प्रबोधनकारांच्या पुढाकारातून माहीम पार्कचं शिवाजी पार्क झालं

शिवसेना आणि दसरा मेळावा असे ठरलेले गणित आहे. या  निमित्ताने दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या मेळाव्याला राज्यभरातून शिवसैनिक येत असतात. मात्र, यंदा पाच ऑक्टोबरला येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात नेमका कोणी मेळावा घ्यायचा, यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.

शिंदे गटानं जसा मूळ शिवसेना आमचीच आणि शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण आमचाच अशी भूमिका मांडली, तसा आता दसरा मेळाव्यावरही शिंदे गटानं हक्क सांगितला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेणार असल्याचा दावाच शिंदे गटाकडून केला जात आहे.

एकेकाळी याच मैदानात दर दसऱ्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जादुई आवाज घुमायचा. कानाकोपऱ्यातील शिवसैनिक विचारांचं सोनं लुटायला इथं हजर व्हायचे.

बाळासाहेबांच्या नंतर उद्धव ठाकरे यांनी हा वारसा पुढे चालवला. त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ देखील याच मैदानात घेतली. शिवसेना या वादळाच्या जडणघडणीच्या अनेक आठवणी या मैदानाशी जोडलेल्या आहेत. 

शिवतीर्थाच्या मातीतल्या कणाकणाच्या इतिहासाशी ठाकरे घराण्याचं नातं आहे. इतकंच काय तर मैदानाचं नामकरणात देखील प्रबोधनकार ठाकरे यांचा मोठा वाटा आहे.

पूर्वी या मैदानाचे नाव होते माहीम पार्क. 

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबईला प्लेगच्या साथीने छळलं होतं. इंग्रजांच्या काळात मुंबईचा झपाट्याने विस्तार होत होता पण प्लेगमुळे मृत्यूचे प्रमाण भयानक वाढले होते. या साथीत मुख्य शहरावरचा भार कमी करावा म्हणून बॉम्बे सिटी इम्प्रुव्हमेंट ट्रस्टची स्थापना इंग्लिश सरकारने केली होती.

या अंतर्गत परळ आणि माहीम यांच्यादरम्यान इंग्रजांनी पहिले उपनगर वसवले. हेच ते दादर.

दादर ही मुंबईतील पहिली नियोजित लोकवस्ती.

अगदी योजनेप्रमाणे बांधकाम झाले होते. यात प्रमुख भर हा सांडपाण्याच्या व्यवस्थेवर होता. इमारतींची उंची तीन मजल्यांपेक्षा जास्त नसावी तसेच दोन इमारतींमध्ये योग्य अंतर असावे असे ठरले होते. या योजनेत रहिवासी इमारतीं सोबतच व्यावसायिक आणि शैक्षणिक इमारतीसुद्धा होत्या. खेळाची मैदाने तसेच उद्यानांसाठीही जागा राखून ठेवण्यात आली होती.

यातच माहीम पार्कचा देखील समावेश होत होता.

दादरमध्ये विशेषतः मराठी मध्यमवर्गीय नोकरदारांनी घरे घेतली. १९२५ सालच्या दरम्यान प्रबोधनकार ठाकरे पुण्याहून इथे राहायला आले.

सार्वजनिक नवरात्रोत्सव सुरु करणे अशा गोष्टीतून त्यांनी तिथल्या सामाजिक कामात भाग घेण्यास सुरवात केली. प्रबोधनकार ठाकरे यांचे पुण्यातील ब्राम्हणेतर चळवळीमुळे मोठे नाव होते. मुंबईत देखील डॉ.आंबेडकर, रायबहादूर बोले यांच्या बरोबरीने बहुजन समाजाच्या उद्धारासाठी झटणारे नेते म्हणून त्यांना ओळख मिळाली.

मुंबई महानगरपालिकेने १९२५ साली माहीम पार्क सर्वसामान्यांना खुले केले.

दादर मधल्या प्रतिष्ठित व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांची ३०० वी जयंती थाटामाटाने साजरी करायचे ठरवले. शिवरायांच्या जन्मतिथीवरून वाद सुरु होताच मात्र त्यावेळच्या राजवाडे, सरदेसाई, जदुनाथ सरकार या इतिहासकारांच्या सल्ल्याने ही जयंती १९२७ साली साजरी करायचे ठरले.

प्रबोधनकार ठाकरे यांनी छ.शिवाजी महाराजांच्या तीनशेव्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त मैदानाचे नाव माहीम पार्कचे शिवाजी पार्क करावे असे सुचवले.

तेव्हाच्या नगरसेविका होत्या गांधीवादी नेत्या अवंतिकाबाई गोखले. अवंतिकाबाईंनी मुंबई म्युन्सिपाल्टीमध्ये नामांतराचा विषय लावून धरला. त्यांच्या व अनेकांच्या प्रयत्नामुळे १० मे १९२७ रोजी ठराव क्रमांक १२३६ नुसार माहीम पार्कचे नाव शिवाजी पार्क असे करण्यात आले. तसा संगमरवरी चबुतरा देखील उभारण्यात आला.

यालाच पुढे शिवतीर्थ म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

भारतात घडलेल्या अनेक राजकीय घडामोडींचा हा शिवाजी पार्क साक्षीदार ठरला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पासून ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या पर्यंत अनेक नेते या मैदानाच्या परिसरात राहिले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ या मैदानाच्या साक्षीने बहरली. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असलेली चैत्यभूमी देखील याच परिसरात उभारण्यात आली. 

तब्बल २८ एकरांमध्ये पसरलेल्या या मैदानात असलेलं गणपतीचे मंदिर आणि समर्थ व्यायाम शाळा ही शिवतीर्थाची ओळख होती.

या ऐतिहासिक मैदानात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्याची कल्पना पुढे आली. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी सार्वजनिक वर्गणी जमवून या पुतळ्याची उभारणी केली. तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते.

शिवसेनेचा जन्मच या मैदानात झाला.

पहिल्या दसरा मेळाव्याला गर्दी होईल की नाही याची शिवसेनाप्रमुखांना काळजी लागली होती. त्यांनी मैदानाच्या एका कोपऱ्यात स्टेज उभा केला. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पहिल्याच दसरा मेळाव्याला तब्बल चार लाख लोक हजर होते. बाळासाहेब ठाकरे यांनी आपलं पहिलं भाषण केलं. 

“असं हे दृश्य आहे की जो कोणी येथे आला नसेल तो दुर्दैवीच म्हटला पाहिजे. मला वाटतं महाराज जर येथे असते तर त्यांचं घोडंसुद्धा उधळलं असतं !

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ दसर्‍याच्या दिवशीच होणार होत; पण तो लांबल. महाराजांना असं वाटलं असेल की काय उपयोग आहे येऊन या शिवाजी पार्कवर? जेथे माझा मराठी माणूस भेकड, नेभळट, नामर्द झालेला आहे, तिथे पार्कमध्ये भय्ये हिंडताहेत. चुरमुरेवाले, खाणारेदेखील उपरेच.

म्हणून महाराजांनी ठरवलं असेल की प्रथम हा ‘शिवसेने’चा मेळावा पाहतो, मराठी माणूस जिवंत आहे की नाही ते बघतो आणि तो जिवंत असेल तर मग १३ ला नाही, ६ तारखेला येतो!”  

तिथून पुढे सलग चाळीस वर्षे बाळासाहेबांची तोफ शिवतीर्थावर कडाडत राहिली. अनेक महत्वाचे निर्णय शिवसेना प्रमुखांनी या मैदानात जाहीर केले. एखाद्या पक्षाने, दरवर्षी एका ठराविक दिवशी, एकाच जागी वर्षानुवर्षं सलगसभा घेणं हा रेकॉर्ड असावा.

बाळासाहेबांचे अंतिम संस्कार देखील शिवाजी पार्क मैदानातच झाले.

हे मैदान फक्त राजकीय चळवळी मुळे गाजले असं नाही तर संदीप पाटील, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर असे जागतिक दर्जाचे खेळाडू घडवणारी क्रिकेट पंढरी म्हणून देखील याची ओळख आहे. गुरु रमाकांत आचरेकर यांच्या मुळे राजकारणापाठोपाठ क्रिकेटचे धडे शिवाजी पार्कची ओळख बनली.

गेली अनेक वर्षे शिवाजी पार्कचे नामांतर छत्रपती शिवाजी महाराज पार्क करण्यात यावे अशी मागणी सुरु होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनल्यानंतर याच्या हालचाली वेगवान झाल्या. या वर्षीच्या मार्च महिन्यात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा प्रस्ताव मंजूर करून तशी घोषणा महापालिकेत केली.

आजही इथे कित्येक पर्यटक सचिन व्हायच किंवा बाळासाहेबांसारखा महान वक्ता व्हायच स्वप्न बघत भक्तिभावाने शिवतिर्थाचे दर्शन घेण्यासाठी येतात. महापरिनिर्वाणदिनाच्या वेळी लाखो भीम अनुयायी इथे हजर राहतात.

अजूनही दादरमध्ये मराठी माणसाचा टक्का खालावलेला नाही. मैदानाभोवतीच्या कट्ट्यांवर मराठी काका आजोबा आपापल्या घोळक्याने गप्पा मारताना पाहायला मिळतात.  

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्यापासून ते आचार्य अत्रे, यशवंतराव चव्हाण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, प्रबोधनकार ठाकरेंच्या पासून ते बाळासाहेब, राज आणि उद्धव या पिढ्यांनी गाजवलेल्या, सचिन कांबळी सारख्या क्रिकेटर्सनी ठोकलेल्या चौकार षट्कारांची जन्मदात्री असलेल्या या मैदानाला मराठी माणसाचा स्वाभिमान म्हणून ओळखतात हे उगीच नाही.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.