महेशबाबू एकटा नाय…या १४ हिरोंची फी ऐकली तरी फ्यूजा उडतील

महेश बाबूने परवा बॉलिवूडला कोल्ला. यावरून मराठी माणसांनी महेश बाबूला कोल्ला. आत्ता तुम्ही म्हणाल अस कुठं झालं. तर ज्या ज्या मराठी चॅनेलने महेश बाबूची बातमी केली तिथल्या कमेंट बॉक्समध्ये जावून पहा तुम्हाला पण कळेल. साऊथ विरुद्ध बॉलिवूडच्या वादात मराठी माणसं बाजू घेवून भांडत होती.

आत्ता या वादात पडणं काही गैर नाही. पण मुद्दा असाय की समजा आपण बॉलिवूडची बाजू घेवून भांडू लागतो अन् एखादा साऊथवाला तुमच्या मराठीचं काय विचारू लागला तर आपली गोची होईल.

असो मराठी इंडस्ट्रीवर टिका होते तेवढीही वाईट अवस्था नाही म्हणा. पण ज्या मराठीने भारताला सिनेमा ही गोष्ट दिली ती इंडस्ट्री बॉलिवूड आणि साऊथ इंडियनच्या भांडणात खिजगणीत देखील नाही हे पण तितकच खरय..

असो विषय काय आहे तर विषय आहे साऊथच्या मार्केटचा. महेशबाबूच्या निमित्ताने साऊथच्या हिरोचं पॅकेज डिस्कस केलं जातय. खरच हे हिरो किती रक्कम घेतात ते पाहू वाटलं आणि जे पाहिलं ते इथं मांडलं.

तर सुरवात महेश बाबू पासूनच..

महेश बाबू म्हणजे तेलगू सिनेमाचा शाहरूख प्लस सलमान. १९९९ पासून तो इंडस्ट्रीत आहे. अस सांगतात की पूर्वी महेशबाबू एका सिनेमासाठी ५५ कोटी फी घ्यायचा पण आत्ता तो एका सिनेमासाठी ८० कोटी घेतो.

२) विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा म्हणजे आपला अर्जून रेड्डी. गेल्या दोन चार वर्षात त्याने अनेक सुपरहिट सिनेमे दिलेत. गिता गोविंदम् , डियर कॉम्रेड असे त्याचे सिनेमे खरच बघण्यासारखे झालेत. असो तर याची फी १० कोटी असल्याचं सांगण्यात येतं.

३) प्रभास

प्रभासचं मार्केट आलं ते बाहुबली सिनेमानंतर. प्रभास हा असा हिरो आहे की ज्याचे दोन सिनेमे जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सिनेमाच्या यादीत पहिल्या दहा मध्ये बसतात. यातील बाहुबली २ या सिनेमाने तर जगभरात १ हजार कोटींच कलेक्शन केलं होतं. प्रभास हा एका सिनेमासाठी १०० ते १५० कोटी रुपये घेतो अस सांगण्यात येतं.

४) अल्लू अर्जून

आर्या ते पुष्पा..तेलगु स्टार अल्लू अर्जून म्हणजे ब्रिलियंन्ट माणूस आहे. तो एकट्याच्या जीवावर हिट सिनेमे देतो. शिवाय त्यांच्या पप्पांच्या नावावर पहिला १०० कोटींचा सिनेमा देण्याचं रेकॉर्ड देखील आहे. पुष्पाच्या दूसऱ्या भागासाठी अल्लू अर्जूनने 100 कोटी घेतल्याची बातमी आली कालच आली होती. अल्लू हा २० कोटींवरून ५० कोटींपर्यन्तची फी घेतो अस सांगण्यात येतं.

५) राम चरण

बाप तैसा बेटा. आत्ता राम चरण हा इंद्रा द टायगरचा पोरगा आहे. त्यामुळं तो काय हलक्यात येत नसणार हे साहजिक आहे. RRR सिनेमाच्या रिलीजपुर्वी तो एका सिनेमासाठी ३५ कोटी रुपये घेत असल्याचं सांगण्यात येत होतं. पण त्यानंतर त्याने आपली फी ४५ कोटींच्या घरात नेली. असही सांगतात की गौतम तिन्नानुरीसोबतच्या सिनेमामध्ये त्याने १०० कोटींची फी घेतली आहे. आत्ता खरं खोट त्यालाच माहिती पण इतकं खरय की तो पण बीग बजेट हिरो आहे.

६) थलपती विजय

तामिळ इंडस्ट्रीत आपले आपले ९ सिनेमे १०० कोटींच्या कल्बमध्ये घेवून जाण्याचा विक्रम थलपती विजयने करुन दाखवला आहे. थलपती हा सुपरस्टार आहे, त्यांच्या प्रत्येक सिनेमाचा एक फॅनबेस असल्याने तो नुसता असला तरी किमान त्याचा सिनेमा १०० कोटी छापतोच हे गणित आहे. म्हणजे नुकताच आलेला त्याचा बिस्ट हा सिनेमा पडला म्हणून सांगितलं जातं पण या सिनेमाने देखील २५० कोटी रुपये कमावले आहेत.

विजय आत्ता ७० कोटींहून १०० कोटींच्या घरात प्रोजेक्टनुसार फी घेतो अस सांगण्यात येतं.

७) ज्युनियर NTR

RRR सिनेमासाठी ज्युनियर NTR ने ४५ कोटींची फी घेतली होती. ज्युनियर NTR देखील तेलगु भाषेतला असा हिरोय की ज्याचा स्वत:चा फॅनबेस आहे, त्यामुळे तो चालतो आणि त्याचा सिनेमा चालतो. RRR च्या सुपरहिट प्रोजेक्टनंतर त्याने आपली फी वाढवली आहे असही सांगण्यात येतय.

८) धनुष

रजनीकांत यांचे माजी जावई धनुष. धनुष एका सिनेमासाठी ७ ते ८ कोटी फी घेतो. मात्र बॉलिवुडमध्ये जे निवडक प्रोजेक्ट त्याने केले त्यासाठी त्याने कमी रक्कम घेतली होती. साधारण एका प्रोजेक्टसाठी तो ७ ते ८ कोटी घेत असला तरी आगामी सिनेमासाठी त्याने ५० कोटींची फी घेतल्याची बातमी आली होती.

९) चिरंजीवी.

इंद्रा द टायगर वाला चिरंजीवी. आचार्य सिनेमासाठी त्याने ५० कोटींची फी घेतल्याची चर्चा होती. साधारण चिरंजीवी ३० ते ४० कोटी एका प्रोजेक्टसाठी घेत असल्याचं सांगण्यात येतं.

१०) पवन कल्याण

पवन कल्याण देखील आत्ता ५० कोटींच्या घरात गेला आहे. साऊथची गाडी पाहून पवनने पण आपला रेट वाढवला आहे.

११) कमल हसन

कमल हसन एका सिनेमासाठी १० कोटींची फी घ्यायचा. जेव्हा कोणीच मार्केटमध्ये नव्हतं तेव्हा कमल हसनची ही फी होती. विश्वरुपम् सिनेमानंतर त्याने आपली फी वाढवून २५ कोटी केली.

१२) सुर्या

सिंघममुळे अजय देवगणचं करियर पुन्हा रुळावर आणणारा ओरिजनल सिंघम म्हणजे सुर्या. सुर्या एका सिनेमासाठी १० ते १५ कोटी घेतो. डबिंग होवून सिनेमा इतर भाषेत रिलीज होणार असेल तर सुर्या त्यासाठी एक्स्ट्रा ५ कोटी घेतो अस सांगण्यात येतं.

१३) विक्रम

अपरिचित वाला विक्रम. त्याचेही अनेक सिनेमे हिंदीत डब केलेले पहायला मिळतील. त्यातला अपिरचित सुपरहिट चालला. सामी एक, सामी दोन हे देखील जोरात चालले. तो एका सिनेमासाठी १२ कोटी घेतो अस सांगितलं जातं.

सर्वात शेवटी नंबर लागतो तो रजनीकांत सरांचा. रजनीकांत एका सिनेमासाठी १०० कोटींचा डाव मांडतात अस सांगण्यात येतं. बाकी रजनीकांत यांच्यावर लिहण्याएवढे आम्ही पामर कोण..?

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.