ब्रेकअप करून निघालेल्या महेश भट्टला अडवण्यासाठी ती विवस्त्र अवस्थेत धावत होती.

महेश भट्ट जन्माला आला तेच एका गुंतागुंतीच्या परिस्थितीत. त्याचे वडील नानाभाई भट्ट तर आई शिरीन मोहम्मद अली. पण दोघांचं लग्न लपवण्यात आलेलं. साध्या भाषेत सांगायच तर नानाभाई यांचा महेश आणि मुकेश ही दोन अनौरस मुले होती. वडिलांचा सहवास त्याला कधी मिळालाच नाही. शिक्षण वगैरे चांगलं झालं पण लहानपणापासून बास्टर्ड असण्याचची भावना कधी गेलीच नाही.

नानाभाई हे सिनेमानिर्माते होते. महेश भट्टच्या रक्तात सिनेमा वाहत होत. तो सुद्धा इंडस्ट्रीमध्ये आला. जाहिराती दिग्दर्शित करत होता. वयाच्या विशीत असताना लॉरेन ब्राईट नावाच्या आपल्या शाळेपासूनच्या गर्लफ्रेंडशी लग्न केलं. याच काळात त्याने पहिला सिनेमा बनवला देखील. पण पहिल्याच सिनेमात त्याने एवढ कांड केलेलं की पिक्चर सेन्सॉर बोर्डने अडवून धरल. रिलीज व्हायला चार वर्षे गेली.

महेश भट्ट, आधी पासून स्वभाव सेल्फ सिस्ट्रक्टिव्ह. दारू, सिगरेट मुली प्रत्येक गोष्टींचा नशा. त्यातून स्वतःला त्रास करून घेण्यात त्याला विचित्र आनंद मिळायचा. अजून सिनेमा इंडस्ट्रीमध्ये पाय जमत होते, एकही मोठा हिट मिळाला नव्हता आणि त्याच्या बद्दल गॉसिपिंग सुरु झालं होतं.

अशातच त्याला भेटली परवीन बाबी.

परवीन बाबी म्हणजे शापित सौंदर्य. गुजरातच्या जुनागड संस्थानात जन्माला आलेली. इंग्लिशविषयात मास्टर्स केलेली बहुदा त्या काळातली एकमेव हिरोईन असावी. तिचाही स्वभाव महेश भट्टशी मिळता जुळता. सगळ्या बाबतीत बिनधास्त. तिचा नुकताच कबीर बेदीशी ब्रेकअप झालेला. दोघे लिव्हइनमध्ये रहात होते अशी चर्चा होती. कुठल्यातरी सिनेमाच्या सेटवर महेशशी तिची ओळख झाली. तो काळ म्हणजे परवीनच्या सिनेमा कारकीर्दीचा सुवर्णकाळ होता.

बच्चन सोबतचे तिचे सिनेमे गाजत होते. तिला आणि झीनत अमानला भारतीय सिनेमाचे सेक्स सिम्बॉल समजल जात होतं. पश्तून ब्युटी परवीन दिवार अमर अकबर एंथोनी, शान, काला पत्थर, नमक हलाल अशा सिनेमांची निवड करून आपल्याला सिनेमाच गणित कळालय हे सिद्ध करत होती. इकडे महेश भट्ट अजूनही यशासाठी चाचपडत होता. मोठमोठ्या गप्पा मारणे, हॉलीवूडच्या सिनेमांचे दाखले देणे वगैरे मुळे तो अगदी कमी वयात फिल्मइंडस्ट्रीच्या विचारवंतांमध्ये गणला जात होता.

परवीनला त्याच फिलॉसोफिकल बोलण आवडल. तिला महेश आवडला. दोघांचं अफेअर सुरु झालं. काम वगैरे विसरून दोघे रात्रंदिवस एकत्रच राहू लागले. तिकडे महेशचा सुखाचा संसार विस्कटला. त्याला एक मुलगा आणि मुलगी असा परिवार होता पण परवीनच्या नशेत सगळ तो विसरून गेला होता. ओशो आणि युजी कृष्णमूर्ती या फिलॉसोफिकल गुरूंच्या विचारांनी त्यांना भारावून टाकलं होतं. 

एक दिवस महेश परवीनच्या घरी गेला तेव्हा त्याला दिसल की ती सिनेमाच काॅस्च्युम परिधान करून हॉलमध्ये बसली आहे आणि हातात चाकू आहे.

महेश हादरलाच. परवीन म्हणाली घरात कोणी तरी मला मारण्यासाठी आलंय. महेशने सगळीकडे शोधून पाहिलं. कोणीच नव्हत. ती कुठल्या सिनेमाची तयारी करतेय की खरच कोणी आलंय त्याला कळेना. पण परवीन अगदी कळवळीने सांगत होती. 

अखेर डॉक्टरकडे गेल्यावर कळाल की तिला पॅरानॉईड स्किझोफ्रेनिया नावाचा मानसिक रोग आहे.

तिला निरनिराळे भास होत होते. सुपरस्टार बनलेली परवीन तिच्या एकटेपणामुळे संतुलन गमावून बसली होती. अमिताभ बच्चन तिला मारण्यासाठी प्लॅन करतोय असे झटके तिला येत होते. हळूहळू ही बातमी पूर्ण इंडस्ट्रीमध्ये पसरली. प्रत्येक पातळीवर महेश भट्ट तिला सावरण्याचा प्रयत्न करत होता. पण परवीनची स्थिती हातातून निसटत चालली होती. 

हा रोग अनुवांशिक आहे असं म्हटल जात होतं. इलेक्ट्रिक शॉक देऊन तिला बर करता येईल असं सांगण्यात येत होतं पण महेश भट्ट यासाठी तयार झाले नाहीत. भारतातील उपचाराचा तिच्यावर काही परिणाम होत नव्हता. तिची परिस्थिती कितीही खालावली तरी महेश भट्टला तिचा चढलेला नशा उतरत नव्हता. परवीन बाबीच्या सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणात ते तिच्या सोबत होते. डॉक्टर म्हणत होते की त्यांच्यामुळेच बाबीची तशी अवस्था झाली

अखेर महेश भट्टने तिला युजी कृष्णमुर्तीसोबत दक्षिण भारताच्या ट्रीपवर नेलं. त्यांचा तो वैचारिक सहवास, ताणतणाव कमी असल्यामुळे ती थोडीशी बरी झाली. पुढे तिचं आणि महेश भट्टच कोणत्यातरी कारणावरून भांडण झालं. मध्यरात्री महेश भट्ट तीला टाकून आपल्या बायकोकडे निघून गेला. असं म्हणतात की परवीन बाबी विवस्त्र अवस्थेत  आकांत करत त्यांच्या मागे धावत होती. पण महेश भट्टनी मन घट्ट केलं होतं. ते मागे वळले नाहीत.

याच काळात कृष्णमुर्तींनी तिला आधार दिला. ती त्यांच्या सोबत अध्यात्मिक शांतीसाठी म्हणून देशोदेशीच्या प्रवासाला निघून गेली. लोक म्हणाले परवीन बाबीने कृष्णमूर्तीसोबत लग्न केलय आणि ते हनिमून ला गेलेत. 

इकडे महेश भट्टला आपल्या नात्यातला अर्थ सापडला. त्याने त्यावर सिनेमा बनवला. महेश भट्टला या सिनेमाने कथाकथनाची लिंक मिळाली. स्वतःच्या आयुष्याला त्याने जगापुढे खुल केलेलं. अर्थ ला भारतीय फिल्म इंडस्ट्रीला बदलवून टाकणारा सिनेमा म्हणून ओळखल जाऊ लागलं.  

परवीन बाबीने सिनेमा इंडस्ट्रीला रामराम ठोकला. ती कृष्णमुर्तीन्सोबत अमेरिकेत स्थायिक झाली. जवळपास सातआठ वर्ष तिथे काढले. एकदिवस बातमी आली की अमेरिकेतल्या एयरपोर्टवर परवीन बाबीला अटक झाली. तिथे तिने काही तरी गोंधळ घातला होता व तिची रवानगी वेड्यांच्या वॉर्डमध्ये करण्यात आली आहे.

तो पर्यंत महेश भट्ट यांनी सोनी राजदानसोबत दुसर लग्न केलं होतं. याच लग्नासाठी त्यांनी आपला धर्म बदलून मुस्लीम करून घेतला. परवीन बाबीचं त्यांच्या आयुष्यातल महत्व कमी झालं नाही. वडिलांनी लहानपणी दिलेली जखम आणि परवीन बाबीसोबतचे जगलेले ते बेधुंद दिवस याच विषयांच्या अवतीभोवती त्यांनी आपले सिनेमे बनवले. 

पुढे काही वर्षांनी परवीन बाबी परत आली. पण ती कधीच बरी होऊ शकली नाही. परत आल्यावर तीच वाढलेलं वजन बेढब रूप कोणालाही ओळखू आल नाही. सिनेमामध्ये परतण तर शक्य नव्हत. काही वर्षांनी जुहू येथे आपल्या अपार्टमेंटमध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि तीन दिवसापर्यत तिची बॉडी सडत राहिली तरी कोणाला कळालेच नाही. एका शापित अप्सरेचा अंत झाला होता.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.