शनिवारवाड्यात महात्मा फुले यांना न मिळालेले बक्षीस

“आमचे स्वतःचे कार्ल मार्क्स” म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांचा गौरव केला, हे आपण बोलण्यापुरतं सोडून थोडं सिरियसली घेतलं पाहिजे.

दोघांनी इतिहासाला एक मोठा अर्थ देऊन त्याची गुंतागुंत मोकळी केली आहे. समाजसुधारक म्हणून त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याशी बहुतांश लोक परिचित आहेत. त्यांना भारतरत्न देण्याची मागणी अधून-मधून जोर धरते मात्र महात्मा फुले यांनी लिहून ठेवलेल्या सांस्कृतिक ठेव्याकडे बहुतांशी दुर्लक्ष झाले आहे.

अधून मधून त्यांच्या जयंती पुण्यतिथी ला आणि त्या पुस्तकांची नावे ऐकतो पण तेवढ्यात तेवढंच. त्यांचं लेखन वाचायची तसदी जास्त कोणी घेत नाही जर का कदाचित घेतलीच तर हा माणूस त्याकाळी किती ग्लोबल विचार करत होता आणि त्यांच्या जाणिवा किती सुस्पष्ट, अचूक आणि क्रांतिकारी होत्या आणि हा माणूस किती नादखुळा स्टड होता याचा आपल्याला अंदाज येईल.

पुराणांचा त्यांनी लिहिलेला पूर्ण इतिहास जर का रामायणासारखा टीव्हीवर दाखवला तर महाराष्ट्रातील लोकं क्वेन्टीन टॅरंटीनोचे पिक्चर किंवा रॉबर्ट वाईडचे मिम बनवायचे बंद करून फुलेंच्या thug life वर मिम सोडतील अशी आमची खात्री आहे.

त्यांच्या पुराणांत खंडोबा, जोतिबा, म्हसोबा असे स्थानिक पूर्वज किंवा महिषासुर वा बळी हे राक्षसराजे कथानकाचे नायक असत आणि विष्णू/वामन/ब्रह्म/परशुराम हे त्यांच्यावर हल्ले करणारे व्हिलन. त्यांनी केलेल्या लेखनात फक्त त्यांचा दृष्टिकोन व तत्कालीन सामाजिक सुधारणाच नव्हे तर त्या काळातील परिस्थिती समाजभान व तत्कालीन पुण्यातील राहणीमान, सामाजिक वातावरण व त्यांच्या कार्याला अनुसरून येणाऱ्या अडचणी व त्यावर त्यांनी केलेली मात याचेही आकलन होते.

आजही ही परिस्थिती किती बदलली हा मोठा प्रश्नच आहे, मात्र त्या काळाच्या अनुषंगाने फुले यांना एक कर्ते समाजसुधारक म्हणून काय अडचणी आल्या त्याचा किमान अंदाज घ्यावा म्हणून त्यांनी लिहिलेल्या काही पुस्तकांवरती नजर फिरवली पाहिजे.

पण जोतीरावांनी शिवाजी महाराजांवरती लिहिलेला पोवाडा जवळपास सर्वांच्याच परिचयाचा आहे. मात्र या पोवाड्याच्या मागची कथा इतकी विलक्षण आणि भरदार आहे.

‘Life of Shivaji in Poetic Metre’ नावाच्या काव्याच्या प्रस्तावनेतच त्यांनी आपल्या बहुजनवादी विचारांची झलक दाखवली आहे. १८६९ साली प्रसिद्ध झालेला हा पोवाडा रांगड्या मराठी भाषेमध्ये असून जवळपास सर्व शब्द सामान्यजनांच्या बोलीभाषेतले आहेत.

त्या काळी याच दक्षिणा फंडामधून शिवरायांवर ती काव्य करणाऱ्या सर्वोत्कृष्ट कवीला बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली होती.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्रभरातून भरपूर लोकांनी आपापल्या कविता दक्षिणा समितीस पाठवल्या. या कवितांमधून एका कवितेची निवड सर्वोत्कृष्ट म्हणून होणार होती व त्यास शनिवारवाड्यात जाहीर बक्षीस दिले जाणार होते. आलेल्या जवळपास सर्व कविता उच्चवर्गीय कुलीन ब्राह्मणांनी लिहिलेल्या होत्या, तसेच संस्कृत भाषेत शिवरायांचे त्यांनी वर्णन केलेले होते. शिवरायांचा एव्हाना गोब्राह्मणप्रतिपालक आणि क्षत्रियभूषण म्हणून पुरस्कार सुरू झाला होता.

मात्र महात्मा फुले यांचे शिवाजी महाराजांविषयी चे विचार जनसामान्यांचे नेते व शेतकऱ्यांसाठी लढलेला राजा या पद्धतीचे होते म्हणूनच त्यांनी या स्पर्धेसाठी एक पोवाडा लिहिण्याचे योजले.

इंग्रजी साहित्य व कवितांचा गाढा अभ्यास असूनही त्यांनी परंपरागत पोवाडा हा काव्याचा प्रकार निवडला त्याचे कारण म्हणजे शिवाजी महाराजांची ख्याती सामान्य लोकांपर्यंत त्यांच्याच भाषेत पोहोचावी हा त्यांचा उद्देश होता.आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी ही स्पर्धा म्हणजे योग्य माध्यम आहे असे त्यांना वाटले.

‘कुणबी, माळी, महार, मांग वगैरे पातळी घातलेल्या क्षेव्यांच्या उपयोगी हा पोवाडा पडावा असा माझा हेतू आहे’

असा प्रस्तावनेतच उल्लेख केला आहे. त्या प्रस्तावनेतच त्यांनी आपल्या खास स्टाइलने इतिहासाचे पुनर्लेखन करून बहुजनांना नायकत्व दिलं आहे. आजच्या घडीला जगात जेव्हा बोलीभाषांना प्रमाणभाषेचा दर्जा देण्यासाठी चळवळ नुकत्याच सुरू झालेल्या असताना महात्मा फुल्यांनी त्याकाळी केलेलं कार्य किती दूरदर्शी होतं याचा आपल्याला अंदाजा येईल शेवटी आपल्याला हे बक्षीस मिळणार नाहीच, हे ते पूर्णपणे जाणून होते.

शेवटी तसंच झालं, मराठीमध्ये हा पोवाडा लिहिल्यानंतर त्यांना शनिवारवाड्यात बक्षीस मिळालं नाही व दुसऱ्या एका ब्राह्मण कवीच्या काव्याला बक्षीस देण्यात आलं.

मात्र शांत बसतील ते फुले कसले! त्यांनी त्याच्या पुस्तिका बनवून स्वखर्चाने छापून त्यांचे बालपणीचे मित्र भांडारकर व मराठीतील पहिले कादंबरीकार बाबा पद्मनजी यांच्या मदतीने पुण्यात या पुस्तकांची विक्री केली.

हे पुस्तक त्यांनी परमहंस सभेचे अध्यक्ष रामचंद्र बाळकृष्ण राणे यांना अर्पण केला, जे हिंदू धर्मात सुधारणा व्हाव्यात याकामी कार्यरत होते. महात्मा फुले उगीच कुणाला नडत नव्हते. मांजरी गावातील आपल्या शेतीचा पसारा, बांधकाम खात्यातील कॉन्ट्रॅक्टवरती घेतलेली पुण्यातील बहुतांश सरकारी कामे, बहुजनांसाठी व मुलींसाठी तयार केलेल्या शाळा, आपला लेखन-प्रपंच तसेच बडोद्याच्या महाराजांपासून ते इंग्रज अधिकाऱ्यांपर्यंत ठेवलेल्या ओळखी या सर्व बाबी त्यांच्या जमेस होत्या. ज्याला त्याला त्याच भाषेत उत्तर देण्याची सॉफ्ट आणि मसल पॉवर त्याच्याकडे होती.

आपल्या सर्व शक्तींचा उपयोग करून त्यांनी समाजबदलाला कसा प्रारंभ केला म्हणून बाकीच्या समाजसुधारकांपेक्षा त्यांना ‘कर्ते” समाजसुधारक असे का म्हटले जाते ते खालच्या किस्स्यावरून कळेल.

तर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर ब्राह्मणांसाठी एक वेगळी राशी दान म्हणून देण्याची व्यवस्था मराठ्यांच्या राजकोषातून करण्यात आली होती. रमणा नावाच्या पाकिटातून ही दक्षिणा पर्वतीच्या पायथ्याशी ब्राह्मणांना दिली जात असे. ही दक्षिणा घेण्यासाठी काशी, उज्जैन, कणोज, मथुरा, तंजावर, कुंभकोनाम, कांची, मथुरा इतक्या दुरून ब्राह्मण येत असत. शाळीग्राम देवतेला वाहिल्या जाणाऱ्या दक्षिणेइतकीच रक्कम वाटण्यात येत असे. शिवाय दक्षिणा मिळालेल्या ब्राह्मणाच्या पिढ्यांना भविष्यात पुन्हा दक्षिणा मागण्याचा अधिकार प्राप्त होई. दुसर्‍या बाजीराव पेशव्यांच्या काळात ही परंपरा एवढी जोमात आली की एका ब्राह्मणास जवळपास 60 हजार रुपयापर्यंत दक्षिणा मिळेल तर एकूण सर्व दक्षिण दान केल्याची रक्कम दहा लाखांच्या घरात गेली होती.

पुढे अठराशे अठरा नंतर जेव्हा इंग्रजांच्या ताब्यात सर्व कारभार आला तेव्हा आपल्या प्रजेमधील सर्वाधिक सुशिक्षित असणाऱ्या ब्राह्मण वर्गाला दुखवू नये, म्हणून त्यांनी ही दक्षिणेची रक्कम परंपरा अबाधित ठेवली. मात्र मुंबई सरकारवर पडणाऱ्या अतिरिक्त भारामुळे एलफिस्टन साहेबांनी ही रक्कम दर साल पन्नास हजाराच्या वर जाऊ नये अशी तरतूद केली. या रकमेचा काही भाग पुण्यातील हिंदू कॉलेज ला दिला जायचा. तेव्हा ते ब्राह्मणांसाठी खुले होते. (खरंतर ह्या कॉलेजच्या स्थापनेमध्येही खंडेराव दाभाडे यांचा सिंहाचा वाटा होता. आज हे कॉलेज डेक्कन कॉलेज म्हणून ओळखले जाते.)

या दक्षिणेमध्ये अफरातफर होत असल्याच्या कारणावरून लोकहितवादी गोपाळराव देशमुख यांनी वेळोवेळी आवाज उठवला.

‘ज्या पुराण पुस्तकांचा अर्थ ब्राह्मणांना माहित नाही त्या पुस्तकांच्या मोठ्या वाचत राहण्याने काहीच फरक पडणार नाही’

अशी घोषणा करत लोकहितवादींनी १८४९ मध्ये उघड भूमिका घेतली. गोपाळराव देशमुखांचे वडील हरिपंत देशमुख हे पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांचे फडणीस म्हणून काम करीत होते.  त्यामुळे सरकार दरबारी त्यांचे वजन होते. त्यांना रावबहाद्दूर जस्टिस ऑफ पीस आणि फर्स्टक्लास सरदार असे किताब ब्रिटिश सरकारकडून मिळाले, एवढी मोठी पोहोच!

त्यांनी आपल्या मित्राकडे मी या दक्षिणा फंडातील काही रक्कम मराठीत लिहिणार्‍या लोकांसाठी स्कॉलरशिप म्हणून द्यावी अशी मागणी करणारे पत्र ब्रिटिश सरकारला लिहिलं.

त्यांच्या दोस्त बापू मांडे आणि दामोदर पंत अत्रे यांनी प्रथम मसुदा तयार केला आणि त्याच्यावर पुण्यातील सुधारणावादी मंडळी अन्ना चिपळूणकर, विष्णू रानडे, विष्णू भिडे आणि त्यानंतर दस्तुरखुद्द लोकहितवादी यांनी सह्या केल्या. बुधवार वाड्याच्या सरकारी शाळेतील प्राचार्य बाळाराम किराड यांनी मात्र याचिका वाचून ती हिंदू धर्माच्या विरुद्ध आहे म्हणून त्याच्यावर सही करायला नकार दिला. अण्णासाहेब चिपळूणकर याचिका घेऊन तिथून निघून जवळ वाट पाहणाऱ्या आपले मित्र केशवराव भवाळकर यांच्या घरी जात असताना अचानक विश्रामबागवाडा शाळेतील काही मुलांनी त्यांचा पाठलाग केला व त्यांना गाठून असे न करण्याची धमकी दिली.

परमहंस सभेच्या लोकांनी व एकूण 39 जाणत्या व्यक्तींनी या याचिकेवर सह्या केल्या. याची खबर लागताच विश्रामबागवाडा शाळेतील प्रमाण शिक्षक विद्यार्थी यांनी पुण्यातील व आसपासच्या गावांतील ब्राह्मणांना गोळा केले व त्यावर सह्या करणाऱ्या सात जणांना नोटिसा पाठवल्या जर समाधानकारक उत्तर आले नाही तर तुम्हाला जातीमधून बरखास्त केले जाईल अशी धमकी देण्यात आली.

शनिवरवाड्याजवळ एका समितीपुढे त्यांनी ह्याचा जबाब द्यावा अशी तंबी दिली गेली. तेथे सर्व कर्मठ लोक जमणार होते, म्हणून सह्या करणाऱ्या लोकांच्या जीवालाही धोका होता. त्यातल्या त्यात पुण्याचा पोलीस सब इन्स्पेक्टर सुद्धा ब्राम्हण होता त्यामुळे तिकडूनही मदत मिळण्याची शक्यता नव्हती. भवाळकरांनी हा सर्व धोका स्वतःच्या डोक्यावर घेण्याची जबाबदारी उचलली.

भवाळकर यांचा ज्योतिबा फुले यांची चांगला परिचय होता.

जोतिबा म्हणजे तेव्हा केवळ २२ वर्षांचा निधडा तरुण होता. मराठी भाषेवरच्या प्रश्नासाठी फुले कुणालाही नडू शकतात हे त्यांना ठाऊक होते. म्हणून दुसऱ्या दिवशी जेव्हा शनिवारवाड्यामागे यांची सुनावणी होणार होती त्याच्या आदल्या रात्री त्यांनी ज्योतिबा फुले यांची गाठ घेतली.

ज्योतिबांनी त्यांना निर्धास्त होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त सर्वांनी ‘माझ्या घरून शनिवारवाड्यासाठी निघा’ असा सल्ला दिला.

दुसऱ्या दिवशी दुपारी जेव्हा ज्योतिबा या लोकांना घेऊन शनिवारवाड्याकडे निघाले तेव्हा त्यांच्या रक्षणाला पुढे शंभर आणि मागे शंभर धडधाकट पैलवान होते ज्योतिबा फुले जात असलेल्या वस्ताद लहुजी साळवे यांच्या तालमीतील हे महार-मांग जमातीतील तरुण ब्राह्मणांच्या रक्षणासाठी समोर आले होते. त्यांच्या सोबत Taraquand नावाचा वरिष्ठ ब्रिटिश अधिकारी होता व त्याच्या हाताखालील कट्टर ब्राह्मण सब-इंस्पेक्टर नाईलाजाने ज्योतिबा फुले यांचे संरक्षण करत होता.

एका रात्रीत ज्योतिबा फुले यांनी सर्व सूत्रे हलवली होती.

माय मराठीचा प्रेमी लोकांचा जथ्था पुण्याचा रस्त्यांवरून फिरत, बहुजनांची ताकद दाखवत शनिवारवाड्याजवळ जाऊन पोहोचला. हे असलं चित्र कधी पुण्याच्या रस्त्यांवर ती बघायला भेटेल याची कुणी कल्पनाही केली नव्हती. दोन्ही बाजूला हल्ले करण्यासाठी लोक तयार होते मात्र एवढा मोठा जथ्था पाहून त्यांना काय करावे तेच सुचेना.

जोतिबा ह्या सर्वांना घेऊन कमिटीसमोर उभे राहिले. किमान लोकहितवादींची सरकारी नोकरी घालवता येईल, या आशेने जमलेले लोकही खजील झाले; कारण लोकहितवादींनी आपल्या ऑफिसात बसून राहावे व इकडे येऊच नये असा सल्ला ज्योतीबांनी देऊन ठेवला होता.

कुणी बोलायला धजेना म्हणून कमिटीचे म्होरक्या बंडू नाना रानडे यांनी भवाळकरांना याचिकेविषयी विचारलं, तेव्हा त्यांनी

“मी याचिका फक्त पोस्ट केली होती व त्याची कोणतीच प्रत माझ्याजवळ नाही”

असा जबाब दिला. चिडून बंडूनानानांनी “ही याचिका बनवणारा कोण होता?” असं विचारलं. ज्या माणसाचं नाव समोर जाईल त्या माणसावर मोठी कारवाई होणार, त्याच्या जीवालाही धोका असणार हे स्पष्ट होतं. भवाळकरांनी

“याचिका बनवण्याची सर्व कल्पना व लिहिणारा माणूस ज्योतिराव फुले होते”

असे त्यांच्याकडे बोट करून सांगितले.

अख्या सभेत स्मशान शांतता पसरली कोणीच काही बोलायला तयार होईल जमलेल्या सर्व मंडळींना ठाऊक होतं ज्योतिराव फुले माणूस त्यांच्या ताकतीचा खूप पलीकडे होता.

सरकारने या सगळ्याची दखल घेतली आणि फक्त ब्राह्मणांसाठी खुली असणारी दक्षिणा आता महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसासाठी खुली केली जो इंग्रजीतील सर्वोत्तम साहित्याचे भाषांतर मराठी मध्ये करेल फक्त संस्कृत आणि ब्राह्मणांची मिरासदारी असणारी ती दक्षिणा खऱ्या अर्थाने स्कॉलरशिप म्हणून वापरली जायला लागली नंतर ह्या दक्षिणा फंडाची सर्व रक्कम डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन कडे वळवण्यात आली व तिच्या मार्फत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाऊ लागली.

यातूनच मराठीत अनेक उत्तमोत्तम ग्रंथांची निर्मिती झाली व नवे इतिहासकार, लेखक आणि संशोधक महाराष्ट्राला मिळाले.

आणि फुल्यांनी आपला पुढचा पोवाडा आपल्याला बक्षीस नाकारणाऱ्या आणि त्या दिवशी जमलेल्या ब्राह्मण शिक्षकांना उद्देशून “विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी” ह्या विषयावर लिहिला. ह्याला म्हणतात swag!

संदर्भ:

१. महात्मा फुले समग्र वाङ्मय, महाराष्ट्र शासन
२. जवाळकर यांचे आत्मचरित्र
३. धनंजय कीर लिखित महात्मा फुले यांचे चरित्र
४. R.V. Parulekar Sections of records from Government of Bombay – Education

  • वैभव वाळुंज

हे ही वाच भिडू.

3 Comments
  1. SHANTANU RAKTATE says

    Classic.. I literllay imagine Mahatma Jotiba Phule was walking down to Shaniwar Wada.

  2. जय says

    शेयर करायला सोपे आयकाँन तयार करण्यात यावं

  3. स्वप्निल says

    पुराणाचा त्यानी लिहिलेला इतिहास क़ुठे वाचायला मिळेल? पुस्तकाचें नाव सांगा. (शासनाच्या समग्र साहित्य ग्रंथात नाहीये)

Leave A Reply

Your email address will not be published.