जाता-जाता मीना कुमारी ‘पाकिजा’ला नवसंजीवनी देऊन गेली !

बॉलीवूडमध्ये ‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हणून सुप्रसिद्ध असणाऱ्या ‘महजबीन’ उर्फ मीना कुमारीच्या आयुष्यातील सर्वोत्तम कलाकृती म्हणजे पाकिजा. या चित्रपटाने दिग्दर्शक कमाल अमरोहीला भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात अजरामर करून ठेवलं. चित्रपटाचे गाणे इतके हिट झाले की आज देखील ते सिनेरसिकांच्या ओठांवर आहेत.

मीना कुमारी आणि कमाल अमरोहीच्याच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात मैलाचा दगड बनलेल्या या अजरामर कलाकृतीच्या निर्मितीचा प्रवास साधा-सरळ अजिबातच नव्हता. १९५६ साली शुटींगची  सुरुवात झालेला ‘पाकिजा’ तयार होऊन प्रदर्शित व्हायला १९७२ सालचा फेब्रुवारी महिना उजाडावा लागला होता.

या १६ वर्षांच्या काळात या चित्रपटाने बऱ्याचशा अडचणींना तोंड दिलं होतं.

ज्याप्रमाणे शहाजहानने आपल्या बायकोसाठी ताजमहाल बनवला होता, अगदी त्याचप्रमाणे आपल्या बायकोसाठी ‘पाकिजा’ बनवायचं ठरवून शुटींग सुरु केलेल्या कमाल अमरोही चे बायको मीना कुमारी बरोबरचे संबंध तोपर्यंत विकोपाला गेले होते. मीना कुमारी अमरोहीचं घर सोडून एकटी राहायला लागली होती आणि वैवाहिक संबंधातील अपयश आणि एकटेपणा ती दारूच्या घोटांबरोबर आणि शायरी लिहिण्यात घालवू लागली होती.

अर्थात तोपर्यंत तिचं नाव भारत भूषण, सावन कुमार आणि ‘धर्मेंद्र’शी जोडलं जायला लागलं होतं.

धर्मेंद्र बरोबरच्या तिच्या नात्याच्या चर्चा तर सगळीकडेच व्हायला लागल्या होत्या. धर्मेंद्रचं फिल्मी करिअर रुळावर आणण्यात देखील मीना कुमारीने महत्वाची भूमिका बजावली होती. पण करिअरची गाडी सुसाट सुटल्यावर मात्र धर्मेंद्रने देखील तिला सोडलं आणि मीना कुमारी पुन्हा एकदा दारूच्या नशेत बुडाली.

एकटीच्या जीवावर चित्रपट सुपर-डुपर हिट करण्याची क्षमता ठेवणाऱ्या मीना कुमारीने तोपर्यंत साईड रोल स्वीकारायला सुरुवात केली होती. ‘दुश्मन’ आणि ‘मेरे अपने’मध्ये प्रेक्षकांनी तिला साईड रोलमध्ये बघितलेलं होतं. पण ‘पाकिजा’चं काम रेंगाळलं ते तसंच रेंगाळलं होतं.

‘पाकिजा’ बनून प्रदर्शित होईल, याची आशा खुद्द कमाल अमरोहीने देखील सोडली होती.

kamal amrohi
कमाल अमरोही

चित्रपटाच्या शुटींगसाठी कमाल अमरोही भारतभर इतकं भटकला होता की त्याच्या या भटकंतीचे मजेदार किस्से इंडस्ट्रीत चवीने चघळले जायला लागले होते. कमाल अमरोहीनेच त्याकाळात दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की आता लोक म्हणायला लागलेत, ‘या चित्रपटचं नाव ‘हिंदुस्तान की सैर’ असायला हवं’. काही काळासाठी तर अमरोहीने चित्रपटाचं नाव ‘लहू पुकारेगा’ असं ठेवायचं देखील ठरवलं होतं.

….पण, पण, पण ‘पाकिजा’ यायचाच होता. ‘शाहकार’ बनायचाच होता.

एका दिवशी सुनील दत्त आणि नर्गिस मीना कुमारीला भेटायला गेले होते. त्यांनी ‘पाकिजा’चं शूट होऊन बाजूला पडलेलं फुटेज बघितलं. ते फुटेज बघून सुनील दत्त आणि नर्गिस आश्चर्याने थक्क झाले.

‘पाकिजा’ ही काय कमाल कलाकृती बनणार याचा अंदाज त्यावेळीच या जोडप्याला आला होता. या दोघांनीही मीना कुमारीला ‘पाकिजा’ पूर्ण करण्यासाठी तयार केलं. त्या दोघांनी खूप समजावल्यानंतर कुठे मीना कुमारी तो चित्रपट पूर्ण करायला तयार झाली.

मीना कुमारी शुटींगसाठी तयार झाली आणि शुटींगचं उरलेलं काम पुन्हा सुरु झालं. पण त्याचवेळी मीना कुमारीला ‘ब्लड कॅन्सर’ने ग्रासलं. हे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असंच काहीसं होतं. साहजिकच मीना कुमारीच्या शारीरिक स्वास्थ्यानुसार शुटींग व्हायला लागलं. ज्यामुळे शारीरिक थकवा येऊ शकतो, अशा गाण्यांमध्ये ‘पद्मा खन्ना’ नावाची मीना कुमारीची ‘बॉडी डबल’ वापरून शुटींग पूर्ण करण्यात आलं.

‘पाकिजा’तल्या काही गाण्यांमध्ये आपल्याला मीना कुमारीचा चेहरा कपड्याने झाकलेला दिसतो, त्याचं महत्वाचं कारण हेच की या गाण्यांवर थिरकणारी अभिनेत्री मीना कुमारी नसून पद्मा खन्ना होती.

जी पुढे ‘पाकिजा’मधली दुसरी मीना कुमारी म्हणूनच प्रसिद्ध झाली.

‘पाकिजा’च्या प्रदर्शनानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे १९७३ साली आलेल्या ‘सौदागर’ या चित्रपटात तिने अमिताभच्या नायिकेची भूमिका केली होती. ‘सजना है मुझे, सजना के लिये’ हे सुपरहिट गाणं तिच्यावरच चित्रित झालं होतं.

‘पाकिजा’मध्ये बॉडी डबलचा वापर करण्यात आलेला असला तरी या चित्रपटातील बहुतांश गीतांमध्ये मीना कुमारी होतीच होती. शरीर साथ देत नसताना देखील मीना कुमारीने स्वतःला अक्षरशः झोकून दिल्यानेच ‘पाकिजा’ सारखी अजरामर कलाकृती निर्माण होऊ शकली होती. या चित्रपटात फक्त एकच गाणं असं होतं की ज्यात मीना कुमारी नव्हती. ते संपूर्ण गाणं पद्मा खन्नावर चित्रित करण्यात आलं होतं.

गीताचे बोल होते,

“चलो दिलदार चलो, चांद के पार चलो”

कैफ भोपाली यांनी लिहिलेलं आणि गुलाम मोहोम्मद यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत मोहोम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलं होतं. ‘चलो दिलदार चलो..’ प्रचंड गाजलं. आजही मीना कुमारीच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांचा जेव्हा कधी विषय निघतो, त्यावेळी या यादीत ‘चलो दिलदार चलो..’ अगदी वरचं स्थान राखून आहे. पण या गाण्यात मीना कुमारी नव्हतीच, याची कल्पना आपल्यापैकी अनेकांना नसेल.

https://www.youtube.com/watch?v=JS2VY6zGTd4

अशाप्रकारे अनेक अडचणींचा सामना करून तयार झालेला ‘पाकिजा’ शेवटी ४ फेब्रुवारी १९७२ रोजी प्रदर्शित झाला. पण प्रदर्शित झाल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसात या सिनेमाला प्रेक्षकांचा जेमतेमच प्रतिसाद मिळाला.

पण तोपर्यंत खूप दिवसांपासून कॅन्सरशी झुंजणारी मीना कुमारी हा आजार बळावल्याने मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती.

३१ मार्च १९७२ रोजी मीना कुमारीने शेवटचा श्वास घेतल्याची बातमी आली. ही बातमी आली आणि जाता-जाता मीना कुमारी ‘पाकिजा’ आणि कमाल अमरोहीला नवसंजीवनी देऊन गेली.

मीना कुमारी गेल्यानंतर तिचा शेवटचा सिनेमा बघण्यासाठी चित्रपट खिडकीवर प्रेक्षकांची तुडुंब गर्दी उसळली. ब्लॅकमध्ये चित्रपटाचे तिकीट विकले गेले. तिकीट खिडकीवर तर चित्रपट सुपर-डुपर हिट झालाच, पण चित्रपट समीक्षकांनी देखील चित्रपटांची भरभरून स्तुती केली.

कुण्यातरी प्रसिद्ध व्यक्तीने म्हंटल,

“शाहकार बन गया है”

‘शाहकार’ या उर्दू शब्दाचा अर्थ होतो अत्युत्तम कलाकृती. ‘मास्टरपीस’

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.