महाराष्ट्राच्या जावईबापूंच्या जीवावर सलमान खानचं करियर धक्याला लागलं..

सलमान खान सध्या भारतीय फिल्म इंडस्ट्रीमधला सर्वात मोठा हिरो मानला जातो. त्याचा प्रत्येक सिनेमा आला की बॉक्स ऑफिस फोडून कमाई करतो. पण मध्यंतरी एक काळ असा आला होता की सलमान सगळे सिनेमे फ्लॉप चालले होते. त्याच्या भोवती अनेक वाद सुरु होते.

तो संपला असच सगळ्यांना वाटत होतं. सलमानला एका हिट सिनेमाची गरज होती. अशावेळी त्याने कुठेतरी एक साऊथचा सिनेमा बघितला. तोंडावरून सज्जन दिसणारा टपोरी हिरो, त्याच्या प्रेमात पडलेली गोड मुलगी, तुफान हाणामारी व एक्शन, शेवटी हिरो टपोरी नाही तर पोलीस आहे असा सस्पेन्स.

हा सिनेमा होता. पोकीरी.

सलमानला याचा हिरो खूप आवडला. त्याची अभिनयाची स्टाईल आवडली. ताबडतोब त्याने सिनेमाच्या दिग्दर्शकाला म्हणजेच प्रभूदेवाला संपर्क केला. खरं तर प्रभूदेवाने ओरीजीनल सिनेमा दिग्दर्शित केला नव्हता त्याने याच तमिळ व्हर्जन बनवलं होतं. पण तो पोकीरीचा हिंदी रिमेक करायला तयार झाला. नाव ठरलं, वाॅन्टेड

या सिनेमाने अनेक रेकोर्ड ब्रेक केले. वाॅन्टेडमुळे सलमानच नशीब पलटल. त्याला पिक्चर हिट करायचा फॉर्म्युला सापडला. यानंतर रेडी, दबंग, जय हो , बॉडीगार्ड अशा एका पाठोपाठ एक साऊथ इंडियन सिनेमांचे रिमेक बनवले आणि ते सुपरहिट झाल्यामुळे तुफान पैसे छापले.

हे सगळ झालं पोकीरीच्या हिरो मुळे,

“महेश बाबू”

महेशबाबूचा जन्म फिल्मी फॅमिली मध्ये झाला. त्याचे वडील कृष्णा हे तेलगुचे मोठे स्टार होते. त्याचा मोठा भाऊ, बहिण हे सगळे सिनेमातच होते. चार भावंडात तिसरा असणाऱ्या महेशबाबूला अभिनयाच बाळकडू घरातूनच मिळाल.

महेशबाबू वाढला त्याच्या आजोळी मद्रासला.

कृष्णा यांचं मत होतं की आपल्या सोबत राहिला तर याच्या डोक्यात हवा जाईल. त्याच्या शाळेत देखील हा फिल्मस्टारचा मुलगा आहे हे लपवून ठेवलं होतं. त्याच्या अभ्यासावर लक्ष ठेवायची जबाबदारी त्याच्या थोरल्या भावावर रमेश बाबूवर देण्यात आली होती.

चेन्नईच्या लॉयला या कॉलेजमध्ये महेशच शिक्षण झालं. पुढे जाऊन तमिळ सुपरस्टार झालेला विजय हा त्याचा कॉलेजमधला मित्र.

शिक्षण संपल्यावर एकदा तो विशाखापट्टणम येथे गेला असता त्याची भेट दिग्दर्शक सत्यानंद यांच्याशी झाली. त्यांनी त्याला अभिनयाच प्रशिक्षण देण्याच मान्य केलं. त्यांच्या हाताखाली महेशबाबूने ३-४ महिने ट्रेनिंग घेतलं.

जेव्हा महेशबाबू तेलगु सिनेमात येण्यासाठी तयारी करू लागला तेव्हा त्याला सगळ्यात मोठी अडचण आली भाषेची.

महेश जरी मुळचा तेलगु असला तरी तो वाढला तामिळनाडूमध्ये, त्याच शिक्षण झाल कॉन्व्हेंटमध्ये. त्यामुळे तेलगु लिहिता वाचता येत नव्हतं. पण त्याने कष्टाने यावर मात केली.

लहानपणी वडिलांच्या काही सिनेमात बालकलाकार म्हणून काम करण्याचा अनुभव होता. के राघवेंद्रराव या दिग्गज दिग्दर्शकाच्या राजा मुदरू या सिनेमातून महेशबाबूने तेलगु सिनेमात एन्ट्री केली. त्याची हिरोईन होती प्रीती झिंटा. हा पहिलाच सिनेमा चांगलाच गाजला.

पहिल्याच पिक्चरमध्ये महेश बाबूला अनेक पुरस्कार मिळाले. सर्वात महत्वाच प्रेक्षकांनी त्याला प्रिन्स ही उपाधी दिली.

तेलगु फिल्म इंडस्ट्रीला नवा युवराज मिळाला होता.

पुढे मुरारी, बॉबी, ओक्करी डोंगा असे त्याचे काही सिनेमे आले. ते बऱ्यापैकी चालले, त्याला नंदी अवार्ड मिळवून दिले. समीक्षक त्याच्या अभिनयाच कौतुक करत होते पण बॉक्स ऑफिसवर  कमर्शियल सक्सेस म्हणावं तेवढ मिळत नव्हता. भूमिका चावला सोबतचा ओक्कडूने त्याला ते कमर्शियल सक्सेस मिळवून दिल.

महेश बाबू हिरो असलेला त्रिशा, सोनू सूद, सयाजी शिंदे, प्रकाशराज अशी मोठी स्टार कास्ट असलेला अताडू तर एक माईलस्टोन ठरला.

याच काळात महेश बाबूची खऱ्या आयुष्यातली लव्हस्टोरी रंगात आली होती. या लव्ह स्टोरीला मराठी तडका होता.

वामसी या सिनेमाच्या वेळी त्याची हिरोईन नम्रता शिरोडकर हिच्या प्रेमात तो पडला होता. नम्रता शिरोडकर ही सुद्धा एका फिल्म फमिली मधून येते. तिची आजी मीनाक्षी शिरोडकर ही भारतातल्या पहिल्या अभिनेत्रीपैकी एक. नम्रताची मोठी बहिण शिल्पा ही देखील हिंदी सिनेमात आघाडीची हिरोईन होती.

खुद्द नम्रता शिरोडकर १९९३ सालची मिस इंडिया होती. एवढच नाही तर मिस एशिया पसिफिक स्पर्धेत तिला दुसरे विजेतेपद मिळाले होते. पुढची ऐश्वर्या राय अशी तिची हवा झाली होती.

पण तिला सिनेमात एवढा रस नव्हता कारण ती प्रिन्सच्या प्रेमात पडली होती.

मिडिया पासून लपून त्यांनी चार वर्षे एकमेकाला डेट केलं. पुढे जेव्हा महेशबाबूच्या घरच्यांना हे कळाल तेव्हा त्याच्या वडिलाचा या नात्याला विरोध होता. महेशने एखाद्या तेलगु मुलीशी लग्न करावं असा त्यांचा आग्रह होता. पण महेश आपल्या म्हणण्यावर ठाम राहिला. त्याच्या मोठ्या बहिणीने म्हणजेच मंजूलाने कृष्णा यांना तयार केले.

२००५ साली महेश बाबू महाराष्ट्राचा जावईबापू बनला.

पण त्याच्या करीयरमध्ये बॅडपॅचचा काळ सुरु होता. महेशचे सिनेमे काही केल्या चालत नव्हते. त्याच्या बहिणीने बनवलेला नानी हा सिनेमा तर जोरदार आपटला होता. या अपयशामुळे दोघे बहीण भाऊ डिप्रेशनमध्ये गेले होते, अशातच पोकीरी आला.

पोकीरीमध्ये इलियाना त्याची हिरोईन होती. प्रकाशराज, सयाजी शिंदे, आशिष विद्यार्थी, नासर असे एकापेक्षा एक दिग्गज कलाकार त्याच्या समोर होते. हैद्राबादच्या माफिया इंडस्ट्रीवर हा सिनेमा आधारित होता. हा बनवला होता पुरी जगन्नाथ यांनी तर प्रोड्यूस केलेलं मंजूलाने.

चिकण्या महेशबाबूचा पोकीरी लोकांना प्रचंड आवडला. त्याची अॅक्टिंग, त्याची एॅक्शन, सिनेमातली गाणी सगळ हिट होतं.

पोकीरीने महेश बाबूच आजवरच सगळ अपयश धुवून काढलं. या सिनेमाने तेलगु मधले सगळे रेकोर्ड मोडले होते.

त्याकाळी आर्यामुळे तेलगु सिनेमाला इंजिनियरिंग कॉलेजच्या मुलांनी भारत भरात डिव्हीडीच्या स्वरुपात पोहचवले होते. पोकीरीने एक पाउल पुढे टाकले. हा सिनेमा फक्त तेलगुच नाही तर सगळ्या भाषा पार करून सगळीकडच्या थिएटरमध्ये गाजला होता.

महाराष्ट्रात जावईबापूचा सिनेमा धुमाकूळ घालत होता.

या सिनेमाने प्रिन्स महेश बाबूला तेलगुमध्ये सुपरस्टार पदावर नेऊन सोडले. तेलगु फिल्मइंडस्ट्री मध्ये आजवर आडदांड राउडी दिसणारे हिरो असायचे. हा शहरी दिसणारा, चिकना हिरो पहिल्यांदाच मिळाला होता.

पोकीरीचे अनेक व्हर्जन बनवले गेले. तामिळ मध्ये हा सिनेमा प्रभू देवाने महेशबाबूचा मित्र विजयला घेऊन बनवला. हिंदीत सलमान खानला. सगळे सिनेमे तुफान सुपरहिट होते मात्र आजही बघणारा प्रत्येक जण म्हणतो महेशबाबूचा पोकीरी सर्वात बेस्ट होता.

एकेकाळी तेलगु वाचायलाही न येणारा हा महेशबाबू आपल्या मेहनतीच्या जीवावर आजही तेलगु फिल्मइंडस्ट्रीवर राज्य करतोय. फक्त तिथलाच नाही तर अख्ख्या भारतातला तो सर्वात मोठ्या स्टार पैकी एक आहे.

आज या प्रिन्स महेश बाबु यांचा ४५ वाढदिवस. यानिमित्ताने अखंड महाराष्ट्रातर्फे जावई बापूंना खूप खूप शुभेच्छा.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.