महात्मा फुलेंना मारायला आलेला मारेकरी त्यांचा विद्यार्थी बनला.

मध्यरात्रीची वेळ होती. पुण्यामध्ये आपल्या वाड्यात जोतीबा आणि सावित्रीबाई हे फुले दाम्पत्य झोपले होते. सावित्रीबाईंना गाढ झोप लागली होती. जोतीबांची झोप सावध होती. अचानक त्यांना कुणाच्या तरी पाउलाची चाहूल लागल्यासारखं वाटलं. ते आपल्या बिछान्यावरून उठले आणि आवाजाच्या दिशेने वळले. जोतीबांनी जोरात विचारलं,

“कोण आहे रे ? काय हवय?”

समईच्या मंद प्रकाशात भला मोठा सुरा चमकला.

वात मोठी करून त्यांनी निरखून पाहिलं दोन आडदांड व्यक्ती घरात शिरल्या होत्या. एव्हाना आवाजाने सावित्रीबाई देखील उठल्या होत्या. त्या क्रूरकर्माना पाहून त्या भयभीत झालेल्या सावित्रीबाई आपल्या पतीच्या शेजारीला आ वासून उभ्या राहिल्या. त्या दोघांच्या मधला एक जण म्हणाला,

“तुमचा निकाल लावायला आम्हाला धाडलं आहे.”

जोतीरावानी अत्यंत शांत पणे विचारलं,

“माझा शेवट आणि तो कशासाठी? मी आपला काही अपराध केला आहे का?”

मारेकरी उत्तरला,

“तुम्ही आमचं काही वाईट केलं नाही. पण काही लोकांनी तुम्हाला यमसदनास धाडण्यासाठी आम्हाला पाठवलंय.”

पुण्यामध्ये जोतीरावांची सुधारकी चळवळ जोरात चालू होती. सावित्रीबाई आणि जोतीबानी गोरगरीब दलित मूले मुली यांना शिकवण्याच व्रत अंगिकारल होतं.

जोतीबांची ही जहाल सुधारकी मते आणि त्यांच्या या चळवळी पुण्याच्या पेठेत राहणाऱ्या पुराणमतवाद्यांना अजिबात खपत नव्हत्या आणि म्हणूनच धर्मभ्रष्ट करत असणाऱ्या फुलें दांपत्याचा शेवट करायचा म्हणून या कट्टर सनातन्यांनी मारेकरी पाठवले होते.

जोतीरावांनी शांत पणे या मारेकर्यांना विचारलं,

“मला मारून तुम्हाला काय फायदा मिळणार?”

यावर उत्तर आलं,

“तुम्हाला मारल्यावर आम्हाला प्रत्येकी हजार रुपये मिळणार आहेत.”

जोतीबा त्या क्षणीच सदगदित होऊन म्हणाले,

“अरे वा! माझ्या मृत्यूने तुमचा फायदा होणार आहे! तर घ्या हे माझ डोकं. ज्या गरीब जनतेसाठी मी माझ आयुष्य वाहिलं आहे त्यांचा माझ्या मृत्यूने देखील काही फायदा होणार असेल तर त्यासाठी मी कधीही तयार आहे !”

हे तेजस्वी निर्भीड विचार ऐकून त्या मारेकर्यांना धक्का बसला. त्यांच्या हातातले सुरे गळून पडले.

डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. जोतिबांच्या त्या एका वाक्याने त्यांना आयुष्यभराचे भान आले. त्यांच्या पायाशी त्या क्रूर मारेकर्यांनी लोळण घेतली.

“तात्यासाहेब आमचं चुकलं. आता एकच भिक्षा घाला. तुमचा जीव घ्यायला टपलेल्या दुष्टांना यमसदनास पाठवण्याची परवानगी द्या.”

जोतिबांनी त्या दोघाच्या खांद्याला धरून त्यांना उठवलं. त्यांना नाव विचारलं. एकाच आडनाव रोढे होत तर दुसरा धोंडीराम कुंभार होता.जोतीबा त्यांना म्हणाले,

“जे काही आता घडले आहे त्याविषयी अवाक्षर ही काढू नका. ज्यांनी तुम्हाला करायला लावलं त्यांना बिचाऱ्यांना आपण काय करतोय ते कळलेलं नाही. देवा त्यांना माफ कर. त्यांना दीर्घायुष्य दे !!”

अपराध्यास माफ करायला मोठ मन लागत. जोतिबांच्याकडे ते होतं म्हणून त्यांना जनतेनं महात्माही पदवी दिली होती.

पुढे जाऊन हे दोन्ही क्रूर मारेकरी जोतिबांचे निष्ठावंत भक्त बनले.

त्यांनी जोतिरावांच्या रात्रशाळेत शिक्षण घेतलं. रोढे मांग त्यांचा अंगरक्षक बनला तर दुसरा धोंडीराम नामदेव कुंभार हा जोतिबांच्या प्रेरणेने पंडीत बनला. पुढील काळात जोतीरावानी काढलेल्या सत्यशोधक समाजाचा तो आधारस्तंभ बनला. त्याने अनेक ग्रंथ लिहिले. यापैकी वेदाचार हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. 

(हा लेख धनंजय कीर यांनी लिहिलेल्या महात्मा जोतीराव फुले यांच्या पुस्तकावर आधारित आहे.)

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.