मेजर शैतानसिंह यांनी 1200 चिनी जवानांना यमसदनी धाडलं होतं

१८ नोव्हेंबर १९६२, पहाटेची वेळ. जवळपास 17 हजार फूट उंचीवर असलेल्या लड्डाख जवळच्या रेजांग मध्ये हाडे गार करणारे भयाण थंड वारे वहात होते.

अशा या थंडीत भारतीय सैन्यदलाच्या १३ व्या कुमाऊं बटालियनचे १२० वीर जवान चीनच्या सीमा रेषेचे रक्षण करण्यासाठी उभे होते.

भारत चीन युद्धाची सुरवात झाली होती. सर्व दिशांहुन आपल्यावर दबाव वाढला होता.

अक्साई चीनच्या प्रदेशातून हल्ल्याची शक्यता होती. साधारण ५.३० वाजता अचानक बॉर्डरच्या पलीकडून अंधारात प्रकाशाचे गोळे दिसु लागले. नेमकं काय होतंय हे कळत नव्हतं.

भारतीय तुकडीचे प्रमुख होते मेजर शैतानसिंग भाटी.

त्यांनी जवानांना प्रकाशाच्या दिशेने गोळीबाराचे आदेश दिले.

पण चीनची ही एक चाल होती. त्यांच्या सैनिकांनी भारतीयांना फसवण्यासाठी काही जंगली याकच्या गळ्यात कंदील अडकवून पाठवलं होत. यात भारतीयांना गुंतवून त्यांच्या अख्ख्या बटालियनने हल्ला केला होता.

हा अनपेक्षित हल्ला म्हणजे साक्षात मृत्यूचे दार उघडल्याप्रमाणे होते.

आदल्या रात्री झालेल्या बर्फवृष्टीमुळे या चौकीचा इतर जगाशी संपर्क तुटला होता.इतक्या लवकर कोणतीही मदत तिथे पर्यंत येईल याची शाश्वती नव्हती.

भारतीय जवानांकडे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जुनाट बंदुका, आणि 1000 हातगोळे एवढीच सामुग्री शिल्लक होती. याच्या जीवावर लढाई लढता येणे शक्य नव्हते.

मेजर शेतानसिंग यांनी आपल्या सैनिकांना एकत्र केलं आणि म्हणाले,

चाहे कुछ भी हो जाय मै यहां से हिलने वाला नहीं हु. आप अगर चाहो तो चौकी छोड कर जा सकते हो. ये शायद हमारी आखरी लढाई हो सकती है. मौत हमारे सामने खडी है. क्यो ना उसे थोडी देर और इंतंजार करने दे?”

भारत माता की जय चा जोरदार नारा दिला गेला. एकही सैनिक चौकी सोडून हलला नाही. काळविक्राळ रुपात येणाऱ्या चिनी बटालियनला सामोरे गेले.

दुपारी 2 नंतर प्रचंड घमासान युद्ध सुरू झालं.

मेजर शैतान सिंग यांनी प्रत्येक पोस्टवर जाऊन जवानांचा हौसला वाढवत होते. त्यांनी पराक्रमाची पराकाष्ठा केली. भारताचा एक एक जवान दहा दहा चिनी सैनिकांना भारी पडत होता.

जवळपास सहा तास ही लढाई झाली.

चीनी तोफगोळ्यांच्या हल्ल्यात मेजर शैतान सिंग जबर जखमी झाले.त्यांना दोन जवानांनी एका बर्फाच्या टेकडीमागे नेलं. कोणतीही वैद्यकीय मदत तिथे मिळणार नव्हती.

ते जवान त्यांना खाली घेऊन जाण्यासाठी निघाले पण शैतान सिंह यांनी त्याला नकार दिला.

त्या दोन्ही जवानांना परत पाठवलं. फक्त त्यापूर्वी एका मशिनगनच्या ट्रिगरला दोरी बांधून तीच दुसरं टोक आपल्या पायाला बांधायला लावलं.

या हात निकामी होऊनही फक्त पायाच्या बोटांनी मेजर शैतानसिंग शत्रूशी लढू पाहत होते.

ते जवान परत गेले, इकडे काही वेळातच शैतान सिंग यांनी प्राण सोडलं पण त्यानंतरही त्यांची मशीनगन अनेक चिनी सैनिकांचा वेध घेत राहिली.

भारतीयांच्या जवळच्या गोळ्या संपल्या, त्यानंतर बंदुकीचा दस्ता, लाकडी फळ्या घेऊन चिनी सैनिकांवर हल्ला केला. असे युद्ध कधीच बघायला मिळाले नव्हते.

भारताच्या १२० जवानांपैकी ११४ जण शहीद झाले पण त्यांनी चीनच्या ३००० पैकी १३०० सैनिकांना यमसदनी धाडलं होत.

भारत १९६२ साली चीन विरुध्दच युद्ध जिंकू शकला नाही पण त्या दिवशी रेंजागमध्ये १३ कुमाऊं बटालियन या सैतानाच्या तुकडीने चीनला मोठा धडा शिकवला होता. ही एकमेव जागा होती जिथे चीनला माघार घ्यावी लागली होती.

लड्डाख भारतात आहे याचं कारण त्या दिवशी शैतान सिंग यांनी दाखवलेलं साहस!

Shaitan Singh

या पराक्रमाबद्दल शैतान सिंग यांना मरणोत्तर परमवीर चक्र देण्यात आले. आजही त्यांचा पुतळा तिथे पाहायला मिळतो.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.