महिंद्राची स्थापना करणारा माणूस पुढं जाऊन पाकिस्तानचा अर्थमंत्री बनला.

महिंद्रा अँड महिंद्रा भारताला जगाच्या पाठीवर ओळख मिळवून देणारा ब्रँड. भारताच्या पहिल्या जीप, ट्रॅक्टरपासून ते आजच्या एक्सयूव्ही पर्यंत महिंद्राचा डंका वाजतोय. आनंद महिंद्रांच्या नेतृत्वाखाली देशाची ओळख बनलेला महिंद्रा अँड महिंद्रा मात्र एकेकाळी महिंद्रा अँड मोहम्मद होता.

गोष्ट आहे स्वातंत्र्यापूर्वीची.

महिंद्राची स्थापना करणाऱ्या जगदीशचंद्र महिंद्रा यांचा जन्म लुधियानाच्या एका संपन्न परिवारात झाला. त्यांना एकूण आठ भावंडे. जगदीशचंद्र सगळ्यात थोरले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावले. जगदीशचंद्र यांच्या वर संपूर्ण घराची जबाबदारी येऊन पडली. घरची शेतीवाडी सांभाळणे हा त्यांच्यापुढे पर्याय होता मात्र जगदीश हे महत्वाकांक्षी होते. त्यांना शिक्षणाचे महत्व ठाऊक होतं.

वडिलांनी मृत्यूपूर्वी त्यांच्या कडून वचन घेतलेलं कि,

“भावंडाना अंतर देणार नाही आणि शिक्षण पूर्ण करेन “

हे वचन पूर्ण करण्यासाठीच जगदीशचंद्र महिंद्रा मुंबईला आले. त्याकाळी देशातील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या व्हीजेटीआयमध्ये इंजिनियरिंग साठी प्रवेश घेतला. जात्याच हुशार होते. चांगल्या मार्काने त्यांनी डिग्री मिळवली. शिक्षण झाल्या झाल्या त्यांना टाटा स्टील येथे मोठ्या पगाराची नोकरी मिळाली.

ते वर्ष होतं १९२९. जेसी महिंद्रा यांनी तिथे प्रचंड कष्ट केले, प्रामाणिकपण काम केलं. या होतकरू तरुणाची कर्तबगारी ओळखून टाटांनी त्यांना सिनियर सेल्स मॅनेजर बनवलं. हातात पैसा येऊ लागला. जगदीशचंद्र यांना वडिलांनी दिलेल्या दुसऱ्या वचनाची आठवण होती. त्यांनी आपल्या भाव बहिणींच्या शिक्षणाकडे देखील तितकेच लक्ष पुरवले.

आपल्या पाठच्या भावाला म्हणजेच कैलाशचंद्र महिंद्र उर्फ केसी याला लाहोरच्या सरकारी कॉलेजमधील डिग्री झाल्यावर थेट इंग्लन्डमध्ये केंब्रिज येथे उच्चशिक्षणासाठी पाठवून दिलं.

केसी महिंद्रा देखील हुशार व मेहनती होता. केंब्रिजमध्ये एक स्कॉलर विद्यार्थी म्हणून त्यांची ओळख होती. फक्त अभ्यासातच नाही तर हॉकी आणि इतर खेळात देखील ते चमकत राहिले. शिक्षण झाल्यावर इंग्लंडमध्येच मेसर्स मार्टिन अँड कंपनीमध्ये नोकरी केली.

इकडे जेसी महिंद्रा देखील आपल्या टाटा स्टीलच्या नोकरीमध्ये एकापाठोपाठ एक प्रगतीची शिखरे गाठत होते.

अशातच जगाला बदलून टाकणारी एक घटना घडली. दुसरे महायुद्ध

दुसऱ्या महायुद्धात इंग्लंड जर्मनीच्या विरोधात उतरली होती. सहाजिकच पारतंत्र्यात असणारा भारत देखील यात ओढला गेला. युद्धासाठी लागणाऱ्या स्टीलचा मोठ्या प्रमाणात पुरवठा भारतातून इंग्लंडला होऊ लागला. ब्रिटिश सरकारने या वर नियंत्रण ठेवण्यासाठी व काळाबाजार रोखण्यासाठी जेसी महिंद्रा यांची स्टील कंट्रोलर ऑफ इंडिया या पदी निवड केली.

साधारण याच काळात केसी महिंद्रा यांची अमेरिकेतल्या इंडियन पर्चेसिंग मिशनचा हेड बनवण्यात आलं. युद्धकाळात लागणाऱ्या सामुग्रीच्या पुरवठ्यामध्ये या दोघं भावंडांची ओळख मलिक गुलाम मोहम्मद याच्याशी झाली. तो मूळचा लाहोरचा. केसी महिंद्रा यांचा समवयस्क होता. ब्रिटिश सरकरमध्ये ऑडिट आणि अकाउंट सर्व्हिस मध्ये काम करायचा. पोस्ट आणि टेलिग्राफ डिपार्टमेंटच्या फायनान्शिअल ऑफिसर पदी त्याची निवड झाली होती.

दुसरे महायुद्ध सुरु झाले तेव्हा त्याला संपूर्ण भारताचा कंट्रोलर जनरल ऑफ स्टोअर्स आणि कंट्रोलर जनरल ऑफ पर्चेस अँड सप्लाय बनवण्यात आलं. स्टील डिपार्टमेंटचे नियंत्रक असणाऱ्या जेसी महिंद्रांशी त्यांचे सूर जुळले.

या काळात गुलाम मोहम्मद यांनी प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने केलेल्या कामाची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने ऑर्डर ऑफ इंडियन एम्पायर या पुरस्काराने सन्मानित केले. पुढे त्यांची हैद्राबाद संस्थानच्या दिवाण पदी निवड करण्यात आली.

दुसरे महायुद्ध संपले तेव्हा जेसी महिंद्रा आणि केसी महिंद्रा यांच्या मनात आपला स्वतःचा स्टील उद्योग सुरु करायचे विचार घोळू लागले. गुलाम मोहम्मद देखील त्यांना जॉईन झाले. २ ऑक्टोबर १९४५ रोजी मुंबईमध्ये या तिघांनी स्टील कंपनी रजिस्टर केली.

याला नाव देण्यात आले “महिंद्रा अँड मोहम्मद”

mm2 4970112 m

एम अँड एम नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीने स्टील उद्योगात आपले पाय रोवण्यास सुरवात केली. जेसी महिंद्रा या कंपनीचे पहिले चेअरमन होते. गुलाम मोहम्मद यांच्या कडे अकाउंट्सची जबाबदारी देण्यात आली होती. महिंद्रा अँड मोहम्मदची सुरवात चांगली झाली. जेसी महिंद्रा, केसी महिंद्रा, गुलाम मोहम्मद या तिघांच्या कष्टामुळे बरीच कामे त्यांना मिळाली. कंपनीचा पसारा वाढत होता.

पण याच दरम्यान ब्रिटिश सरकारतर्फे भारताला स्वातंत्र्य देण्याची तयारी सुरु झाली. पण हे स्वातंत्र्य कोणत्या स्वरूपात द्यायचे हे निश्चित नव्हते.

भारताच्या अंतरिम सरकारमध्ये मुस्लिम लीगचे लियाकत अली खान हे अर्थमंत्री बनले. त्यांना जेव्हा पहिले बजेट सादर करायचे होते तेव्हा त्यांनी मदतीसाठी गुलाम मोहम्मद यांना दिल्लीला बोलावून घेतले. त्यांची कॅबिनेट सेक्रेटरीपदी निवड झाली. हैदराबादची नोकरी सोडून गुलाम मोहम्मद सरकारमध्ये सामील झाले. अर्थसंकल्प बनवताना त्यांनी चमकदार कामगिरी केली. लियाकत अली त्यांच्यावर प्रचंड खुश झाले.

१५ ऑगस्ट १९४७ साली जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा इंग्रजांनी फाळणी करून पाकिस्तानची देखील निर्मिती केली होती. अनेक मुस्लिम भारतातून पाकिस्तानला स्थलांतरित झाले तर तेथील हिंदू भारतात परत आले.

गुलाम मोहम्मद हे धर्मनिरपेक्ष विचारांचे होते. त्यांना भारत प्रिय होता. धर्माच्या आधारावर बनलेल्या पाकिस्तानला जाण्याचा  इरादा नव्हता. मात्र लियाकत अली हे नव्या देशाचे पहिले पंतप्रधान बनले. त्यांना ठाऊक होते जर पाकिस्तानची आर्थिक स्थिती भक्कम बनवायची असेल तर अर्थमंत्री म्हणून एकच माणूस योग्यतेचा आहे तो म्हणजे मलिक गुलाम मोहम्मद. त्यांनी त्याची समजूत काढली आणि पाकिस्तानला येण्यास राजी केलं.

गुलाम मोहम्मद पाकिस्तानचे पहिले अर्थमंत्री बनले.

हा महिंद्राच्या साठी मोठा धक्का होता. गुलाम मोहम्मद हे त्यांच्या व्यवसायातले पार्टनर होते. त्यांच्याकडे तर शेअर्स होतेच पण कंपनीचे नावच महिंद्रा आणि मोहम्मद असे होते. गुलाम मोहम्मद यांना अर्थमंत्रीपदाची मोठी जबाबदारी मिळाली असल्यामुळे त्यांनी आपण परत येणार नाही हे महिंद्रांना सांगून टाकले. आपल्याकडे असलेले शेअर्सदेखील महिंद्राच्या नावावर ट्रान्सफर केले.

आता प्रश्न उरला होता कंपनीच्या नावाचा. एम अँड एम नावाने कंपनीची सगळी स्टेशनरी बनली होती. सर्वत्र मार्केटिंग याच नावाने केले जात होते. पुन्हा नव्या नावाने सुरवात करणे एका छोट्या कंपनीला परवडणारे नव्हते. अखेर जेसी महिंद्रा यांनी एक आयडिया केली, गुलाम मोहम्मद यांच्या जागी आपल्या धाकट्या भावाची नेमणूक केली आणि कंपनीचे नवे नाव बनले,

“महिंद्रा अँड महिंद्रा “

ब्रिटिश भारत सोडून गेले पण जाताना ते देशाला एक दुभंगलेला दरिद्री देश बनवून गेले होते.

भारताच्या नवनिर्मात्यांनी जिद्द केली होती,

“छोट्याशा सुई पासून ते अंतराळयाना पर्यंत प्रत्येक गोष्ट भारतात बनवायची, पुढच्या पिढ्यांना कोणापुढे हात पसरायला लागू नये.”

अनेक नवीन उद्योजकांना घडवण्यासाठी स्वतः पंतप्रधान उपपंतप्रधान पुढे आले. त्यांनी देशात कारखाने उभे राहावेत यासाठी शकत ती सगळी मदत या उद्योजकांना देऊ केली. अशातच भारतीय लष्कराला वाहने लागणार होती. केसी महिंद्रा जेव्हा अमेरिकेत होते तेव्हा त्यांनी विली जीप पहिले होते. दुसऱ्या महायुद्धात त्यांची कामगिरी जवळून अनुभवली होती. केसी महिंद्रा यांनी आपल्या मोठ्या भावाला या जीप निर्मितीच्या उद्योगात जाण्यास तयार केले. सरकार तर त्यांच्या पाठीशी होतेच.

केसी महिंद्रा यांनी जिद्दीने महिंद्रा जीपची निर्मिती केली. ती तुफान गाजली. गावागावात खेडोपाडी जीप घुमू लागली. आज आपण पाहतो त्या जागतिक कीर्तीच्या महिंद्रा अँड महिंद्रा ऑटोमोबाईल कंपनीचा जन्म झाला होता .

हे ही वाच भिडू.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.