आदित्य ठाकरेंचे जीवलग ते भाजपकडून विधानसभा अध्यक्ष असा आहे राहुल नार्वेकरांचा प्रवास
“राहुल नार्वेकर कुठेही गेले, तरी पक्ष नेतृत्वाला फार जवळ करतात. शिवसेनेत गेल्यावर आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीत मला आणि भाजपमध्ये गेल्यावर फडणवीसांना त्यांनी जवळ केलं. आता एकनाथ शिंदे तुम्हीही जवळ करा, नाहीतर काही खरं नाही.” ही वाक्य आहेत माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची. विधानसभा अध्यक्षपदी भाजपच्या राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनपर भाषणात ते बोलत होते.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर या नव्या सरकारची पहिली परीक्षा होती ती म्हणजे अध्यक्षपदाची निवडणूक. या निवडणुकीत भाजपनं राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली होती, तर महाविकास आघाडीनं शिवसेनेच्या राजन साळवी यांना उमेदवारी दिली होती.
निवडणुकीत शिंदे सरकारनं बाजी मारली, राहुल नार्वेकरांना १६४ मतं मिळाली, तर राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली. या निवडणुकीत एमआयएम आणि समाजवादी पक्षाचे आमदार तटस्थ राहिले.
पण राज्यात स्थापन झालेल्या नव्या सरकारला पहिली लढाई जिंकून देणारे राहुल नार्वेकर आहेत कोण..?
देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन करताना सासरे-जावई नात्यावर टिपण्णी केली, कारण नार्वेकरांचे सासरे रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे सभापती आहेत.
राहुल नार्वेकर हे सध्या भाजपचे आमदार असले, तरी त्यांचा राजकीय प्रवास शिवसेना ते राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी ते भाजप असा राहिला आहे.
त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा आरंभ केला तो शिवसेनेतून. त्यांचे वडील सुरेश नार्वेकर हे कुलाब्यातून नगरसेवक होते. तर त्यांचे भाऊ मकरंद नार्वेकर आणि वाहिनी हर्षिता नार्वेकर सध्या नगरसेवक आहेत.
राहुल नार्वेकर हे पेशानं वकील आहेत, शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रवक्ते म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. तब्बल १५ वर्ष ते शिवसेनेत कार्यरत होते. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कोअर टीममधले सदस्य म्हणूनही नार्वेकर परिचित होते. सोशल मीडिया आणि माध्यमांशी संवाद साधण्यासोबतच शिवसेनेची कायदेशीर बाजूही त्यांनी अनेकदा सांभाळली.
मात्र २०१४ मध्ये त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला.
तेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि मावळ मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळाली. तिथं शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. अध्यक्षपद निवडणुकीनंतर बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘२०१४ मध्ये नार्वेकर यांच्याशी आमचं बोलणं झालं होतं. त्यांनी मागणी केलेली की जर निवडणुकीत पराभूत झालो, तरी मला दुसरीकडे संधी मिळेल. आम्हीही जावईहट्ट पुरवला.’
२०१४ मध्ये राष्ट्रवादीकडून त्यांना विधानपरिषदेवर संधी मिळाली होती. राष्ट्रवादीनं त्यांना प्रवक्ते म्हणूनही जबाबदारी दिली होती.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ते भाजपकडून रिंगणात उतरले. कुलाबा मतदारसंघात त्यांचा मुख्य सामना होता तो मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्याशी. तगडी लढाई असतानाही नार्वेकर यांनी १६ हजार १९५ मतांनी मोठा विजय मिळवला. पुढं त्यांना भाजपचे मीडिया इनचार्ज म्हणून जबाबदारी मिळाली.
कायद्याच्या अभ्यासाच्या जोरावर त्यांनी पाहिल्याच टर्ममध्ये विधानसभा गाजवली. त्यानंतर राज्यात सत्तापालट झाल्यानंतर आता वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी त्यांच्यावर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
मोठ्या सत्तानाट्यानंतर शिंदे गट आणि भाजपचं सरकार सत्तेत आलं आहे. बंडखोर आमदारांची पात्रता, व्हीपची चर्चा आणि सोमावरी होणारी बहुमत चाचणी पाहता नार्वेकर यांच्यावर जबाबदारी आणि त्यांच्यापुढची आव्हानंही मोठी आहेत.
हे ही वाच भिडू:
- शिवसेना कुणाची ? या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…
- दोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील?
- वस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…