तुमचे क्वारंटाईनचे किस्से सांगणार असला तर थांबा, आधी गांधींचा क्वारंटाईन किस्सा वाचा.

आत्ता कुठं मोकळं व्हायला लागलय, परत परत क्वारंटाईन चं काय लावताय. होय भिडू सगळं मान्य पण कस झालय सांगू का? लय दिवसातनं मोकळं झाल्यामुळं लोकं आत्ता गप्पा मारायला लागलेत. बार पण सुरू झाल्यानं गप्पा रंगायल्यात.

पण झालय अस की बोलायला विषयचं नाहीत. गावाकडं कसं गेलो आणि गावातल्या माणसांनी कसं पुण्यामुंबईतनं आलाय म्हणून मला क्वारंटाईन केलं हाच एकमेव विषय आहे. यापलीकडं सांगण्यासारखं काहीच राहिलं नाही. 

आत्ता आमचचं सांगतो की,

आमच्या ऑफिसात विपुल गुलाहे नावाचा एक थोर इसम आहे. तो अकोल्यावरनं आला तेव्हा त्याला कसं क्वारंटाईन केललं हे सांगाय लागला. इतक्यात आमचा वैभव वाळुंज आला आणि त्यांने ही तर कायचं नाय खुद्द महात्मा गांधींनापण क्वारंटाईन कस केलंल हे सांगू लागला.

मग म्हणलं लिही बाबा, जे सांगतोय ते लिही. मग त्यानं जे लिहलं तेच हे खाली मांडलय..

महात्मा गांधी हा सगळ्यात मोठ्ठा माणूसय हे मान्य करायलाच लागतंय. गांधीजींना त्या काळात क्वारंटाईन केल्तं म्हणजे हा माणूस काळाच्या किती पुढं होता बघा…

क्वारंटाईन ही खरं म्हणजे लै पूर्वापार चालत आलेली पद्धतय.

पटकीच्या रोगात त्या काळी गावंच्या गावं उजाडली जायची. मरून जाणाऱ्यांच्या जवळपासही कुणी भटकत नव्हतं.  भारताच्या जुन्या संस्कृत वाङ्मयातून आणि ग्रंथांतून पटकीसारख्या रोगाची वर्णने आढळतात. भारतातील मोठ्या नद्यांच्या काठच्या प्रदेशातून हा रोग पूर्वापार चालत आलाय.

बाहेरच्या देशांना मात्र हा रोग माहित नव्हता आणि जेव्हा माहित झाला तेव्हा या रोगाचा १८१७ ते १९२३ या काळात जगद्‌व्यापी साथीच्या स्वरूपात सहा वेळा प्रादुर्भाव झाला. ती माणसं पटकीमुळं एवढी हबकून गेली की प्रभात-फेऱ्या काढण्यापासून ते पोरींना चेटकिणी समजून मारेपर्यंत त्यांनी सगळं करून पाह्यलं.

बर्गमन नावाच्या अफलातून माणसाचा द सेवंथ सील पिच्चरय, त्यात हे अफाट दाखवलंय. १९५८–७२ या काळात सातवी जगद्‌व्यापी साथ पसरली. या काळात त्यांनी थोडा शहाणपणा केला आणि नंतर प्लेगचा हत्यार म्हणून वापर केला.

गांधीजींनाही आफ्रिकेवरून येताना ह्या संकटाचा सामना करावा लागला होता. त्यांनी आपल्या “सत्याचे प्रयोग” पुस्तकात हा प्रसंग लिहिला आहे.

आफ्रिकेत तेव्हा विविध रोगांची साथ पसरली होती. त्यातलं डर्बनच्या पूर्वेला असणारं गुजराती भिडूंच्या हक्काचं ठाणं म्हणजे नाताळ कॉलनी. सध्या ह्या जागेला स्थानिक लोक ‘क्वाजुलु नताल’ म्हणून ओळखतात.

तेव्हा भारतातून गिरमिटावर म्हणजेच परमिट काढून मोलमजुरी करण्यासाठी गरीब लोक नाताळात जात असत. त्यांना अतिशय मुश्किलीनं जीवन कंठावे लागत असे. तसेच लोकल गोरी माणसं त्यांना मोक्कार पिळून काढत असत.

त्यांच्या हक्कांसाठी गांधीजींनी तिथंच थांबून लढा द्यायचा ठरवला. १८९६ मध्ये पोराबाळांना घेऊन जाण्यासाठी ते भारतात आले आणि डिसेंबर १८९६ ला परत भारतातून आफ्रिकेला जाणाऱ्या नौकेवर चढले.

जानेवारीत हे जहाज डर्बनला पोहोचलं मात्र एकही भारतीय माणसाला ह्या जहाजातून खाली उतरू दिलं गेलं नाही.

गांधीजींच्या सोबत कस्तुरबा, आपली दोन पोरं हरिलाल आणि मणिलाल आणि त्यांच्या विधवा बहिणीचा मुलगा गोकुळदास हेही होते. त्यांनाही अडवण्यात आलं. आफ्रिकेत भारतीयांना बरे दिवस यावेत आणि त्यांची ताकद वाढावी म्हणून गांधीजींनी तिथं वसवण्यासाठी 2 बोटी भरून माणसं आणली होती.

गांधीजी जेव्हा भारतातून निघाले होते तेव्हा राजकोट आणि भारतातल्या कित्येक जागी पटकीची साथ आली होती.

दस्तुरखुद्द महाराष्ट्रात आणि पुण्यामध्ये ह्या वेळी हाहाकार माजला होता. पण युरेपियन लोकांसाठी हे एवढं नेहमीचं झालं होतं की त्याच्या मॅनेजमेंटसाठी त्यांनी कोड ठरवून दिले होते. धोकादायक जागांवरून येणाऱ्या लोकांसाठीबोटीवर पिवळा झेंडा लावण्यात येत असे.

अशा झेंडा लावलेल्या बोटीवरच्या प्रत्येकाची मेडिकल टेस्ट केली जायची आणि त्यानंतरच झेंडा उतरवुन उतारू लोकांना जाऊ दिलं जायचं.

त्या काळी समजूत होती की असा प्लेगचा जिवाणू २३ दिवसांपर्यंत जगू शकतोय. त्यामुळं  निघालेल्या सगळ्या जहाजांना २४ दिवस वेगळं ठेवलं जायचं. १३ जानेवारी १८९७ ला गांधीजींना ह्या जहाजातून उतरवण्यात आलं.

ह्याचा किस्सा सांगताना गांधीजींनी आपल्या दिवसांचं वर्णन वादळी आगमन असं केलं आहे.

मुंबईतून प्लेग घेऊन आलेली माणसं म्हणून त्यांच्या 2 जहाजांकडे पाहिलं जात होतं. त्यातल्या त्यात जर का कुणी खोकणारा, शिंकणारा माणूस बोटीवर घावला की अडचणी अजूनच वाढत आणि हा क्वारंटाईनचा काळ वाढवला जात असे.

गांधीजींच्या बोटवरची सगळी माणसं सुदैवाने खमकी होती त्यामुळं डॉक्टरांनी त्यांना पाचच दिवस क्वारंटाईन व्हायला लावलं.

त्या वेळात प्रवाशांच्या मनोरंजनासाठी आणि वेळ काढण्यासाठी ह्या लोकांनी अनेक खेळ आणि करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अर्थात सवयीप्रमाणे गांधीजींचं ह्याच्यात अजिबात लक्ष नव्हतं आणि डर्बनमध्ये अधूरं राहिलेलं काम पूर्ण करण्याकडं होतं.

पण एवढ्यात सुटेल त्याला पटकी का म्हणणार..!

तिथल्या गोऱ्या लोकांनी आमच्याकडं रोग घेऊन आले म्हणून ह्या बोटीतून आलेल्या लोकांवर दगड-विटा आणि अंडी फेकली. गांधीजींची पगडी एकानं उडवून लावली आणि त्यांना बुक्क्या आणि लाथांनी तुडवण्यात आलं. कित्येक लोकांना मारहाण करण्यात आली. तिथल्या एका गोऱ्या पोलीस सुप्रीटेंडन्टच्या बायकूने मधी पडून गांधीजींचा आणि इतर प्रवाशांचा जीव वाचवला.

मिस अलेक्झांडर ह्यांनी छत्री उघडली आणि त्या ह्या पांढऱ्या झुंडीच्या आणि गांधीजींच्या मध्ये उभ्या राहिल्या.

मिस्टर गांधींना मारहाण झाल्याची खबर तात्काळ लंडनमध्ये पोचली आणि ब्रिटिश सरकारची इज्जत वाचवण्यासाठी त्यांनी “दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी” असा आदेश दिला. मिस्टर अलेक्झांडर आणि ब्रिटिश वसहतींचे प्रमुख चेंबरलिन सायेब ह्यांनीही लगेच पोलीस कारवाई करण्याची जुळवाजुळव केली.

पण गांधीबाबाने नेहमीसारखं ह्याला नकार दिला.

“मला त्यातल्या कुणालाच शिक्षा व्हावी असं वाटत नाही. त्यातल्या काहींशी तर माझी पर्सनली वळख आहे. त्यांना जेव्हा जाणीव होईल, तेव्हा त्यांनाच ह्याचं वाईट वाटून ते माफी मागतील. कारवाई वगैरे करायचा विचार सोडून द्या.”

दुसऱ्या दिवशी पेपरला ह्या बातम्या मोठ्या अक्षरात झळकल्या. लंडनपासून डर्बनपर्यंत गोऱ्या लोकांना स्वतःचीच लाज वाटायला लागली तर असा होता गांधींच्या क्वारंटाईनचा अनुभव.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.