क्रिकेट किटमध्ये शेणाचा तुकडा ठेवणारा आफ्रिकन कट्टर गोरक्षक : मखाया एन्टिनी

क्रिकेट जेंटलमन लोकांचा खेळ समजला जातो [ भले काही सामन्यांमध्ये तसं घडत नाही ] पण क्रिकेटमध्ये अंधश्रद्धा नावाचं प्रकरण सुद्धा चांगलंच प्रचलित आहे. म्हणजे त्या ऐकल्या तर हसू येईल इतक्या विचित्र आणि भयानक अंधश्रद्धा असतात. भलेही त्या खेळाडूच्या वैयक्तिक/ खाजगी असतील पण खेळाडूंचा त्यावर विश्वास असतो.

सचिन तेंडुलकर आधी डाव्या पायात पॅड चढवतो कारण त्याच्यासाठी ते लकी असतं असं म्हणलं जातं. केवळ भारतातच नाही तर विदेशी खेळाडूसुद्धा या अंधश्रद्धा मानतात. स्टीव्ह वॉ खिशात कायम लाल रुमाल ठेवून खेळतो. श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्या दरवेळी बॅटिंगला जाण्याच्या आधी क्रिकेट किटमधल्या प्रत्येक गोष्टीला स्पर्श करीत असे आणि मगच मैदानात उतरत असे.

आजचा किस्सासुद्धा तितकाच मजेदार आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू मखाया एन्टिनी जगप्रसिद्ध खेळाडू आहे हे आपल्याला मान्य आहेच. एका मुलाखतीत त्याने सांगितलेला त्याच्या श्रद्धेबद्दलचा हा किस्सा, आपल्यासाठी अंधश्रद्धा असेल पण त्याला ती गोष्ट लकी चार्म होती.

मखाया एन्टिनी हा दक्षिण आफ्रिकेकडून खेळणारा महत्वाचा अष्टपैलू खेळाडू होता. सुरवातीच्या काळात त्याच्या घरची परिस्तिथी हलाखीची होती. जेमतेम शाळा करून तो गुरे राखायला जायचा. गाईप्रती त्याला विशेष ओढ आणि लळा होता. गायीगुरे राखताना त्याच्यात आणि त्या जनावरांमध्ये एक विशेष नातं तयार झालं होत.

सध्याच्या भाषेत सांगायचं तर तो कट्टर गोरक्षक होता.

लहानपणी जेव्हा तो गुरे राखायला जायचा तेव्हा त्याच्या पायात बूट वगैरे काहीच नसायचं. अनवाणी पायाने तो दगडधोंडे, रानंच्या रानं पालथी घालायचा. आफ्रिकेतल्या कडाक्याच्या थंडीत त्याचे पाय अक्षरशः गोठायचे त्यावर उपाय म्हणून तो गायांच्या शेणात पाय घालून बसायचा. त्या शेणामधून त्याला ऊब मिळायची.

जनावरांमागे पळून पळून त्याची तब्येतही चांगली होती आणि तो खेळायचाही उत्तम. एकदा माळरानावर मित्रांसोबत खेळत असताना बोर्डाच्या एका अधिकाऱ्याची त्याच्यावर नजर पडली आणि त्याचबरोबर त्याच्या अनवाणी पायांवर सुद्धा. १५ वर्षाच्या मखाया एन्टिनीची बॉलिंग बघून तो अवाक झाला.  त्याचा खेळ पाहून तो अधिकारी खुश झाला होता. किंग विलियम टाऊनमध्ये त्याला प्रॅक्टिससाठी जागाही उपलब्ध करून दिली.

पुढे ग्रेग हेय या अधिकाऱ्याने त्याला खेळताना पाहिले.  त्याने मखाया एंटिनीला काही पैसे देऊ केले ज्यातून तो बूट घेऊ शकेल आणि ताकीदही दिली कि,

हे बूट फक्त खेळण्यासाठी वापरायचे, गुरे राखण्यासाठी नाही.

यानंतर मात्र मखाया एन्टिनीचं नशीब चमकलं. त्याच्या उत्तम खेळण्याच्या जोरावर तो लवकरच पुढच्या दोन वर्षात आफ्रिकेच्या अंडर १९ संघात सामील झाला. तिथल्या उत्तम खेळाच्या जोरावर केवळ वयाच्या २० व्या वर्षी तो आफ्रिकेच्या नॅशनल टीमचा सदस्य झाला.

एंटीनी हा भारताइतकाच किंवा थोडा जास्तच गौभक्त होता.

लहानपणी कडाक्याच्या थंडीमध्ये गायीच्या शेणाने दिलेली उब त्याला चांगलीच ठाऊक होती. त्याची आठवण राहावी म्हणून त्याच्या क्रिकेट किटमध्ये कायम एक शेणाचा तुकडा असायचा. जो त्याने संपूर्ण क्रिकेट करियरमध्ये वापरला. ज्या ज्या वेळी एंटीनीला विकेट मिळत नसायच्या तेव्हा तो त्या शेणाच्या तुकड्याचं चुंबन घ्यायचा. त्याच्या साठी तो शेणाचा तुकडा लकी चार्म होता.

त्याने या शेणाच्या तुकड्याच्या लकी चार्मच्या जोरावर आपल्या देशाकडून खेळताना १०१ कसोटी सामन्यांमध्ये ३९० विकेट्स आणि १७३ वनडे सामन्यांमध्ये २६६ बळी मिळवले आहेत. त्याची हि थेरी बऱ्याच लोकांना माहिती नव्हती .

त्याच्याबद्दल आणखी एक गोष्ट होती कि तो खेळत असताना जेव्हा त्याला विकेट मिळत नसत तेव्हा तो ब्रेकमध्ये बाथरूममध्ये जाऊन स्वतःच्या लघवीने तोंड धुवायचा कारण तसं करणं त्याला मॅचमध्ये टिकून ठेवण्यास आणि बळी मिळवण्यास फायदेशीर ठरायचं.

बऱ्याच गोष्टी मखाया एंटीनी बद्दल आहेत. पण एक गुराख्याचं पोरगं आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व करत आणि प्राण्यांच्या प्रति उपकाराची जाणीव ठेवतं हि मोठी गोष्ट मानली गेली. आयपीएल स्पर्धेत तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचा वेगवान गोलंदाज होता.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.