स्तनात गाठ आली ? स्तनाचा आकार वाढला ? ब्रेस्ट कॅन्सरला सिरियसली घ्या…

कल्पना करा.. एक दिवस तुमच्या कानावर आलं कि, तुम्हाला ‘कँसर’ झालाय…एखादा दुसरा आजार झाला असता तर वाचण्याचे चान्सेस तरी असते मात्र कँसर म्हणलं कि, काळजात चर्रर्र होतं…

त्यातल्या त्यात ब्रेस्ट कँसर म्हणजेच स्तनाचा कर्करोग हा तर महिलांना लागलेला शाप म्हणावा लागेल. कारण ब्रेस्ट कॅन्सरच्या वेदना या त्याच महिला सांगू शकतील ज्यांनी या कॅन्सरला तोंड दिलंय किंव्हा देतायेत. कँसरच्या होणाऱ्या शारीरिक वेदना, मानसिक परिणाम आणि सर्वात मोठी भीती म्हणजे आपण जगणार की मरणार ???

हेच ब्रेस्ट कँसरचं संकट आपल्या लाडक्या महिमा चौधरीवर आलंय. महिमा सद्या ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. 

अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केलाय ज्यामध्ये महिमा रडतांना दिसतेय. तिचे अनुभव शेअर करतांना ती सांगते कि, तिला कोणतीही लक्षणे नव्हती. ती दरवर्षी रेग्युलर टेस्ट करत असायची. यावेळेस मात्र तिला कँसरची टेस्ट करण्याचा सल्ला मिळाला आणि जी भीती तिला वाटलेली ती खरी ठरली, तिला  ब्रेस्ट कँसर असल्याचं निष्पन्न झालं. महिमाचं नशीब तिला ही बातमी लवकर कळाली. कारण ब्रेस्ट कँसर लवकर तपासे, लवकर उपचारे; त्यास आयु आरोग्य लाभे या गटात येतो.

कँसर म्हणजे साक्षात मरण नाही. मात्र काही संथ आणि खोलवर परिणाम करणारे कँसर असतात हे दुर्लक्षून चालणार नाही.

मनीषा कोईराला, सोनाली बेंद्रे, लिसा रे, छवी मित्तल अशा अनेक सेलेब्रेटींना कॅन्सरला तोंड द्यावं लागलं..  

भारतात दरवर्षी येणारी ब्रेस्ट कॅन्सरच्या आकडेवारी लाखांच्या घरात आहे. आणि त्यापैकी ५०००० महिलांचा याच कॅन्सरमुळे मृत्यू होतो. हे आमच्या मनाची आकडेवारी नसून सरकार दरबारी नोंद असलेली आकडेवारी आहे.

२०१२ मधली आकडेवारी पाहिल्यास, १ लाख ४४ हजार ९३७ ब्रेस्ट कॅन्सर पेशंटची नोंद झालेली तर ७० हजार २१८ महिलांचा मृत्यू झालेला.  

तर २०२० ची आकडेवारी सांगते, २०२० मध्ये १३.९ लाख ब्रेस्ट कॅन्सरची प्रकरणं समोर आलेली. सरासरी एकदा काढायचा तर २०२५ मध्ये हा एकदा १५ लाख क्रॉस करेल अशी शक्यता वर्तवली जातेय.

ही आकडेवारी ब्रेस्ट कॅन्सरची समस्या किती धोकादायक आहे याची जाणीव करून देते. गेल्या १०-१५ वर्षांमध्ये तरुण महिला “ब्रेस्ट कॅन्सरच्या” विळख्यात येत आहेत.

याचं मुख्य कारण म्हणजेच बदलती जीवनशैली. दारू, धूम्रपान सारखे व्यसन, फास्ट फूड, लठ्ठपणा. 

ब्रेस्ट कॅन्सर ची लक्षणे काय आहेत ?

 • सगळ्यात मोठं आणि ठळक लक्षण म्हणजे स्तनात गाठ येणे.

छातीत किंव्हा स्तनामध्ये जर गाठ आढळली मग ती कितीही छोट्या आकाराची असो कॅन्सरची शंका घेणं अतिशयोक्ती अज्जीबात ठरणार नाही. 

 • निपल्समधून डिस्चार्ज होणे.
 • निपल्स आत मध्ये जाणे.
 • निपल्सची जागा खाजणं.
 •  निपल्स लाल होणे तसेच तो भाग दुखणे. 
 • अचानक स्तनाचा आकार वाढत जाणे.
 • अचानक स्तन आकुंचन पावणे.
 • स्तन अचानक घट्ट /कडक होणे.
 • पाठदुखीचा त्रास होणे.
 • अंडरआर्म्स मध्ये सूज येते.
 • अचानक वजन कमी होणे, भूक न लागणे.

आणखी एक लक्षण किंव्हा कारण आपण म्हणू शकतो ते म्हणजे, अनुवांशिकता. ब्रेस्ट कँसरला कौटुंबिक इतिहास असतो. तुमच्या कुटुंबात, रक्ताच्या नात्यातल्या कुणाला कँसर झालेला असेल तर त्यांच्या मार्फत हा आजार पसरू शकतो.

 

ब्रेस्ट कँसरवरच्या उपचाराची प्रक्रिया पुढील गोष्टींवर अवलंबून आहे.

 • कँसर शरीरात किती टक्के पसरलाय ?
 • कॅन्सरच्या पेशींचा प्रकार कोणता आहे ?
 • पेशंट महिला मेनोपॉज च्या स्थितीत आहे का ?
 • ब्रेस्ट कँसर स्तनांच्या स्नायूंमध्ये किती प्रमाणात पसरलाय ?
 • एकाच स्तनात आहे का दोन्ही स्तनांमध्ये, इतर अवयवांमध्ये, किंव्हा मेंदूमध्ये पसरला आहे?
 • कँसर प्रसाराचं प्रमाण किती टक्के आहे?

ब्रेस्ट कॅन्सर पेशंटला कोणत्या प्रकारचे उपचार द्यायचे हे त्या त्या रुग्णांवर अवलंबून असते.काही पेशंटवर तर एकत्रितपणे उपचार केले जातात. त्यातील उपचार पद्धती पाहिल्यास,

१) सर्जिकल ऑपरेशन – या ऑपरेशनमध्ये ब्रेस्टमधील कँसरची गाठ काढून टाकली जाते. पेशंट प्रमाणे त्यांच्यावर २ प्रकारचे ऑपरेशन केले जातात.

२) लम्पक्टॉमी – या ऑपरेशनमध्ये ब्रेस्टमधील गाठ काढून टाकली जाते, बाकी स्तनाचा भाग तसाच ठेवला जातो. 

३) मास्टॅक्टॉमी – या ऑपरेशनमध्ये डॉक्टर संपूर्ण स्तनच काढून टाकतात. 

४) किमोथेरपी – किमोथेरपी म्हणजे औषधांद्वारे कँसर पेशी नष्ट करणे. ही औषधे सुई द्वारे नसांमध्ये सोडले जाते. तसेच मुखावाटे देखील ही औषधे दिली जातात. जास्तीत जास्त याच थेरपीची शिफारस केली जाते. यावर अनेकांचा विश्वासही बसतो कारण ही थेरपी पुन्हा कँसर डिटेक्ट करण्याची जोखीम कमी करते.

५) हार्मोनल थेरपी –हार्मोनल थेरपी ही थेट कँसर पेशींना वाढण्यासाठी जी संप्रेरकं मदत करतात त्यांना रोखण्याचं काम करते. खासकरून ऑपरेशननंतर ब्रेस्ट कॅन्सर पेशंटला ही थेरपीची शिफारस केली जाते. तसेच काही प्रकरणं याला अपवाद ठरतात कारण काही प्रकरणांमध्ये स्तनातील गाठीचा आकार कमी करते.

 ६) बायोलॉजिकल थेरपी – कँसर पेशी नष्ट करण्यासाठी या थेरपीचा वापर होतो. तसेच या थेरपीमध्ये  रोगप्रतिकारक शक्ती वापरतात. तसेच कँसर पेशींचा प्रसार रोखण्यासाठी याचा वापर होतो.

७) रेडीएशन थेरपी – स्तनाच्या आतील कँसर पेशी नष्ट करण्यासाठी या थेरपीचा वापर होतो, त्यात एक्स रे कणाद्वारे या पेशी मारल्या जातात.

सुरुवातीच्या टप्प्यात स्तनाच्या कर्करोगाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. बहुतेक प्रकरणांमध्ये, ही कॅन्सरची गाठ इतकी लहान असते की ती जाणवतही नाही, परंतु मॅमोग्राम टेस्टद्वारे ती ओळखली जाऊ शकते. आता सगळ्याच गाठी या कॅन्सरच्या नसतात मात्र याबाबत खबरदारी घेतलेली बरी असते.

वैयक्तिकरीत्या आपण काय काळजी घ्यायची ?

 • वाढत्या वयात आपले वजन नियंत्रणात ठेवले पाहिजे.
 • दररोज शरीराच्या हालचाली केल्या पाहिजेत. व्यायाम इत्यादी.
 • अति प्रमाणात धूम्रपान, मद्यपान टाळलं पाहिजे.
 • भरपूर फळं आणि भाज्या खाल्या पाहिजेत आणि बॉडीला हायड्रेट ठेवलं पाहिजे

सर्वात महत्वाची काळजी म्हणजे, मासिक पाळी येऊन गेल्याच्या ४-५ दिवसांनी Self-Breast Examination करावं.

म्हणजेच घरच्या घरी स्वतःच्या स्तनांची तपासणी केली पाहिजे. थोडक्यात जे वर ब्रेस्ट कॅन्सरचे लक्षणं सांगितलीत ती जाणवत आहेत का ? तशी चिन्ह आहेत का ? उदा. स्तनांचा आकार, रंग, ठेवणं बदललीय का ? निपल्स आतल्या बाजूला गेलेत का इत्यादी लक्षणं तपासत राहावीत. मात्र हेही लक्षात असू द्यात सर्वच गाठी कॅन्सरच्या नसतात तर साधारण गाठींचं देखील यात प्रमाण असतं.

इतकंच नाही तर ब्रेस्ट कॅन्सरमध्ये अलीकडे पुरुषांचं ही प्रमाण वाढायला लागलंय, स्त्री असो वा पुरुष गाठ कोणत्याही प्रकारची असोत, त्यासाठी मॅमोग्राफी टेस्ट करून घ्यावी. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.