महाराष्ट्राचा खली उमेश पाटीलला आज तुमच्या मदतीची गरज आहे…

काल रात्री मनसेच्या वसंत मोरेंनी उमेश पाटील यांना मदत हवी आहे म्हणून फेसबुक पोस्ट टाकली. या फेसबुक पोस्टनंतर मोठ्या प्रमाणात त्यांना मदत मिळू लागली आहे. त्यांच ऑपरेशन आहे व त्यासाठी त्यांना मदत करावी लागणार आहे असं वसंत मोरेंनी सांगितलं आहे.

पण हे उमेश पाटील कोण?

तर उमेश पाटील महाराष्ट्राचे खली म्हणून प्रसिद्ध आहेत. 2019 साली बोलभिडूवरून उमेश पाटील यांची स्टोरी पब्लिश करण्यात आली होती. तीच पुन्हा देत आहोत. 

———

पुण्यातून सिंहगडला जाणारा रस्ता. धायरीचा उड्डाणपूल क्रॉस केला की एक हॉटेल दिसत. हॉटेल रानमळा-पाटलांचा वाडा. घरच्यासारखी चव म्हणणारे हॉटेल लय झालेत. पण इथे बोकडाच मट्टण मिळतं म्हणून जावुया म्हणलं. सोबत अजून दोन मित्र होते. गाडीवरून दोघजण उतरुण हॉटेलात शिरले आणि एका झटक्यात शांत झाले. त्यांच्या मागून मी हॉटेलात शिरत होतो.

पोरं आत गेली आणि कशापायी गार पडली?.. नक्की कसला वाडा आहे?

कुतूहलानं पुढं गेलो आणि समोर पाहीलं.

१४० किलो वजन, सात फुट उंची, १७ नंबरचा शूज असा डोंगराएवढा माणूस कॉउन्टरवर बसला होता. एका क्षणात भिती म्हणजे काय असते ते कळलं. या माणसानं आपल्या खांद्यावर हात जरी ठेवला तरी आपण फुटभर जमिनीत जाणार हे नक्की. हॉटेलमध्ये बसलो तेव्हा दबक्या आवाजत आमची चर्चा चालू झाली. या माणसाबरोबर बोलायचं का? जेवण झालं आणि धाडस केलं.

दादा तुम्ही खली सारखं दिसता…?

एका क्षणात समोरचा माणूस बोलता झाला आणि कळालं मोठा दिसणारा माणूस आतून किती डाऊन टू अर्थ असू शकतो. त्यांचं नाव उमेश रमेश वसवे पाटील, उंची सात फूट. वजन १४० किलो. आणि त्यांच्या पाठीमागेच खली सोबतचे ढिगभर फोटो.

उमेश रमेश वसवे पाटलांचे वडिल रिक्षाचालक, घरची परिस्थिती बेताचीच, त्यांच गाव खडकवासला पण शाळेसाठी म्हणून ते आपल्या बहिणीकडे नाशिकला होते. भोसला मिलिट्री स्कुलमध्ये १२ पर्यन्तच शिक्षण झाले आणि पुण्यात आले. त्या काळात उंची कमालीची वाढली होती. सहा फुटाचा उमेश सात फुटावर गेला होता. परिस्थिती बेताची असल्याने हमाली करण्यापासून बाउन्सर म्हणून काम करण्यापर्यन्त सगळी कामे ते करत होते. याच काळात गणपतीची वर्गणी मागताना त्यांची भेट रमेश वांजळे यांच्यासोबत झाली.

रमेश वांजळेंनी त्यांना सोबत घेतलं, २४ तास रमेश वांजळे यांच्यासोबत.

वांजळेंच्या सोबत असणाऱ्या उमेश यांना बघून अनेकांच धाब दणाणायचं. अशातच खली टिव्हीवर आला होता. WWE चा नवा चॅम्पियन. आठ फुटाची उंची. खलीच जोरात वारं होतं आणि इकडं खडकवासल्यात आपल्याकडं पण खली आहे. तो सेम खलीसारखा दिसतो म्हणून चर्चा चालू होत्या.

अशातच एकदिवस उमेश रमेश वसवे पाटलांना संधी मिळाली. निमित्त ठरलं राम कदम यांच्या दहिहंडीच. राम कदमांनी उमेश रमेश वसवे पाटलांना दहिहंडीच निमंत्रण दिलं. महाराष्ट्राचा खली म्हणून त्यांना बघायला तुफान गर्दी झाली. इतक्या मोठ्या माणसाला पोलिसांनी संरक्षण दिलं. प्रत्येकाला त्यांच्यासोबत फोटो काढून घ्यायचा होता. राम कदम ओळख करुन देताना म्हणाले हा,

“महाराष्ट्राचा खली”

महाराष्ट्राचा खली हि ओळख उमेश रमेश वसवे पाटलांना कायमची चिटकली, ती त्यांनी अभिमानाने मिरवली पण. खलीमुळे उमेश रमेश वसवे पाटलांना वेगळी ओळख मिळाली होती. उमेश रमेश वसवे पाटलांच एकच ध्येय होतं आयुष्यात कधीतरी खलीला भेटायचं.

एक दिवस कपिल शर्माच्या शोमधून फोन आला. खली येणार आहेत तूम्ही याल का? उमेश लगेच तयार झाले पण कार्यक्रमाच्या दोन तास अगोदरच शोच्या प्रोडक्षण टीम कडून फोन आला होता. इतक्या वेळात पुण्यातुन मुंबईत पोहचणं अशक्य होतं. गोरेगावच्या फिल्मसिटीत दोन तासत पोहचण अशक्य असल्याने तो बेत फसला..

इकडे उमेशचा एक मित्र खलीकडे ट्रेनिंग घेत होता. त्याने खलीला उमेश रमेश वसवे पाटलांचे फोटो दाखवले होते. अचानक एक दिवस उमेशला फोन आला.

मी खलीचा असिस्टंट बोलतोय, खली सरांना तुमच्याशी बोलायचं आहे.

आत्तापर्यन्त उमेशच खलीवेड त्यांच्यामित्रांना चांगलच कळालं होतं. कोणीतरी चेष्टा करत असेल म्हणून उमेशने फोन कट केला. पुन्हा दहा मिनटात फोन खनानला. हॅलो खरच खली सरांना बोलायचं आहे.

khali

तिकडून खली बोलत होता. इकडे उमेश रमेश वसवे पाटलांना कळायचं बंद झालं होतं. स्वत: खलीने फोन केला हा आनंद वेगळा होता. उमेश म्हणाला तुम्हाला भेटायचं आहे.

खली म्हणाले,

पुढच्या तीन चार दिवसात मी भारत बाहेर जाणार आहे, मी इंडियात परत आलो की आपण भेटू.

तीन चार दिवसांचा वेळ होता. उमेश म्हणाला,

मी आत्ताच निघतो. चालेल का…?

खली म्हणाला निघ तुला पत्ता पाठवतो. इकडे सांगून ठेवतोय व्यवस्थित ये…

खलीच्या एका शब्दावर उमेश फ्लाईटला बसला ते जालंधरमध्येच पोहचला. तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते. उमेश पत्ता शोधत जालंधरमधल्या खलीच्या ट्रेनिंग सेंटरला गेला. रात्रीच्या दोन वाजता कुणाला उठवायचं आणि कोणाला सांगायचं की, मला खली सरांनी बोलवलय..

तो ट्रेनिंग सेंटरला घुसला तर तिथे १० ते १५ पहिलवान मंडळी उमेशची वाट बघत थांबली होती. खलीने जाताना सांगितलं होतं की पुण्यातून माझ्यासारखा दिसणारा एकजण येतोय. त्यांचा पाहूणचार करा. खलीच्या ट्रेनिंगसेंटरवर असणाऱ्या मुलांनी रात्री त्यांना जेवूखावू घातलं.

दूसऱ्या दिवशी सकाळी उमेशला दाराच्या बाहेरून खलीसारखा आवाज आला. आवाजाच्या दिशेने उमेश पळत गेला. उमेश आणि खलीची हि पहिली भेट.

उमेश खाली वाकून पाया पडला. खलीने त्याला उचललं. उमेशसाठी खली सर हे चार दिवसात जिवलग मित्रबंधू झाले. खली सगळीकडे हेच सांगायचे की उमेश माझा भाऊ आहे. उमेश रात्रंदिवस खली सोबत राहू लागला. खलीचा सख्खा भाऊ उमेशला जेवण करु देत असे.

या चार दिवसांत उमेशच आणि खलीचं जे नात तयार झालं त्याबद्दल उमेश वसवे म्हणतात,

लूक लाईक सारखे खूपजण असतात. शाहरूख सारखे दिसणारे, सलमान सारखे दिसणारे. पण मी खलीसारखा दिसतो इतक्यावरच हे थांबल नाही. खली सरांचा मोठ्ठेपणा म्हणून त्यांनी मला धाकटा भाऊ केलं. जे नातं आजही कायम आहे. आठवड्यातून एक दोन वेळा बोलण्यापासून whatsapp वर चॅटिंग करण्यापर्यन्त आमची मैत्री. वरून डोंगराएवढा दिसणारा माणूस आतून इतका मख्खन आहे ते खली सरांना भेटल्यावर कळलं.

पुढे खली पुण्याला आला. सहकुटूंब सहपरिवार, तेव्हा त्यांनी उमेशला फोन केला. उमेश खलीला भेटला तेव्हा खलीची पत्नी आणि मुलगी सोबत होती. खलीची बायको उमेशला म्हणाली, मला खली सरांनी तुमच्याबद्दल सगळं सांगितल आहे. खलीसोबतची ओळख आत्ता कौटुंबिक झाली.

खली कुटूंबाबरोबर आला तर खलीसोबत मुंबई, पुण्यात उमेश वसवे अगदी सावलीसारखे असतात. खली बाहेरच्या लोकांना उमेशची ओळख करुन देताना हा माझा भाऊ असच सांगतो.

आज खलीचा वाढदिवस तेव्हा आठवड्याभरापुर्वी उमेश रमेश वसवे पाटलांची झालेली भेट आठवली. सुरवातीला मला उमेश वसवेंची देखील भिती वाटली होती. पण जेव्हा बोललो तेव्हा उमेश देखील आतून “मख्खन” आहे याची जाणिव झाली. म्हणूनच म्हणलं बोलभिडू कडून खलीच्या वाढदिवसादिवशी चार गोष्टी उमेशच्या सांगाव्यात.

——–

ही स्टोरी पब्लिश झाल्यानंतर उमेश पाटील बोलभिडू सोबत व्यक्तिश: जोडले गेले. त्यांचे अधूनमधून फोन येत असत. मधल्या काळात लॉकडाऊनमध्ये सिंहगड रोडवर असणारे हॉटेल बंद करून त्यांनी हे हॉटेल नॅशनल हायवेवर सन सिटी रोड जिथे वळण घेतो तिथे उभारल्याचं सांगितलं होतं. त्यानंतरच्या काळात त्यांचे फोन देखील कमी झाले. 

आज वसंत मोरेंनी पोस्ट केल्यानंतर उमेश पाटील कोणत्या परिस्थितीतून जात आहेत याची माहिती मिळाली. तुमच्या क्षमतेनुसार या डोंगराएवढ्या मनाच्या माणसाला तुम्ही मदत करु शकता. 

 

https://www.facebook.com/vasantmore88/posts/577147213769652

 

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.