कधीकाळी महात्मा गांधी फुटबॉलचे देखील हिरो होते.

ग्लोबल माणसाची ग्लोबल गोष्ट…

महात्मा गांधी,

भारताचा सगळ्यात लोकप्रिय ग्लोबल माणूस. फक्त राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय  इतिहासावर बोलत असताना महात्मा गांधींच नाव घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. ही गोष्ट आहे महात्मा गांधी आणि त्यांच्या फुटबॉलप्रेमाची. गांधीजी आणि द. आफ्रिका म्हटलं की आपल्याला फक्त रेल्वे स्टेशनवर झालेला गांधीजींचा अपमान आणि त्याविरुद्ध त्यांनी केलेलं बंड एवढंच प्रकरण आठवतं. पण आपल्यापैकी खूप कमी जणांना या गोष्टीची कल्पना असेल की, हाच अपमान त्यांना फुटबॉलच्या मैदानापर्यंत घेऊन गेला होता.

द.आफ्रिकेमध्ये फुटबॉलची पायाभरणी करणाऱ्या महत्वपूर्ण लोकांमधील महत्वाचं नांव म्हणजे महात्मा गांधी हे होय. एवढंच नाही तर गांधीजी हे १८९६ साली द.आफ्रिकेत स्थापण्यात आलेल्या ‘ट्रांसवाल इंडियन फुटबॉल असोसिएशन’ या संघटीत फुटबॉल क्लबच्या संस्थापकांपैकी एक होते.

गांधीजी आणि फुटबॉल हे समीकरण कसं जुळून आलं…?

क्रिकेट हा कायमच “जंटलमन्स गेम” राहिलेला आहे आणि फुटबॉलमध्ये एक तरी हाड मोडल्याशिवाय सामना संपत नाही. मग म.गांधीसारखा अहिंसावादी माणूस फुटबॉलकडे कसा आकर्षित झाला असेल असा प्रश्न आपल्याला पडणं सहाजिकच. तर गांधीजींच्या फुटबॉल प्रेमाची गोष्ट चालू होते  ती १८ व्या शतकाच्या उतरार्धात. वकिलीच्या शिक्षणासाठी इंग्लंडला गेलेल्या गांधीजींना तेथील लोकांमध्ये फुटबॉलबद्दल वाढत चाललेली रुची बघून हा खेळ लवकरच जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होणार याचा अंदाज आला होता.

गांधीजी जेव्हा द.आफ्रिकेत पोहोचले त्यावेळी तिथे त्यांना वंशभेदाचा सामना करावा लागला. याविरोधात अहिंसक पद्धतीने लढण्यासाठीचा मार्ग त्यांना फुटबॉलच्या मैदानात घेऊन गेला.

त्याचं मुख्य कारण असं की तेव्हा क्रिकेट हा फक्त गोऱ्या लोकांपुरताच मर्यादित खेळ होता. काळया लोकांनी  क्रिकेट खेळणं तर सोडून द्या, त्यांना क्रिकेट बघायला देखील बंदी होती. त्यामुळे द.आफ्रिकेतील बहुतांश काळी जनता ज्यामध्ये भारतातून गेलेले मजूर आणि छोटे व्यापारी यांचा देखील समावेश होता. या सर्वांचा प्रमुख खेळ फुटबॉलच होता. फुटबॉलचे सामने बघायला या लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत असे. ही गर्दी अशा लोकांची होती की ज्यांना कधी ना कधी वंशवादाचा त्रास सहन करायला लागला होता.

त्यावेळीच या लोकांमध्ये वर्णभेदाविरुद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी फुटबॉलचं मैदान हे एक चांगलं व्यासपीठ असल्याचं गांधीजींनी हेरलं होतं.

त्यानंतर गांधीजी नियमितपणे फुटबॉलचे सामने बघायला मैदानावर जाऊ लागले आणि सामन्याच्या मध्यंतरादरम्यान ते जमलेल्या लोकांमध्ये वर्णभेदाविरुद्ध जागृती करू लागले. त्याविरोधात लढण्यासाठी सत्याग्रहाच्या माध्यमातून अहिंसक लढा उभारण्याविषयी लोकांना मार्गदर्शन करू लागले.

खेळ म्हणून गांधीजींना फुटबॉलमध्ये किती रस होता..?

गांधीजी फक्त द.आफ्रिकेत वर्णभेदाविरोधातील चळवळ उभारण्याच्या दृष्टीने फुटबॉलकडे बघत नव्हते तर ऐतिहासिक संदर्भानुसार त्यांना या खेळात रुची असल्याचे देखील पुरावे आहे. या आवडीतूनच गांधीजींनी द. आफ्रिकेत फुटबॉलचा प्रचार आणि  प्रसार करण्यासाठी  देखील महत्वपूर्ण योगदान दिलं.

द. आफ्रिकेतील डर्बन, प्रिटोरिया आणि जोहान्सबर्ग या तीन प्रमुख शहरांमध्ये त्यांनी फुटबॉलच्या क्लबची  स्थापना देखील केली होती.

१९०३ साली गांधीजींच्या मदतीनेच ‘साउथ अफ्रीकन असोसिएशन ऑफ हिंदू फुटबॉल’ या संस्थेची स्थापना  करण्यात आली होती. गांधी स्वतः कधी फुटबॉल खेळल्याचा पुरावा उपलब्ध नसला तरी ते आपल्या संघांचा सामना बघायला मैदानात मात्र उपस्थित राहत असत. द. आफ्रिकेतील वास्तव्य संपल्यानंतर गांधीजी भारतात आले. भारतात आल्यानंतर देखील त्यांनी आफ्रिकेतील फुटबॉल क्लबशी असलेले आपले ऋणानुबंध जपले. १९२१-२२ साली गांधीजींच्या आमंत्रणावरूनच आफ्रिकेतील संपूर्ण भारतीय लोकांचा फुटबॉल संघ असणारा “ख्रिस्तोफर्स काँटिजंट” हा संघ भारतात आला. संघाने वर्षभरात भारतातील विविध शहरांमध्ये  १४ सामने खेळले. अहमदाबाद येथे आयोजित करण्यात आलेला सामना बघायला गांधीजीं जातीने उपस्थित राहिले होते.

फिफाकडून ‘फुटबॉल लिजेंड’ म्हणून गौरव

२०१० सालच्या फुटबॉल  विश्वचषकाचे आयोजन द. आफ्रिकेत करण्यात आलं होतं. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी गांधींना आपला आदर्श मानणारे नेल्सन मंडेला हे देखील उपस्थित होते. याचवेळी आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुटबॉलचे संचालन करणाऱ्या ‘फिफा’ या फुटबॉल संबंधित सर्वोच्च संघटनेने महात्मा गांधींचा ‘फुटबॉल लिजेंड’ म्हणून गौरव केला होता.

गांधीजींच्या प्रयत्नामुळेच आफ्रिकेमध्ये फुटबॉल संस्कृती रुजायला झालेल्या मदतीबद्दल फिफाने गांधीजींबद्दल व्यक्त केलेली ही कृतज्ञतेची भावना होती.

हे ही वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.