महिलांवरील अत्याचारासाठी “कपड्यांना” दोष देणाऱ्यात खुद्द महात्मा गांधी देखील होते..

बलात्कार हा कोणत्याही सुसंस्कृत समाजावर असलेला मोठा धब्बा. जेव्हा बलात्काराच्या घटना घडतात तेव्हा जनतेकडून तीव्र प्रतिक्रिया नोंदवली जाते. मात्र बऱ्याचदा नेते मंडळी या घटनेबद्दल बेजवाबदार वक्तव्य करतात.

उदाहरणार्थच बघायचं झालं तर नुकताच उत्तरप्रदेश मधील बदायूमध्ये घडलेल्या बलात्कार प्रकरणावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य चंद्रमुखी देवी यांनी पीडित महिला संध्याकाळी एकटीच बाहेर गेली नसती तर अशी घटना घडली नसती असं म्हटलं आहे.

यापूर्वी देखील मुलायम सिंग यादव यांनी लडके है गलती हो जाती है असं वादग्रस्त विधान केलं होत तर काही वर्षांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत आणि समाजवादी नेते अबू आझमी यांनी महिला कमी कपडे वापरत असल्याने, बलात्कारांचं प्रमाण वाढलं आहे असं विधान केलं होतं.

हि विचारसरणी आजकालची नाही. खूप वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांनी देखील याच पद्धतीचे विधान केले होते.

गोष्ट आहे १९३८ सालची.

गांधीजींनी आपल्या आयुष्यभरात चार वर्तमानपत्रे सुरु केली. यातील हरिजन हे शेवटचं. या हरिजन वर्तमानपत्रात गांधीजी नियमितपणे लिखाण करत असत. वाचकांनी विचारलेल्या अवघड प्रश्नांना ते उत्तर देखील देत.

अशाच एका तरुणीने गांधीजींना आपले काही प्रश्न विचारले होते. झालं असं होतं की पंजाबमधील एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीला आणि तिच्या मैत्रिणींना सडकछाप रोड-रोमियोंकडून छेडलं जात असे. त्यांचा शारीरिक व मानसिक छळ चालविला होता. त्याबाबत या तरुणीने गांधींकडे पत्राद्वारे तक्रार केली होती. तिचा प्रश्न होता कि,

अशावेळी अहिंसेचे तत्त्वज्ञान वापरून मुली स्वतःचे रक्षण करू शकतील काय, महिलांची अशी छेड काढणाऱ्या नीच तरुणांच्या सवयीवर नेमका काय तोडगा आहे?

‘हरिजन’ च्या ३१ डिसेंबर १९३८च्या अंकामध्ये ‘स्टुडंट्‌स शेम’ या शीर्षकाखाली गांधीजींनी या मुलीच्या प्रश्नांना उत्तर दिलं.

‘अशा प्रकारे उपद्रव देणारे पुरुष म्हणजे भारतातील वाढते राक्षसच आहेत. अशा घटनांची सारी माहिती वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध व्हायला पाहिजे, आणि दोषी व्यक्तींची वा अपराध्यांची नावे त्यांचा छडा लागताच प्रसिद्ध करायला हवीत. कारण समाजातील गैरवर्तन जनतेच्या नजरेसमोर आणणे, यापेक्षा अधिक प्रभावी उपाय असू शकत नाही. कोणताही गुन्हा व दोष घडण्यासाठी अंधाराची आवश्यकता असते. त्याच्यावर प्रकाश टाकला की, असे गुन्हेगार गायब होतात.’

गांधीजींनी या लेखात चांगलं वर्तन असणाऱ्या युवकांना आवाहन केले की,

अभिव्यचारी वर्तनापासून इतर तरुणांना त्यांनी परावृत्त केले पाहिजे. आपल्या तरुण वर्गाचे प्रतिनिधी अशी कृत्यं करतात, याचे तुम्हाला वैषम्य वाटले पाहिजे आणि त्यासाठी आपल्या सहकाऱ्यांमधील, मित्रांमधील दोष दूर करण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्नशील असले पाहिजे.’

त्यांचा मुलींना देखील सल्ला होता की अत्याचारी कृत्यांपासून स्वसंरक्षणासाठी किंवा प्रतिकार करण्यासाठी त्यांनी काही कौशल्ये शिकून घेण्याची आवश्यकता आहे. हे सांगताना ते म्हणतात,

“मला भीती वाटते की, आधुनिक मुलींना अर्धा डझन रोमिओंची ज्युलियट व्हायला आवडत असावे. त्यांना साहस आवडते. आजकालच्या मुलींचे पोषाख वारा, पाऊस, उन यापासून सरंक्षण करणारे नसतात, तर दुसऱ्याला आकर्षित करण्यासाठीच असतात.

या आधुनिक मुलींनी स्वतःला अधिक उठावदार दिसण्यासाठी निसर्गावरही मात करण्याचा प्रयत्न चालवला आहे. अशा मुलींसाठी अहिंसेचा मार्ग नाही.”

गांधीजींची मते पुराणमतवादी होती यात शंकाच नाही. मुली आधुनिक कपडे घालतात म्हणून त्यांची तरुणांकडून छेड काढली जाते, त्यांच्यावर अत्याचार होतो हे त्यांचं मत आजकालच्या प्रगत व स्वावलंबी महिलांना रुचणार नाही हे नक्की.

पण त्याकाळात गांधीजींसारख्या देशातील सर्वात मोठ्या नेत्यावर तुमचं चुकलंय हे सांगण्याचं धाडस काही मुलींनी दाखवलं होतं.

गांधीजींना बंगालच्या ११ मुलींनी आपल्या सही निशी एक पत्र पाठवलं. यात त्यांनी लिहिलं होतं की,

“महिलांनी कोणता वेष परिधान करावा, हा तिचा हक्क आहे. महिला म्हणजे नरकाचे द्वार आहे, अशा आशयाचे विधान काही जण करतात; त्या धारणेला तुमची दुर्दैवी विधाने पुष्टी देतात. गोखले, टिळक, देशबंधू (सी.आर.दास) अशा प्रकारचे विधान करताना नक्कीच डळमळीत झाले असते. हात जमिनीवर ठेवून पायाने हवेत लाथा मारणाऱ्या बर्नाड शॉला जे शोभते, ते महात्म्याला शोभत नाही.’

गांधींवर अतिशय चिडून लिहिलेल्या या पत्राचा शेवट या अकरा बंगाली तरुणींनी पुढील शब्दांत केला होता,

‘आधुनिक मुलींविषयी तुमच्या मनात अजिबात आदर नाही, हे त्या लेखातील विधानांवरून स्पष्ट होते. प्रत्येक मुलाला स्वत:च्या आईविषयी जितका आदर असतो, तितकाच आदर आम्हा मुलींना तुमच्याविषयी वाटतो. त्यामुळे जर त्या खरेच दोषी असतील, तर त्या आपल्या मार्गात सुधारणा करण्यास तयार आहेत. पण त्यांना दूषणे देताना किंवा त्यांच्यावर थेट बहिष्कार घालण्यापूर्वी त्यांचा काही दोष असेल, तर तो सिद्ध करणेही आवश्यक आहे. तुम्हीही सत्याचा सामना करायला हवा. तुम्ही या आधुनिक मुलींना ज्युलियट संबोधले आहे, तर त्यांच्यात याला तोंड देण्याचे पुरेसे धैर्य नक्कीच आहे.’

या पत्रामुळे खळबळ उडाली. गांधीजींचा मोठेपणा हा की त्यांनी हे पत्र आपल्या वर्तमानपत्रात छापून देखील आणलं. त्यांच्यावर होणाऱ्या परखड टीकेला सामोरे जाणे हे गांधीजींच्या राजकारणाचे वैशिष्ट्य राहिले आहे. त्यांनी या टीकेला उत्तर देखील दिले.

या उत्तरात गांधीजी म्हणतात,

 ‘जवळपास चाळीस वर्षांपूर्वीच मी दक्षिण आफ्रिकेत भारतीय महिलांची सेवा सुरू केली आहे. त्यावेळी तुमचा कोणाचा जन्मदेखील झालेला नव्हता. स्त्रीत्वाचा अपमान करणारे लेखन करण्यापासून मी कायम स्वतःला रोखले आहे.’

गांधीजींचं म्हणणं होतं की स्टुडंट्‌स शेम हा लेख आपण मुलींचे दुबळेपण दाखविण्यासाठी लिहिलेला नसून, रोगाचे मूळ निदान करण्यासाठी लिहिला आहे.

जवळपास ऐंशी वर्षांपूर्वी झालेली ही चर्चा व वाद आजच्या काळातही सुसंगत आहे. गांधीजींनी त्याकाळात व्यक्त केलेली मते आजही आपल्या पैकी अनेकांच्या मनात घर करून आहेत. मात्र त्यावेळी त्या ११ मुलींनी गांधीजींना परखडपणे पाठवलेलं पत्र आणि गांधीजींनी त्याला दिलेला प्रतिसाद हा आजही आपल्यासाठी आदर्श ठरेल असाच आहे.

संदर्भ: When 11 young women took on Gandhi about a woman’s right to dress as she chooses- Ramchandra guha

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.