अन् गांधींजी थेट कस्तुरबां विरोधातच उपोषणाला बसले
जगभरात महात्मा गांधी आणि अहिंसावाद हे दोन्ही एकमेकांना समानार्थी वापरले जाणारे शब्द. याच अहिंसावादाच्या तत्वावर गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. १९२० मध्ये टिळक युगानंतर आलेल्या गांधीवादाने भारताला एक वेगळी दिली.
बापुजींच्या या अहिंसावादाची असहकार, बहिष्कार यासारखी अनेक अस्त्रं होती. त्या अनेक अस्त्रांपैकीच एक अस्त्रं होतं ते म्हणजे उपोषण.
ज्याच्या मनात प्रेमभाव आहे केवळ अशाच व्यक्तीच्या विरोधात बापुंनी उपोषणाचा आधार घेतला. १९२४ साली यंग इंडियामध्ये लिहीलेल्या एका लेखातच त्यांनी या बद्दल सांगितलं आहे.
आपल्या संपुर्ण स्वातंत्र्य चळवळीदरम्यान गांधीजींनी २५ पेक्षा जास्त उपोषणं करुन समोरच्याचं यशस्वी ह्रदयपरिवर्तन करुन दाखवलं होतं. मात्र यात कुठे ही सत्तेला झुकवल्याचा अभिमान नव्हता. सत्तेला झुकवण्यापेक्षा त्यांचे मतपरिवर्तन करणे हा बापुजींच्या उपोषणाचा उद्देश असायचा.
नेहमीच व्यवस्थेच्या विरोधात आणि सामाजिक प्रश्नांसाठी बापुंनी उपोषणं केली. पण त्यांच्या आयुष्यात एक दिवस मात्र असा प्रसंग घडला की ते थेट पत्नी कस्तुरबांच्या विरोधातच उपोषणाला बसले.
जेष्ठ गांधी अभ्यासक आणि लेखक सुरेश द्वादशीवार यांनी ही घटना एके ठिकाणी लिहिली आहे.
कस्तुरबा आणि बापूंचं वैवाहिक जीवन ६२ वर्षांचं होतं. या काळात दोघांनी एकमेकांना अखंड साथ दिली, गांधीजींच्या विचारामागे त्या ठाम उभ्या होत्या. बापुंच्या साधेपणाच्या सवयीमुळे बा आणि त्यांची मुलं हे सर्व जण इतर मंडळींसोबत आश्रमातच राहायचे.
तर झालं असं कि गांधीजींच्या आश्रमात येणारं सारं काही सार्यांच्या हक्काचं असायचं. त्यातून त्यांचं असंग्रहाचं व्रत आश्रमात फारसं काही येऊही द्यायचं नाही. जे आलं त्यात आणि जे आहे त्यात सारं भागवावं असा त्यांचा आग्रह होता. सार्यांचा स्वयंपाक एकत्र आणि जेवणंही एकत्रच व्हायचं. जेवण देखील अगदीच साधं असायचं.
एकदा कस्तुरबांच्या माहेरची माणसं त्यांना भेटायला आली आणि आश्रमातलं ते जेवण पाहून मनातून निराश झाली. परत जाताना त्यांनी बांच्या हाती २५ रुपये दिले, आणि सांगितलं कधीतरी आपल्या मुलांना काही गोडधोड करून खाऊ घाल.
मात्र आश्रमाच्या नियमानुसार बांनी ते पैसे सामाईक खात्यात जमा करायला हवे होते. पण ते त्यांनी स्वतःजवळ ठेवले. बापूंना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी कस्तुरबांची संध्याकाळच्या प्रार्थना सभेत जाहीर कानउघाडणी केली.
‘ज्याची पत्नी त्याचं ऐकत नाही त्याचं म्हणणं समाज तरी कसा ऐकेल’ असं ते म्हणाले.
त्यावर वैतागलेल्या बा म्हणाल्या,
‘हे पैसे माझ्या माहेरचे आहेत. ते माझं स्त्रीधन आहे. त्यावर तुमचा काही एक हक्क नाही.’
बांच्या या अवताराने बापूच अवाक् झाले आणि बांचा निषेध म्हणून त्यांनी एक दिवस अन्नत्याग करुन उपवास केला. तेवढ्यावरच न थांबता बांच्या निषेधाचा एक अग्रलेख देखील लिहला.
कस्तुरबा मात्र बापूंच्या वारंवारच्या उपोषणांना कंटाळत असतं. १९३० मधे बापूंनी २१ दिवसांचा उपवास जाहीर केला. तेव्हा मात्र त्यांना धक्काच बसला. मीराबेनना सांगून त्यांनी बापूंना एक तार पाठवली. ‘हा उपवास थांबवा. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. आपल्या जबाबदार्या मोठ्या आहेत.’ असं सारं त्यांनी त्या तारेत लिहिलं.
ती तार मिळाली तेव्हा बापूंच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्यांनी तात्काळ उत्तराची तार पाठवून काळजी करू नकोस, असं त्यांना कळवलं.
पुढे १९३२ मध्ये गांधीजींनी पुणे कराराच्या वेळी उपोषण केलं तेव्हा त्यांची प्रकृती एकदम बिघडली. कस्तुरबा तुरुंगात आल्या आणि त्यांनी बापूंची खालावलेली तब्येत पाहिली. त्या काहीशा वैतागाने म्हणाल्या, ‘जिवाची काळजी नाही. आमचीही काळजी नाही. कितीदा हे उपवास’. एवढं म्हणून त्या आत गेल्या.
अशा या बापुंप्रती प्रेम आणि माया असलेल्या कस्तुरबा आणि आपल्या तत्वांशी एकनिष्ठ असलेले गांधीजी….
हे ही वाच भिडू.
- गांधीजी सुद्धा प्रेमात पडलेले, लग्न मोडायची वेळ आली होती.
- घरच्यांचा विरोध तर होताच पण त्यांच्या लग्नाचे मेन व्हिलन खुद्द महात्मा गांधी होते
- उपोषण न करता या माणसाने चक्क आण्णा हजारेंना ओव्हरटेक केलय ?