अक्साई चीनप्रमाणे माझ्या टकलावर काही उगवत नाही मग ते ही चीनला देऊन टाकायचं का?

अगदी सुरवातीपासून भारताने चीनशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता. चीनच्या प्रजासत्ताकला पहिली मान्यता देणारा भारत देशच होता.

दारिद्र्य व अविकसित अर्थव्यवस्था या दोन्ही देशांच्या समान समस्या होत्या. हे दोन्ही देश एकत्र आले तर जगभरात आशिया खंडाचे वर्चस्व निर्माण होऊ शकते हे नेहरूंनी ओळखले होते.

म्हणूनच हिंदी चिनी भाई भाई म्हणवणाऱ्या चीनला मदत करण्याचे त्यांनी धोरण स्वीकारले होते.

पण माओच्या चीनने याचा गैरफायदा घेतला.

साधारण १९५९ सालापासून चीनने भारतीय सीमेवर गडबड करण्यास सुरुवात केली. पण आधीच भारताचा पश्चिमेकडच्या पाकिस्तानशी वाद होताच आता पूर्वेकडील शेजारी चीनशी सुद्धा वैर सुरू होऊ नये म्हणून नेहरूंनी थोडा समजूतदार पणा दाखवायचं ठरवलं होतं.

चिनी सैन्याने एकदा भारतीय गस्ती पथकावर हल्ला केला पण चिनी पंतप्रधान चाऊ एन लाय यांच्याशी बोलून हा वाद मिटवण्यात आला.

भारतातल्या अक्साई चीनमधल्या सीमारेषेबद्दल चीनचे काही आक्षेप होते.

नोव्हेंबर १९६१ साली बॉर्डरवरील कुरबुरी वाढल्या. चीनची विमाने भारतीय हद्दीत घुसून घिरट्या घालू लागली. चीनच्या सैनिकांनीही सीमा रेषा पार करून अतिक्रमण केले होते.

खरं तर हे हिमालयातील पर्वतीय क्षेत्र होते. येथे सीमा रेषा आजही निश्चित नाही. पण या अतिक्रमणामुळे नेहरूंना आणि संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांना विरोधकांनी खिंडीत पकडले.

सोशालिस्ट पार्टीचे आचार्य कृपलानी यात सगळ्यात आघाडीवर होते.

त्यांना जनसंघाचे अटलबिहारी वाजपेयी, प्रजा समाजवादीचे हेम बारूआ, स्वतंत्रता पार्टीचे एन.जी.रंगा यांची साथ होती. कधी नव्हे ते काँग्रेसचे सदस्य देखील नेहरूंच्या धोरणाविरुद्ध कुजबुज करत होते.

आंतरराष्ट्रीय परराष्ट्र नीतीचे जाणकार भारताने हा विषय वाढवू नये या मताचे होते पण नेहरूंवरील दबाव वाढला होता.

५ डिसेंबर १९६१ रोजी संसदेत चर्चा सुरू असताना एका विरोधी पक्षाच्या खासदाराने नेहरूंवर आरोप केला की,

“पंडित नेहरू हे आपल्या देशाच्या टीमकडून खेळण्याऐवजी अंपायर म्हणून मिरवण्याची जास्त सवय आहे.”

या आरोपामुळे नेहरू भडकले. त्यावेळी केलेल्या सुप्रसिद्ध भाषणात त्यांनी अक्साई चीनमध्ये कसे गवताचे एक पाते देखील उगवत नाही आणि तेथील वाद निरर्थक आहे हे वक्तव्य केले.

याचाच एक अर्थ भारताने त्या क्षेत्रातील आपला ताबा सोडून दिल्यासारख होतं.

अख्ख्या लोकसभेमध्ये गदारोळ सुरू झाला. अशावेळी बोलायला उठलेल्या महावीर त्यागी या जेष्ठ काँग्रेस खासदारांनी आपली टोपी काढून टक्कल दाखवले आणि म्हणाले,

यहां भी कुछ नहीं उगता तो क्या मैं इसे कटवा दूं या फिर किसी और को दे दूं?

नेहरू स्वतः देखील टकले होते. महावीर त्यागी यांनी उपहासातून पंतप्रधानांवर खूप मोठी टीका केली होती.

महावीर त्यागी हे जेष्ठ गांधीवादी स्वातंत्र्यलसैनिक होते. एकेकाळी ब्रिटिश सैन्यात असणाऱ्या त्यागी यांनी जालियनवालाबाग हत्याकांडानंतर राजीनामा देऊन स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली होती.

नेहरूंचे ते अगदी जवळचे मित्र होते. दोघांची कायम चेष्टा मस्करी चालायची. मोतीलाल व जवाहरलाल या नेहरू पितापुत्रात झालेला वाद सोडवण्यात महावीर त्यागी यांनीच एकेकाळी मध्यस्ती केली होती.

यामुळे पंतप्रधानांना माहीत होतं की त्यागी यांची तळमळ सच्ची आहे. यामुळे टक्कल प्रकरण जास्त वाढलं नाही.

पण विरोधी पक्ष आणि मीडियांच्या दबावातून नेहरूंनी चीनला भारताची एकही इंच मिळू देणारी नाही अशी भूमिका जाहीर केली.

भारतीय सैन्याने देखील चीनला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. खोडसाळ चीनने याचा गैरफायदा घेत १९६२ साली युद्ध लादले आणि आपला सर्वात मोठा पराभव केला.

संदर्भ- INDIA AFTER GANDHI by Ramchandra Guha

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.