जनरल बिपीन रावतांच्या मृत्यूची थट्टा करणाऱ्यांवर चिडून या दिग्दर्शकानं धर्मच सोडलाय

जनरल बिपीन रावतांच्या दुर्दैवी अपघातानंतर अक्खा देश सदम्यात गेलाय. घरातलंच माणूस गेल्यासारखं देशभर सुतक पाळलं जातंय.  मात्र यातही काही लोकांनी सोशल मीडियावर या दुर्दैवी अपघातावर आनंद व्यक्त केलाय. केरळमधल्या एका दिग्दर्शकाला मात्र या प्रकाराचा राग आला आणि त्यांनी अशा कमेंट्सचं कारण देत आपला धर्मच सोडलाय.

आता अशा कमेंट्सच्या खाली डायरेक्ट शिव्या घालण्याच्या आधी थोडं थांबा. बऱ्याच वेळा देशात अस्थिरता माजवायला, दोन धर्मात तेढ निर्माण करायला फेक अकाउंट वरून अश्या कंमेंट केल्या जातात, असं अनेकदा समोर आलं आहे.

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या वेळेस मोहम्मद शमीवर त्याच्या धर्मावरून केलेल्या कंमेंट्स पाकिस्तानातूनच आल्या होत्या असं उघड झालंय. त्यामुळे लगेच निष्कर्षावर पोहचण्याऐवजी अश्या कंमेंटचं बॅकग्राऊंड चेक करत जावा.

आता बघूया दिग्दर्शक साहेबांचं नक्की म्हणणं तरी काय आहे,

जनरल बिपीन रावतांच्या मृत्यूच्या पोस्टवर काही समाजकंटक हसणाऱ्या इमोजीनं रिऍक्ट झाले होते.

अशा समाजकंटकांचा निषेध करणारा व्हिडिओ अकबर अली यांनी फेसबुकवर टाकला होता. मात्र या व्हिडिओला आक्षेपार्ह भाषेत तूफान ट्रोल करण्यात आलंय. ट्रोलिंग एवढं वाढलं की फेसबुकनं हा व्हिडिओच काढून टाकला. अकबर अली यांचं अकाऊंटपण सस्पेंड केलं. मात्र या प्रकारामुळं अकबर अली चांगलेच पेटलेत. त्यांनी आता दुसरं नवीन अकाउंट उघडून पोस्ट टाकायला सुरवात केलीये.

दुसऱ्या फेसबुक खात्यावरनं अकबर म्हणतायत ”हसणारे इमोजी टाकणाऱ्यांच्या विरोधात बोलल्यामुळंच पाच मिनिटांत माझं अकाऊंट ब्लॉक करण्यात आलंय. इस्लामिक नेत्यांनीही शूर वीर लष्करी अधिकाऱ्यांचा अपमान करणाऱ्या विरोध केला नाही आणि हे मला आता सहन होत नाहीये. माझा आता धर्मावरचा विश्वास उडाला आहे.”

”आजपासून मी मुसलमान नाही. मी भारतीय आहे. भारताविरुद्ध हसणारे इमोजी पोस्ट करणाऱ्यांना हे माझे उत्तर आहे,”

‘सोशल मीडियावर देशविघातक कारवाया होतायत. जनरल बिपीन रावतांच्या मृत्यूवर हसणे हे त्याचंच एक उदाहरण आहे. जनरल रावतांच्या मृत्यूवर हसणारे कार्यकर्ते हे मुस्लिम समाजातीलच होते. आणि त्यामुळंच आपण मुस्लिम धर्म सोडत आहोत,’ असं त्यांनी म्हटलंय.

अकबर अली आता आपल्या पत्नीबरोबर हिंदू धर्मात प्रवेश करणार आहेत.

याआधीही मदरशातले अनुभव सांगून अकबर अली चर्चेत आले होते.  मदरशामध्ये लहानपणी शिक्षण  घेत असताना आपल्यावर उस्तादांकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा खळबळजनक खुलासा त्यांनी केला होता .

पण आता एका झटक्यात अकबर अली यांचं मतपरिवर्तन झालं असं तुम्हाला वाटत असेल तर थोडं थांबा.

पिच्चर अभी बाकी है!

 अकबर अली हे केरळ भाजपा राज्य कमिटीचे माजी सदस्य आहेत.

राज्यातल्या  बीजेपी नेत्यांशी झालेल्या वादामुळं त्यांनी समितीतुन राजीनामा दिला होता. अकबर अली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याही जवळचे आहेत. संघाच्या गणवेशातील त्यांचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झालेत. त्यांच्या फेसबुक वॉलवर पण हिंदू धर्माचं कौतुक करणाऱ्या पोस्ट बऱ्याच दिवसापासून पडत होत्याच.

याआधी उत्तरप्रदेशमध्ये वसीम रिझवी यांनी हिंदू धर्मात प्रवेश केला होता. डासानादेवीच्या मंदिरात धर्मपरिवर्तन करणाऱ्या रिझवींनी जितेंद्र नारायणसिंह त्यागी हे नाव घेतलंय. आता अकबर अली कोणते नाव घेतायत ते बघावं लागणार आहे.

बरं अकबर अली इथून पुढेही या एकाच वादामुळं चर्चेत असतील, असं नाही. लवकरच ते वादग्रस्त विषय असणाऱ्या केरळमधील ‘मोपला उठावा’वर सिनेमाही बनवणार आहेत. त्यामुळं या प्रकरणात आणखी नवा ट्विस्ट येणार का? हे पाहावं लागेल…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.