महाराष्ट्राचा माळकरी मार्क्सवादी : आचार्य प्र.के. अत्रे

आचार्य अत्रे यांनी क्रांतिसिंह नाना पाटलांवर लिहलेला महाराष्ट्राचा माळकरी मार्क्सवादी हा लेख नाना पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त देत आहोत.

महाराष्ट्राचा माळकरी मार्क्सवादी 

क्रांतिसिंह नाना पाटील ह्यांचे चरित्र मोठे अद्भूतरम्य आहे. एका सज्जन, कुलीन आणि भाविक मराठा कुटूंबात त्यांचा जन्म झाला. वडील, आजोबा आणि पणजोबा हे वारकरी पंथाचे. दर महिन्याला पंढरीची वारी करावयाचे. तेव्हा जन्माला आल्यानंतर अवघ्या बाराव्या दिवशीच नानांच्या गळ्यात पंढरीची माळ पडली, लहानपणी नानांचे शिक्षणाकडे फार थोडे लक्ष.

खेळणे व दांडगाया करणे एवढाच त्यांचा आवडता उद्योग होता. व्यायामाचा नि कुस्तीचाही त्यांना नाद लागला. आई-वडिलांना शेतावर ते मदत करीत असत. तेवढेच त्यांना समाधान पुढे पोथ्यापुराणांचा नि भजनपुजनाचा त्यांना नाद लागला. त्यामुळे जून्या पौराणिक ग्रॅंथाचे त्यांनी पुष्कळ वाचन केले. वयाच्या अठराव्या वर्षी ते मराठी शालान्त परिक्षा पास झाले.

आता पुढे काय करायचे हा त्यांच्यापुढे प्रश्न पडला. एवढ्यात सातारा जिल्ह्यात सत्यशोधक समाजाची चळवळ सुरू झाली. ठिकठिकाणी जलसे होऊ लागले. त्या चळवळीने महाराष्ट्रातला बहुजन समाज खडबडून जागा झाला. ह्या चळवळीचा नाना पाटलांच्या तरुण मनावर फार परिणाम झाला. त्यांनी सत्यशोधक वाड्मयाचा अभ्यास केला आणि बहुजनसमाजातले सर्व धार्मिक विधी ते स्वत:च करु लागले.

त्याचप्रमाणे पोराबाळांना शिक्षण द्या, लग्नसणात कर्ज काढून भरमसाट खर्च करु नका, सावकाराच्या घराची पायची चढू नका, अफू, गांजा, दारू ह्या व्यसनांपासून दूर रहा, ह्या सामाजिक सुधारणांचा प्रचार ते खेडेगावांतून करु लागले. जनसमुदासमोर भाषणे करण्याची सवय तेव्हापासून त्यांना लागली.

वीस साली कऱ्हाड तालुक्यात तलाठी म्हणून त्यांची नेमणूक झाली. पण तलाठ्याच्या कामाकडे त्यांचे लक्ष होते कुठे ? कुठे सत्यशोधकी प्रचारासाठी गावगन्ना हिंड, कुठे मुंबई कौन्सिलच्या निवडणुकांसाठी ब्राह्मणेतर पक्षाच्या उमेदवारासाठी जिवाचे रान कर, तर बाकीचा सारा वेळ गावोगाव कुस्त्यांचे फड भरीव, असे त्यांचे एकसारखे उद्योग चालू असत. एकदा तलाठ्याच्या कामात वसुलीची रक्कम दोन आठवड्यांनी उशीरा भरली, म्हणजे ती रक्कम आठवडाभर वापरली अस त्यांच्यावर अन् मुलकी पाटलावर आरोप झाला. त्यात पाटलाची काही चूक नाही, सारा दोष आपलाच आहे, असा नानांनी खुलासा केला. तेव्हा त्यांच्यावर पकड वॉरंट निघाले.

तेवढ्यात १९३० ची महात्मा गांधींची महात्मा गांधींची चळवळ सुरू झाली होती. नाना सत्यशोधकी चळवळीतून बाहेर पडले आणि महात्माजींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या सत्याग्रही चळवळीत त्यांनी उडी घेतली. एका उंच काठीला तिरंगी झेंडा लावून ते गावेगाव महात्मा गांधींचा जयजयकार करत हिंडू लागले अन् कॉंग्रेसचा प्रचार करु लागले. सातारा जिल्ह्यातल्या गावागावातून ते अशा रितीने लोकजागृती करु लागले, त्याचबरोबर त्यांना पकडण्याचे सरकारी वॉरंट सुटले.

पण नाना पोलीसांच्या हाती पुष्कळ दिवस सापडू शकले नाहीत. शिरोडे, सावंतवाडी, बेळगाव, पंढरपूर या भागात व्याख्यानांचा दौरा काढीत काढीत ते शेवटी मुंबईपर्यन्त येवून धडकले. मुंबईतले त्यांचे त्या वेळचे भाषण ऐकून श्रोते खूष झाले असे म्हणतात. कारण ग्रामिण भाषणाचा असो मनोरंजन नमुना त्यांनी पुर्वी कधी पाहिला नव्हता. दोन वॉरट चुकवित चुकवित अशा फरारीपणाचे आयुष्य नानांनी कित्येक दिवस कंठले. पुढे गांधी-आयर्विन समेट झाला. सारे लोक सुटले पण नानांच्या वरचे वॉरंट तसेच राहिले.

शेवटी मित्रमंडळींच्या आग्रहावरून नाना प्रकट झाले आणि तलाठी प्रकरणातल्या दोषाबद्दल त्यांना सहा महिने सक्तमजूरी आणि शंभर रुपये दंड झाला. राजकीय कैदी म्हणून तुरूंगात जाण्याएवजी फौजदारी गुन्ह्यात त्यांना पहिला कारागृहवास घडला. हा एक चमत्कारिक योगायोगच म्हणावयास हवा. एकामागून एक काळ होवून कौंटुबिक पाशातून त्यांच्यी जवळजवळ मुक्तताच झाली असे म्हणायला हरकत नाही.

त्यानंतर कॉंग्रेसच्या सत्याग्रहात ते राजरोसपणे शिरले. प्रथम दोन महिने ते स्थानबद्ध झाले. पण पॅरोलवर सुटले. पुढे पॅरोल मोडल्यावरून त्यांना सहा महिन्यांची आणि शंभर रुपये दंडाची शिक्षा झाली. त्यातून सुटल्यानंतर पुन्हा कायदेभंगाबद्दल त्यांना एका वर्षांची सक्तमजूरीची शिक्षा झाली. ही शिक्षा भोगून ते बाहेर आले. तोच गांधीजींनी सामुदायिक सत्याग्रह बंद करुन वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला. त्यात ते पडले. तेव्हा त्यांना सहा महिने शिक्षा आणि पन्नास रुपये दंड झाला.

ही शिक्षा भोगून नाना बाहेर पडले. नि अवघ्या सात दिवसांच्या आत त्यांनी युद्धविरोधी घोषणा करुन दूसऱ्यांदा सत्याग्रह केला. त्यात त्यांना तीन महिने शिक्षा व पंचवीस रुपये दंड झाला. ही शिक्षा संपल्यानंतर दुष्काळी परिषदेचा प्रचार करत नाना दक्षिणेतल्या संस्थानी भागातून प्रचार करु लागले. पण कोल्हापूर संस्थानात त्यांनी पाऊल टाकले न टाकले तोच संस्थानी पोलीसांनी त्यांच्या हातापायात दंडाबेडी अडकवली. रीतसर त्यांच्यावर खटला होऊन त्यांना एक वर्षााची शिक्षा आणि पाचशे रुपये दंड झाला.

सारांश, ८ ऑगस्ट १९४२ च्या छो़डो भारत चा ठराव कॉंग्रेसने मंजूर करण्यापूर्वी कॉंग्रेस स्वातंत्र्याच्या चळवळीत नाना पाटलांना एकदा नाही, दोनदा नाही, चांगली आठ वेळी शिक्षा झाली होती. पुष्कळांना नाना पाटलाचे हे पूर्वचरित्र माहित नाही. त्यांना वाटते की, बेचाळीसच्या चळवळीतच साताऱ्याला पत्रिसरकार स्थापन करुन नाना पाटील एकदम लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ होवून बसले.

तीस सालांपासून ते बेचाळीस सालापर्यन्त बारा वर्षात येरवड्याच्या अनेक वाऱ्या त्यांनी केल्यामुळे त्यांची स्वातंत्र्यनिष्ठा आणि देशाभिमान चांगलाच तावूनसुलाखून निघाला होता.

महात्मा गांधीनी भारत छोडो ची घोषणा केल्यानंतर नाना पाटलांच्या जीवनातील दूसऱ्या तेजस्वी कालखंडाला प्रारंभ झाला. मात्र ह्या चळवळीत आता तुरूंगात म्हणून जायचे नाही असा त्यांनी मनाचा निर्धार केला. आणि असा निर्धार करुन त्यांनी सातारा जिल्ह्यात हजार बाराशे सहकारी जमा करुन आपल्या तुफानी व्याख्यानांच्या प्रचारास सुरवात केली.

नाना पाटलांचे खरे स्वरुप आता प्रकट झाले. त्यांच्या वक्तृत्वप्रतिमेला जणू काही नवीनच बहर फुटला. त्यांच्या व्याख्यानाला हजारो लोक जमू लागले.  महात्मा गांधी की जय आणि करेंगे या मरेंगे ह्या घोषणा करुन ते आपल्या व्याख्यानाला प्रारंभ करीत. त्यांच्या भाषणाचा धबधबा तीन तीन तास अस्खलितपणे वाहात असे आणि हजारो शेतकरीबांधव त्यांच्या त्या वाग्गंगेत मनसोक्त डुंबत असत.

त्यामुळे नाना पाटलांची कीर्ती वाढू लागली आणि सर्वत्र पसरू लागली. सातारा जिल्ह्यातील गावागावातून आणि दऱ्याखोऱ्यातून नवजवान हातात भाला, कुऱ्हाडी घेवून बाहेर पडू लागले आणि नानांच्या मोर्चात सामील होऊ लागले.

२ सप्टेंबर १९४२ रोजी तासगावच्या मामलेदार कचेरीवर पहिला मोर्चा चालून गेला. पोलीस आणि अधिकारी यांनी तो सशस्त्र लोकमसुदाय पाहताच त्यांची पाचावर धारण बसली होती. मामलेदार सज्जन गृहस्थ होता. तो मुकाट्याने बाहेर आला आणि त्याने मोर्चाच्या पुढाऱ्यांशी बोलणे केले.

पुढारी मामलेदाराला म्हणाले,

“आम्ही मामलेदार कचेरीवर तिरंगी झेंडा लावणार. त्यानंतर तुम्ही सरकारी अधिकाऱ्यांनी गांधी टोप्या घातल्या पाहिजेत आणि राष्ट्रीय सरकारचे नोकर म्हणून यापुढे काम केले पाहिजे.”

मामलेदारांनी ते कबुल केले. एवढेच नव्हे, तर डोक्यावर गांधी टोपी चढवून त्यांनी चौकात ध्वजारोहण केले. तेव्हा महात्मा गांधींच्या नावाचा जयजयकार करीत मोर्चा विजयानंदाने परत गेला. त्यामुळे नाना पाटलांच्या चळवळीला आणखीन जोर चढला. ठिकठिकाणी त्यांच्या प्रचाराच्या सभा होऊ लागल्या. पोलिसांच्या सशस्त्र तुकड्या त्यांना पकडण्यासाठी त्यांच्यामागे धावून लागल्या.

पण जनतेचा नाना पाटलांना प्रचंड पाठिंबा असल्याने त्यांचा थांगपत्ता लोकांनी पोलिसांना लागू दिला नाही. वडार, रामोशी ही सर्व जमात नाना पाटलांच्या बाजूला सामील झाली आणि पोलिसांच्या हालचालीवर टेहळणी करुन त्यांच्या इत्यंभूत बातम्या नानांना पुरवू लागली.

त्यानंतर दुसरा मोर्चा ८ सप्टेंबर १९४२ ला निघाला.

या वेळेपर्यन्त पोलीस चांगलेच सावध झाले होते. चार-पाच हजारांचा मोर्चा इस्लामपूरला येऊन पोहोचतो न पोहोचतो तोच त्याजवर सशस्त्र पोलीसांनी हल्ला केला. किर्लोस्करवाडीचे पंड्या इंजिनियर हातात तिरंगी निशाण घेऊन अग्रभागी चालले होते. त्यांना पोलिसांनी गोळी घालून ठार मारले. त्याखेरीज आणखी एकजण ठार झाला आणि पंधराजण जखमी झाले.

तिसरा मोर्चा त्याच दिवशी वडूज येथे काढण्यात आला. त्याच्या अग्रभागी हाती तिरंगी झेंडा घेऊन परशुराम पहिलवान चालला होता. मोर्चात एकंदर हजार दीड हजार लोक होते. मोर्चा कचेरीजवळ येताच फौजदारांनी त्यांना दरडावले,

मागे हटा !

मोर्चातले वीर गर्जेले,

‘आम्ही कचेरीवर झेंडा लावणार, त्याखेरीज मागे हटणार नाही !

त्याचबरोबर पोलीसांनी गाळीबार सुरू केला. पहिली गोळी परशुराम पहिलवानाच्या छातीतून आरपार गेली. तो मटकन खाली बसला. तोच दुसरी गोळी त्यांच्या कपाळाच्या कवटीमध्ये शिरली आणि तो धाडकन् खाली पडला. पण त्याच्या हातातला तिरंगी झेंडा काही खाली पडला नाही. पोलिसांच्या गोळीबाराने सत्तर लोक जखमी झाले. कोणाच्या मांडीतून गोळ्या गेल्या होत्या तर कोणाच्या हातातून गोळ्या गेल्या होत्या.

त्यानंतर सत्याग्रही स्वरुपाचे निशस्त्र मोर्चे सरकारी कचेऱ्यांवर नेण्याचे धोरण नाना पाटील ह्यांनी थांबविले. कारण त्यात निष्कारण प्राणहानी होते असे त्यांना आढळून आले. त्यानंतर सरकारी राज्ययंत्र बंद पाडण्यासाठी भूमिगत चववळीला त्यांनी प्रारंभ केला. नाना पाटील ह्यांच्यामागे आता पोलिसांचा ससेमिरा खूपच लागला. त्यांना उघडपणे जिल्ह्यातून हिंडणे फिरणे मुष्किलीचे झाले. मग कुठे पिकात दडून रहा,मळ्यात मुक्काम कर, किंवा एखाद्या खेड्यातल्या घराच्या माळ्यावर लपून बस अशा रीतीने ते पोलिसांना हुलकावण्या देऊ लागले.

ह्या कामी पुष्कळदा अगदी जिवावर बेतणारी अशी अनेक संकटे त्यांच्यावर येऊन गेली.

सातारा जिल्हा हा दरोडेखोरांचा जिल्हा म्हणून फार प्रसिद्ध आहे. मध्यंतरी नाना पाटलांना वाटले की, ह्या समातीच्या लोकांशी आपण सहकार्य करुन पोलिसांना तोंड द्यावे, पण दरोडेखोर ते दरोडेखोर !  त्यांना राजकीय दृष्टी कुठून असणार? ते उलट नाना पाटलांच्या नावाचा गैरफायदा घेऊन लुटालुट करु लागले. त्यामुळे काही काळ फार फसगत झाली आणि नाना पाटलांबद्दल कित्येक लोकांचा फार गैरसमज झाला.

एका बाजूला पोलिसांचे अत्याचार आणि दूसऱ्या बाजूला दरोडेखोरांची लुटमार ह्यांच्या जात्यात सातारा जिल्हातील गरीब जनता भरडून निघू लागली. तेव्हा नाना पाटलांनी ह्या दरोडेखोरांचा त्रास नष्ट करण्याचे ठरविले. जे जे दरोडेखोर होते, किंवा जे कोणी गावगुंड होते आणि जे पोलिसांना फितूर होऊन नाना पाटलांच्या बातम्या पुरवीत होते अशांना पकडून त्यांच्या तळपायावर पंधरा लाठ्यांचे तडाखे मारण्यात येत असत. याच प्रकाराला पत्री मारणे असे म्हणत.

ह्या शिक्षेच्या धाकाने सर्व गुंडांचे धाबे दणाणले आणि नाना पाटलांचा सर्वत्र दरारा बसला. हे कार्य करण्यासाठी नाना पाटलांनी एक तुफान सेना स्थापन केली. ह्या सेनेतले सैनिक गावोगाव जाऊन तेथील गुंडाना आणि समाजकंटकांना अशी काही दहशत बसवू लागले की, त्यामुळे सातारा जिल्ह्यातील गुंडगिरी थोड्या दिवसाच्या आत नेस्तनाबूत झाली.

आता यानंतर नाना पाटलांच्यासमोर दूसरा महत्वाचा प्रश्न उभा राहिला. तो असा की, ह्या गडबडीत सातारा जिल्ह्यातून इंग्रज सरकारचे अस्तित्व जवळजवळ नाहीसे झाले होते. तेव्हा लोकांच्या दैनंदिन रक्षणाची जबाबदारी अशी त्यांच्या अंगावर येऊन पडली त्याचप्रमाणे त्यांची दैनंदिन गाऱ्हाणी दूर करणे आणि त्यांच्या समाजिक हिताची व मार्गदर्शनाची कामे करणे या गोष्टींची जबाबदारीही त्यांच्याच शिरवार येऊन पडली.

ह्या परिस्थितीतून प्रतिसरकार स्थापन करण्याची आणि ग्रामराज्ये सुरू करण्याची कल्पना निर्माण झाली. या ग्रामराज्याची घटना तयार करण्यात आली. ग्रामपंचायती स्थापन करण्यात आल्या. खेड्यापाड्यातील जनतेची आपआपसातील भांडणे मिटवण्यासाठी तडजोड कमिट्या स्थापन करण्यात आल्या साक्षरता-प्रचाराची मोहिम, दारूबंदी, अस्पृश्यता निवारण, अल्पखर्चाने गांधी विवाह पद्धती ने लग्ने लावणे अशी अनेक उपयुक्त कामे ग्रामराज्यातर्फे यशस्वी रितीने करण्यात आली, जवळजवळ तीन वर्षे साताऱ्याच्या दक्षिण भागात नाना पाटलांच्या या प्रतिसरकारची राजवट अबाधितपणे चालली होती.

जवळजवळ चारशे गावात ग्रामराज्ये स्थापन करण्यात आली होती. भारतीय राजकारणातील ह्या अभूतपुर्व प्रयोगाने नाना पाटील आणि त्यांचे प्रतिसरकार ह्यांची किर्ती सर्व भारतवर्षात पसरून त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले.

पुढे पंचेचाळीस साली दुसरे महायुद्ध संपले.

त्याचबरोबर मुंबई सरकारने आपले सारे लक्ष साताऱ्यावर केंद्रीभूत केले. नाना पाटलांच्या प्रतिसरकारची बदनामी करण्यासाठी त्यांनी एक मोहिम सुरू केली. नाना पाटील आणि त्यांचे सहकारी म्हणजे भयंकर गुंड असून ते गरिब जनतेवर अनन्वित अत्याचार करीत आहेत, कोणाचे ते खून आहेत तर कोणाचे हातपाय तोडीत आहेत. कोणाच्या पायांना बैलाप्रमाणे पत्र्या मारीत आहेत. सरकारी खजिने आणि आगगाड्या लुटीत आहेत अशा एक ना दोन छपन्न गोष्टी मुंबई सरकार तिखट मीठ लावून सांगू लागले.

ज्यांचे हातपाय तोडण्यात आले अशा काही लोकांचे फोटोदेखील सरकारने, टाईम्स मध्ये छापून प्रसिद्ध केले. एवढेच करुन सरकार थांबले म्हणता की काय? त्याने साताऱ्याच्या दक्षिण भागात एक गोरे लष्कर सुद्धा पाठवून दिले. लोकांना वाटले आत्ता त्या ठिकाणी मोठी लढाई होणार पण थोड्याच दिवसात मुंबई सरकारचा हा प्रकार धांदात खोटा आणि एकतर्फी होणारा आहे हे लोकांच्या कळून आले. त्यानंतर काही दिवसांनी सार्वत्रिक निवडणूका झाल्या आणि कॉंग्रेस सरकारचे राज्य मुंबई इलाख्यात प्रस्थापित झाले. त्याबरोबर भूमिगतांना अभयदान मिळून ते जनतेपुढे भराभर प्रकट होऊ लागले.

७ मे १९४६ रोजी सातारा प्रतिसरकारचे नेताजी नाना पाटील आणि त्यांचे शेकडो पराक्रमी सहकारी मोठ्या वैभवाने एकदम प्रकट झाले. सातारा जिल्ह्यामधील जनतेला आनंदाने वेड लागायचेच काय ते बाकी राहिले.

जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांमधून त्यांचे विराट सत्कारसमारंभ झाले. २६ मे १९४६ रोजी मुंबई शहरात नाना पाटील आणि त्यांचे सहक्रांतिकारक ह्यांचा जो अभूतपुर्व सत्कार झाला तो ज्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला असेल, तो ते आमरण विसरणार नाहीत. सतत चार वर्षे नाना पाटील ह्यांनी इंग्रजांच्या हातावर तुरी दिली. एकदाही ते त्यांच्या हाती सापडले नाहीत.

यामुळे नाना पाटलांच्या नावाभोवती एवढ्या चमत्कारांचे आणि दंतकथांचे वलय तयार झाले होते की, कुठलातरी पुराणातला वा कथाकादंबऱ्यातला नायकच आपण बघतो आहोते असे लोकांना वाटू लागले. ह्या गोष्टीला आज चौदा वर्षे झाली पण नानांच्या अपरंपार लोकप्रियेमधला एक कणही अद्याप कमी झाला नाही.

भूमिगत अवस्थेमधून नाना पाटील जेव्हा महाराष्ट्रापुढे प्रथम प्रकट झाले तेव्बहा ताबडतोब १२ मे १९४६ रोजी नवयुगने सातारा जिल्हा प्रतिसरकार विशेषांक काढून त्यांच्या भूमिगत जिवनावर आणि पराक्रमावर इत्यंभूत प्रकाश टाकला. नाना पाटील ह्यांच्या अद्भूतरम्य चरित्राची व रोमहर्षक व्यक्तिमत्वाची ओळख नवयुगने प्रथमच महाराष्ट्राला करून दिली. ह्याबद्दल साहजिकत आम्हाला अभिमान वाटतो. त्यावेळेपासून नाना पाटील आणि आम्ही ह्यांच्यामध्ये जो स्नेहाचा बंध निर्माण झाला आहे तो आजतागायत कायम आहे.

१९४६ सालानंतर नाना पाटलांच्या जीवनात आमुलाग्र क्रांती झाली आहे. स्वातंत्रप्राप्तीनंतर कॉंग्रेसचे भांडवलशाही आणि हुकूमशाही स्वरुप जेव्हा स्पष्टपणे प्रकट झाले, तेव्हा ते कॉंग्रेसमधून बाहेर पडले आणि शेतकरी-कामगार पक्षात शिरले. या पक्षात आल्यानंतर मार्क्सवादी विचारसरणीशी त्यांचा प्रथम परिचय झाला. शेतकऱ्यांचे कल्याण हा त्यांच्या तळमळीचा एकमेव विषय होता. त्यांच्या सारा जन्म शेतकऱ्यांच्यातच गेला शेतकऱ्यांचा उद्धार करणे हे त्यांच्या जीवनाचे एकमेव ध्येय होते. तेव्हा ह्या देशात साम्यवाद आल्याखेरीज शेतकऱ्यांचे कामगारांचे कल्याण होणे अशक्य आहे ही गोष्ट जेव्हा त्यांना उमगली तेव्हा ते ५३ साली कम्युनिस्ट पक्षात दाखल झाले.

आज कम्युनिस्ट पक्षाविषयी नाना तऱ्हेचा प्रचार करण्यात येतो आणि त्याच्याबद्दल जनतेमध्ये नाना तऱ्हेचे गैरसमज निर्माण करण्यात येतात पण नाना पाटील हे कम्युनिस्ट असूनही असे तसे नाहीत. पण कम्युनिस्ट म्हणूनच मी जगेन आणि कम्युनिस्ट म्हणूनच मी मरेन अशा निर्धाराचे ते ज्वलन्त कम्युमिस्ट असूनही कम्युनिस्टांविरोधी प्रचाराचा त्यांच्या लोकप्रियतेला यत्किचिंतही उपसर्ग झालेला नाही. ह्याचे कारण नाना पाटील हे काय आहेत हे महाराष्ट्रातील जनता उत्तम तऱ्हेने ओळखते. तेव्हा कॉंग्रेस सरकारच्या किंवा प्रजासमाजवादी पक्षाच्या बेचाळीस पिढ्या जरी खाली उतरल्या तरी ह्या महाराष्ट्रामध्ये नाना पाटलांविरुद्ध कोणीही गैरसमज निर्माण करु शकणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

नाना पाटील हे मराठी जनतेची अस्सल मराठमोळी भाषा बोतात. शेतकऱ्यांच्या जीवनातल्या गोष्टी रुपके आणि दृष्टांत सांगून ते शेतकऱ्यांच्या काळजास हात घालतात. त्यांचा मराठी बाणा आणि महाराष्ट्रप्रेम, म्हणजे बावनकशी सोने आहे. ज्या बेचाळीसच्या क्रांतीचा वारसा आपल्याकडे आहे, असे प्रजासमाजवादी मोठ्या आढ्यतेने सांगतात, त्या क्रांतिचे त्यांचे त्या वेळेचे पुढारी जयप्रकाश नारायण, अरुणा असफअली, अन् अच्युतराव पटवर्धन आज कोठे आहेत? सर्वोदयाच्या भगव्या कफन्या अंगात अडकवून आज ह्या साऱ्या पुढाऱ्यांनी राजकारणाचा संन्यास घेतला पण बेचाळिसी क्रांतीचे एकमेव पुढारी जे क्रातिसिंह नाना पाटील ते मात्र जनताक्रांतीच्या अग्रभागी होते तसे आजतागायत आहेत.

भारत चीनच्या सीमावादात कम्युनिस्ट हे नाना पाटलांची खणखणीत अन दणदणीत भूमिका काय आहे ती पाहा. ते म्हणाले,

महाराष्ट्राचा शेतकरी वीतभर बांधाकरिता रक्त सांडतो. दिवाणी कोर्ट करतो आणि वळचणीचे पाणी कसे वाहील यासाठी झगडतो. तो शेतकरी चीन आपली शीव ओलांडून पाहिल तर गय करील काय? शिवेच्या आत चीन आल्याचे नुसते जाहीर होऊ द्या मी स्वत: शिवेवर झगडायला धावून जाईन.

असा जाज्वल्य महाराष्ट्राभिमान ज्यांच्या देहात धगधगतो आहे, तो कम्युनिस्ट पक्षात आहे म्हणून त्यांच्याविषयी कोण गैरसमज करुन घेईल?

पंचावन्न सालापासून नाना पाटलांच्या जीवनात तिसरा खंड सुरू झाला आहे. या चार वर्षात नाना पाटलांनी आपल्या सिंहदर्जनेने महाराष्ट्रातले गाव न् गाव हलविले आहे. एक गिवसाची विश्रांतीसुद्धा कधी त्यांनी घेतली नाही. साऱ्या महाराष्ट्रातून झंझावती दौरा काढून हजारो प्रचाराच्या सभा त्यांनी घेतल्या आहेत. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य आपण मिळवले म्हणून कॉंग्रेसवाल्यांनी आपले फटके कितीही आभाळात उडविले तरी त्या श्रेयात नाना पाटील ह्यांचा फार मोठा भाग आहे हे एखादा आंधळासुद्धा सांगू शकेल.

अजूनही संयुक्त महाराष्ट्राचा लढा कुठे संपलाय? बेळगाव कारवासराठी समितीने सत्याग्रहाची घोषणा केलीच आहे आणि सत्याग्रहाच्या आघाडीवर आपण दंड थोपटून उभे राहणार असल्याची नाना पाटलांनीही गर्जना केली आहे. समाजवादी भारतात समाजवादी महाराष्ट्र निर्माण झाल्याचे सुवर्ण दृश्य माझ्या डोळ्यांनी मला पाहू द्या. अशी तळमळीची इच्छा नाना पाटलांनी आपल्या एकसष्ठीच्या समारंभावेळी व्यक्त केली ह्यापेक्षा त्यांच्या महाराष्ट्र प्रेमाचा निर्माळा आम्ही अधिक तो काय द्यायचा?

नाना पाटील हे माळकरी आहेत यावरून महाराष्ट्राच्या प्राचीन परंपरेबद्दल त्यांची अथांग निष्ठा जशी व्यक्त होत, त्याचप्रमाणे ते मार्क्सवादी आहेत ह्यावरुन महाराष्ट्रात समाजवाद आणण्याचा त्यांचा निर्धार किती अभंग आहे हेही व्यक्त होते. म्हणून अठ्ठावीस युगे विटेवर उभ्या राहिलेल्या समचरण पांडुरंगाच्याच आशिर्वादाने ते या शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या महाराष्ट्रात समाजवाद प्रस्थापित करु शकतील अशी आशा करायला हरकत नाही.

साप्ताहिक नवयुग दिनांक ७ ऑगस्ट १९६०

Leave A Reply

Your email address will not be published.