पाणीसाठा आहे पण तरी महावितरणचा शेतकऱ्यांना मोठा धक्का..

राज्यातला शेतकरी आधीच आस्मानी संकटामुळं पिचलेला आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळं नुकसान झालंय. माल पिकलाच, तर त्याला योग्य तो दर मिळत नाहीये. तरीही बळीराजानं हार न मारता तग धरला आहे.

आता रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी या हंगामावर अवलंबून आहेत. नव्यानं सुरुवात करताना शेतकऱ्यांसमोर वेगळाच पेच उभा ठाकलाय, तोही महावितरणमुळं. यंदा रब्बी पिकांची जोपासना करण्यासाठी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे. त्यामुळं उत्पादन वाढवण्याची चांगली संधी शेतकऱ्यांकडे आहे.

काय आहे महावितरणचा शॉक

आतापर्यंत शेतीसाठी १० तास वीजपुरवठा केला जात होता. आत ऐन रब्बी हंगाम अगदी तोंडावर असताना वीजपुरवठा फक्त आठ तासांसाठी राहणार आहे. साहजिकच शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ होणार आहे.

दरवर्षीचा खोळंबा

प्रत्येक वर्षी रब्बी हंगामाला सुरवात झाल्यावर महावितरणकडून हा निर्णय घेतला जातो. महावितरणच्या सिंगल फेज योजनेमुळं गावातला विद्युत पुरवठा सुरळीत असेल, पण कृषीपंपाचा पुरवठा हा दोन तासांनी कमी करण्यात आला आहे. कृषी विभागाचा अंदाज खरा ठरला, तर यावेळी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल. तसं झाल्यास रब्बीच्या क्षेत्रातही वाढ होण्याची शक्यता आहे. जर रब्बीचं क्षेत्र वाढलं, तर कृषीपंपाचा जास्त वापर करावा लागेल.

रब्बीसाठी वीज का महत्त्वाची

खरीप पिकांना पावसामुळं मुबलक पाणी मिळतं. तर रब्बी हंगामातली पिकं मुख्यत्वे साठवणूकीच्या पाण्यावरच वाढतात. हवामान खात्याचा अंदाज बघता सध्या ऊनही वाढत आहे, त्यामुळं शेतकऱ्यांना पेरणी करण्यापूर्वी आणि पेरणी झाल्यानंतरही पाणी द्यावं लागणार आहे. या समस्येमुळं शेतकऱ्यांना कमी वेळात जास्त भरणा करण्याचं आव्हान पेलावं लागणार आहे.

वीज कपात का होणार?

शेतीच्या अत्याधुनिक पध्दतींसाठी वीज गरजेची आहे. कोळसा टंचाईमुळं आधीच उद्योगांना मिळणारी वीज कमी केली आहे, त्यात आता शेतकऱ्यांनाही या टंचाईचा फटका बसणार आहे. अवघे आठ तासही सुरळीत वीजपुरवठा होईल की नाही, याची शंका असल्यानं उत्पादनात घट होण्याची मोठी शक्यता आहे.

आता कोळसा टंचाईमुळं ऐन दिवाळीत उद्योगधंदे काळोखाच्या छायेत असताना, आता शेतकऱ्यांवरही पाणीसाठा असूनही मोक्याच्या हंगामात नुकसान सोसण्याची वेळ आली आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.