हातवारे करणाऱ्या आमदारावर कारवाई झाली पण बाळासाहेब ठामपणे पाठीशी उभे राहिले

आजपासून राज्यात हिवाळी अधिवेशन सुरु झालंय. हिवाळी अधिवेशन म्हंटल कि कशी गुलाबी थंडी असते. सगळे नेते मंडळी मफलर, स्वेटर गुंडाळून असतात. थंडी वाढली की हुडहुडी भरते. पण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसानं वातावरण तापलंय.

ते अशामुळे की,

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली.

या नकलीचा परिणाम भाजपच्या सदस्यांनी विधानसभा डोक्यावर घेतली. पंतप्रधानांविषयी अशाप्रकारे अंगविक्षेप करुन बोलताना लाज वाटली पाहिजे असं म्हणतं, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांच्या निलंबनाची मागणी केली. पुढे जाधवांनी माफी मागितली खरी, पण या घटनेवरून छगन भुजबळांचा असाच हातवारे करण्याचा एक किस्सा आठवला. 

तर किस्सा आहे ९० च्या दशकातला. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तीच मुळात रस्त्यावर उतरलेल्या मराठी माणसाला आवाज मिळवून देण्यासाठी. शिवसैनिकांनी अन्यायाविरुद्ध आंदोलने केली, प्रसंगी राडा केला आणि मराठी अस्मितेसाठी अंगाराप्रमाणे झुंजणारी संघटना म्हणून शिवसेना नावारूपाला आली.

हा शिवसैनिकांचा धगधगता आवाज सर्वप्रथम विधानसभेत घुमवला छगन भुजबळ यांनी.

मुंबईच्या भायखळा भाजी मार्केटमध्ये एकेकाळी भाजी विकणारा हा तरुण. VJTI कॉलेजमधून डिप्लोमा इंजिनीअर बनला. कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष असलेल्या छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून बाळासाहेबांच्या विचारांचा भगवा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला.

सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्नाना बेधडकपणे सडेतोड ठाकरी भाषेत तोंड फोडण्याचे संस्कार छगन भुजबळ यांच्यावर देखील झाले. भुजबळांची आक्रमकता पाहून बाळासाहेबांनी त्यांना पहिल्या फळीत घेतलं. शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांपैकी एक म्हणून त्याची ओळख झाली. आणि काळाच्या ओघात भुजबळ आमदार झाले.

१९८५ साली सेनेच्या अनेक उमेदवारांनी जागा लढवल्या पण फक्त छगन भुजबळांनी विजय मिळवला. अख्ख्या सभागृहात बाळासाहेबांचा वाघ एकच होता मात्र त्याच्या एकाच्याच गर्जनेने विधानसभा हादरून जाऊ लागली. भुजबळांनी विधानसभेत विरोधी पक्ष कसा असतो हे पहिल्यांदा दाखवून दिलं. भुजबळ हे हाडाचे शिवसैनिक होते. त्यांनी ठाकरी शैली विधानसभेत पहिल्यांदा दाखवली.

या काळात एकदा अमरावती येथे दुर्गापुजेवरून दंगल झाली होती. छगन भुजबळ यांनी सेना स्टाईलमध्ये या प्रश्नाला नागपूरच्या अधिवेशनात वाचा फोडली. त्यावेळी बोलताना त्यांनी 

या अल्पसंख्यांच्या प्रश्नच एकदाचं काय ते…करून टाका 

अस वक्तव्य केलं. मात्र हे बोलताना त्यांनी हाताच्या मुठी आवळून एक विशिष्ट एक्शन केली. सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाने त्यावर आक्षेप घेतला. वातावरण तापलं. तेव्हाचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण देखील क्रुद्ध झाले. छगन भुजबळ यांचे वक्तव कामकाजातून काढावे तर त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले नव्हते पण तसे हावभाव केले होते. सगळ्यांचीच पंचाईत झाली.

अखेर सभापतींनी त्यांना १५ दिवसांसाठी सस्पेंड केलं. सभागृहात मार्शल बोलवण्यात आले त्यांनी भुजबळांना ओढून बाहेर नेलं.

त्याकाळात आमदारांच्या निलंबनाचे प्रसंग खूप कमी असायचे. भुजबळ भीत भीतच बाळासाहेबांना भेटले मात्र त्यांनी आगे बढो म्हणून आशीर्वादच दिला. त्यानंतर मात्र भुजबळांची गाडी विधानसभेत सुपरफास्ट सुटली.

एकदा तर बोलण्यासाठी बंदी घालण्यात आली तेव्हा फक्त हातवारे करुन भाषण करण्याचा पराक्रम देखील त्यांनी केला. खरा विरोधी पक्षनेता कसा असावा हे छगन भुजबळ यांनी दाखवून दिल.

हा किस्सा छगन भुजबळ यांनी विधीमंडळाचा स्मृतिगंध या पुस्तकात सांगितला आहे.

हे हि वाच भिडू :

webtitle : Maharashtra winter assembly session : Balasaheb Thackeray stands with suspended Chhagan Bhujbal

 

   

 

Leave A Reply

Your email address will not be published.