जिंकल कोण, महाविकास आघाडी की बॅलेट पेपर..?

राज्यात आज विधानपरिषदेच्या ६ जागांचे निकाल हाती आले.

त्यापैकी ५ महाविकास आघाडी आणि १ भाजप असा निकाल लागला आहे. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीत सध्या ख़ुशीचा माहोल आहे तर विरोधातील भाजपच्या गोटात काहीस गमचं वातावरण आहे.

हाच ट्रेंड सोशल मिडियावर देखील दिसून येत आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये कॉमेंट आणि पोस्ट वॉर चांगलाच चालू आहे. यादरम्यान सरकारने केलेली काम, तीन पक्षांची एकजूट अशी बरीच विजयाची कारण सांगितली जात आहेत.

या सगळ्या कारणां दरम्यानच आणखी एक कारण सांगितले जात आहे ते म्हणजे,

बॅलेट पेपरवरील मतदान. 

लोकसभा, विधानसभा आणि इतर निवडणुकांमध्ये भाजप इव्हीएममध्ये फिक्सिंग करत असते पण विधानपरिषदेमध्ये बॅलेट पेपरवर मतदान झाल्यामुळे यात छेडछाड करता आलेली नाही. तसेच मतदानात फेरफार करता आले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय झाला अशी चर्चा सोशल मीडियावर चालू आहे. 

त्यामुळे हा विजय महाविकास आघाडीचा की इव्हीएमचा असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

यावर ‘बोल भिडू’ने खरं काय आहे हे जाणून घेण्यासाठी इव्हीएमला विरोध आणि बॅलेट पेपरवरच निवडणूक व्हावी अशी मागणी असणाऱ्या नेते आणि अभ्यासकांशी संपर्क साधला.  

यामध्ये माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. वंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. चेतन तुपे, काँग्रेसचे माजी आ. रमेश बागवे, पुणे महानगर पालिकेतील काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्याशी संपर्क केला. या मान्यवरांनी एकंदरीतच बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्याची अपेक्षा बोलून दाखवली. 

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाले,

बॅलेट पेपर वर निवडणूक  झाल्यामुळेच विधानपरिषदेची निवडणूक पारदर्शी झाली. त्यामुळे इथून पुढच्या निवडणूक देखील पारदर्शी व्हायच्या असतील तर बॅलेट पेपरवरच मतदान झाले पाहिजे अशी ठाम भूमिका आहे.

आता पर्यंत ईव्हीएमने भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षाला मतदान केलेले नाही. त्यामुळे या निवडणुकीत इव्हीएम नसल्यामुळेच भाजप हि निवडणूक हरला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. वंदना चव्हाण ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाल्या,

आजच्या निवडणुकीमध्ये म्हणूनच बॅलेट पेपरची भूमिका महत्वाची होतीच. त्याबद्दल दुमत नाही. पण ईव्हीएम मशीनच्या घोटाळयांबद्दल वारंवार बोलले जाते. त्यामुळे लोकांची देखील बॅलेट पेपरवर मतदान करण्याची मागणी होती.

आज बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्यानंतर लोकांच्या मनात पुन्हा एकदा विश्वास प्रस्थापित होत आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळात देखील बॅलेट पेपरवर मतदान झाले पाहिजे. जेणेकरून कुठेही शंकेला वाव राहणार नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. चेतन तुपे ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाले,

बॅलेट पेपरचा रोल जगात सगळीकडे महत्वाचा मनाला जातो. राज्यात देखील आज विधानपरिषदेच्या निवडणुकीने हे सिद्ध केले आहे. महाविकास आघाडीच्या विजयात बॅलेट पेपरचा रोल खूप महत्वाचा होता.

बॅलेट पेपर नाकारण्यासाठी जे मुख्य कारण सांगितले जाते ते म्हणजे मतमोजणीला वेळ लागणे. या निवडणुकीला एका विधानसभे एवढे हे मतदान होते, पण मतमोजणीला इव्हीएमपेक्षा १० ते २० टक्केच जास्त वेळ लागला. त्यामुळे बॅलेट पेपर इथून पुढे देखील मतदान घ्यावी असे मत चेतन तुपे यांनी व्यक्त केले.

काँग्रेसचे माजी आ. रमेश बागवे ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाले,

आजच्या निवडणुकीत बॅलेट पेपरच्या महत्वाचा सहभाग होता यात वादच नाही. इथून पुढे देखील बॅलेट पेपर वरच मतदान व्हायला हवे. लोकशाही मध्ये लोकांच्या मताला किंमत असते. पण हे लोक मशीनमध्ये जो घोळ करतात वारंवार तो यावेळी बॅलेट पेपरमुळे करता नाही आले.

त्यामुळे आजच्या निकालातून लोकांचे खरे मत दिसून आले आहे. सोबतच महाविकास आघाडीचा देखील फायदा झाला आहे. असेही बागवे म्हणाले.

पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाले,

आजची बॅलेट पेपर वरील निवडणूक निश्चितच चांगली झाली आहे. बॅलेट पेपरचा आमच्या पक्षाला या निवणुकीत असा फायदा झाला की, प्रत्येक मत-मत तपासायला मिळाले. किती मतपत्रिका होत्या, कोणते मत बाद होते, कोणते मत वैध ठरले असे सगळे समोर उभे राहून पाहायला मिळाले. त्यामुळे ईव्हीएम सारखी कोणतीच शंका मनात नव्हती.

पुणे महानगर पालिकेतील काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाले, 

सुशिक्षित वर्गाने आता भाजपला नाकारले आहे हे या निकालांमधून स्पष्ट आहे. ईव्हीएम हॅक होते हे सिद्ध झालेले नाही पण शंका होत्या. आजच्या निकालामध्ये बॅलेट पेपरचे महत्व अधोरेखित होऊन कोणत्याही शंका राहिलेल्या नाहीत.

आणखी जर सिद्ध करायचेच असेल तर पुढची देखील निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी. सगळेच प्रगतशील राष्ट्र निवडणूक बॅलेटवरच करतात.

या सगळ्या प्रतिक्रियांमध्ये महाविकास आघाडीच्या विजयात राज्यभरामध्ये बॅलेट पेपरचे महत्व सांगितले जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चालू असणाऱ्या चर्चामध्ये महाविकास आघाडीसोबतच बॅलेट पेपर देखील जिंकले आहे असे म्हणायला वाव आहे.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.