आयुक्ताला मारहाण, कुटुंबाला संपवण्याची धमकी..अंडरवर्ल्ड कनेक्शन नेमकं चाललंय काय ?

गेल्या काही दिवसांपासून जितेंद्र आव्हाड आणि ठाणे महापालिकेचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यामध्ये चालू असलेल्या वाद बातम्यांमधून समोर येतच होता पण हा वाद टोकाला गेला जेंव्हा काल बुधवारी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली. ज्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याबाबतचा उल्लेख आढळतोय, त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महेश आहेर यांना गाठलं त्यांना मारहाण केली. 

हा वाद आजकालचा नाहीये तर बरीच दोन्ही बाजुंनी धुसफूस सुरु आहे. पण या दोघांमध्ये नेमकं काय भांडण आहे ? कुणीकुणावर काय आरोप केलेत? संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया..

महेश आहेर हे ठाणे महापालिकेमध्ये अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त आहेत. तर ठाण्यातल्या मुंब्रा विधानसभा मतदार संघाचे जितेंद्र आव्हाड आमदार आहेत. महेश आहेर आणि आव्हाड गटात गेल्या बरीच दिवसापासून धुसफूस सुरु आहे. त्यात मंगळवारी जितेंद्र आव्हाडांनी एक ट्विट केलं ज्यात महेश आहेर हे एका व्यक्तिला फोन करून ते अंडरवर्ल्डच्या संपर्कात आहेत आणि जितेंद्र आव्हाड यांना संपवणार असल्याचे म्हटले होते. या ट्विटनंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया येत होत्या.

त्यानंतर बुधवारी जितेंद्र आव्हाडांच्या कुटुंबियांना मारण्याबाबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. 

कथित ऑडिओ क्लिपमध्ये महेश आहेर आणि इतर दोन व्यक्तींमध्ये हे डायलॉग्स सुरु आहेत. क्लिपमध्ये  महेश आहेर यांनी आव्हाड यांचा उल्लेख साप असा केलाय, त्यांना ठेचण्याची भाषाही केली आहे. 

“माझ्या जीवाला जितेंद्र आव्हाडांकडून धोका आहे, असं पोलीस अधिकाऱ्यांना पटवून दिलं आहे, आव्हाड माझे केव्हाही काही करू शकतो असं मी क्रीयेट करून ठेवलं आहे. बाबाजीला सांगून आमचे शूटर स्पेनमध्ये कामाला लावले आहेत. नताशाचा पत्ता शोधला आहे. त्याचा जावई ठाण्यात नाही आला. तर त्याच्या बापावर एक अटॅक केला ना, तर तो एका दिवसात येईल. मी एअरपोर्ट पासून फिल्डिंग लावली. त्याची गेम करणार त्याच्या मुलीला रडायला लावणार, म्हणजे त्याला कळणार मुलीच दुःख काय असत? आपली फॅमिली उध्वस्त होऊ शकते असं वाटेल तेव्हा तो आटोक्यात येऊ शकतो”, असं सर्व प्लानिंग केलंय असे सगळं संभाषण त्या ऑडिओ क्लिप मध्ये ऐकू येतंय. 

या ऑडिओ क्लिपमधला आवाज हा महेश आहेर यांचाच असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी केलाय. तर या क्लिपबाबत जितेंद्र आव्हाडांनी देखील दुजोरा दिला होता.  महेश आहेर आव्हाड कुटुंबाला संपवण्याचा कट करत आहेत असा आरोप आव्हाड कुटुंबाकडून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय. 

तर महेश आहेर तो आरोप फेटाळत आहेत. अशा धमक्यांना आपण घाबरत नाही, पोलिसात तक्रारही मी करणार नाही कारण पोलीस काहीही करणार हे आपल्याला माहिती आहे असं आव्हाडांनी म्हंटलं आहे पण त्याच दरम्यान, जितेंद्र आव्हाडांच्या कन्या नताशा यांनी नौपाडा पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे..

ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्याच दिवशीच्या संध्याकाळी पावणे ७ च्या सुमारास जितेंद्र आव्हाड यांचे खासगी सचिव अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर यांच्यासह आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महानगर पालिकेच्या गेटवर महेश आहेर यांना गाठलं जेंव्हा ते कामकाज संपल्यानंतर घरी निघाले होते. तेंव्हाच आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी लाथाबुक्क्यांनी महेश आहेरांना मारहाण केली. महेश आहेर यांच्यासोबत त्यांचे सुरक्षारक्षकही होते, त्यातल्या एकाने आहेर यांच्या बचावासाठी बंदुक बाहेर काढली, सुरक्षा कडे करुन आहेर यांना परत मुख्यालयाच्या आत नेण्यात आलं. 

नंतर पोलिस प्रोटेक्शनमध्ये महेश आहेरांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.  इकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आले नौपाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 

जितेंद्र आव्हाडांसहित नौपाडा पोलिसांनी कलम ३५३, ३०७, ३३२, ५०६(२), १४३, १४९, १२० (ब) या अंतर्गत गुम्हा दाखल केलाय तर नगरपालिका अधिनियम ३/२५, ४/२५ अन्वये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे आता जितेंद्र आव्हाड यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पण या सगळ्या प्रकरणात कुणी कुणावर काय आरोप केलेत ते पाहूया ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जवळचे पालिका अधिकारी अशी महेश आहेर यांची ओळख आहे. मागेच जितेंद्र आव्हाडांनी आहेरांवर ब्लॅकमेलिंगचा आरोप केला होता. व्हायरल कथित ऑडिओ क्लिपमध्ये ज्या बाबाजीचा उल्लेख केलाय तो बाबाजी म्हणजे  तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर टोळीचा शूटर श्यामकिशोर गरिकापट्टी, त्याच्याच मदतीने महेश आहेर लोकांना धमकावण्याचे काम करतात. याच शूटरच्या माध्यमातून मुलगी आणि जावई यांना मारण्यासाठी महेश आहेर हे एका व्यक्तीशी ऑडिओ क्लिपमध्ये बोलत असल्याचाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. 

त्यानंतर आव्हाडांनी अनेक ट्विट्स करून महेश आहेरांच्या विरोधातले पुरावे समोर आणले आहेत. 

तर महेश आहेरांनी जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप केलेत, “ जी क्लिप व्हायरल झाली आहे, त्यात कुणाचा आवाज आहे मला माहित नाही. मी २०१९ पासून मुंब्रामध्ये सहाय्यक आयुक्त आहे. मी अनेकदा अनाधिकृत बांधकामं तोडली आहे. ही बांधकाम तोडू नये, यासाठी माझ्यावर मोठ्या प्रमाणात दबाव होता. मला आणि माझ्या परिवाराला शिवीगाळ केली जात होती”.

“मी जेव्हा अतिक्रमण विभागाचा पदभार घेतला, तेव्हा माझ्या मतदारसंघात मला विचारल्या शिवाय कारवाई करू नये, असे मला आव्हाडांनी सांगितले होते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या मी येत्या काही दिवसांत पुढे आणेल. तसेच मला आणि माझ्या कुटुंबियांना जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांपासून धोका आहे”, असे आरोप महेश आहेर यांनी केलेत. 

होणाऱ्या गंभीर आरोप-प्रत्यारोपांनुसार हे प्रकरण आणखी चिघळणार हे तर नक्की.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.