अशी झाली होती नाना-मकरंदची भेट…

सिनेइंडस्ट्रीत एखादा कलाकार जेव्हा यशस्वी होतो तेव्हा त्याच्यामागे अनेक दिवसांची मेहनत आणि कष्ट असतात. अर्थात एका रात्रीत स्टारपदावर पोहोचणारे सुद्धा कलाकार असतात. अचानक मिळालेलं यश खुपदा त्यांना टिकवता येत नाही. जे कलाकार शुन्यातुन विश्व निर्माण करतात त्यांना मात्र यशाची जाणीव आणि गांभीर्य सुद्धा असतं.

मेहनतीने आणि चिकाटीने सिनेइंडस्ट्रीत स्वतःचं ठसठशीत अस्तित्व निर्माण करणारा एक कलाकार म्हणजे मकरंद अनासपुरे.

मकरंद शालेय जीवनात अभ्यासात तसा हुशार. दहावीला त्याला ८०% इतके मिळाले. त्यामुळे मकरंद अभ्यासात चांगली प्रगती करुन वैद्यकीय शिक्षण घेईल, अशी घरच्यांना अपेक्षा होती. काॅलेजात गेल्यावर मात्र १२ वीला मकरंदला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले.

याचवेळी अभ्यासापेक्षा आपला कल इतर गोष्टीत जास्त आहे, याची जाणीव मकरंदला झाली.

पुढच्या जीवनात मकरंद काॅलेजमधुन पथनाट्यांमध्ये भाग घेऊन लागला. पथनाट्यांमध्ये काम करताना जमलेल्या लोकांशी गप्पा मारायचा. मकरंदने नंतर मराठी सिनेमात स्वतःच्या बोलण्यामध्ये मराठवाडी बोलीचा जो लहेजा आणला त्याचा पाया इथे घडला. औरंगाबाद येथील सरस्वती भुवन काॅलेज येथे शिकताना मकरंदला एकांकिकेमध्ये अभिनय करण्याची आवड निर्माण झाली.

मकरंद आणि अभिनेता मंगेश देसाई यांच्या एकांकिकेची अंतिम फेरीत निवड झाली.

अंतिम फेरी मुंबईच्या नेहरु सेंटर मध्ये संपन्न होणार होती. यासाठी नाना पाटेकर प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित असणार होते. ‘देता आधार की करु अंधार’ असं या एकांकिकेचं नाव.

मंगेश मेकअप करत होता. मकरंद तयार होऊन तिथेच परिसरात फिरत असताना एक जीप समोर उभी राहिली. जीपमधुन नाना पाटेकर उतरले. नाना पाटेकरांचं व्यक्तिमत्व आणि वलय जबरदस्त. मकरंद नानांकडे पाहतच राहिला.

नानांनी मकरंदला येऊन त्यांच्या भारदस्त आवाजात विचारलं,

‘औरंगाबाद वरुन जी दोन पोरं आली आहेत त्यांची एकांकिका झाली का?’

नाना मकरंदच्याच एकांकिकेविषयी विचारत होते. पण मकरंदला काय बोलावं तेच कळालं नाही.

मंगेश-मकरंदची एकांकिका सादर झाली. बक्षीस वितरण सोहळ्यात नाना पाटेकर मकरंदला उद्देशुन म्हणाले,

‘तुला बक्षीस मिळेल की नाही मला माहित नाही. पण तु एक उत्तम कलाकार आहेस. तुझ्यासारख्या कलाकारांची हिंदी सिनेमाला गरज आहे. तु आवर्जुन मुंबईत ये आणि मला भेट.’

खुद्द नाना पाटेकर असं म्हणत असल्यावर मकरंदला खुप आनंद झाला. मकरंद लगेच हुरळुन गेला नाही. त्याने शिक्षण पूर्ण केलं. आणि पुढे मुंबईत आला. मुंबईत आल्यावर अनिल गावडे या मित्राने मकरंदला मदत केली. काही दिवस मकरंद आमदार निवासात सुद्धा राहिला.

नानांनी शब्द दिल्याप्रमाणे नानांच्या ‘वजुद’, ‘यशवंत’ यांसारख्या हिंदी सिनेमांमध्ये मकरंदला अभिनयाची संधी मिळाली.

याच काळात ‘जाऊ बाई जोरात’ हे पहिलं व्यावसायिक नाटक मकरंदला मिळालं. या नाटकाने मात्र मकरंदला आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन दिलं. या नाटकाच्या जोरावर मकरंदने मुंबईत घर घेतलं. अभिनेते सयाजी शिंदेंनी सुद्धा मकरंदला घर घेण्यासाठी मदत केली होती. ‘जाऊ बाई जोरात’ नाटकात काम करणारी अभिनेत्री आज मकरंदची बायको आहे.

स्वतःचे खास फोटो काढुन संग्रही ठेवणे, हि प्रत्येक कलाकाराची हौस. मकरंद पण त्याला अपवाद नाही. ‘टूरटूर’ नाटकादरम्यान नामवंत फोटोग्राफर उदय मिठबावकर यांच्या फोटो स्टुडिओत मकरंद गेला.

उदय म्हणाले दोन-तीन कपड्यांचे जोड घेऊन ये, मग आपण तुझे फोटो काढू.

मकरंदने मित्रांकडुन त्यांचे कपडे घेतले. कपडे घेऊन तो उदय मिठबावकरांना भेटला. मकरंदला फक्त पाच-दहा फोटोंची अपेक्षा होती. पण मिठबावकरांनी वेगवेगळ्या हावभावांमध्ये आणि कपड्यांमध्ये मकरंदचे बरेच फोटो काढले.

काही दिवसांनी फोटो आणायला मकरंद गेला. तेव्हा मकरंदजवळ इतके पैसे नव्हते. मिठबावकरांनी खुप फोटो काढले होते. त्यामुळे पैसे जास्त लागणार हे मकरंदने गृहीत धरलं. अंदाजे ४०० रुपये आता देऊन उरलेले पैसे पुढे फेडण्याचा विचार मकरंदने केला. मिठबावकरांनी मकरंदला फोटो दिले.

जेवलायस का? असं त्यांनी मकरंदला विचारलं.

मकरंद नाही म्हणताच शेजारच्या हाॅटेलमध्ये मकरंदला जेवायला घेऊन गेले. ८० रुपये जेवणाचं बिल झालं. मिठबावकरांनी जेवणाचे पैसे मकरंदला द्यायला सांगीतले. मकरंदने बिल चुकतं केलं.

‘या फोटोंसाठी वेगळे पैसे देऊ नकोस. माझी फी मला मिळाली.’ असं प्रेमाने मकरंदला त्यांनी सांगीतलं.

मिठबावकरांकडे काढलेले हे फोटो नंतर मकरंदने अनेक ठिकाणी वापरले. ‘वास्तव’ या सिनेमासाठी महेश मांजरेकर कलाकरांची निवड करत होते. मकरंदजवळ शेवटचा फोटो राहिला होता.

मकरंदने मांजरेकरांना त्या फोटोची झेराॅक्स दिली. मकरंदने अशी फोटोची झेराॅक्स दिल्यामुळे मांजरेकरांना आश्चर्य वाटलं. ‘वास्तव’ सिनेमात सुद्धा मकरंदने छोटीशी भुमिका केली होती.

अभिनेते शिवाजी साटम नवख्या कलाकारांना इंडस्ट्रीत येण्यासाठी पाठींबा द्यायचे. सी.आय.डी. या लोकप्रिय मालिकेसाठी त्यांनी मकरंद अनासपुरेचं नाव सुचवलं. मकरंद सी. आय. डी. च्या सेटवर पोहोचला. बी.पी.सिंग हे मालिकेचे दिग्दर्शक. मकरंद त्यांना जाऊन भेटला. मकरंदचं व्यक्तिमत्व त्यांच्या अपेक्षेपेक्षा वेगळं होतं.

मकरंदसाठी ते ज्युनियर पोलीस अधिका-याची भुमिका लिहित होते. पण मकरंदकडे बघताच त्यांनी त्याच्यासाठी ट्रेनी काॅन्स्टेबल हि खास वेगळी व्यक्तिरेखा लिहिली.

मकरंदच्या अभिनयाचे असंख्य चाहते. गानसरस्वती किशोरी आमोणकरांचा मुंबईत गाण्याचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाआधी दोन दिवस कुठे जायच्या नाहीत. मकरंदच्या अभिनयाच्या किशोरीताई चाहत्या होत्या. ‘सुंबरान’ सिनेमाच्या प्रिमियरसाठी मकरंदने त्यांना आग्रहाचं आमंत्रण दिलं.

किशोरीताईंचा दोन दिवसांनी कार्यक्रम असला तरीही मकरंदच्या आग्रहाखातर त्या प्रिमियरला गेल्या.

२०११ साली मकरंदने ‘डँबिस’ या मराठी सिनेमाचं दिग्दर्शन केलं. मकरंद जितका उत्तम कलाकार तितकाच समाजाप्रती भान असलेला एक नागरीक. नाम फाऊंडेशन अंतर्गत मकरंद अनासपुरेंनी नाना पाटेकरांसह संपुर्ण महाराष्ट्र पालथा घातला. शेतक-यांचे प्रश्न, समस्या जाणुन घेतल्या. शेतकरी व त्यांच्या कुटूंबियांना मानसिक व आर्थिक आधार दिला. यशाच्या शिखरावर असुनही कलाकाराने पाय जमिनीवर कसे ठेवावे याचं उत्तम उदाहरण म्हणजे मकरंद अनासपुरे.

  •  देवेंद्र जाधव 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.