रामदेव बाबा भारतातच राहिले आणि या योग गुरूंनी ४२ देशात १६० अब्जांच साम्राज्य उभं केलं

रामदेव बाबा आणि त्यांच्या पतंजलीला कोण ओळखत नाही. सुरवातीला पहाटे टीव्हीवर योगासन शिकवत आपल्या घरात शिरले मग हळूहळू दात चमकवणाऱ्या दंतकांतीपासून ते तुपापर्यंत आणि नुडल्सपासून फेडेड जीन्सपर्यंत प्रत्येक गोष्ट आपल्या दारात विकायला आणली. बघता बघता त्यांचे कोट्यवधींच एम्पायर उभे राहिले.

अदानी-अंबानी यांना जमणार नाही या वेगात पतंजलीची प्रगती सुरु झाली. फक्त भारतातचं नाही तर जगात पतंजली मॉडेल बद्दल कुतूहल होतं. मात्र ते फक्त स्वदेशी म्हणतं भारतावर फोकस ठेऊन राहिले.

पण एक असे योग गुरु सुद्धा होते ज्यांनी जवळपास ४२ देशात जाऊन १६० अब्ज रुपयांचे साम्राज्य उभं केलं होतं आणि ते देखील स्वतःच कोणतंही उत्पादन सुरु न करता.

इतकंच नाही तर त्यांनी स्वतःचं कायदेशीर मान्यता असलेलं चलन पण तयार केलं होतं. सोबतचं हे योग गुरु राजकारणात पण होते, आणि ते ही एका-दुसऱ्या देशाच्या नाही तर तब्बल ४२ देशांच्या. अशा योग गुरुंचं नाव म्हणजे,

महर्षी महेश योगी

या महर्षींचा जन्म भारतातलाच. १९१८ साली तेव्हाचं मध्यप्रांत आणि आताच्या छत्तीसगडमधील राजिम शहराच्या जवळील पांडुका गावातील. मुळ नाव होतं महेश प्रसाद वर्मा. अलाहाबाद विद्यापीठामध्ये पदवी घेतल्यानंतर ब्रम्हचारी राहण्यासाठी बाहेर पडले.

वडिल महसुल विभागात कार्यरत होते त्यामुळे त्यांच्या बदल्या सातत्यानं ठरलेल्या असायच्या. पण या पोरग्यानं एकाच जागी राहून शिक्षण पुर्ण करायचं ठरवलं. त्यानंतर जवळपास १३ वर्ष महर्षी महेश ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी ब्रह्मानंद सरस्वतींच्या सानिध्यात शिक्षण ग्रहण केलं, आणि त्यानंतर स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांनीच बालब्रम्हचारीची उपाधी देवून त्यांना महर्षी महेश योगी हे नवीन नाव दिलं.

१९५८ मध्ये महर्षी महेश योगी यांनी पहिली परदेश यात्रा काढली, आणि मानवाच्या विकासाचं शिक्षण देण्यास सुरुवात केली. सोबतचं वैदिक साहित्यावर पण जोर दिला. यानंतर त्यांनी युरोपमध्ये विविध देशात योग सिद्धीचे वर्ग सुरु केले. त्यातुन मिळालेल्या पैशातुन तिथं भारतीय औषधांचे कारखाने सुरु केले आणि त्यातुन मिळालेल्या पैशातुन भारतात शेकडो वैदिक शाळा सुरु केल्या, तिथं आज देखील वैदिक शिक्षण दिलं जातं.

जगभरात अनुयायी असलेले महर्षी….

वैदिक शिक्षणासोबतचं महर्षी महेश यांनी ट्रांसेंडेंटल मेडिटेशनमधून जगभरात आपली ओळख तयार केली आहे. योग आणि ध्यानमधून त्यांनी जगाला एका स्वस्थ आणि अध्यात्मिक जीवनाचं वचन दिलं आणि त्यातुन विविध देशांमध्ये आपले अनुयायी तयार केले आहेत. ६० च्या दशकात महर्षी सुप्रसिद्ध रॉक बँड बीटल्सच्या सदस्यांचे अध्यात्मिक गुरु बनले. बँडचे सदस्य त्यांच्या सोबत सुट्टीचे दिवस घालवायचे.

आता हे ट्रांसेंडेंटल मेडिटेशन काय असतं तर ते आपल्या भक्तांना हवेत तरंगण्याचा फील द्यायचे. याच ‘फ्लाईंग योगा’ला महर्षींनी ट्रांसेंडेंटल मेडिटेशन सिद्धी प्रोग्राम असं नाव देवू केलं होतं.

यात भक्त अगदी तल्लीन होवून हवेत उडण्याचा अनुभव घ्यायचे. महर्षींच म्हणणं होतं की अनेक संशोधनानंतर या थेअरीचा शोध लागला आहे.

स्वतःच कायदेशीर आणि मान्यताप्राप्त चलन  

या योग गुरूंना भारताबाहेर एवढं मानलं जायचं कि नेदरलँडमध्ये त्यांनी तयार केलेलं चलन चालत होतं आणि ते देखील अगदी कायदेशीर. फक्त लोकच नाही तर तिथलं सरकारचा देखील महर्षींवर विश्वास होता.

त्यातूनच त्यांनी ‘राम’ नावाचं चलन तयार केलं. त्यांची संस्था ‘ग्लोबल कंट्री वर्ल्ड ऑफ पीस’ ने २००२ मध्ये हे चलन बाजारात आणलं. २००३ मध्ये नेदरलँड सरकारनं त्याला कायदेशीर मान्यता दिली. यात राम नावाच्या १, ५ आणि १० रुपयांच्या नोटांचा यात समावेश होता.

याच्याशिवाय अमेरिकेच्या आयवाच्या महर्षी वैदिक सिटीमध्ये पण राम नावाच्या चलनाचा वापर केला जात होता. सोबतच अमेरिकेच्या ३५ राज्यांमध्ये रामावर आधारित बॉन्ड्स सुरु केले होते.

४२ देशांमध्ये राजकीय पक्ष 

हे योग गुरु राजकारणात देखील सहभाग घ्यायचे, ते ही एका देशातील नव्हे तर तब्बल ४२ देशांमधील. ‘नॅचरल लॉ पार्टी’ या नावानं त्यांनी १९९२ मध्ये ४२ देशांमध्ये राजकीय पक्ष सुरु केला. इतकच नाही तर अमेरिकेच्या जॉन हेगलिन यांनी या पक्षाच्या माध्यमातून तीन वेळा अध्यक्षीय पदाची निवडणूक देखील लढवली होती. इंग्लंडच्या निवडणुकांमध्ये देखील या पक्षांने सहभाग घेतला होता. हे सगळे प्रचार करताना देखील बाबांच्या योग-ध्यान याच मुद्द्यांवर करायचे.

भारतातील राजकारणात पण या महर्षींचा सक्रिय सहभाग होता. भारतात त्यांनी अजेय भारत पक्ष नावानं राजकीय पक्ष सुरु केला, धमधडाक्यात निवडणुकांमध्ये उमेदवार उभे केले, बराच पैसे खर्च केला. मध्यप्रदेश विधानसभेत या पक्षानं एक जागा जिंकली देखील, पण बाकी ठिकाणी प्रभाव दाखवता आला नाही. एका दशकानंतर त्यांनी राजकारण बाजूला सरकवलं

माजी पंतप्रधानांना देखील रसद पुरवली जायची… 

माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे आध्यत्मिक गुरु म्हणजे महर्षी महेश. गुरु या नात्यानं ते चंद्र शेखर यांना निवडणूक लढवण्यासाठी लागणारी रसद पुरवण्याचं काम ते करत असतं. यात अगदी हेलिकॉप्टर पासून सगळ्या गोष्टी असायच्या. महर्षींची इच्छा होती की त्यांनी बनवलेल्या पक्षात चंद्रशेखर यांनी भारतात वाढवावं आणि वेदांनुसार भारतीय राजकारणात एक नवी सुरुवात करावी.

चंद्रशेखर आणि महर्षी या दोघांमधील दुवा होते मध्यप्रदेशचे तत्कालीन उच्च शिक्षण मंत्री मुकेश नायक. त्यांनी देखील पुढे जाऊन काँग्रेस सोडून महर्षींच्या अजेय भारत पक्षाचं काम सुरु केलं होतं.

तब्बल १६० अब्ज रुपयांचं साम्राज्य…

असं म्हंटलं जातं कि ६० पासून ७० च्या दशकांपर्यंत महर्षी महेश योगी यांनी आध्यत्म आणि योगाच्या बळावर जेवढा पैसा कमावला, आणि जगभरातील देशांमध्ये प्रॉपर्टी विकत घेतली तेवढी अजून पर्यंत कोणी उभं करू शकलेलं नाही. आणि विशेष म्हणजे ते जे काम करायचे ते सगळं ना नफा ना तोटा या तत्वावर चालवलं जात होतं.

२००८ मध्ये त्यांच्या संस्थेशी संबंधित एक अहवाल प्रकाशित झाला होता, त्यानुसार महेश योगींनी जवळपास १५० देशांमध्ये ५०० शाळा, जगात ४ महर्षी विद्यापीठ आणि ४ देशांमध्ये वैदिक शिक्षण संस्था सुरु केल्या होत्या.

याच अहवालानुसार त्यांच्या संघटनेची जवळपास १६० अब्ज रुपयांची कायदेशीर संपत्ती होती.

त्याच वर्षी त्यांनी आपलं काम आता पूर्ण झालं आहे म्हणतं संस्था आणि योग यामधून निवृत्तीची घोषणा केली. त्यांच्या मते गुरूंच्या प्रति त्यांचं जे कर्तव्य होतं ते त्यांनी पूर्ण केलं होत. निवृत्तीनंतर अवघ्या काहीच दिवसात त्यांचं वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झालं. मात्र आज देखील त्यांचे भारतातील आश्रम, त्यांनी सुरु केलेल्या शाळा, त्यांनी उभं केलेलं काम हे आज देखील सुरु आहे.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.