या निवडणुकीमुळे एक कळलं राज्यात ५४ हजार पदवीधरांना साधं मतदान करता येत नाही

राज्यात आज विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे निकाल लागले. यात पदवीधर साठी तिन्ही मतदारसंघ मिळून तब्बल ६४ टक्के इतके भरघोस मतदान झाले. तर शिक्षकसाठी दोन्हीकडे मिळून ७२ टक्के मतदान पार पडले.

इतर सामान्य परिस्थितीमध्ये देखील इतके मतदान होत नाही.

पण सध्या कोरोनाचा काळ चालू असून देखील चांगले मतदान झाल्याने उच्च शिक्षित मतदारांबद्दल समाधान व्यक्त केले गेले.

पण आज निकाल लागला आणि याच शिक्षक आणि पदवी बहाद्दरांनी आपण किती उच्च शिक्षित आहोत हे दाखून दिले.

त्याच कारण मतमोजणी करताना मोठ्या प्रमाणात बाद झालेली मत. लोकशाहीमध्ये एक एक मत किती महत्वाच असत हे अनेकदा दिसून आलय. अटल बिहारी वाजपेयींचे सरकार एका मताने पडले होते. पण इथे मात्र हजारोंनी मत बाद ठरली.

राज्यातील,

पुणे पदवीधर मतदारसंघात एकूण २ लाख ४७ हजार ६८७ मतदारांनी मतदान केले. त्यापैकी २ लाख २८ हजार २५९ मत वैध ठरली. तर उच्च शिक्षित पदवीधरांची १९ हजार ४२८  इतकी मत अवैध ठरली.

मराठवाडा पदवीधरसाठी एकूण २ लाख ४१ हजार ९०८ इतके मतदान झाले. त्यापैकी २ लाख १८ हजार ८१६ मते वैध ठरली तर तब्बल २३ हजार ९२ मते बाद ठरली.

नागपूर पदवीधरसाठी पाचव्या फेरीअखेर एकूण १ लाख ३३ हजार ५३ मतांपैकी १ लाख २१ हजार ४९३ मते वैध ठरली. तर तब्बल ११ हजार ५६० मत अवैध ठरली.

पुणे शिक्षक मतदार संघासाठी ५२ हजार ९८७ इतके मतदान झाले होते. त्यापैकी ५० हजार २२६ मते ही वैध तर २ हजार ७८४ मते ही बाद ठरली.

अमरावती शिक्षक मतदार संघासाठी ३०,८६९ हजार  मतदान झाले होते. त्यापैकी ४८८ मते ही बाद ठरली.

अशा प्रकारे तीन पदवीधर मतदारसंघात जवळपास ५४ हजार ०८० बहाद्दरांना मतदानच नीट करता आलेले नाही.

मार्कशीट वर पैकीच्या पैकी मार्क घेणार्यांना नुसत १,२,३ अस लिहिता आलेलं नाही. कोणी मतपत्रिकेवर सही केली, कोणी अक्षरात लिहिल, तर कोणी कंडोम, मराठा आरक्षण, वीज बील असं पण मतपत्रिकेवर लिहिले आहे.

असाही दावा केला जातोय की मुद्दाम अशाप्रकारे मतदान बाद करण्यात आलं. त्याचा निश्चित आकडा नसला तरी असाही दावा आहे की ४० हजारांच्या दरम्यान अशी मते असावीत. पण मत बाद म्हणजे बाद. कोणी काय लिहलं आणि किती जणांनी लिहलं याला मतगणनेत स्थान नाही. 

मत अवैध का ठरवली जातात ?

मतमोजणी करताना मतपत्रिकेवरील नोंदवलेला क्रमांक योग्य आहे का, मतदान हे निवडणूक आयोगाने दिलेल्या पेनद्वारेच नोंदविले आहे का, मतपत्रिकेवर काही लिहिले तर नाही ना, दोन उमेदवारांना एकच क्रमांक दिला आहे का, अशा अनेक बाबी तपासल्या जातात. तसे नसल्यास ती मतपत्रिका बाद ठरवली जाते आणि एक मत बाद होते.

कसं करायचं असत मतदान..?

निवडणूक आयोगाने पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी मतदान करताना एक प्रक्रिया ठरवून दिली आहे. त्यानुसार, मतदान करताना मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभ‌ळ्या शाईच्या स्केच पेननेच मत नोंदवावे लागते.

इतर कोणत्याही प्रकारच्या पेनचा वापर करता येत नाही.

तुमच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील पसंती क्रमांक नोंदवावा लागतो, रकान्यात मराठी, इंग्रजी किंवा रोमन पद्धतीनुसार १ हा अंक लिहून मत नोंदवावे आणि हे केवळ १,२,३  अशा अंकात/आकड्यात नोंदवाव. विशेष म्हणजे इथे रोमन मध्ये तर सर्व क्रमांक रोमन मध्येच टाकावे लागतात. एक आकडा मराठीत, दूसरा रोमनमध्ये असे टाकून चालत नाही.

एक, दोन, तीन इत्यादी अशा अक्षरी/ शब्दात नोंदवू नये असा नियम आहे .

उमेदवारांची संख्या विचारात न घेता मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहेत. तितके पसंतीक्रमांक नोंदवू शकतात. एका उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात एकच पसंती क्रमांकाचा अंक नोंदवावा लागतो. तो पसंती क्रमांक इतर कोणत्यही उमेदवारासमोर नोंदवता येत नाही. तसेच पसंतीक्रमांक केवळ एकाला देखील देता येतो.

हे ही वाच भिडू. 

2 Comments
 1. निलेश says

  मत बाद का झालेत???
  कारण काही voter ने लिहिले की आधी आरक्षण मग मतदान
  काहींनी आधी अनुदान मग मतदान
  असे पण इतक्या year मध्ये कोणीही निवडून आले तरी हे प्रश्न जे सामान्यांचे आहेत ते सुटले नाहीत

 2. निलेश says

  मत बाद का झालेत???
  कारण काही voter ने लिहिले की आधी आरक्षण मग मतदान
  काहींनी आधी अनुदान मग मतदान
  असे पण इतक्या year मध्ये कोणीही निवडून आले तरी हे प्रश्न जे सामान्यांचे आहेत ते सुटले नाहीत म्हणून

Leave A Reply

Your email address will not be published.