फक्त पुण्यात नाही तर सिंगापूरच्या चहा टपरीवर देखील मालपाणी क्रिमरोल मिळतो

तुम्ही जर चहाच्या टपरीवर किंव्हा कॅन्टीनमध्ये चहा घ्यायला गेलात तर तुम्ही चहासोबत क्रीमरोल, टोस्ट, खारी किंव्हा बिस्किटे उचलताच…पण हे सगळं घेतांना एक नाव नजरेला हमखास पडतं ते म्हणजेच मालपाणी !

भिडू तर चहाच्या टपरीवर गेलाच तर आवडीने ‘मालपाणीचेच ‘बेकलाईट क्रीमरोल’ उचलतोच !

 शुद्ध शाकाहारी बेकरी उत्पादने

असं ब्रीदवाक्य घेऊन शाकाहारी बेकरी उत्पादने ही संकल्पना घेऊन लोकांच्या मनात आणि जिभेवर आपलं हक्काचं स्थान मिळवणारा मालपाणी ब्रँड गेल्या १५ वर्षांपासून लोकप्रिय झाला आहे.

इतर कंपनीच्या मानाने मालपाणीच्या क्रीमरोल ला अधिक पसंती दिली जाते. कारण हा क्रीमरोल आणि बिस्किटे म्हणजे अगदी कुरकुरीत आणि जिभेवर विरघळणारी. आणि त्यात संपूर्ण शाकाहारी असल्यामुळे शाकाहारी लोकांची तर पहिली पसंती मालपाणीलाच असणार. ते म्हणतात ना, पुण्यातले खव्वये संपूर्ण देशभरात गाजतात..तर मालपाणी ब्रँडदेखील पुण्यातूनच सगळीकडे पसरला..

१९९९ मध्ये रविवार पेठेतल्या एका छोट्या खाणी जागेत हा ब्रँड जन्माला आला. मालपाणी ग्रुपचा शाकाहारी बेकरी उत्पादनांचा व्यवसाय फक्त पुण्यातच नाही तर संपूर्ण राज्यात पसरला आहे.   

राज्यातच नव्हे तर बंगळुरू, हैद्राबाद आणि अगदी सिंगापूरच्या दुकानांमध्येही मालपाणींचे बेकरी उत्पादने पोहोचली आहेत.

पुण्यातली एक खासियत म्हणजे कँप परिसरातल्या बेकऱ्यांनी आपल्या एक विशिष्ठ चवीची परंपरा कायम राखली आहे. आजही अनेक पुणेकर कँपातूनच बेकरी उत्पादनांची खरेदी करतो. हेच हेरून  मालपाणी ग्रुप चे संस्थापक सचिन मालपाणी यांनी देखील बेकरी व्यवसाय सुरु केला. मालपाणी यांना बेकरीचे ज्ञान नव्हते पण त्यांना एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे पूर्णत: शाकाहारी बेकरी उत्पादने विकणाऱ्या कंपन्याच नाहीत. त्यांनी अनेक व्यवसायात आपले नशीब आजमवायचा प्रयत्न केला पण,

खरं तर त्यांना खाद्यपदार्थ बनवण्यातच त्यांना रस होता

मग आपण आता शाकाहारी ग्राहकांना शाकाहारीच बेकरी उत्पादने द्यायची असं त्यांचं ठरलं आणि त्यांनी या व्यवसायात पहिलं पाऊल टाकलं, त्यासाठी भांडवल काय तर साधारण आकाराचा ओव्हन आणि एक मिक्सर होय. 

सुरुवातीला त्यांनी घरघुती पद्धतीची बिस्किटे, नानकटाई इत्यादी बनविण्याचे प्रयत्न केले. सुरुवात इतकी काही चांगली झाली नाही कारण त्यांचे बरेच प्रयोग फसले होते. मग त्यांनी एका बेकरीत काम करणाऱ्या अनुभवी माणसाला हाताशी धरले आणि काम सुरु केले. पण तरी देखील लोकांची मागणीच नव्हती त्यामुळे त्यांना अनेकदा आपला व्यवसाय बंद करावा लागला होता.

बरं हे एकदा -दोनदा नव्हे तर असं ७-८ वेळेस घडलं..तेही २००३ पर्यंत.

पण त्यांचं क्रीमरोल आणि खारी हे उत्पादन आलं आणि त्यांचे नशीबच पालटले.

पण सुरुवातीला सचिन मालपाणी यांनी अगदी १०-१५ च पाकिटे क्रीमरोल बनवत असायचे. परंतु मागणी वाढत गेली तशी-तशी त्यांनी क्रीमरोलचे उत्पादनही वाढवायला सुरुवात केली. व्यवसाय इतका वाढत गेला कि, त्यांच्या उत्पादनांची पुण्यातल्या लक्ष्मी रस्ता, डेक्कन, स्वारगेट इथल्या दुकानांत मागणी वाढू लागली.

व्यवसायाचा व्याप वाढू लागला आणि सचिन मालपाणी यांनी सातारा रस्त्यावर सिटीप्राईड चित्रपटगृहासमोर असलेल्या वॉशिंग सेंटर शेजारच्या गल्लीत त्यांनी ९०० चौरस फुटांची जागा घेऊन आपला व्यवसाय मोठा केला. अजूनही याच ठिकाणी मालपाणींची सर्व उत्पादने मिळतात.

यानंतर त्यांनी २०१० मध्ये नऱ्हे-आंबेगावमध्ये देखील उत्पादने बनवायला सुरुवात केली.

त्यांच्या उत्पादनांच्या गुणवत्तेमुळे आणि चवीमुळे बाहेर गावातील ग्राहक देखील आकर्षित झाली आणि त्यांचा खप वाढत गेला.  क्रीमरोल व खारीसह बिस्किटे, टोस्ट, ब्राऊन टोस्ट, ब्राऊन बिस्किटे, गव्हाची खारी अशी नवी उत्पादने त्यांनी आणली.

विशेष म्हणजे त्यांनी बनवलेली केकही पूर्णत: शाकाहारी आणि दूध पावडर व व्हे प्रोटिन वापरलेले असतात. तसंच ते त्यानंतर चकली, बाकरवडी, शंकरपाळे, खारी पुरी असे उत्पादने देखील गेल्या ४  वर्षांपासून त्यांनी बाजारात आणली आहेत आणि ते ग्राहकांच्या पसंतीस देखील उतरली आहेत.

त्यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते उत्पादनाच्या दर्जात कधीही हलगर्जीपणा करत नाहीत.

पण त्याच्यापुढे एक आव्हान होते ते म्हणजे बेकरीतले सर्वच उत्पादने शाकाहारी बनविणे. अनेक जन त्यांच्यावर शंका घ्यायची कि, बेकरीचे उत्पादने शाकाहारी कसे काय मग ते त्या लोकांना सगळा कारखाना दाखवीत असायचे.

मालपाणी कंपनी २०१० मध्ये प्रायव्हेट लिमिटेड झाली, सद्या कंपनीची दररोज ४ ते ४.५ टन माल बनवण्याची क्षमता आहे. २०१४ पासून तर कंपनीची उत्पादने सिंगापूरपर्यंत पोहोचले होते.

सद्या ते बेक-लाइट आकर्षक आणि आधुनिक उत्पादने तयार करीत आहेत जे प्रत्येक घरातील न्याहारी, चहा-वेळ आणि स्नॅक्स टेबल्समध्ये भर पाडतात. त्यांच्या विविध उत्पादनांमध्ये कुकीज, खारी, टोस्ट, चकली, मलई रोल, कप-केक्स आणि बर्‍याच गोष्टींचा समावेश आहे. त्यांच्या सर्व उत्पादनांमध्ये ताजेपणा राखत असताना ट्रेंडशी मिळते,जुळते प्रोडक्ट्स बनवतात..

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.