महाविकास आघाडी सरकार खरंच केवळ हिंदूंच्या सणांना निर्बंध घालत आहे का?
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आज आगामी दहीहंडी उत्सवासाठी परवानगी नाकारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. अजूनही असलेला कोरोना आणि ऑक्टोबरमध्ये अंदाजित असलेल्या तिसऱ्या लाटेमुळे गर्दी टाळण्यासाठी दहीहंडीची परवानगी नाकारल्याच सांगण्यात येत आहे.
मात्र या नंतर सरकरावर विरोधी पक्षाकडून अर्थात भाजप आणि मनसेकडून टीका होऊ लागली आहे.
भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी सरकार हिंदूंच्या सणांबाबत पक्षपात करत असल्याचा आरोप केला आहे. “प्रत्येकवेळी संयमाची सबुरीची भाषा हिंदू बांधवांनाच का सांगायची?” असा प्रश्न राम कदम यांनी उपस्थित केला आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी दहीहंडी उत्सवाला परवानगी न दिल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारकडून केवळ हिंदू धर्मियांच्या सणांवर निर्बंध घातले जातात का? हे बघणं महत्वाचं ठरत. त्यासाठी हिंदू आणि इतर धर्मियांच्या सणांवेळी सरकारने काय भूमिका घेतली होती हे बघावं लागेल.
१. गणपती :
गतवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेमधून काहीस सावरल्यानंतर मोठा सण होता तो म्हणजे गणेशोत्सव. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सवासाठी नियमावली जारी केली होती. यात घरगुती गणपतीच्या मूर्तीवर २ फुटांची मर्यादा घालण्यात होती. तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मूर्ती ४ फुटांचीचं असावी असं सांगण्यात आलं होतं.
तसेच सजावटीमध्ये भपकेबाजी नसावी. गणेशाचे आगमन व विसर्जनाची मिरवणूक काढण्यात येऊ नये. सोबतच गर्दीमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून घेण्याच्या सूचना गणेशभक्तांना करण्यात आल्या होत्या. त्यावेळी या निर्बंधांमुळे सरकारवर बरीच टीका झाली होती.
त्यानंतर अलीकडेच काही दिवसांपूर्वी २०२१ मधील गणेशोत्सवासाठी देखील सरकारकडून अगदी अशाच पद्धतीची नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यावरून देखील सरकारला टीकांना सामोरं जावं लागलं होतं.
२. दिवाळी :
गणपतीनंतर हिंदू धर्मीयांमध्ये सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. पण कोरोनामुळे गतवर्षी दिवाळीत सरकारकडून विविध निर्बंध घालण्यात आले होते. यात दिवाळीत प्रदूषण होऊ नये म्हणून फटाके फोडणे टाळावे, त्याऐवजी दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी करावी. असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं होतं.
सोबतच दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजन करू नये, करायचे असल्यास ऑनलाईन आणि सोशल मीडिया माध्यमातून कार्यक्रम करावे. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ऐवजी संस्थांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिरांवर भर दिला जावा, धार्मिक स्थळ खुली नसल्यामुळे सण घरगुती पद्धतीने सध्या स्वरूपात साजरा करावा, असं देखील सरकारकडून आवाहन केलं गेलं होतं.
३. होळी/धूलिवंदन :
नवीन वर्षात अंदाजित असलेली दुसरी लाट लक्षात घेऊन सरकारकडून होळी आणि धूलिवंदन या सणांसाठी नियमावली जारी करण्यात आली होती. यात सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करू नये यासाठी नागरिकांना सूचना देण्यात आल्या होत्या.
हे दोन्ही सण घरगुती पद्धतीने आणि कोरड्या रंगांनी खेळले जावे असं देखील नियमावलीत सांगण्यात आलं होतं. तर शहरांमध्ये नागरिक एकत्र येण्याच्या शक्यतेनं सर्वत्र पोलिसांकडून बंदोबस्त ठेवला गेला होता. जोडीला शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी, गस्त ठेवली गेली होती.
४. गुढीपाडवा :
साडेतीन मुहूर्तांमधील एक सण असलेल्या गुढीपाडवा सणासाठी सरकारकडून नियम जारी केले होते. यात गुढीपाडवा साधेपणाने आणि सकाळी ७ ते रात्री ८ यादरम्यान साजरा करण्यात यावा असं सांगण्यात आले होते.
तसेच राज्यात काही ठिकाणी गुढीपाडवा हा सण पारंपारिक वेशभूषा परिधान करून आणि सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात येत असतो. त्या पार्श्वभूमीवर पालखी, दिंडी, प्रभातफेरी, बाइक रॅली व मिरवणुका काढण्यात येतात. मात्र सरकारच्या नियमांमध्ये या सगळ्यांवर बंदी घातली गेली होती.
५. बेंदूर :
महाराष्ट्रात शेतकऱ्यांकडून बेंदूर हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यात बैलांना दुपारपर्यंत सजवून संध्याकाळी त्यांची वाद्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली जाते. पश्चिम महाराष्ट्रात बेंदूर, तर उर्वरित महाराष्ट्रात बैल पोळा म्हणून हा सण उत्साहात साजरा केला जातो.
मात्र कोरोनामुळे सरकारने अशा मिरवणुकीवर बंदी घातली आहे. त्यामुळे मागच्यावर्षी प्रमाणेच यंदाही शेतकऱ्यांना बैलांची पूजा घरीच करावी लागली होती.
६. रमजान ईद :
मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईदसाठी देखील राज्य सरकारकडून नियम घालून देण्यात आले होते. यात मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपआपल्या घरातच साजरे करावे असं सांगण्यात आलं होतं.
प्रामुख्याने जर नियम बघायचे झाले तर नमाज पठणासाठी मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये. स्थानिक प्रशासनाने सामान खरेदीसाठी वेळेचे घालून दिलेल्या बंधनाचे तंतोतंत पालन करण्यात यावे. त्या वेळे व्यतिरिक्त बाजारामध्ये सामान खरेदीकरिता गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.
सोबतच त्यावेळी कलम १४४ लागू होते. तसेच रात्रीची संचारबंदीमुळे फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत, तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरु नये असं आवाहन केले गेले होते.
७. बकरी ईद :
बकरी ईदसाठी देखील राज्य सरकारकडून रमजान ईदाप्रमाणेच नियम घालण्यात आले होते. यात बकरी ईदची नमाज मशीद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता आपल्या घरीच अदा करावी.
तसेच सार्वजनिक ठिकाणी कार्यान्वित असलेले जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अथवा दूरध्वनीवरून जनावरे खरेदी करावी. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी. बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये असं आवाहन केले गेले होते.
८. मोहरम :
नुकत्याच पार पडलेल्या मोहरमसाठी देखील सरकाकडून नियम घालून देण्यात आले होते. यात इतर धार्मिक कार्यक्रमांप्रमाणे आपापल्या घरात राहूनच मोहरमचा दुखवटा पाळण्यात यावा. केंद्र व राज्य शासनाकडून सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणूकीला परवानगी देता येणार नाही.
खाजगी मातम देखील शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करुन घरीच करावेत. सोसायटीमधील नागरिकांनी देखील एकत्रित मातम/दुखवटा करु नये. वाझ मजलीस हे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात यावेत. ताजिया/आलम ताजिया/ आलम काढू नयेत, असे नियम घालून देण्यात आले होते.
मात्र उच्च न्यायालयाने मोहरमसाठी सशर्त परवानगी दिली होती. यात पायी मिरवणुकीवर मात्र न्यायालयाने बंदी घातली होती. ७ ट्रकमधून प्रतिकात्मक शोक मिरवणूक काढण्यात यावी व प्रत्येक ट्रकमध्ये केवळ १५ जणांना मुभा देण्यात आली होती. सोबतच लसींचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवस झालेल्यांनाच या मिरवणुकीत भाग घेता येईल, अशी अटही न्यायालयाने टाकली होती.
९. नाताळ :
ख्रिश्चन समाजाच्या नाताळ सण साजरा करण्यावर देखील राज्य सरकारकडून काही प्रमाणात निर्बंध घातले गेले होते. सोबतच नवीन वर्ष साजरे करण्यावर पण निर्बंध घालण्यात आले होते. याच दोन्हीचा एक भाग म्हणून २२ डिसेंबर ते ५ जानेवारी राज्यात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती.
रात्रीच्यावेळी गर्दी होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून संचारबंदी लागू केल्याचे सांगण्यात आले होते.
प्रार्थना स्थळ उघडण्याची मागणी :
याशिवाय राज्य सरकारकडून पंढरपूरच्या वारीवर देखील २ वर्षांपासून बंदी आणली आहे. सोबतच सर्व धर्मीय प्रार्थना स्थळ सध्या बंद ठेवण्यात आली आहेत. भाजपकडून सातत्याने हि प्रार्थना स्थळ उघडण्याची मागणी होतं आहे. मात्र राज्य सरकारकडून अद्याप या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलेला नाही. गतवर्षी देखील मंदिर उघडण्यावरून मोठा वादंग झाल्याचे पाहायला मिळाले होते.
एकूणच वरील सर्व सण आणि निर्बंध लक्षात घेता केवळ हिंदू धर्मियांच्या सणांवर निर्बंध घालण्यात येतात असं म्हणणं काहीस चुकीचे ठरले. दहीहंडी सह दिवाळी, गणपती अशा सणांसोबत रमजान ईद, नाताळ अशा सणांवर देखील सरकारकडून निर्बंध घालण्यात आले होते.
हे हि वाच भिडू
- पंजाबातील हिंदू शिखांमध्ये चाललेली आंदोलने सरसंघचालकांनी पंजाबात जाऊन शमवली होती
- अधिकारी टाळाटाळ करत होते, अटलजींनी हट्टाने तुकोबारायांचं नाणं बनवून अनावरण केलं
- सुवर्ण मंदिराची पहिली वीट एका मुस्लीम संताने रचली होती !