ते दिल्लीत होते.

तर त्यानंतर ते गुवाहाटीत बंडखोर आमदारांच्या सोबत रॅडिसन हॉटेल मध्ये वास्तव्यास असल्याचं समोर आलेलं. तेथील सर्व नियोजन तेच पाहत असल्याची देखील माहिती मिळालेली.नंतर शिंदे गटात ते थेट सक्रिय राहिले.

श्रीकांत शिंदे हे आधापासूनच भाजपच्या नेत्यांचे जवळचे मानले जातात. त्यात कल्याण डोंबिवली हा त्यांचा मतदारसंघ म्हणजे RSS चा बालेकिल्ला त्यामुळे २०२४ ची लोकसभा आणि मंत्रीपदही मिळेल या जोरावर श्रीकांत शिंदे शिंदे गटासोबत आहेत .

२. राहूल शेवाळे.  

शिवसेनेच्या मुंबईतील खासदारांपैकी एक प्रमुख नाव म्हणजे राहुल शेवाळे. २०१४ सालच्या मोदी लाटेत राहुल शेवाळे पहिल्यांदा दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेले. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला. 

त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत राहुल शेवाळे यांनी एकनाथ गायकवाडांचा पराभव केला. शेवाळे यांना ४ लाख २४ हजार ९१३ मते मिळालेली तर दुसऱ्या क्रमांकावर कॉंग्रेसचे एकनाथ गायकवाड होते त्यांना २ लाख ७२ हजार ७७४ मते मिळालेली.

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गटाची बंडखोरी झाल्यानंतर कोणते खासदार त्यांच्या गोटात जातील याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. त्यात अनेक खासदारांनी राष्ट्रपती निवडणूकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा द्या अस पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सांगितल त्यात राहुल शेवाळेही होते.त्यानंतर उद्धव ठाकरेंनी खासदारांच्या आग्रहास्तव पाठिंबा जाहीरही केला परंतु तरीही राहूल शेवाळे यांनी उद्घव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.

३. संजय मंडलिक. 

संजय मंडलिक हे कोल्हापूरचे खासदार. कोल्हापुरात सेनेची ताकद म्हणजे इथे ६ आमदार २ खासदार. होय.

कोल्हापुरात लोकसभेचे दोन मतदारसंघ येतात, एक कोल्हापुर आणि दुसरा हातकणंगले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही मतदारसंघांमध्ये शिवसेनेने विजय मिळवला.  कोल्हापूरमधून – संजय मंडलिक आणि हातकणंगलेमधून धैर्यशील माने.

कोल्हापूरमधून ७ लाख ४९ हजार ८५ मतं मिळवत संजय मंडलिक यांनी धनंजय महाडिकांचा पराभव केला होता. त्यावेळेस धनंजय महाडिक यांना ४ लाख ७८ हजार ५१७ मते होती.

त्यामुळे संजय मंडलिक हे शिंदे गटात जातील अशी शक्यता कमी होती. परंतू आज एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या फोटोत ते दिसले..शिंदे गटात मंडलिक जाण्याचं कारण म्हणजे आपला २०२४ लोकसभा विजय पक्का करणं. संजय मंडलिक यांच्यासमोर सगळ्यात मोठ आव्हान होत महाडिकांचं. परंतु आता धनंजय महाडिक राज्यसभेत गेले. त्यामुळे भाजपने कोणता दुसरा नेता कोल्हापूरात आणून बसवू नये म्हणून भाजप आणि शिंदे गटासोबत जाऊन आपली २०२४ चा विजय मंडलिकांनी पक्का आणि सेफ केलाय अस बोललं जातयं.

४. राजेंद्र गावित.

पालघरमधून शिवसेनेचे राजेंद्र गावित यांनी आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांचा ८८ हजार ८८३ मतांनी पराभव केलेला. राजेंद्र गावित यांना ५ लाख ८० हजार ४७९ मतं मिळवलीत तर बळीराम जाधव  यांना ४ लाख ९१ हजार ५९६ मतं मिळालेली.

पालघर भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ असून, अनेक वर्षांपासून पालघर लोकसभेची जागा भाजप पारंपारिक लढवत. मात्र २०१९ ला उद्धव ठाकरे यांनी पालघर लोकसभा शिवसेनाच लढवणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे भाजप-सेना युतीत पालघरची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली.

या जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीने पूर्ण ताकदीनिशी हि जागा लढवली होती. मात्र इकडे युतीतील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं.

एकनाथ शिंदेंच्या बंडादरम्यान पक्षाने आमदारांप्रमाणेच शिवसेनेा खासदारांची बैठक बोलवली होती. या बैठकीला चार खासदार अनुपस्थित होते. त्यातले एक म्हणजे राजेंद्र गावित. बैठकीला उपस्थित न राहण्याचं कारण म्हणजे त्यांची नाराजी असणार अशी चर्चा होती. मागच्या आठवड्यात त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती तेव्हाच ते शिंदे गटात गेल अशा चर्चा रंगल्या परंतु मी कामासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटलो अश म्हणत त्यांनी चर्चांचं खंडण केल पण अखेर आज ते शिंदे गटात गेले.

५. हेमंत गोडसे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात एकदा निवडून दिलेला खासदार पुन्हा निवडून येत नाही असा इतिहास आहे. मात्र हेमंत गोडसे यांनी तो इतिहास खोडून काढत २०१४ आणि २०१९ असा सलग विजय मिळवला .

हेमंत गोडसे मनसेत होते तेंव्हा २००९ मध्ये छगन भुजबळ यांचा पुतण्या समीर भुजबळांनी गोडसेंचा पराभव केलेला. २०१४ मध्ये गोडसे शिवसेनेत आले अन त्यांनी छगन भुजबळ यांचा पराभव केला.

२०१९ मध्ये गोडसेंची लढत समीर भुजबळ यांच्यासोबत होती, त्या लढतीत हेमंत गोडसे यांनी ५ लाख ६३ हजार ५९९ मतं मिळवत विजय मिळवला होता तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांचा पुतण्या समीर भुजबळ हे होते. त्यांनी २ लाख ७१ हजार ३९५ मतं मिळवली होती.

मात्र महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतरही गोडसे विरुद्ध भुजबळ संघर्ष धुसफुसत होता. त्यामुळे महाविकासआघाडीतून लोकसभेचं तिकिटी त्यांना २०२४ मध्ये मिळेल की नाही याची शंका होतीच. त्यात आधीपासूनचं महाविकासआघाडी हे अनैसर्गिक सरकार असून खासदारांमध्ये अस्वस्थता आहे अस त्यांचं म्हणनं होत, २०१४ नंतर त्यांना केंद्रात मोदी सरकारमध्ये मंत्रीपदही मिळालेल त्यामुळे आता शिंदे गटात सामिल होऊन २०२४ चा विजय आणि कदाचित मंत्रीपदाचीही लॉटरी लागेल या आशेने ते शिंदे गटात गेले अस बोललं जातय

६. हेमंत पाटील

हिंगोलीमधून ५ लाख ८६ हजार ३१२ मतं घेत शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील विजयी झालेले. तर कॉंग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे ३ लाख ८ हजार ४५६ मतं घेत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेत.

हिंगोलीतून २०१४ साली सुभाष वानखेडे यांनी शिवसेनेच्या तिकिटावरून लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र तेंव्हा काँग्रेसचे राजीव सातव यांनी वानखेडेंचा १,६३२ मतांनी पराभव केलेला. तेच सुभाष वानखेडे २०१९ ला काँग्रेसच्या तिकिटावरून उभे होते तेंव्हा त्यांचा पराभव शिवसेनेच्या हेमंत पाटलांनी केलेला.

कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील डिसेंबर २०२१ मध्ये नांदेड येथे बोलताना असं म्हणाले होते की,  “राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये आमचा ‘वापर करून’ घेतला जात असल्याची भावना आमच्या मनात निर्माण झाली आहे. याबाबत आम्ही वरिष्ठांच्या कानावर काही बाबी घातल्या आहेत.” यावरून नाराज खासदारांच्या यादीत हेमंत पाटलांचाही समावेश आहे असं दिसून येतं होतं. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक बोलावली त्या बैठकीलाही हेमंत पाटील उपस्थित नव्हते. तेव्हापासूनचं ते शिंदे गटात जातील अशी चर्चा झाली आणि अखेर ते शिंदे गटात गेले. थोडक्यात महाविकासआघाडीत एकत्रित लोकसभा निवडणूक लढवली तर तिकिट मिळणार नाही हा सगळ्यात मोठा फॅक्टर अनेक खासदारांनी अधोरेखित केलाय.

७. भावना गवळी

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघामधून शिवसेनेच्या भावना गवळी ५ लाख ४२ हजार ९८ मतांनी विजय मिळवला तर ४ लाख २४ हजार १५९ मतं घेत कॉंग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे दुसऱ्या क्रमांकावर राहिलेत.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. १९९९, २००४, २००९, २०१४,२०१९ असं सलग ५ वेळेस भावना गवळी या शिवसेनेच्या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.

भावना गवळींना ईडीने आत्तापर्यंत ३ वेळा चौकशीसाठी बोलावलंय. शिंदे गटाने बंड केलं तेंव्हा भावना गवळी यांनी, बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ २२ जून ला उद्धव ठाकरेंना पत्र लिहून, “बंडखोर आमदारांवर कोणतीही कारवाई करू नये अशी विनंती केली होती. शिंदे गटाच्या बंडानंतर खासदारांमधून पहिली प्रतिक्रिया या पत्राद्वारे भावना गवळींनीच दिली होती.  

त्यामुळे त्या शिवसेना नेतृत्वावर नाराज असल्याचं दिसून येतं. कारण एकनाथ शिंदेंच्या बंडादरम्यान पक्षाने बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीला भावना गवळींनी दांडी मारली होती. त्यानंतर भावना गवळी यांना प्रतोद पदावरून हटविण्यात आले. तेव्हापासूनच त्या एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत असल्याचे सांगण्यात येत होते ते आता स्पष्ट झालेलं आहे. 

८. प्रतापराव जाधव 

गेल्या २० वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रतापराव जाधव सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेत. त्यांनी राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे यांचा पराभव केला. प्रतापराव जाधव यांना ५ लाख २१ हजार ९७७ मतं मिळाली तर राजेंद्र शिंगणे यांना ३ लाख ८८ हजार ६९० मत मिळवत ते दुसऱ्या क्रमांकावर होते.

एकनाथ शिंदेंसहित सेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीत दाखल झालेले तेंव्हा पक्षाने आमदारांप्रमाणेच शिवसेनेना खासदारांची बैठक बोलवली होती. त्यात प्रताप जाधवांची गैरहजेरी बरंच काही सांगून गेली.

संजय गायकवाड आणि संजय रायमूलकर हे दोन बुलढाण्याचे बंडखोर आमदार आधीच शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे बुलढाण्यात पुन्हा निवडून येण्यासाठी भाजप आणि शिंदे गटातले आमदार हेच आपल्याला मदत करतील यामुळे प्रतापराव जाधव शिंदे गटात सामिल झाले अस तिथल्या स्थानिक पत्रकारांनी सांगितलं.

९. सदाशिव लोखंडे

सदाशिव लोखंडे यांनी २०१९ च्या अहमदनगर लोकसभा निवडणुकीत ४ लाख ८६ हजार ८२० मते मिळवून काँग्रेसच्या भाऊसाहेब मल्हारी कांबळे यांचा पराभव केलेला. कांबळे यांना ३ लाख ६६ हजार ६२५ मते होती.

सदाशिव लोखंडे देखील महाविकास आघाडीच्या काळात नाराज होते.  मे २०२१ मध्ये निळवंडे डाव्या कालव्यावरील आढळा जलसेतूच्या कार्यक्रमाला जलसंपदामंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाहणी दौरा केला होता. 

तेंव्हा सदाशिव लोखंडे यांनी महाविकास आघाडीतल्या मोठ्या नेत्यांवर सडकून टीका केली होती कि,

“आमच्याच मतदारसंघात कामे होत असताना आम्हालाच निमंत्रण दिले जात नाही. आम्ही कोणतेही कार्यक्रम घेताना अधिकारी कोरोनाचे नियम पुढे करतात. मंत्र्यांच्या कार्यक्रमात मात्र कितीही गर्दी झाली, तरीही तेथे नियम कुठे जातात? त्यामुळे हा भेदभाव नको. आमदार, खासदार किंवा मंत्री असो, नियम सर्वांना सारखेच असतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी भेदभाव करू नये. या प्रकाराची तातडीने चाैकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत” अशी उघड उघड टीका त्यांनी केलेली. थोडक्यात महाविकास आघाडीला कंटाळून त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. 

१०. कृपाल तुमाणे

रामटेक लोकसभा मतदारसंघाची ओळख म्हणजे माजी पंतप्रधान पी.व्ही नरसिंह राव यांनी १९८४ आणि १९८९ असे दोन वेळेस लोकसभा निवडणुक लढवली होती आणि त्याच्या दुसऱ्या पर्वात ते पंतप्रधान झाले होते.  सुरुवातीपासूनच काँग्रेसचा गड राहिलेल्या रामटेकमध्ये बाळासाहेब ठाकरेंना विशेष रस होता. काँग्रेसच्या या गडाला सुरुंग लावला तो शिवसेनेच्या सुबोध मोहितेंनी.  १९९९, २००४ असे दोन वेळेस सुबोध मोहिते निवडून आलेले.

२००९ चा उपवाद सोडता पुन्हा शिवसेनेने रामटेक ताब्यात घेतलं, २०१४, २०१९ असे सलग दोन वेळेस शिवसेनेचे कृपाल तुमाने निवडून आलेत. त्यांना ५ लाख ९७ हजार १२६ मतं मिळाली तर ४ लाख ७० हजार ३४३ मतं घेत कॉंग्रेसचे किशोर गजभिये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेत.

अलीकडेच कृपाल तुमाणे हे चर्चेत आलेले जेंव्हा त्यांनी, “उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं”, असं विधान केलेलं सोबतच, “तुम्ही शिंदे गटात जाणार का”, या प्रश्नावर त्यांनी नो कमेंट्स असं म्हणत उत्तर देणं टाळलं होतं ज्यामुळे ते कुठंतरी एकनाथ शिंदेंच्या गटात जातील अशी शक्यता होतीच आणि त्यांनी शिंदे गटात सामील होत ती शक्यता सत्यात उतरवली. 

११. श्रीरंग बारणे

मावळमधून श्रीरंग बारणे यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ७ लाख २० हजार ६६३ मते घेत राष्ट्रवादीचे आणि शरद पवारांचे नातू पार्थ पवार यांचा पराभव केलेला. पार्थ पवार यांना ५ लाख ४ हजार ७५० मते मिळाली होती. नाराज खासदारांच्या यादीत त्यांचाही नंबर लागतो.

श्रीरंग बारणे मार्च २०२२ ला जालन्याच्या दौर्‍यावर गेले असताना, जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांना संबोधून असं बोलले होते की, “जालन्याचे राष्ट्रवादीचे पालकमंत्री शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची कामं करत नाहीत. याबाबत शिवसेना कार्यकर्त्यांकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. याचा अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोपवणार आहे.” असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीतील अस्वस्थता दाखवून दिली होती. 

पुढच्या २०२४ च्या लोकसभेतही त्यांची खरी कसोटी ही राष्ट्रवादीसोबतचं होती. त्यात महाविकासआघाडीतून तिकीट मिळणार की नाही याची शक्यता कमी त्यामुळे महाविकासआघाडी राज्यात असताना शिंदे गट – भाजपसोबत जाऊन आपली जागा सेफ करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं बोलल जातयं

१२. धैर्यशील माने

हातकणंगलेमधून धैर्यशील माने यांनी ५ लाख ८५ हजार ७७६ मते मिळवत त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टींचा पराभव केलेला. राजू शेट्टी यांना ४ लाख ८९ हजार ७३७ मते मिळाली होती.

धैर्यशील माने यांनी काही दिवसांपूर्वी भूमिका मांडलेली की , “सर्व खासदार हे उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहेत, ठाकरेंच्या भावना सर्व खासदारांनी ऐकून घेतल्या आहेत. आम्ही सर्व खासदार ठाकरेंसोबतच आहोत असं त्यांनी स्पष्ट केलेलं”

उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या सगळ्या बैठकांना धैर्यशील माने उपस्थित होते त्यामुळे ते शिंदे गटात जातील अशी शक्यती कमी होती. परंतु काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं अशी इच्छा त्यांना बोलून दाखवली होती.

त्यांची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती ज्यात त्यांनी प्रवाहासोबत जाण्यातच जास्त फायदा आहे असं म्हटल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर आज ते शिंदे गटात सामिल झाले

अशाप्रकारे….महाविकास आघाडीत राहून शिवसेनेचे खासदार अस्वस्थ होत होते. कारण त्यांनी आपल्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या उमेदवारांना पाडून स्वतःची लोकसभेची कारकीर्द घडवली आहे त्यामुळे त्यांचं महाविकास आघाडीत सहजासहजी पटणं शक्यच नव्हतं.

म्हणूनच सरतेशेवटी या सर्व खासदारांचे स्थानिक राजकारण आणि २०१४ व २०१९ च्या मोदी लाटेत लोकसभा निवडणूकीतील त्यांनी मिळवलेले यश पाहाता असंच एकंदरीत असं चित्र आहे की, येत्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पुन्हा एकदा निवडून येण्यासाठी भाजपची मदत लागणार आहे.  म्हणूनच त्यांनी शिंदे गटाची वाट धरल्याचं सांगण्यात येतंय..

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.