मलिक अंबर: या आफ्रिकन हबशी माणसाने मराठ्यांना गनिमी काव्याची देणगी दिली.

तो मुळचा आफ्रिका खंडातल्या इथिओपियाचा. खरं नाव चापू.

पंधराव्या शतकाचा हा काळ. भारत सोने की चिडिया म्हणून ओळखला जात होता. भारताच्या तलम रेशमी कापडाला जगभर मागणी होती.  युरोपहून अरबी समुद्रामार्गे भारताला जाण्याचा रस्ता सापडला होता. यामुळेच आफ्रिकेमध्ये अरब आणि युरोपियन व्यापाऱ्यांची वर्दळ वाढली होती. 

तसं बघायला गेलं तर आफ्रिका गरीब खंड. मात्र त्यांना सुद्धा भारताच्या रेशमी कापडाच वेड लागलं होतं. भारतीय कापड तर अतिशय महाग. मग आफ्रिकेतले राजे आपल्या देशातल्या तगड्या तरुणांना गुलाम म्हणून भारतात विकू लागले आणि त्या बदल्यात भारतातून कापड आयात केलं जाऊ लागलं. भारतात तेव्हा लढाईसाठी या जवानांची जोरदार मागणी होती. अरब व्यापाऱ्यांनी आफ्रिकन गुलामांचा धंदा एकदम पॉप्युलर करून ठेवला.

इथिओपियाच्या कंबाटा प्रांतात एका कृष्णवर्णीय मूर्तिपूजक कुटुंबात चापूचा जन्म झाला. हरारे , कंबाटा हा अतिशय डोंगराळ भाग त्यालाच अबसीनिया असंही म्हटल जात आणि इथल्या लोकांना हबशी !

हे हबशी लोक जात्याच काटक. डोंगराळ जंगली भागावर जगणं अवलंबून होतं.  गुलामगिरीची चढाओढ सुरु झाल्यावर इथले लोक इतरत्र पसरू लागले. चापूच्या घरच्यांनी देखील त्याला विकल. येमेन मार्गे तो बगदादला जाऊन पोहचला. तिथे भरलेल्या मोठ्या बाजारात चापूला मीर कासीम बगदादी या दलालाने विकत घेतले.

हा मीर कासीम खूप दयाळू होता.त्याला लवकरच ध्यानात आले की अंगापिंडाने मजबूत असलेला चापू हा डोक्यानेही खूप तल्लख आहे. मीरने त्याला शिकवायचे ठरवले. त्याला इस्लामधर्माची दीक्षा दिली. त्याचे नाव अंबर ठेवले म्हणजेच अरबी भाषेत हिरा!!

अंबरची खरी जडणघडण बगदाद मध्ये झाली. या वाळवटाच्या मधोमध असणाऱ्या शहरात कालव्याने पाणी कसे आणले आहे हे सगळे अंबर पाहत होता. इथेच तो अरबी भाषा आणि युद्धकला यामध्ये निपुण झाला. 

मीर कासीमने आपला हा हिरा मोठ्या किमतीत भारतात विकला. त्याला विकत घेतले होते अहमदनगरच्या निजामाचा पेशवा चेंगेज खान याने. तो सुद्धा हबशी होता. अंबरने काहीचं दिवसात चंगेज खानवर आपली जादू केली. चंगेज खान या आपल्या गाववाल्या पोराला मानसपुत्र मानू लागला. त्याने त्याला प्रशासन शिकवले. चेंगेज खानच्या मृत्यूनंतर अंबरची गुलामी संपली. तो आझाद झाला. त्याने स्वतःचे सैन्य उभा केले.

दक्खन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या दक्षिण भागात तेव्हा निजामशाही , आदिलशाही या सुलतानशाहीचं वर्चस्व होतं. तर उत्तरेत मुघलांचं राज्य होतं. एकमेकांवर कुरघोडीतून बऱ्याचदा यांच्यात आपापसात युद्ध व्हायचं. तो या युद्धामध्ये भाडोत्री सैन्य पुरवू लागला. त्याच्या सैन्यात हबशी आणि अरब सैनिक होते. हे अंबरचे एकदम कट्टर स्वामिनिष्ठ होते.

अंबरने त्यांना लहानपणी दूर इथिओपियामध्ये पाहीलेली नवीन युद्धनीती शिकवली . महाराष्ट्रातल्या डोंगरकपाऱ्यामध्ये जंगलात एखाद्या विजेच्या चपळाईने हे हबशी सैनिक हल्ला करत आणि काही क्षणातचं शत्रूच मोठ नुकसान करून गायब होतं.

एवढचं नव्हे तर उष्ण हवामानामध्ये कमी अन्नपाणी असताना जास्तीतजास्त वेळ तग धरून राहता यावे यासाठी त्याने केळे खाण्याचा उपाय शोधून काढला. काही दिवसातच अंबरची आणि त्याच्या दऱ्याखोऱ्यामध्ये भटक्णाऱ्या सैन्याची प्रसिद्धी अख्ख्या दख्खनमध्ये पसरली. त्याला आता मलिक अंबर म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

आणि मलिक अंबरच्या सैन्याच्या युद्धपद्धतीला अख्ख्या भारतात बारगिरी म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

नगरच्या चांदबीबीच्या मृत्यूनंतर अकबर बादशाहपासून निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबरला बोलावून घेण्यात आलं. अकबराच्या मुघल सेनेला अहमदनगरहून त्याने पळवून लावले. अल्पवयीन सुलतानाला गादीवर बसवून मलिक अंबरने सत्ता आपल्या हाती घेतली. इथल्या स्थानिक मराठा सरदारानां एकत्र आणलं. विजापूरच्या आदिलशहाशी देखील तह केला. महाराष्ट्रात त्याने निजामशाहीची घडी बसवली.

त्याने सर्वप्रथम निजामशाहीची राजधानी त्याने नव्याने वसवलेल्या खडकी या शहरात हलवली. मलिक अंबरने स्वतः या गावाची आखणी केली होती. मराठवाड्यातल्या दुष्काळी परदेशात असलेल्या या खडकी मध्ये त्याने बगदाद प्रमाणे कालव्याने पाणी आणले. शेतजमीन महसूल पद्धतीमध्ये सुधारणा केली. यासाठी मुघल सरदार तोडरमल यांच्या पद्धतीचा अवलंब केला. यामुळे काय झालं , शेतकऱ्यावरचा कराचा भार तर कमी झालाच शिवाय राज्याचे उत्पन्न वाढले. 

औरंगाबादची नहर ए पाणचक्की

वाढलेल्या महसुलाचा उपयोग करून त्याने प्रजाहिताच्या अनेक योजना मार्गी लावल्या. त्याची पाणीपुरवठा योजना, रस्तेबांधणी, इमारतींचे बांधकाम प्रसिद्ध आहे. खडकी म्हणजे सध्याचे औरंगाबादमध्ये त्याने बांधलेली पाणचक्की अजूनही कार्यरत आहे. मलिकने अनेक विद्वान, कलाकारांना आश्रय दिला. हैदर अली या अरबी लेखकाला आश्रय देऊन ‘इक्ब अलजवाहर’ हा ग्रंथ लिहून घेतला. दौलताबाद किल्ल्याची डागडुजी केली.  

मलिक अंबरच्या सर्वात विश्वासू सरदारांमध्ये होते पुण्याचे मालोजी आणि विठोजी हे दोघे भोसले बंधू. त्यांच्याकडे वेरूळची जहागिरी होती. अंबरने या दोन्ही तरुणांची क्षमता ओळखून त्यांना मोठी पदे दिली. पुढे या मालोजी भोसलेंचे जेष्ठ सुपुत्र शहाजी भोसले देखील मलिक अंबरच्या पदरी रुजू झाले. तिथेच त्यांना गनिमी कावा या युद्ध पद्धतीची ओळख झाली. याच गनिमी काव्याने त्यांनी अकबराचा नातू खुर्रमच्या लाखोंच्या सैन्याचा पराभव केला. 

शहाजी महाराजांकडून हा गनिमी काव्याचा वारसा शिवरायांकडे आला. शिवाजी महाराजांनी बारा मावळातल्या आपल्या साथीदारांना घेऊन याच गनिमी काव्याच्या जोरावर स्वराज्याची स्थापना केली.

असा हा कोण कुठल्या आफ्रिकेमधल्या देशाचा हबशी त्याने दिलेल्या युद्धकलेच्या जोरावर मराठ्यांनी मुघलांना पाणी पाजून अखंड भारताचा इतिहास बदलला.

हे ही वाच भिडू.

2 Comments
  1. Raj says

    Yach kuthe reference aasel tar dual ka…..verify karava label…

Leave A Reply

Your email address will not be published.