फुलेंनी विरोध केलेल्या मंडईला त्यांच्या पश्चात ‘महात्मा फुले’ नाव देण्यात आलं

पुणे, शिक्षणाचं माहेरघर आणि सांस्कृतिक शहर अशी जगभर ओळख. सोबतच या शहराने आपल्या जाज्वल्य इतिहासाने स्वतःची वेगळी ओळख तयार केली. इथलं खानपान, परंपरा हे सर्वच प्रसिद्ध आहे.

इंग्रजांच्या काळात त्यांनी पुण्यात नगरपालिकेची स्थापना केली. वेगवेगळ्या सोयी सुविधा बनवण्यास सुरवात केली….यातच एक महत्वाचं काम म्हणजे पुण्यातली भाजी मंडई. 

मग हि मंडई कशी सुरु झाली ?

ही भाजी मंडई होण्याच्या आधी शनिवारवाड्या समोरच्या पटांगणात भरणाऱ्या बाजारात भाजीपाला विकला जात असायचा. बऱ्याचदा पुण्यात आसपासच्या खेड्यातून येणारा ताजा भाजीपाला शेतकरी स्वतः विकायला बसत. 

पुण्यात राहणाऱ्या नोकरदार वर्ग हा बाजाराचा मोठा सहारा होता. पुण्याचा परिघ जसा विस्तारत गेला तशी कसब्यात असलेली छोटी मंडई मग शनिवारवाड्याच्या पटांगणात मग स्वारगेटपलीकडे मार्केट यार्ड येथे स्थलांतरित होत गेली….शिवाय जेंव्हा हा बाजार शनिवारवाड्याच्या पटांगणात भरायचा सभोवतालच्या परिसरातील नागरिकांनी त्याला विरोथ केल्यावर ही मंडई शुक्रवारपेठेत हलवण्यात् आली. 

पण हि मंडई सुरुवायच्या आधी इथला परिसर शेतजमिनीचा होता अन त्याला ‘काळे वावर’ म्हणून ओळखले जात होते. या काळ्या वावरामधे चार मोठ्या विहिरी होत्या. 

अशातच एकदा टूम निघाली की नागरिकांच्या सोयीसाठी आणि नगरपालिकेचे उत्पन्न वाढावे म्हणून मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटच्या धर्तीवर पुण्यातही एखादी मंडई उभारायची. १८८२  साली मंडई उभारण्याच काम सुरू झालं. 

म्युनिसिपालिटीच्या ठरावानंतर १८८२ मधे मंडईचे बांधकाम सुरू होऊन ५ ऑक्टोबर १८८६ रोजी वास्तूचे उदघाटन झाले. 

शुक्रवार पेठेतील सरदार खासगीवाले यांची बागवजा मोकळी पडलेली जागा निवडण्यात आली. ही चार एकराची जागा ४० हजार रुपयांना खरेदी करून पुण्यातील एक बांधकाम व्यावसायिक वासुदेव बापुजी कानिटकर यांच्यावर बांधकामाची जबाबदारी सोपवण्यात आली. 

त्याप्रमाणे अडीच तीन वर्षात जवळ जवळ तीन लाख रुपये खर्च करून गॉथिक स्टाईलची अष्टकोनी विस्तृत उंच टॉवर असलेली इमारत उभी केली. त्याकाळचे मुबंईचे ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड रे यांच्या हस्ते ५ ऑक्टोबर १८८६ रोजी थाटामाटात उदघाटन झाले.

पण …..या मंडईला महात्मा फुलेंचा विरोध होता..

भले नंतर या मंडईला महात्मा फुलेंचं नाव दिलं गेलं तरी त्याच्या आधीचा इतिहास जाणून घेणं महत्वाचं आहे…

म्युनिसिपालिटीने काळ्या वावरामधे जेव्हा मंडई बांधण्याचा निर्णय घेतला तेव्हा महात्मा फुले यांनी त्याला विरोध केला, कारण तो खर्च शिक्षणासाठी प्राधान्याने व्हावा, असे त्यांचे मत होते.

जेंव्हा हि आलिशान मंडई सुरु झाली होती तेंव्हा ती मुख्यत्वे भाजी विक्रेते आणि शेतकऱ्यांसाठी शापच ठरली होती. या मंडईतील गाळयांचे भाडे सर्वसामान्य भाजी विक्रेत्याला परवडणारे नव्हते. पण इंग्रजांनी जबरदस्तीने या भाजीवाल्यांना तिथे जाण्याची सक्ती केली. मग हे भाजीवाले महात्मा जोतीराव फुलेंकडे मदतीसाठी गेले. फुले हे काय तेंव्हा नगरपालिकेचे सदस्य नव्हते मात्र सरकारमध्ये त्यांच्या नावाचे वजन होते. असाही त्यांचा सुरवातीपासूनच या आलिशान इमारतीला विरोध होता.

भाजी विक्रेत्यांना आणि ग्राहकांना या इमारतीची गरज नसताना त्यावर लाखो रुपये खर्च कशा साठी? असा प्रश्न उपस्थित केला गेला. त्या ऐवजी लाखोंची रक्कम गरीब जनतेच्या शिक्षणासाठी वापरावी असा जोतिबांचा आग्रह होता.

पण तोपर्यंत मंडई बांधून पूर्ण झाली होती पण तेथील गाळ्यांचं भाडं भरणं म्हणजे विक्रेत्यांवरचा एक प्रकारचा अत्याचार होता. जोतिबांनी नगरपालिकेच्या सदस्यांची त्यांनी भेट घेतली व परिस्थिती समजावून सांगितली. पण फुलेंचं हे म्हणणं नगरपालिकेत कोणीही ऐकून घेतले नाही. फुले मंडई ही पूर्वी रे मार्केट’ नावाने ओळखली जायची. म्हणजेच हे नाव गव्हर्नर रे यांच्या नावावरून मंडईला देण्यात आलं त्यामुळे इंग्रज सरकार माघार घेत नव्हतं कारण त्यांच्या इभ्रतीचा सवाल होता.

मग काय फुलेंनी आंदोलन उभारलं… महात्मा फुलेंनी छोट्या भाजी विक्रेत्यांना घेऊन मोठा विरोध सुरू केला. हे इंग्रज सरकारला पसंद पडले नाही. त्यांनी जोतिबांना विरोध केला. नगरपालिकेच्या काही लोकांनी तर सूड म्हणून, मुद्दाम जोतिबांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांच्या घराबाहेर मैला फेकण्यास सुरवात केली. अनेक जण जोतिबांच्या घराकडे पाहून हसत असत.

पण या एका घटनेमुळे खोडोपाड्यातील शेतकऱ्यांमध्ये जोतिबा फुलेंच्या बद्दलचा आदर वाढला. गरीब जनतेसाठी लढणारा महात्मा अशी ओळख त्यांना मिळाली.

ज्या जोतिबांवर पुणेकर हसले होते त्याच जोतिबांचे नाव मंडई ला देण्यात आले. आचार्य अत्रे यांच्या कारकिर्दीत गव्हर्नर रे यांचं नाव बदलून महात्मा फुले मंडई असे नाव दिले. मध्यंतरी १९२४ साली नगरपालिकेने लोकमान्य टिळकांचा पूर्णाकृती पुतळा मोतीलाल नेहरू यांच्या हस्ते मंडईच्या प्रवेशद्वाराजवळ बसवला. याच इमारतीमध्ये महात्मा फुलेंचे वैचारिक विरोधक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचाही पुतळा उभारण्यात आला होता मात्र गांधी हत्येच्या दंगली वेळी तो अन्य ठिकाणी हलवण्यात आला.

फुलेंनी जरी सामान्यांच्या शिक्षणासाठी मंडईला विरोध केला असला तरी त्यांच्या पश्चात, त्याच मंडईचे नाव बदलून, महात्मा फुले मंडई असे झाले ! 

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.