अधिवेशनात हाणामारी करणारे आमदार डर्टी पिक्चर बघायला मांडीला मांडी लावून बसले होते

आजचा किस्सा आहे, हिवाळी अधिवेशनाला नागपुरात गेलेल्या आणि विद्या बालनचा डर्टी पिक्चर बघून आलेल्या आमदारांचा.

पण हा किस्सा सुरू करण्यापूर्वी थोडं बघावं लागेल की ह्या मौजमजेच्या प्रथा नेमक्या पडल्या कशा ? तर जुन्या जाणत्या लोकांना जर विचारलं ना की, नागपूरच अधिवेशन म्हणजे काय ?तर हमखास उत्तर येणार ते म्हणजे

हुर्डा पार्टी

होय…नागपूर करारामुळे हे हिवाळी अधिवेशन सुरू झालं असलं, किंवा बराच मोठा इतिहास असला तरी बऱ्यापैकी या अधिवेशनाला हुर्डा पार्टी अधिवेशन म्हणत असत.

साधारणपणे नोव्हेंबर, डिसेंबर या काळात विदर्भात ज्वारीचा हुर्डा निघतो. खास करून वाणीचा हुर्डा मिळत असे. त्यावेळच्या राजकीय नेत्यांची मोठमोठी शेती होती. त्यात या हुर्डा पार्टी रंगत असत. ज्वारीची कणसं गोवर्‍यांच्या शेकोटीत भाजली जात. नंतर चोळून हुर्डा काढला जात असे. हा हुर्डा, मिरचीचा ठेचा व छान दही-साखर असा मेन्यू राहात असे.

हे दही-साखरही कणसाच्या कुच्यांनी खावे लागत असे. सभागृहात राजकीय विरोध, आरोप-प्रत्यारोप झडत, राजकीय विरोधही पराकोटीला जात असायचा. पण, रात्री मात्र हुर्डा पार्टीत सर्व विरोध मावळत असे. या हुर्ड्याचा तिखट-गोड शिराही लज्जतदार लागत असे. पण, यात पार्टीपेक्षाही वैदर्भीय दिलदारी हा भाग महत्त्वाचा राहात असे.

बॅ. नानासाहेब वानखेडे यांच्या बंगल्यावर व शेतावर होणारी पार्टी तर अगदी कालकाल पावेतो चर्चेत राहात होती.

मग पुढं काळ सरत गेला हुर्डा पार्टीची जागा मौजमजेने घेतली.

अशीच मौजमजा करताना २०११ साली काही आमदार घावले. पुढं त्यावरून रामायण महाभारत घडलं ते वेगळंच, पण त्यावेळच्या आमदारांनी बघितलेल्या डर्टी पिक्चरच्या बातम्यांनी रकानेच्या रकाने भरुन गेले होते.

अशाच मुंबई मिरर मध्ये ही बातमी आली होती. त्याप्रमाणे

२०११ साली हिवाळी अधिवेशन भरलं होत तेव्हाच विद्या बालनचा डर्टी पिक्चर रिलीज झाला होता. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं आघाडीचं सरकार सत्तेत होत. पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते. त्या दिवशी गुरुवार होता आणि अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच तापला होता. विरोधात असणाऱ्या शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होत.

साधारण २ वाजता सभा तहकूब करण्यात आली. पुढं सभा सुरू झाल्यानंतर ही शेतकऱ्यांना देण्यात येणार पॅकेज यावर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच एकमत होईना. शेवटी शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनी सदनातुन वॉक आऊट केलं.

आणि थेट मल्टिप्लेक्स गाठलं.

त्यावेळी नागपुरात मल्टिप्लेक्स मध्ये डर्टी पिक्चरचा ६ चा शो होता. आता हे शिवसेना आणि भाजपचे आमदार एकटेच नव्हते बरं का ? तर त्यांच्या सोबत सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार सुद्धा पिक्चर बघायला गेले होते. जवळपास २५ आमदार आणि काही मंत्री सुद्धा या ताफ्यात होते.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर एकत्र न येऊ शकणारे आमदार एकत्र आले होते ते विद्या बालनच्या डर्टी पिक्चरमुळे.

आता हा विषय उघड कसा झाला ?

तर त्या मल्टिप्लेक्सवाल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दिवशी गुरुवारी फायनान्शिअल पॅकेजवर एकमत न झाल्याने बंद पुकारण्यात आला होता. याचा परिणाम सगळी जनता त्या मल्टिप्लेक्सला जमा झाली होती. तिथं काही मीडियाची माणसं ही आली होती.

डर्टी पिक्चरवेळी मिशन इम्पॉसिबल आणि Ladies vs Ricky Bahl हा पिक्चर सुद्धा लागला होता. खर शो ८ चा होता. मग इथल्या लोकांच्या आणि मीडियाच्या नजरेला पडू नये म्हणून अर्ध्यांनी हे पिक्चर बघितले तर काही आमदारांनी डर्टी पिक्चर बघून आणि हे सुद्धा पिक्चर पाहिले. जेणेकरून मीडियाला टाळता येईल हा उद्देश.

आता हे कमी की काय, शिवसेनेचे प्रताप सरनाईक सुद्धा तिथं होते. ते मिशन इम्पॉसिबलचा ८ चा शो बघायला गेलं होते. ते म्हंटले की,

मला काही आमदार भेटले होते, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे. त्यांचा मस्तपैकी डर्टी पिक्चर पाहून झाला होता. पण बिल्डिंगच्या बाहेर काही ते पडेनात. याउलट त्यांनी मिशन इम्पॉसिबल बघायला पसंती दिली. मी त्यातल्या काही आमदारांना विचारलं की तुम्ही एवढे का घाबरलाय? त्यावर आमदार म्हंटले, बाहेर कॅमेरे घेऊन मीडियाची मंडळी उभी आहेत.

आणि खरंच अहो, डझनभर कॅमेरे आणि पत्रकार आमदारांची वाट बघत होते.

त्या मल्टिप्लेक्सच्या आवरात बऱ्याच मोठ्या मोठ्या गाड्या पार्क होत्या. यावरुन तरी अंदाज येतच होता. आता हे पत्रकार लोक जात नाहीत म्हंटल्यावर आमदार आणि मंत्र्यांनी आपल्यासाठी साध्या गाड्या बोलवल्या. तर काहींनी बाईकची हेल्मेट मागवून घेतली आणि ती डोक्यावर घातली. काहींनी आपल्या बॉडिगार्डचा आधार घेत लपण्याचा प्रयत्न केला. आपले चेहरे लपवायचे इतके प्रयत्न करून सुद्धा दुसऱ्या दिवशीच्या पेपरात आमदार आणि मंत्र्यांची हे भली लिस्ट छापून आली.

(आता या घटनेला बरीच वर्षे झाली असल्याने आम्ही नाव देऊ शकत नाही)

अशाप्रकारे नाव आल्यावर, समाजातून टीका व्हायला लागल्यावर सगळे आमदार आणि मंत्री एकमुखाने म्हंटले, आम्ही आमचा वेळ कसा घालवावा हे ठरवण्याचा अधिकार आम्हाला आहे.

We did nothing wrong, We did nothing wrong

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.