शंकरराव चव्हाण आणि विखे पाटलांनी इंदिरा गांधींच्या संमतीने काँग्रेस पक्ष फोडला

गोष्ट आहे सत्तरच्या दशकातली. पाकिस्तानला हरवून बांगलादेश निर्मिती केल्यानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी प्रचंड शक्तीशाली बनल्या होत्या. त्यांनी जुन्या काँग्रेसच्या नेत्यांना धोबीपछाड देऊन पक्ष आपल्या हातात आणला होता.

वेगवेगळ्या राज्यातले मुख्यमंत्रीपदी सुद्धा त्यांनी आपल्या मर्जीतल्या व्यक्तींना बसवण्यास सुरवात केली.

यातूनच महाराष्ट्रात वसंतराव नाईकांना पायउतार होऊन शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री बनले.

शंकरराव चव्हाण मराठवाड्याच्या दुष्काळी भागातून आलेले नेते होते. रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्त्वाखाली निजामशाहीविरुध्द लढण्यात त्यांच्या राजकीय आयुष्यातील उमेदीची वर्षे घालवली होती. नगराध्यक्षपदापासून ते राज्याचा मुख्यमंत्री हा खडतर प्रवास त्यांनी सचोटीने पार केला होता.

शंकरराव चव्हाण हे कठोर प्रशासक होते. सचोटी, टापटिप, शिस्त आणि घेतलेल्या कामात पूर्ण झोकून देऊन काम करणे हे शंकररावांचे गुणविशेष. त्यांनी प्रशासनात सुसूत्रता आणली. दिरंगाई विरुद्ध कठोर कारवाई सुरू केली.

त्यामुळे अधिकारी वर्ग त्यांना घाबरून असे आणि त्यांचे राजकीय सहकारी त्यांच्या पाठीमागे हेडमास्तर अस म्हणून टिंगलच करीत.

काँग्रेसमधल्याच अनेक नेत्यांशी त्यांचे वाद होते. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील सहकारसम्राट व साखर लॉबीशी त्यांचा उभा दावा होता.

यशवंतराव चव्हाण यांच्या बागलबच्च्यांनी मराठवाड्याचा विकास होऊ दिला नाही असं शंकररावांच्या समर्थकांच म्हणणं होतं.

शंकरराव चव्हाणांची त्यांच्याच मंत्रिमंडळातील पाटबंधारे मंत्री असलेल्या वसंतदादा पाटलांसोबतची भांडणे प्रचंड गाजली.

दोघांचाही सिंचन विषयाचा अभ्यास मोठा होता. वसंतदादा पाटील शेतकऱ्यांशी नाळ जोडले गेलेले लोकनेते होते तर शंकरराव चव्हाण यांना आधुनिक भगीरथ अस म्हटलं जायचं. महाराष्ट्रातील जायकवाडी,अप्पर वर्धा, काळ, काळीसरार, अरुणावती, विष्णुपुरी अशी निम्म्याहून जास्त धरणे त्यांनीच उभी केली होती.

ऊसशेतीला पाणीपुरवठा असावा यावरून दोघांचे वाद होते.

या वादाची परिणीती शंकरराव चव्हाणांनी वसंतदादाना मंत्रिमंडळातुन वगळण्यात झाली. दुखावलेल्या दादांनी थेट राजकीय संन्यास घेत असल्याचे जाहीर केले.

शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले त्याच्या काहीच महिन्यांतच इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी जाहीर केली होती. आणिबाणी नंतर तर त्यांनी अधिकच कठोरपणे कारभाराला सुरुवात केली. महाराष्ट्रातील अनेक छोट्या-मोठ्या नेत्यांना गजाआड करण्यात आले.

पेपरवाल्यांनी त्यांना ‘अनुशासन शंकर’ असे नाव दिले.

आणीबाणीच्या काळात शंकररावांनी मंत्रालयाच्या कारभारात शिस्त आणली हे खरेच, पण त्यांच्या खाक्यामुळे घाबरून अधिकारी फायलींवर सह्याच करेनासे झाले. सर्वसामान्यांचा मंत्रालयातील वावर कमी झाला. लोकांची कामे होईनाशी झाली.

शंकरराव चव्हाणांच्या शिस्तीमुळे सरकारबद्दल जनतेच्या मनात उलट चीडच निर्माण झाली.

या सा-याचा एकत्रित परिणाम म्हणून १९७७च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला ४८पैकी २८ जागा गमावाव्या लागल्या.

काँग्रेससाठी हा धक्का जबरदस्त होता. साहजिकच शंकरराव-विरोधी लॉबीने उचल खाल्ली.

राजकारणात संन्यास घेऊन सामाजिक काम करण्यासाठी सांगलीला परत गेलेले वसंतदादा पाटील संन्यासीपदाची वस्त्रे कृष्णेत फेकून देऊन ‘काँग्रेसच्या घराला आग लागली’ अशी आरोळी ठोकत पुन्हा राजकारणाच्या रिंगणात उतरले. धडाक्यात त्यांचं स्वागत झालं.

मुंबईमध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत शंकरराव चव्हाणांचा प्रचंड टीका करण्यात आली. पराभवाचे खापर त्यांच्या डोक्यावर फोडण्यात आले. मुख्यमंत्रीपद गेलेल्या शंकरराव चव्हाणांनी पक्ष सोडला.

अस म्हणतात की या बैठकीत झालेला अपमान शांतपणे सहन करून शंकरराव चव्हाण घरी आले आणि थेट इंदिरा गांधींना फोनवर आपली पक्षातली घुसमट सांगितली. त्यांना देखील शंकररावांचं म्हणणं पटलं.

चक्क इंदिरा गांधींनी त्यांना काँग्रेस फोडून वेगळा पक्ष काढण्यास परवानगी दिली.

तो काळ राजकीय अनागोंदीचा होता. खुद्द इंदिरा गांधींना देखील काँग्रेस बाहेर हकलण्यात आलं होतं. इंदिरा काँग्रेस, रेड्डी काँग्रेस अशी अनेक शकले झाली होती. त्यातच शंकरराव चव्हाणांच्या महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस उर्फ मस्का काँग्रेसची भर पडली.

या पक्षात त्यांच्यासोबत नगरचे बाळासाहेब विखे पाटील देखील आले. त्यांना मस्का काँग्रेसचं अध्यक्षपद देण्यात आलं.

पण दुर्दैवाने १९७८च्या विधानसभा निवडणुकीत शंकराव चव्हाणांच्या पक्षाचे त्यांच्यासह आणखी दोनच आमदार निवडून आले. वसंतदादा पाटील यांच्या सरकारने या माजी मुख्यमंत्र्यांचा जमेल तितका पाणउतारा केला.

त्यांना मुंबईत आमदार निवासच्या छोट्या खोलीत राहावे लागले.

पुढे शरद पवारांनी वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून पुलोद सरकार स्थापन केले तेव्हा मस्का काँग्रेसदेखील या आघाडीत सामील झाली.

शंकरराव चव्हाणांना त्यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री पद मिळाले व त्यांचे राजकीय पुनर्वसन झाले.

काँग्रेस पक्ष सोडला तरी त्यांची इंदिरा गांधींच्या प्रति निष्ठा अभंग होती आणि याची इंदिराजींना देखील कल्पना होती. काही वर्षांनी शंकरराव चव्हाण यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून स्वगृही परतले. इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्यावर त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळाले.

जे मुख्यमंत्री पद अपमानित होऊन त्यांना सोडावे लागले होते तिथे त्यांची पुन्हा वर्णी लागली.

गांधी घराण्याच्या निष्ठेचा परिणाम म्हणून त्यांना केंद्रात गृह, संरक्षण, अर्थ मंत्रालयासारखी महत्वाची जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळाली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.