महाराष्ट्र सरकारने बनवलेल्या स्कुटरसाठी पाच-पाच वर्षे वेटिंग असायचं..

एक काळ होता आपल्या भरवश्याचा साथी म्हणून स्कुटरला ओळखलं जायचं. अख्ख ४ माणसाचं कुटुंब या स्कुटरवर बसू शकत होतं. स्टायलिश तरणी पोरं त्याकाळी पण बुलेट, जावा, यामाहा घेऊन हिंडायची, दूधवाला भैय्या राजदूत वरून यायचा. पण मिडल क्लास माणूस वाट बघीन पण स्कुटरच घेईन म्हणायचा.

बँका, सरकारी ऑफिस यांच्या बाहेर स्कुटर उभ्या केलेल्या दिसायच्या. लो मेंटेनन्स, जबरदस्त एव्हरेज आणि एकदम सुरक्षित असलेली स्कुटर प्रत्येकाची लाडकी होती.

यातही दोन ब्रँड फेमस होते. चेतक आणि प्रिया.

हमारा बजाज या दोन स्कुटरची विक्री करायचा. पण यातला एक ब्रँड बनवण्यात महाराष्ट्र सरकारचा हात होता. ऐकून धक्का बसला ना?

गांधीजींचे लाडके व स्वातंत्र्यसैनिकाचे घराणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बजाज यांनी फिरोदियांच्या साथीने पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये आपले ऑटो कारखाने उभारले होते राहिले.

जमनालाल बजाज यांच्यानंतर रामकृष्ण बजाज यांनी या कंपनीची सूत्रे सांभाळली होती. १९६५ साली बजाजची पुढची पिढी म्हणजे हार्वर्ड विद्यापीठातून मॅनेजमेंट शिकलेले राहुल बजाज यांनी कंपनीची सूत्र हाती घेतली. हा बजाजच्या बदलाचा नवीन टप्पा होता.

राहुल बजाजनी बजाजची स्वतःची स्कूटर बनवण्याचं स्वप्न बघितलं. इटलीच्या वेस्पाबरोबर बजाजने स्कूटर बनवण्याच्या तंत्रज्ञान सहकार्याचा करार केला. भारतीयांची स्वतःची १९७२ साली स्कूटर प्रत्यक्षात आली. तीला नाव देण्यात आलं बजाज चेतक.

चित्तोडच्या महाराणा प्रताप यांच्या घोड्याच्या नावावरून चेतकला नाव देण्यात आलं होत. ही गाडी प्रचंड चालली. व्हेस्पा वर बेस्ड असलेल्या या मॉडेलच्या यशानंतर बजाजला एक नवीन गाडी बनवायची होती.

तो काळ आणीबाणीचा होता. लायसन्सराजचे अनेक नियम लागू होते. बजाजला गाडी प्रोडक्शन वाढवण्यासाठी सरकारी परवानगीची गरज होती. केंद्रातून या परवानग्या मिळणे अवघड होते. अखेर राहुल बजाज यांनी महाराष्ट्र सरकारशी करार केला की दोघांनी मिळून एक कारखाना सुरु करू.

११ जून १९७५ रोजी महाराष्ट्र स्कुटर्स लिमिटेड या कंपनीचे रजिस्ट्रेशन करण्यात आले.

महाराष्ट्र सरकार तर्फे  पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळकडे या कंपनीचे २७ % शेअर्स होते तर बजाज कडे २४% टक्के शेअर्स होते. स्कुटरची निर्मिती महाराष्ट्र स्कुटर्सच्या ब्रँड खालीच केली जाणार होती. बजाज टेक्निकल सपोर्ट देणार होते.

माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या कर्मभूमीत म्हणजे साताऱ्यात महाराष्ट्र स्कुटर्सचा प्लांट उभा करण्यात आला. सातारा एमआयडीसी मध्ये ४७ एकरात उभ्या असलेल्या या कारखान्यात शेकडो स्थानिक हातांना काम मिळाले. एका वर्षात या कारखान्यातून २४,००० स्कूटरची निर्मिती सुरु झाली.

साताऱ्यात तयार होणाऱ्या या स्कुटरच नाव देण्यात आलं होतं प्रिया.

प्रियादेखील चेतक प्रमाणे १५० सीसीची होती मात्र त्यात चेतक पेक्षाही काही छोटेमोठे बदल करण्यात आले होते. ती थोडी उंच होती, हेडलाईट, टेललाईट पासून लूक बदलला होता. स्पीडोमीटर देखील वेगळं होतं. ही गाडी जास्त सुटसुटीत होती. किफायतशीर होती. प्रिया स्कुटरवर देखील लोकांच्या उड्या पडल्या.

या गाडीची  त्याकाळी ७ हजार ८५० रुपये इतकी होती. फक्त ३६ रुपयात पेट्रोल टाकी फुल करून महिना महिना गाडी चालवणारे महाभाग त्याकाळी होते.

चेतकपाठोपाठ प्रियाने मार्केटमध्ये एवढी हवा केली की बाकीच्या गाड्या स्पर्धेतून बाहेर फेकल्या गेल्या. संपूर्ण भारतात फक्त या दोनच स्कुटरची हवा होती. अगदी दिल्लीच्या राजपथ पासून ते गल्ली बोळात धावणाऱ्या प्रत्येक दोन स्कुटरपैकी एक महाराष्ट्राची प्रिया असायची.

लायसन्स राज मुळे गाड्यांचे प्रोडक्शन किती करावे यावर लिमिट असायचं.  त्याकाळी या स्कुटरसाठी ५ वर्षे १० वर्षे इतकी वेटिंग लागू लागली. हुंड्यात स्कुटर दिली नाही तर लग्न मोडू लागली. प्रियाच्या बुकिंग साठी पार मुख्यमंत्र्यांपर्यंत वशिला लावला जाऊ लागला.

१९७६ ते १९९२ हा काळ प्रिया स्कुटरने गाजवला. पण हळूहळू सरकारचे या स्कुटर कडे दुर्लक्ष होऊ लागले. सरकारी अधिकाऱ्यांचा गोंधळ, त्यांचे घोटाळे यामुळे कारखाना प्रोफेशनली चालवला जात नाही असे आरोप बजाज करू लागले. दोन्ही पार्टींमध्ये भांडणे होऊ लागली.

दोघांच्यात कंपनीच्या शेअर्स वरून कोर्टकचेऱ्या देखील सुरु झाल्या. नव्वदच्या जागतिकीकरणानंतर स्कुटरच मार्केट कमी झालं होतं. प्रिया स्कुटरच प्रोडक्शन थांबलं तस महाराष्ट्र स्कुटरदेखील डळमळली.

१ एप्रिल २००६ पासून महाराष्ट्र स्कुटरमध्ये बजाजने स्कुटरच प्रोडक्शन पूर्णपणे थांबवलं. तिथे आता टू व्हिलर गाड्यांसाठी लागणारे स्पेअर पार्टस बनत होते मात्र काही दिवसांनी हे सुद्धा बंद पडले.काही वर्षांपूर्वी बजाजने न्यायालयातील लढाई जिंकली व महाराष्ट्र सरकारचे शेअर्स विकत घेतले व आता ही कंपनी पूर्णपणे बजाज यांच्या मालकीची आहे. 

पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे माजी संचालक श्री अरुण गोडबोले यांनी बोल भिडूशी बोलताना सांगितलं की,

“प्रिया स्कुटर हा बजाजचा नाही तर पूर्णपणे महाराष्ट्र स्कुटर्सचा ब्रँड होता. या कारखान्यामुळे जवळपास हजार जणांना नोकऱ्या मिळाल्या होत्या पण गेल्या काही वर्षांपासून हि सर्व मंडळी बेरोजगार झाली. हा कारखाना  परत सुरु व्हावा यासाठी आम्ही मुख्यमंत्र्याना पत्रव्यवव्हार देखील केला होता. “

गेल्या काही दिवसांपासून आमदार शिवेंद्रराजे यांनीदेखील सातारा इथल्या बंद पडलेल्या कारखान्यात पुन्हा स्कुटरची निर्मिती सुरु व्हावी यासाठी प्रयत्न सुरु केलेले आहेत. बजाज आता चेतकचे इलेक्ट्रिक मॉडेल बाजारात आणत आहे त्याप्रमाणे प्रियाचेही आणेल अशीच अपेक्षा प्रियाचे जुने फॅन्स व्यक्त करताना दिसत आहेत.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. समाधान खोचरे says

    करून गोडबोले हे सातार्याचे लेखक. त्याच युनायटेड वेस्टर्न बँक उदय उत्कर्ष आणि अस्त हे खुपचं छान पुस्तक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.