म्हणून ‘अश्विनी ये ना’ गाण्यात ‘च’ आणि ‘ळ’ हे शब्द नाहीत
अशोक सराफ, सचिन पिळगावकर या धमाल जोडीचा ‘गंमत जंमत’ सिनेमा आठवतोय? झटपट पैसा मिळवण्यासाठी दोन मित्र श्रीमंत मुलीला किडनॅप करण्याचा प्लॅन आखतात. पुढे हा प्लॅन त्यांच्याच अंगलट कसा येतो, याची धमाल गोष्ट म्हणजे ‘गंमत जंमत’.
सचिन पिळगावकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.
अशोक सराफ-सचिन पिळगावकर या जोडीची अफलातुन जुगलबंदी, जोडीला अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची साथ यामुळे हा सिनेमा सुपरहिट ठरला होता.
हा सिनेमा आजही लक्षात राहण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे या सिनेमातलं किशोर कुमार यांच्या आवाजातलं, ‘अश्विनी ये ना’ हे गाणं.
१९८७ चा तो काळ होता. किशोर कुमार यांनी त्यांच्या सदाबहार आवाजाने अनेक उत्तमोत्तम गाणी भारतीय सिनेसृष्टीला दिली होती. परंतु मराठी सिनेमासाठी त्यांनी एकही गाणं गायलं नव्हतं. याचदरम्यान सचिन पिळगावकर हे मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टीत उत्तमोत्तम भूमिका साकारत होते.
सचिन पिळगावकरांच्या ‘अखियो के झरोको से’ तसेच अन्य सिनेमांतील गाण्यांसाठी किशोर कुमार यांनी आवाज दिला होता. त्यामुळे किशोरदा आणि सचिनजींचे एकमेकांसोबत चांगले संबंध होते.
म्हणुनच ‘गंमत जंमत’ सिनेमातील ‘अश्विनी ये ना’ गाणं गाण्यासाठी सचिनजींनी किशोरदांना विचारले. परंतु किशोरदांनी गाणं गाण्यासाठी सचिनजींना चक्क नकार दिला.
सचिनजी मात्र हट्टाला पेटले होते. त्यांना काहीही करुन ‘अश्विनी ये ना’ साठी किशोरदाच हवे होते. सचिनजींनी गाणं न गाण्यामागचं कारण विचारलं. तेव्हा किशोरदांनी मराठीतील ‘च’ आणि ‘ळ’ या अक्षरांच्या उच्चारणात अडचण असल्याचे सचिनजींना सांगीतले.
सुरुवातीला किशोरदा नेमकं काय म्हणत आहेत, तेच कळत नव्हतं. गाणं न गाण्यासाठी किशोरदा नवनवीन कारणं देत आहेत, असंच सचिनजींना वाटलं.
पण नंतर त्यांची हि अडचण सचिनजींनी समजुन घेतली.
सचिनजी लगेच ‘अश्विनी ये ना’ चे गीतकार शांताराम नांदगावकरांकडे आले. त्यांनी किशोरदांना गाणं गाण्यासाठी येत असलेली अडचण शांताराम यांना समजावली. यानंतर शांताराम नांदगावकरांनी ‘च’ आणि ‘ळ’ या अक्षरांचा कुठेही समावेश होणार नाही अशाप्रकारे गीतरचना करुन ‘अश्विनी ये ना’ हे गाणं पुन्हा लिहुन सचिनजींना दिलं.
आता मात्र सचिनजी गाणं घेऊन किशोरदांकडे गेले. किशोर कुमार खुश झाले. आणि त्यानंतर घडला एक इतिहास.
मराठी सिनेसृष्टीतलं किशोर कुमार यांच्या आवाजातलं पहिलं गाणं म्हणुन ‘अश्विनी ये ना’ गाण्याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. किशोरदांचा आवाज, अशोक सराफ-चारुशीला साबळेंचा आगळावेगळा झाडू डान्स, अनुराधा पौडवाल यांची किशोरदांना साथ अशा अनेक गोष्टींमुळे हे गाणं तुफान लोकप्रिय झालं.
या गाण्याची कोरीओग्राफी खुद्द सचिनजींनीच केली होती. अरुण पौडवाल यांनी खास डिस्को पद्धतीचं संगीत गाण्याला दिलं होतं
यानंतर ‘माझा पती करोडपती’ सिनेमातलं ‘तुझी माझी जोडी जमली गं’ हे गाणं सुद्धा किशोर कुमार यांनी गायलं. या गाण्यात सुद्धा ‘च’ आणि ‘ळ’ अक्षरं नव्हती. यासाठी गीतकार शांताराम नांदगावकरांचं खरंच कौतुक करावं तितकं कमीच.
कारण किशोर कुमार यांची समस्या लक्षात घेऊन तशा प्रकारे गाण्याचे शब्द लिहिणं हे त्यांच्यासाठी एक आव्हानात्मक कामच म्हणावे लागेल. आणखी एक वैशिष्ट्यपुर्ण गोष्ट म्हणजे किशोर कुमार यांनी मराठी सिनेमात गायलेली दोनही गाणी अशोक सराफ यांच्यावर चित्रीत आहेत.
२०१९ साली आलेल्या ‘ये रे ये रे पैसा 2’ सिनेमामध्ये ‘अश्विनी ये ना’ हे गाणं पुन्हा रिक्रिएट करण्यात आलं.
अवधुत गुप्ते यांनी या गाण्याचं नव व्हर्जन गायलं आहे. यात संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, मृण्मयी गोडबोलेसह अन्य मराठी कलाकार झळकले होते.
एक सलाम किशोरदांना ज्यांनी अक्षरांच्या उच्चारणामुळे गाणं बिघडू नये, या भावनेपोटी आपली अडचण स्पष्टपणे सांगीतली. एक सलाम सचिनजींना ज्यांनी हार न मानता किशोर कुमार यांच्यासाठी गाणं बदललं आणि त्यांचा आवाज मराठी सिनेसृष्टीत अजरामर केला.
आणि एक सलाम शांताराम नांदगावकरांसारख्या प्रतिभासंपन्न गीतकाराला कारण त्यांनी चिकाटीने, संयमाने आणि कल्पकतेने नव्याने गाणं लिहून किशोरदांच्या गाण्यासमोरचा अक्षरांचा अडथळा दूर केला.
- देवेंद्र जाधव
हे ही वाच भिडू
- करियअरची सुरवात एका अपमानापासूनच होते, किशोरकुमारचं देखील तसंच झालं !
- त्या क्षणापासून अशोककुमार आणि सिगरेट हे समीकरण फिक्स झालं.
- फक्त सलमानचा नाही तर आमच्या अख्ख्या पिढीचा तो रोमँटिक आवाज होता.