केनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता

जवळपास अनेक शतके अख्खा आफ्रिका खंड गुलामीच्या काळोखात पिचला होता. युरोपातील अनेक देश आपल्या वसाहती बनवून या देशांना लुटण्याचे काम करत होते.

असाच गुलामगिरीमध्ये सडत असलेला देश होता केनिया.

आफ्रिका खंडातील एक महत्वाचा देश. या देशावर इंग्रजांचे राज्य होते. त्यानी व त्यांच्या पूर्वी आलेल्या पोर्तुगीजांनी केनियाच्या निबिड जंगलाची व तिथल्या कृष्णवर्णीय जमातींची कत्तल करून तिथे चहा व कॉफीचे मळे उभारले. आफ्रिकेतील प्रचंड संपत्ती, खनिजे, शेतीचा माल परत युरोपमध्ये नेण्यासाठी चांगली वाहतूक व्यवस्था लागणार होती.

यातूनच ब्रिटिशांनी तिथे रेल्वे लाईन उभारण्याचा घाट घातला. या कामासाठी हजारो भारतीय मजूर केनियाला स्थलांतरित झाले.

त्यावेळी भारतातील स्वातंत्र्यलढा अतिशय भरात होता.

एकेकाळी आफ्रिकेत आपल्या आंदोलनाची सुरवात करणारे म.गांधी अहिंसक सत्याग्रहातून सगळे ब्रिटिश साम्राज्य हलवत होते. अबाल वृद्ध या सत्याग्रहात भाग घेत होते.

आता पाकिस्तानमध्ये गेलेल्या गुजरानवाला येथील एक शीख कुटुंब देखील केनियाच्या नैरोबीला आले. त्यांचा छोटा मुलगा देखील महात्मा गांधींच्या विचारांनी भारावून गेला होता.

त्याचं नाव माखनसिंग

ते केनियाला आले ते वर्ष होते १९२७. माखनसिंह अभ्यासात प्रचंड हुशार होता. नैरोबीत राहून त्याने लंडनमधील अभ्यासक्रम शिकत होता. केनियाचे माजी सरन्यायाधीश चुणीलाल मदन सांगतात,

माखनसिंग यांनी गणितातली बुद्धी आजकालच्या कंप्युटरपेक्षाही फास्ट काम करायची.

त्यांना पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला जायचे होते पण त्यांच्या घरच्या परिस्थितीमुळे त्याला शिक्षण अर्ध्यात टाकून वडिलांच्या प्रिंटींग प्रेस मध्ये हात भार लावायला लागला.

तिथे एका कामगाराप्रमाणे त्याने नोकरी पत्करली.

भारतातून केनियाला गेलेल्या पंजाबी व गुजराती मजुरांच्या मध्ये सर्वात जास्त शिकलेला माखनसिंगच होता. १९३० च्या दशकात नव्याने स्थापन झालेल्या ट्रेड युनियनचा त्याला सेक्रेटरी बनवण्यात आलं.

सुरवातीला पर्मनंट जॉबच अमिश दाखवून आफ्रिकेत आणलेल्या या कामगारांना आता काँट्रॅक्ट बेसिस वर नेमण्यात येऊ लागलं होतं.

त्याशिवाय अनेक जाचक नियम व अटी यांनी तिथला कामगार वैतागला होता. आपला देश सोडून दूर जंगलात आलेले भारतीय कामगार आता बंडाची भाषा बोलत होते.

१९३९ साली माखनसिंगने केनियामधील पहिला संप यशस्वी करून दाखवला.

माखनसिंगचा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास मोठा होता. मार्क्सवादाने त्याला भारावून टाकले होते. या अभ्यासामुळे कामगारांचे प्रश्न त्याला प्रखरतेने जाणवू लागले. ब्रिटिश साम्राज्यवाद अविकसित देशांना कसा संपवत आहे हे त्यांना दिसत होतं, या विरुद्ध आवाज उठवण्याचा ते प्रयत्न करत होते.

त्यांच्या कार्यामुळे तिथल्या कामगारांचे अनेक प्रश्न सुटले, त्यांचे कामाचे तास कमी केले गेले, त्यांच्या पगारावर मिळणारी करकपात कमी करून घेतली. या सगळ्याचा फक्त केनियाच नाही तर इतर आफ्रिकन देशातील कामगारांवर फरक पडला.

माखनसिंग यांचे १९३४ साली लग्न झाले होते. त्यांनी आपल्या मुलाचे नाव स्वराज्यपाल सिंग असे ठेवले.

भावाच्या लग्नाच्या निमित्ताने ते भारतात गेले असता तिथे स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला.

अहमदाबादच्या गिरणी कामगारांच्या संपामध्ये भाषण केले या कारणाने इंग्रज सरकारने त्यांना अटक केली. तब्बल ५ वर्षे ते भारतात तुरुंगात होते. येथे असताना त्यांनी कार्ल मार्क्सच्या दास कॅपिटल या ग्रंथाचे भाषांतर केले.

१५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांची सुटका झाली. याला एक आठवडा देखील झाला नसेल. पण स्वातंत्र्याची फळे चाखत भारतात थांबण्यापेक्षा आपल्या कामगार बंधूंच्या मदतीसाठी ते परत केनियाला गेले.

केनियात परत आल्या आल्या त्यांना डिटेन करण्यात आले.

पण ते आता इंग्लिश साम्राज्याचे नाही तर स्वतंत्र भारताचे नागरिक असल्यामुळे सरकारला त्यांच्या वर कारवाई करता येत नव्हते.

माखनसिंग यांनी फक्त भारतीयच नाही तर केनियाच्या स्वाहिली कार्यकर्त्यांना गोळा करून ट्रेड युनियन चालवले. फक्त कामगारांच्या हक्कासाठी नाही तर केनियाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी त्यांनी अहिंसावादी चळवळ उभी केली. गांधीजींच्या विचाराने केनियामध्ये लढणारा हा एकमेव कम्युनिस्ट असावा.

१ मे १९५० रोजी नैरोबी इथे भरलेल्या एका प्रचंड सभेत त्यांनी केनियाच्या पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली.

तो एक ऐतिहासिक दिवस ठरला. कारण केनियामध्ये आजवर जाहीर सभेत कोणीही संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली नव्हती. माखनसिंग हे पहिलेच व्यक्ती ठरले. ही सभा झाल्या झाल्या त्यांना अटक करण्यात आली. पुढची ११ वर्षे त्यानी तुरुंगातच काढली.

१९५१ साली केनियाच्या स्थानिक स्वाहिली जमातीच्या लढवय्यानी माऊ माऊ हे रक्तरंजित आंदोलन सुरू केले. माखनसिंग यांच्या अर्क कार्यकर्त्यांनी त्यात भाग घेतला. कित्येकांची कत्तल झाली.

ब्रिटिश सरकारने माखनसिंग यांना सशर्त सुटकेची ऑफर दिली,

तुम्ही परत भारतात जाणार असाल तर तुमची सुटका करतो पण परत केनियामध्ये पाऊल ठेवायचे नाही.

पण माखनसिंग यांनी याला नकार दिला. आई वारली असूनही ते भारतात परत गेले नाहीत. ही सशर्त सुटका म्हणजे केनियाच्या स्वातंत्र्यलढ्याला दिलेला दगा ठरेल असे त्यांचे मत होते.

१९६१ साली ब्रिटिश सरकारला केनियाला स्वातंत्र्य द्यावे लागले. कोणतीही केस दाखल न करता, कोणताही खटला न चालवता ११ वर्षे तुरुंगात काढलेले माखनसिंग यांची सुटका झाली.

केनियाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगात जाणारे ते पहिले नेते होते व सुटका होऊन बाहेर येणाऱ्या मध्ये देखील ते शेवटचे होते.

महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर किंग यांच्या धर्तीवर त्यांनी कार्य केले मात्र दुर्दैवाने भारतीय इतिहासाने त्यांची विशेष दखल घेतली नाही.

मध्यंतरी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केनिया दौऱ्यावर असताना माखनसिंग यांच्या आठवणींना उजाळा दिला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.