तेलंगणाच्या ‘SHE TEAM’ च्या धर्तीवर महाराष्ट्राचं निर्भया पथक तयार झालं

७३ व्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून मुंबईमध्ये निर्भया पथकाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. समाजकंटक, महिलांची छेड काढणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणारे हे पथक मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात येत आहे.

हे पथक मुंबईमधील ९१ पोलीस स्थानकांमध्ये सक्रीय असणार आहे. हे पथक प्रोअ‍ॅक्टीव्ह आणि रिअ‍ॅक्टीव्ह दोन्ही पद्धतीचं पोलिसिंग करणार आहे. प्रो अ‍ॅक्टीव्ह म्हणजेच तक्रारीऐवजी स्वत:हून दखल घेत कारवाई करणारं आणि रिअ‍ॅक्टीव्ह म्हणजेच तक्रारींवर आधारित कारवाई करण्याचं काम करेल. क्यूआर कोड बेस पोलिसिंगचा एक प्लॅन या पथकाकडे देण्यात आलाय.

तसेच जनजागृती आणि शिक्षण देण्याचंही काम पथकाकडून केलं जाईल. शाळा कॉलेजमध्ये जाऊन कार्यक्रमांच्या माध्यमामधून सुरक्षित वातावरण तयार करण्याचं काम हे पथक करेल. सुरक्षित असल्यासंदर्भातील भावना वाढणं हे या पथकाकडून अपेक्षित आहेत.

आज निर्भया पथक लोकांनी काय नव्याने ऐकलं नाही. याआधी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक असताना विश्वास नांगरे-पाटील यांनी महिला सुरक्षिततेसाठी निर्भया पथकाची दिनांक ८ ऑगस्ट २०१६ रोजी स्थापना केली. निर्भया पथकाच्या स्थापनेमुळे कोल्हापूर परिक्षेत्रात महिलांच्या छेडछाडीचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली.

पण या निर्भया पथकाची मूळ संकल्पना तेलंगणा राज्य पोलिसांच्या “SHE TEAM” च्या धर्तीवर आहे.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी काम करणाऱ्या तेलंगणा सरकारच्या SHE TEAM या पथकामुळे अनेक गुन्हेगारांना घाम फुटतो. जेव्हा महिलांच्या अत्याचारात वाढ होत होती तेव्हा तेलंगणच्या वूमन सेफ्टी विंगच्या हेड पोलीस अधिकारी स्वाती लाक्रा यांनी SHE TEAM आणि ट्रस्ट सेंटर तयार केले. SHE TEAM ची सुरुवात २४ ऑक्टोबर २०१४ मध्ये करण्यात आली. या मोहिमेचा उद्देश मुली आणि महिलांना संरक्षण प्रदान करणे हा होते.

हि SHE TEAM तेलंगाना पोलिसांचीच एक विंग आहे, जी पाच लोकांच्या छोट्या-छोट्या समूहांमध्ये काम करते. हैदराबादच्या गर्दीच्या सार्वजनिक भागात हि टीम प्रामुख्याने काम करते. टीमचे काम जलद कारवाई करण्याचे आहे. जर एखादी व्यक्ती घटनास्थळी महिलांची छेडछाड किंवा महिलांचा पाठलाग करत असेल तर त्याठिकाणी जाऊन संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याचे काम ही टीम करते. पुढच्या दोनच वर्षात महिलांच्या छेडछडीच्या घटना या टीममुळे कमी झाल्याच एका सर्वेक्षणात आढळून आलं.

या टीममुळे महिलांचा आत्मविश्वासही वाढला त्यामुळेच सर्व देशभरातून या मोहिमेचे कौतुक करण्यात आलं.

या “SHE TEAM” च्या धर्तीवरच विश्वास नांगरे-पाटील यांनी महिला सुरक्षिततेसाठी निर्भया पथकाची स्थापना केली. त्यावेळी महाराष्ट्रात फोन कॉल, मेसेज, ई-मेल, सोशल मीडियाचा वापर करुन किंवा प्रत्यक्षरित्या महिलेची छेड काढली जात होती. अशा वेळी महिलांना विनाविलंब पोलिसांची मदत उपलब्ध करून देऊन तिच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, महिला शाळकरी मुलींच्या छेडछाडीकडे होणारे दुर्लक्ष व त्यातून अपराध्यांचे वाढणारे बळ यांवर प्रभावी नियंत्रण आणणे, पुरुषांना विशेषत: तरुणांना त्यांच्या गैरवर्तनाची समुपदेशनातून जाणीव करून देणे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीने त्यांना सुधारण्याची संधी देण्याच्या उद्देशाने कोल्हापूर परिक्षेत्रात विश्वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतून निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली.

कोल्हापूर परिक्षेत्रात कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा व पुणे या जिल्ह्यात निर्भया पथकाच्या माध्यमातून काम आजही सुरु आहे. जिल्हा पातळीवर जिल्हा पोलीस अधीक्षक आणि शहरी भागामध्ये पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाचं काम चालतं. प्रत्येक जिल्ह्यात पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्यावर पोलीस उपअधीक्षकांचे नियंत्रण आहे.

निर्भया पथकात प्रत्येक टीममध्ये सहायक पोलीस निरीक्षक किंवा पोलीस उपनिरीक्षक दर्जाची एक महिला अधिकारी असते. त्यांना मदत करण्यासाठी दोन महिला पोलीस हवालदार आणि दोन पुरुष पोलीस हवालदार असतात. त्यांची नेमणूक तीन महिन्याकरीता असते. निर्भया पथकातील टीमचे अस्तित्व नागरिकांकरीता गोपनीय ठेवण्याकरीता ही टीम खाजगी वेशात वावरते. आरोपीवर वस्तुनिष्ठ नियंत्रण ठेवण्यासाठी टीम सोबत स्पाय कॅमेराही असतो.

निर्भया पथकातील टीमला जिल्हास्तरावर किमान तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणामध्ये महिलांचे समाजातील स्थान, त्यांच्यावरील अत्याचार वा छेडछाड, त्यातून त्यांच्यावर होणारे शारीरिक, मानसिक आघात व त्यांवर उपचार तसेच महिलांबाबत कायदेशीर तरतूदींचे सखोल मार्गदर्शन दिले जाते.

या पथकाच्यावतीने पहिल्यांदा महिला अथवा तरुणींची छेडछाड होण्याची शक्यता असणारी ठिकाणे शोधून काढण्यात येतात. त्यामध्ये शाळा, महाविद्यालये, बस स्थानक, बाजारपेठा, महिला वसतीगृहे, सिनेमा हॉल, उद्याने इत्यादीचा समावेश असतो. निर्भया पथक अशा ठिकाणांची टेहाळणी करुन उडाणटप्पू मुले, तरुण, पुरुषांचा शोध घेते.

टीम सोबत असलेल्या स्पाय कॅमेरा, स्मार्टफोनचा कॅमेरा किंवा छुप्या कॅमेऱ्याच्या मदतीने त्यांच्या छेडछाडीच्या संशयास्पद हालचालीचे चित्रीकरण केले जाते. चित्रीकरणाच्या आधारे सदर संशयिताला ताब्यात घेऊन स्थानिक पोलीस स्टेशनला नेण्यात येते. गुन्हा घडते वेळी हजर साक्षीदार सामाजिक जबाबदारीतून स्वतःहून तपासाच्या प्रक्रियेत सहभागी होत असल्यास त्यांची साक्ष नोंदविली जाते.

संबंधितांने केलेल्या कृत्याचे स्वरूप लक्षात घेता त्यानुसार उचित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येतो. पोलीस आवश्यकतेनुसार न्यायालयात दोषारोपपत्र सादर करतात किंवा अल्पवयीन अपराध्याला समज देवून पालकांच्या ताब्यात दिले जाते. आरोपी वर गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित आरोपींचे समुपदेशन केले जाते. घडलेल्या घटनेचे परिणाम गंभीर होऊ नयेत वा त्याची व्याप्ती वाढू नये, यासाठी त्यांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवून आणण्याकरीता समुपदेशन करण्यात येते. 

आता मुंबईत सुरु करण्यात आलेल्या  निर्भया पथकाची मदत १०३ हा हेल्पलाईन नंबर डायल केल्यानंतर मिळणार आहे. 

हे ही वाच भिडू. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.