महाराष्ट्रात राज्यसभेसाठी काँग्रेसकडे जागा एक आणि उमेदवार अनेक अशी अवस्था झालीय…

काल राज्यसभेची ६ जागांसाठी पोट निवडणूक आणि १ जागेसाठी निवडणूक जाहीर झालीय. यात महाराष्ट्र, तामिळना़डू, पश्चिम बंगाल, आसाम आणि मध्य प्रदेशातील रिक्त जागांवर ही निवडणूक होणार आहे. ४ ऑक्टोबरला यासाठी मतदान होऊन मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी हि निवडणूक जाहीर झालीय.

मात्र सध्या या एका जागेसाठी इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या दिसून येत आहे…

मध्यप्रदेशमध्ये भाजपचे माजी केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांची राज्यपाल पदावर नियुक्ती झाल्याने तिथं पोटनिवडणूक जाहीर झालीय. तर आसाममध्ये बोडोलँड पीपल्स फ्रंटचे बिस्वजीत दैमारी भाजपमध्ये गेल्याने तिथंली जागा रिकामी झाली होती. तिथून भाजपचे केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या मानस रंजन भूनिया यांच्या राजीनाम्यामुळे ती जागा रिक्त झाली होती. तर तामिळनाडूमधून अन्नाद्रमुकचे के.पी. मुनुस्वामी आणि आर वैथिलिंगम यांनी राजीनामा दिला होता. सध्या तिथं द्रमुकचे बहुमत असल्यामुळे या जागा त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. तर आघाडीमुळे एक जागा काँग्रेसला जाण्याची शक्यता आहे. यासाठी जेष्ठ नेते गुलाब नबी आझाद आणि प्रवीण चक्रवर्ती यांच्या नावाची चर्चा आहे. 

पॉंडिचेरीच्या एका जागेसाठी म्हणजे एन गोकुलकृष्णन यांचा कार्यकाळ संपल्याने तिथं निवडणूक जाहीर झालीय.

मात्र या सगळ्या जागांमध्ये चर्चा आहे ती महाराष्ट्राच्या जागेसाठी.

कारण इथून काँग्रेसकडे जागा एक आहे आणि इच्छुक उमेदवारांची संख्या मात्र जास्त आहे. इथल्या जागेसाठी. इथं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशा महायुतीचे सरकारकडे बहुमत आहे. पण जर इच्छुकांची नाव बघितली तर डॉ. प्रज्ञा सातव, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा, संजय निरुपम, अविनाश पांडे अशी नाव चर्चेत आहेत.

डॉ. प्रज्ञा राजीव सातव : 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यात उपाध्यक्ष म्हणून दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे आतापर्यंत सक्रिय राजकारणापासून दूर असलेल्या डॉ. प्रज्ञा सातव राजीव सातव यांचा वारसा चालवतील हे स्पष्ट झालं आहे. मात्र रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेस डॉ. प्रज्ञा सातव यांना संधी देणार का हा प्रश्न आहे.

संजय निरुपम आणि मिलिंद देवरा :

मुंबई कांग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे मिलिंद देवरा हे देखील दोन वेळा लोकसभेची निवडणूक हरल्यानंतर बऱ्याच काळापासून प्रतीक्षा यादीत आहेत. काँग्रेसमध्ये या दोन्ही नेत्यांकडे फायरब्रॅन्ड आणि अनुभवी म्हणून ओळखलं जातं. यासोबतच काँग्रेसला देखील सध्या राज्यसभेमध्ये अशा फायरब्रॅन्ड नेत्यांच्या अनुभवाची गरज आहे.

मुकुल वासनिक :

रामटेकचे माजी खासदार मुकुल वासनिक यांचं नाव देखील या जागेसाठी सध्या आघाडीवर आहे. वासनिक महाराष्ट्राच्या राजकारणात फारसे सक्रिय दिसून येत नसले तरी दिल्लीच्या राजकारणात त्यांचं वजन आहे. मध्यंतरी राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर वासनिक यांचं नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर आलं होतं. सोबतचं मागच्या वर्षी मध्यप्रदेशचं प्रभारीपद देखील वासनिक यांच्याकडे सोपवलं होतं.

अविनाश पांडे : 

राज्यसभेचे माजी खासदार अविनाश पांडे यांच्या नाव देखील चर्चेत येऊ लागलं आहे. याआधी ते २०१० ते २०१६ दरम्यान राज्यसभेचे महाराष्ट्रातील खासदार होते. इतकंच नाही तर असं देखील सांगितलं जातं आहे कि अविनाश पांडे राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गहलोत यांच्या मार्फत थेट सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या संपर्कात आहेत.

एकूणच आता या नावांमधून काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार कि आश्चर्यकारक रित्या वेगळं कोणाचं नाव येणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. येत्या काही दिवसातच याबाबतच चित्र स्पष्ट होणार आहे.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.