ब्रॅडमनचा खेळ बघण्यासाठी देवदास गांधींनी जेलमध्ये रात्र घालवली होती…!!!

 

सर डॉन ब्रॅडमन. फक्त ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधलाच नाही तर संपूर्ण क्रिकेट जगतातला खऱ्या अर्थाने ‘डॉन’ माणूस. ज्यावेळी  हा माणूस क्रिकेट खेळत होता त्यावेळी  या माणसाने क्रिकेट जगतावर अक्षरशः अधिराज्य गाजवलं. त्यामुळेच जगाच्या कानाकोपऱ्यात जिथे कुठे क्रिकेट खेळलं जातं, त्या प्रत्येक ठिकाणी ब्रॅडमनचे चाहते बघायला मिळतातच मिळतात. भारत ही त्याला अपवाद नाही. भारतातही तुम्हाला ब्रॅडमनचे कितीतरी चाहते अगदी सहज बघायला मिळतील. ब्रॅडमनच्या जगभरातील अशाच कोट्यावधी चाहत्यांपैकी एक नांव होतं देवदास गांधी. राष्ट्रपिता महात्मा गांधींचे सुपुत्र. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण देवदास  गांधींनी केवळ ब्रॅडमनचा खेळ बघायला मिळावा म्हणून एक रात्र जेलमध्ये घालवली होती.

हा किस्सा आहे १९४८ सालचा. १० जून १९४८. ऑस्ट्रेलियन संघ  इंग्लंडच्या दौऱ्यावर होता आणि हा आपला शेवटचा इंग्लंड दौरा असेल याची घोषणा ब्रॅडमन यांनी आधीच केली होती. म्हणजेच या दौऱ्यानंतर ब्रॅडमन कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होते. आपल्या एका  व्यावसायिक बैठकीसाठी देवदास गांधी देखील त्यावेळी इंग्लंडमध्ये होते. ब्रॅडमनचा हा शेवटचा दौरा असल्याची कल्पना देवदास गांधी यांना होतीच, त्यामुळे आपल्या आवडत्या खेळाडूला खेळताना बघण्याची ही शेवटची संधी आहे हे त्यांना कळून चुकलं होतं. शिवाय त्यासाठी त्यांची काहीही करायची तयारी होती.

bradman
सर डॉन ब्रॅडमन

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड दौऱ्यातील पहिली कसोटी नॉटिंगहम येथे खेळवली जाणार होती. त्यामुळे हा मॅच बघण्यासाठी देवदास गांधी नॉटिंगहमला पोहोचले, परंतु मॅचचे जवळपास सगळे तिकीट विकले गेले होते. कसाबसा करून देवदास गांधींना एक पास मिळाला. या सगळ्यात पहिल्या दिवसाचा खेळ संपला होता आणि इंग्लंडचा संघ ऑल-आउट झाला होता. आता ब्रॅडमन दुसऱ्या दिवशीच खेळायला येणार हे एव्हाना नक्की झालं होतं. आता देवदास गांधीसमोर नवीन प्रश्न होता, की या शहरात नेमकं राहायचं कुठे आणि रात्र कुठे घालवायची. कारण शहरातील जवळपास सर्वच हॉटेल्स बुक होत्या. कुठल्याही हॉटेलमध्ये राहण्यासाठी जागाच नव्हती.

यावर देवदास गांधींनी एक भन्नाट आयडिया लढवली. ते जवळच्याच एका जेलमध्ये गेले आणि तेथील पहारेकऱ्याला त्यांनी आपल्याला जेलमध्ये टाकण्याची विनंती केली. आता असं विनाकारण जेलमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी त्यांनी त्या पहारेकऱ्याला नेमकं कसं तयार केलं, याबाबतीत मात्र माहिती उपलब्ध नाही. पण त्या रात्रीसाठी त्यांनी जेलमध्ये प्रवेश मिळवला आणि आपली रात्र तिथेच काढली. दुसऱ्या दिवशीचा नाश्ता  जेलमधील कैद्याबरोबरच घेत ते ग्राउंडच्या दिशेने निघाले.

ब्रॅडमन खेळण्यासाठी मैदानात आले, त्यावेळी देविदास गांधी मैदानात हजर होते. आपल्या आवडत्या खेळाडूचा खेळ ‘याची देही याची डोळा’ बघण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली होती. ब्रॅडमनने देखील त्यांना बिलकुल निराश केलं नाही. आपल्या लौकिकास जागत त्या सामन्यात धमाकेदार शतक ठोकलं. ब्रॅडमनचा हा परफॉर्मन्स बघणं देवदास गांधींसाठी फार मोठी गोष्ट होती. ही इनिंग बघून ते त्याच रात्री आपल्या पुढील कामासाठी  लंडनला निघून गेले होते. पुढे हा सामना ऑस्ट्रेलियाने ८ विकेट्सनी जिंकला. देवदास गांधी यांना मात्र सामन्याच्या निकालापेक्षा ब्रॅडमनची बॅटिंग बघण्यात अधिक रस होता. त्यांची ती इच्छा पूर्ण झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.