महाराष्ट्रातल्या या गावात हनुमानाचं नाव घ्यायलाही लोक घाबरतात!

आम्ही एकटेच किर्रर्र अशा अंधारातून निघालो. कुठंतरी फसलो. घाबरलो. भुत आहे असं वाटून अंगाला पार घाम फुटला. बोबडी वळली. तेव्हा आमच्या तोंडातून देवाचं नाव निघतं. या देवांमध्ये सगळ्यात जास्त घेतलं जाणारं नाव म्हणजे हनुमान.

हनुमान, मारूती, बजरंगबली, पवनसुत असे कितीतरी हनुमानाचे नाव आहेत. हनुमान म्हणजे शंकराचा अवतार, रामाचा निस्मीम भक्त, ब्रम्हचारी, धिप्पाड, बलशाली, राक्षसांचा कर्दनकाळ, देवाचा तारणहार, तर पैलवान लोकांचा मसिहा. सामन्य लोकांचा संकटमोचक.

जवळपास भारतातल्या प्रत्येक गावात हनुमानाचं मंदिर आहे. त्यांची मनोभावे सेवा केली जाते. हनुमानाचा जप तप केला जातो. हनुमानाला पुजलं जातं. मात्र भिडूंनो महाराष्ट्रात असं एक गाव आहे. ज्या गावात हनुमानाचं नाव जरी घ्यायचं म्हणलं तर लोकांची फाटते. तिथं मंदिर असण्याचा विचारच करू नका. त्याच गावाबद्दल तुम्हाला आम्ही आज सांगतोय.

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यापासून अगदी २० ते २५ किलोमीटर अंतरावर दैत्यनांदुर नावाचं गाव आहे. त्या गावात जो संकटमोचक आहे, लोकांचा रक्षणकर्ता आहे त्या हनुमानाचं नाव घ्यायलाच गावातील लोक घाबरतात.

दैत्यनांदुरचे लोक या पाठीमागं एक आख्यायिका सांगतात,

या गावात निंबा नावाच्या दैत्यांचं राज्य होतं. तो दैत्य रामाचा निस्सीम भक्त होता. रोज रामाची मनोभावे सेवा करायचा. श्रीराम सितेच्या शोध घेण्यासाठी निघाले असतांना या गावी येतात. या गावात मु्क्काम करतात. दैत्याची सेवा पाहुन श्रीराम त्यांच्यावर प्रसन्न होतात आणि दैत्य राजाला आशिर्वाद देतात. या गावात लोक तुलाच कुलदैवत समजतील तुच यांचा देव असशील.

हे जेव्हा हनुमानाला समजतं तेव्हा तो रागवतो. एक दैत्य रामाचा कसा भक्त असू शकतो. यावरून निंबा दैत्य राजा आणि हनुमानामध्ये युद्ध होतं. आणि या युद्धात निंबा दैत्य राजा हनुमानाला हरवतो.

त्यामुळे तेव्हापासून या गावात निंबा दैत्य राजाची पुजा केली जाते. मात्र ही दंतकथा असली तरी लोक या गोष्टीचं तंतोतत पालन करतात. विश्वास ठेवतात आणि येणाऱ्या पिढीला ही आख्य़ायिका सांगतात.

नांदूर निंबा दैत्य किंवा दैत्य नांदूर म्हणून या गावाला ओळखलं जातं. गावाच्या मध्यभागी निंबादैत्य महाराजाचं दगडात कोरलेलं प्राचिन असं मंदिर आहे. हेच मंदिर  या गावातील लोकांचं कुलदैवत आहे. गुढीपाडव्याला दोन- तीन दिवस निंब दैत्य महाराजांची मोठी यात्रा भरते. तेव्हा आजपासच्या गावाकऱ्यांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते.

महत्वाचं म्हणजे या गावातील गावकरी सांगतात,

आमच्या गावात एकाही माणसाचं, पोराचं नाव हनुमान, मारूती, बजरंगबली नाही. तसंच कोणीच हनुमानाचं नाव गावामध्ये घेत नाही.

नाव घ्यायला काही हरकत नाही. मात्र आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांनी हनुमानाचं नाव घेतलंय त्या लोकांना वाईट अनुभव आलेला आहे. त्या भितीपोटी नाव घ्यायचं किंवा ठेवायचं कोणी धाडसच करत नाही.

काही दिवसापुर्वी या गावात मारूती नावाची कार आली होती. मात्र तीचं नाव मारूती असल्यामुळं ती बंद पडली. तीच्यात बिघाड झाला. नेमका कशामुळे बिघाड झाला हे माहित नाही मात्र कारचं नाव मारूती असल्यामुळेच ती बंद पडली. निंबा दैत्याचा त्या गाडीवर कोप झाला. असं गावकरी सांगतात. मात्र या सगळ्या गोष्टींना ठोस असा पुरावा नाही.

पिढ्यांन पिढ्या हे चालतं आलेलं आहे. त्यामुळे त्याविरोधात जायचं किंवा बोलायचं धाडस कोणी करत नाही. हनुमानाचं नाव घेण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. निंबा दैत्य हेच आमचं जागृत दैवत आहे. त्याचीच आम्ही पुजा करत राहू, असं गावकरी सांगतात.

Leave A Reply

Your email address will not be published.