निजामापुढं पेशव्यांची इभ्रत पणाला लागली आणि मल्लखांबाचा जन्म झाला
मल्लखांब म्हंटल कि, आपल्या डोळ्यसमोर उभ राहतं ते फक्त एका लाकडावर वेगवेगळ्या कवायती करणाऱ्या लोकांचं चित्र. आणि या कवायती पण काही साध्या नसतात, कधी पाय वर तर कधी डोकं खाली, अश्या शरीराच्या अंगांना त्यांच्या आहे त्या स्थितीत न ठेवता वाकडं-तिकडं करून त्यांच्याशी खेळण्याच्या हा प्रकारच वाटतो.
इथं सपाट जमिनीवर योगासन आणि जिममधी जाऊन त्या मशिनी उचलणं म्हंटल तरी अर्धा जीव जातो. या मल्लखांबात तर जमिनीत नुसतं दोन फूट गाडलेल्या लाकडावर बॅलन्स करत कसरती करायला लागतात. या कवायती बघून डोळ्यांची पापणी सुद्धा झाकायला म्हणतं नाही. कधी कधी तर प्रश्न पडतो कि, या मल्लांच्या अंगात हाडं आहेत कि नाही? आणि असली तरी रबराची असणार!
यासोबत अजून एक प्रश्न पडतो कि, या अश्या मल्लखांबाचा शोध नक्की लागला तरी कुठं आणि कुणी म्हणायचा?
तर, ही गोष्ट आहे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीची, म्हणजेच दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळातली. मराठी राज्य पानिपतच्या दारुण पराभवातून सावरण्याबरोबर सगळ्या भारतात पसरत चाललेल्या इंग्रजांच्या साम्राज्याला तोंड देण्याचा आतोनात प्रयत्न करत होत. यात राजकीय व सामाजिक अस्थिरता, अंतर्गत कलह आणि फाटाफुटीचे राजकारण अश्या अडचणी सुद्धा तितक्याच होत्या, त्यात भर म्हणून मराठी दरबारापुढं एक आव्हान येऊन ठेपलं.
हे आव्हान होत हैद्राबादच्या निजामाकडनं, देशातल्या बाकीच्या राज्यांमधल्या मातीत दंड थोपवत विजय मिळवून आलेले अली आणि गुलाबी यांच्याविरुद्ध. या दोन कसलेल्या, भीमकाय आणि बलदंड पैलवानांनी दुसर्या बाजीराव पेशव्यांच्या दरबारात कुस्तीचं तंगड आव्हान दिलं. पण या पैलवान गड्यांचा आत्मविश्वास, त्यांची रग आणि तयारी बघून दरबारात पेशव्यांच्या पदरी असलेल्या बावन्न पैलवानांन मधल्या एकाचीपण समोर यायची हिम्मत झाली नाही.
आता थेट पेशव्यांच्या इभ्रतीचा प्रश्नये म्हंटल्यावर पेशव्यांकड भिक्षुकी करणाऱ्या सतरा अठरा वर्षाच्या बाळंभटदादा देवधर यांनी हा विडा उचलला अन तयारीसाठी थोडा वेळ मागितला.
बाळंभट यांनी त्यांच्या नाशिकजवळच्या कोठुरे गावी जाऊन मातेचे आशीर्वाद घेतले आणि नाशिक जिल्ह्यात असलेल्या वणीच्या डोंगरावर वसलेल्या सप्तशृंगी देवीची आराधना सुरू केली. असं म्हणतात कि, त्यांच्या कठोर आराधनेने देवी प्रसन्न झाली आणि तिने बाळंभट दादांना आशीर्वाद दिला की,
प्रत्यक्ष मारुतीरायाच त्यांना कुस्तीचे डाव शिकवतील.
याप्रमाण बजरंग बलीने दृष्टांत देऊन एका लाकडी लाटेवर (खांबावर) कुस्तीचे डाव दाखवले. काहीजण असंही म्हणतात की झाडावर खेळणाऱ्या माकडांमुळे बाळंभटांना मल्लखांबची कल्पना सुचली.
शिकवणी पूर्ण झाल्यानंतर ठरलेल्या मुदतीत बाळंभट दादा पुण्याला परतले. आखाडा सुरु झाला आणि स्वतः पेक्षा वयाने, अनुभवाने, वजनाने मातब्बर असलेल्या अलीला बाळंभटांनी गळखेड्याच्या डावांनी चितपट केले. गुलाब तर दादांची तयारी बघूनच तिथून चिंगाट पळाला.
दादांनी ज्या लाकडी खांबावर कसून सराव केला, त्या खांबाला त्यांनी ‘मल्लखांब’ असं नाव दिलं. मल्लांनी साथीदाराच्या अनुपस्थितीत ज्याच्यावर सराव करायचा तो मल्लखांब. अशा तऱ्हेनं कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून मल्लखांबाला सुरुवात झाली.
यासोबतच असेही म्हणतात, की रामायणकाळात महाबली हनुमानांनी मल्लखांबाचा शोध लावला.
सोमेश्वर चालुक्याने बाराव्या शतकात ११३५ मध्ये लिहिलेल्या ‘मानसोल्लास’ या ग्रंथात मल्लखांबसदृश काही उड्या आढळतात. ओरिसामधील प्रसिध्द जगन्नाथपुरीच्या प्राचीन मंदिराशेजारी, पंधराव्या शतकात सुरू झालेल्या जगन्नाथ वल्लभ आखाड्यामध्ये स्थापनेपासून मल्लखांब प्रशिक्षण वंशपरंपरेने सुरु असल्याचं म्हंटल जात. त्याच प्राचीन कौशल्याला बाळंभट्टदादांनी पुनर्जन्म दिला, त्याचे जतन-संवर्धन केल्याचे म्हंटले जाते.
दरम्यान, पुढं १८१८ मध्ये मराठा संस्थान खालसा झाले आणि इंग्रजांनी पेशव्यांची रवानगी उत्तर प्रदेशातील कानपूर जवळच्या ब्रह्मावर्त इथं केली. पुण्याहून पायपीट करत कानपूरला जाताना पेशव्यांबरोबर बाळंभट दादाही होते. पेशव्यांनी जिथं जिथं मुक्काम केला तिथं- तिथं त्यांनी कुस्तीचा आखाडा सुरू केला, ज्यात मल्लखांब सुद्धा लावले.
बाळंभटदादांनी पहिला आखाडा वाराणसीत सुरू केला आणि कोंडभटनाना गोडबोले यांना मल्लखांबाचे प्रशिक्षण दिले. नानांनी बाळंभटदादांना मल्लखांबाचा प्रसार करण्यासाठी मदत केली. या आखाड्यात बाळंभटदादांनी ज्या शिष्यानं गळ्यात आधी प्रशिक्षण दिल. त्यात वाराणसीच्या टकेजमाल यांचा समावेश होता. ते पुढं वडोदऱ्याला स्थायिक झाले.
पुढे टकेजमाल यांनी वाराणसीच्या जुम्मादादांना प्रशिक्षण दिले. राजरत्न प्रा. माणिकराव हे जुम्मादादांचे शिष्य. वडोदऱ्याचे दामोदरगुरू मोघे यांनी कोंडभटनानांकडून मल्लखांबाचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी पुढे जाऊन वेताचा मल्लखांब विकसित केला.
बाळंभटदादांचे पुत्र आणि कोंडभटनानांचे शिष्य नारायणगुरू देवधर यांनी मल्लखांबाचा भारतात प्रसार करण्यासाठी महत्त्वाचं योगदान दिले. सुरत, बडोदा, भोपाळ, उज्जैन, देवास, इंदूर, झांशी, ग्वाल्हेर येथे त्या काळी सुरू झालेले आखाडे आजही अस्तित्वात आहेत आणि तिथं मल्लखांब आजही चालतो.
तसं पाहायचं झालं तर मल्लखांब हा एक स्वयंपूर्ण, स्वतंत्र व्यायामप्रकार म्हणून ओळखला जातो. केवळ महाराष्ट्रात नव्हे तर आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, बिहार, पंजाब, उत्तर प्रदेश या
महाराष्ट्राबाहेरच्या राज्यांमध्येही हा व्यायाम प्रकार प्रचलित आहे.
एवढंच नाही तर या मल्लखांबाची ख्याती आता सात समुद्रापार जाऊन पसरलीय. हा प्रकार परदेशात लोकप्रिय करण्याच्या दृष्टीने अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे काम वाखाणण्याजोगं आहे.
१९३६ मध्ये त्यांनी बर्लिनच्या ऑलिंपिक स्पर्धेत मल्लखांबाचे प्रात्यक्षिक सादर केले. तिथं असलेल्या जर्मनच्या क्रीडारसिकांना हा प्रकार फार आवडला. पश्चिम जर्मनीतल्या कोलोन इथल्या क्रीडा-विद्यापीठात मल्लखांबाचा सराव व संशोधनकार्य चालू आहे. यासोबतच नंतर सिंगापूर, थायलंड, मलेशिया, लॉस अँजेल्स मधल्या क्रीडास्पर्धांमध्ये सुद्धा या मल्लखांबच्या कवायती सादर करण्यात आल्या. ज्याचे भरभरून कौतुक झाले.
आता जगभर या खेळाचं नाव गाजलं, पण जिथून या खेळाला मूळतः सुरुवात झाली, त्या नाशकात आज मल्लखांब नुसता नावापुरताच राहिलाय. बाळंभट्ट देवधर यांच्या कोठरे गावातील आखाडाही आता बंद पडलाय. एवढंच नाही तर वणी, त्र्यंबकेश्वर आणि इतर तालुक्यांमधील आखाडेही बंद पडलेत. सध्या बोटावर मोजण्याएवढेच मल्लखांब प्रशिक्षक आहेत. त्यात व्यायामशाळेत येऊन शिकणाऱ्या मुलांची संख्या तर विचारूच नका. सोप्या अश्या मशिनरी व्यायामामुळं मल्लखांबासारख्या मेहनती खेळाकडे तरुण पिढीचं दुर्लक्ष होतंय, असं म्हणायला काय हरकत नाही.
हे ही वाच भिडू :
- अमरावतीची ऑलिम्पिक टीम हिटलर समोर भगवा झेंडा घेऊन उतरली होती..
- बाजीराव पेशवेसुद्धा पिलाजीराव जाधवरावांना युद्धशास्त्रातला गुरू मानायचे
- दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीवर काम करणाऱ्या आईबापाचा लेक ऑलिम्पिक गाजवायला निघालाय