प्लॅन तयार झालाय. ठाकरे सरकार मन्थएन्डपर्यंत १००% व्हॅक्सिनेशनचं टार्गेट पूर्ण करणार..

नेहमी आपल्या भाषणांनी फेमस असणारे इंदोरीकर महाराज आज म्हणाले कि

मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही. करोनावर एकच औषध आहे मन खंबीर ठेवा

आता महाराज काहीही म्हणोत तिकडे सरकारने प्रत्येकाला लस द्यायचं ठरवलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली कि, फक्त २७९ दिवसांमध्ये आपल्या देशाने १०० कोटी लसींचा आकडा पूर्ण केला आहे. हा लसीकरणाचा आकडा गाठून देशाने एक अनोखा रेकॉर्ड आपल्या नावे केलाय.

आता तसं पाहिलं तर आपल्या देशाची लोकसंख्या १३८ कोटीच्या आसपास आहे. तर २० ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार १०० कोटी लसींचा आकडा समोर आला. ज्यात सिंगल डोस घेणारे आणि डबल डोस घेणारे अश्या दोन्ही लोकसंख्येचा समावेश आहे.  आता या १० ते १२ दिवसांमध्ये लस घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. 

पण माहितीनुसार, अजूनही देशातील मोठ्या लोखसंख्येने लसीचा एकही डोस घेतलेला नाही. अशीच काहीशी परिस्थिती महाराष्ट्रातही आहे. त्यात तिसऱ्या लाटेची शक्यता जरी सध्या दिसत नसली तरी भविष्यातील खबदारी म्हणून एक तरी लसीचा डोस घेतला जावा यासाठी आता राज्य सरकारनं पाऊल उचललं आहे.  

या महिन्या अखेरपर्यंत म्हणजेचं ३० नोव्हेंबरपर्यंत लसीकरणासाठी पात्र असलेल्या सगळ्या नागरिकांना कमीत कमी लसीचा पहिला डोस तरी दिला जावा, या अर्थानं राज्य सरकारं तयारी करत आहे.  

मोठ्या संख्येने या महिन्याच्या प्रत्येक दिवशी कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याची राज्याची तयारी आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे १०० टक्के लसीकरण करण्यावर भर देण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. एवढंच नाही तर नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील लसीकरणाचा आढावा घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर  मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासोबत संवाद साधला. या बैठकीस सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम , डॉ. संजय औक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित आदी उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान, उद्धव ठाकरे म्हणाले कि, 

करोनाची साथ अजूनही संपलेली नाही. अश्यात ज्यांनी लस घेतली आहे त्यांना संसर्गाची खूप कमी भीती आहे, आणि सिद्ध देखील झालं आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील टाळाटाळ न करता पुढाकार घेऊन लसीचे दोन्ही डोस घेण्यास प्राधान्य द्यावे. 

एवढंच नाही जिल्ह्याधिकाऱ्यांना आदेश देताना मुख्यमंत्री म्हणाले, आपापल्या जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, समाजातील सगळ्या स्तरावरच्या आणि धर्मच्या लोकांना या व्हॅक्सिनेशन प्रोग्रॅममध्ये सहभागी करून घ्या.

यासोबतच उद्धव ठाकरे यांनी चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कि, करोना संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. पण तरी सुद्धा नागरिकांनी बेफिकीर राहू नये. यासाठी कोरोना चाचण्यांचे प्रमाणही कमी व्हायला नको. त्यात वाढ कशी करता येईल यावर भर दिला गेला पाहिजे. यासाठी राज्यातील वेगवगेळ्या भागात टेस्टिंग लॅब सुरु केल्या आहेत.  

लस घेण्याबरोबरच करोना सुसंगत वर्तन ठेवण्यासाठी सतत जनजागृती मोहीम राबवली गेली पाहिजे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर थिएटर सुरू केली जात आहेत. त्यामुळे प्रत्येक थिएटरमध्ये लसीकरणाबाबत संदेश दाखविण्यात यावेत. 

 सोबतच आणखी पर्यायांचा देखील अवलंब करण्यात यावा, लसीकरण मोहिमेत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सहभाग घ्यावा. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर यांना लसीच्या दोन्ही मात्रा अनिवार्य करण्यात याव्यात. डोंगरी भागात मोबाइल युनिटच्या माध्यमातून लसीकरण करण्यात यावे, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

आता राज्यात गेल्या २४ तासातल्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर,  राज्यात दिवसभरात करोनाच्या १०७८ नव्या रुग्णांची नोंंद झाली, तर ४८ जणांचे मृत्यू झाले. त्यासोबतच दिवसभरात १०९५ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. 

 तर आतापर्यंतची एकूण आकडेवारी जर पहिली तर संक्रमितांचा आकडा ६६ लाखाच्या आसपास आहे. तर या आजाराने आतापर्यंत राज्यात जवळपास दीड लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.  

हे ही वाचं भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.