रंकाळ्याची लढाई ही शिवरायांच्या पूर्वजांच्या पराक्रमाची पहिली खूण होती

स्वराज्याची स्थापना करून प्रत्येक मराठी मनाला ताठ मानेने जगायची शिकवण देणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.

भोसले घराण्याच्या रक्तात वहात असलेल्या पराक्रमाला मोठा इतिहास आहे.

भोसले घराण्याचा संबंध शिसोदे या राजपूत राजवंशाशी जोडला जातो. चौदाव्या शतकात या घराण्यातला भैरवजी उर्फ भोसाजीराणा हा कर्तबगार पुरुष होऊन गेला.

दक्षिणेकडे आल्यावर या घराण्याचे आडनाव भोसले असे पडले.

वेरूळचे बाबाजी भोसले हे या घराण्यातले पहिले ज्ञात पुरुष. त्यांच्याकडे वेरूळची पाटीलकी होती. शिवाय पांडे पेडगाव व इतर अशा आठ गावांची देशमुखी त्यांना सांभाळायला दिलेली हाती.

ही गावे निजामशाही व आदिलशाहीच्या सीमेवर असल्यामुळे हा भाग जोखमीचा होता.

बाबाजी व रेवाऊ यांना दोन मुले, मालोजी आणि विठोजी. थोडा काळ शेती सांभाळणाऱ्या  या दोघानी पुढे लष्करी कवायतीच प्रशिक्षण घेतलेल.

निजामशाहीतले नावाजलेले सरदार फलटणचे वनगोजी उर्फ राणा वनंगपाळ नाईक निंबाळकर यांच्या सैन्यात हे दोन्ही बंधू दाखल झाले.

याकाळात विजापूरच्या आदिलशाह आणि अहमदनगरचा निजामशहा यांच्यात सत्तासंघर्ष सुरू होता.

आदिलशाहने उत्तर महाराष्ट्रात ढवळाढवळ करण्यास सुरुवात केली होती. त्याच्या सैनिकांनी कराडपर्यंत मजल मारली होती.

आदिलशाही मनसुब्याला आवर घालण्यासाठी वनगोजी निंबाळकरांनी मोहीम हाती घेतली. जवळपास १२ हजाराची फौज घेऊन ते पन्हाळा किल्ल्यावर चालून आले.

कोल्हापुरातील रंकाळा तलावाजवळ त्यांनी आपली छावणी स्थापन केली होती.

वनगोजी निंबाळकरांच्या हल्ल्याची बातमी आदिलशहाला समजली. त्याने निंबाळकरांना जिवंत पकडून आणण्याचे आदेश आपल्या सैनिकांना दिले.

निंबाळकरांच्या रंकाळा छावणीवर अचानक आदिलशाही सैन्य चालून आले. या सैन्याच्या अग्रभागी दोन हत्ती होते. निशाणे सोडून धडकी बसवणारा नगारा वाजवत हे सैन्य चालून येत आहे हे पाहिल्यावर रंकाळ्याच्या छावणीत गोंधळ उडाला. तिथलं सैन्य बेसावध होतं.

पण मालोजी आणि विठोजी भोसले या बंधूनी संकटसमयी सगळी सूत्रे आपल्या हाती घेतली.

वेगाने सैनिकांना तयार केले आणि सर्वप्रथम पुढे येणाऱ्या हत्तीवर हल्ला केला.

हत्तींच्या गंडस्थळावर भाला फेकून मारल्यावर हत्ती बिथरले व उलट फिरून आदिलशाही सैन्याला चिरडत धावू लागले. या गोंधळाचा फायदा घेत भोसले बंधूनी आपल्या तलवारीच्या पराक्रमाने शत्रूला कापून काढले.

आदिलशहाचा मोठा पराभव झाला.

त्याचे सातशे घोडे भोसलेंच्या तुकडीने पकडले होते. या तरुण मराठा वीरांचा पराक्रम बघून वनगोजी निंबाळकर प्रचंड खुश झाले.

महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात या रोमहर्षक लढाईची आणि ती जिंकणाऱ्या भोसले बंधूंची चर्चा सुरू होती.

निंबाळकरांनी भोसलेंच्या शौर्याची हकीकत निजामशाहच्या कानावर घातली.

निजामाने मालोजी व विठोजी भोसले या बंधूना पंच हजारी मनसब, सैन्याच्या खर्चासाठी पुणे,सुपे,चाकण चौऱ्यांशी, इंदापूर ही जहागिरी इतका सरंजाम बहाल केला. कुटुंबाला ठेवण्यासाठी शिवनेरी हा किल्ला बहुमानपूर्वक दिला.

रंकाळ्याच्या युद्धानंतर दिलेल्या फर्मानात मालोजी भोसलेंना राजा ही पदवी मिळाली.

या होतकरू, पराक्रमी तरुणाला वनगोजी निंबाळकरांनी जावई करून घेतले. कोल्हापूरच्या रंकाळ्याची लढाई भोसले घराण्याच्या उदयाची खूण ठरली.

पुढे मालोजींचा सुपुत्र म्हणजे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे व नातू पहिले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पासून भोसले घराण्याच्या किर्तीचा ध्वज दिगंतात फडकू लागला.

संदर्भ – मालोजीराजे आणि शहाजी महाराज’ वा.सि.बेंद्रे
कोल्हापूर सकाळ मध्ये छापून आलेला राजेंद्र पवार यांचा लेख

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.