२४ वर्षापुर्वीच्या या घटनेमुळे ममता बॅनर्जींनी कॉंग्रेस सोडली होती..

डिसेंबर १९९७. बंगालच्या राजकारणात वादळापुर्वीची शांतता जाणवत होती. ममता बॅनर्जी स्वतःच्या कॉंग्रेस पक्षावर एका वर्षापासून नाराज होत्या. अगदी पक्ष सोडण्याच्या मनस्थिती पर्यंत आल्या होत्या.

कॉंग्रेस हायकमांड आणि ममता बॅनर्जी यांच्यात १९९६ पासूनच वाद चालू होते.

त्या वादा मागचं मुख्य कारण होतं सोमेन मित्रा यांना पश्चिम बंगाल कॉंग्रेसची दिलेली जबाबदारी. त्यावेळी ममता बॅनर्जी युथ कॉंग्रेसच्या अध्यक्षा होत्या.

सोमेन मित्रा यांचे डाव्यांशी असलेले मैत्रीपुर्ण संबंध हे ममतांना खुप आधीपासून खटकत होते. त्यामुळे ममता बॅनर्जी सोमेन यांना व्यंगात्मक टिकेतुन टरबुज म्हणून चिडवायच्या. जो बाहेरून हिरवा आणि आतून लाल असतो.

सोमेन हे काँग्रेसचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष सीताराम केसरी यांच्या गटातील मानले जायचे.

त्याची काही कारणं देखील होती. जून १९९७ ची काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक सीताराम केसरी, शरद पवार आणि राजेश पायलट यांच्या दरम्यान होती. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी बंगालमधून काँग्रेस सदस्यांचे एक डेलिगेशन बनवलं होतं. या डेलिगेशन मध्ये ममतांच्या समर्थकांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच होती.

आणि नेमकी हीच गोष्ट ममतांना आतून खात होती. जेव्हा निवडणूक झाली, तेव्हा सोमेन यांनी बंगाल कॉंग्रेसची ९० टक्के मत केसरी यांच्या बाजूने दिली होती.

अध्यक्ष झाल्यानंतर केसरी यांनी काँग्रेसचे ८० वे अधिवेशन बोलावण्याची घोषणा केली. त्यासाठी स्थळ निवडलं होतं कोलकात्याचं नेताजी इंडोर स्टेडियम आणि तारीख होती ८, ९ आणि १० ऑगस्ट १९९७.

आता अधिवेशन बंगालमध्ये होणार त्यामुळे हे स्पष्ट होते की त्याच्या आयोजनाची जबाबदारी बंगाल कांग्रेस वरती असणार होती. आणि अधिवेशन यशस्वी झाल्यानंतर त्याचं सगळं क्रेडिट सोमेन मित्रा घेऊन जाणार होते. ही गोष्ट ममतांना पटत नव्हती. हा त्यांना पक्षातील आपली उंची कमी करण्याचा डाव असल्याच वाटतं होतं.

बराचसा विचार केल्यानंतर कॉंग्रेस अधिवेशनापुर्वी १५ दिवस म्हणजे २१ जुलै १९९७ रोजी कोलकात्याच्या चौरंगी स्ट्रीटवर त्यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवला. या घोषणेच्या दुसऱ्या दिवशी पासून केसरींचे दुत जितेंद्र प्रसाद आणि अहमद पटेल ममतांचा रुसवा काढायला बंगाल मध्ये दाखल झाले. ममता आपल्या मेळ्यावर ठाम होते.

सुवर्णमध्य म्हणून पटेल यांनी या मेळाव्याला राष्ट्रीय अध्यक्ष सिताराम केसरी यांना बोलवाव असं सुचवलं. ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाणार नाही.

मात्र काही केल्या ममता ऐकायला तयार नव्हत्या. त्यांनी एकट्याच्या जीवावर २१ जुलैला शक्तीप्रदर्शन केलं. हे शक्तिप्रदर्शन बघून कुठूनही वाटत नव्हतं की तो फक्त कार्यकर्त्यांचा मेळावा होता. कारण लाखोंच्या संख्येने लोक तिथे उपस्थित होते. सभेच्या स्वरूपात होत असलेल्या या मेळाव्यात केसरी विरोधी पोस्टर झळकले होते. कार्यकर्त्यांचा हा पाठिंबा आणि उत्साह बघून नेमके ९ ऑगस्टला ममता यांनी कोलकात्यामध्ये मोठ्या सभेची घोषणा केली.

ज्यावेळी बंगालमध्ये हे सगळे राजकारण चालू होतं त्याच वेळी शेजारच्या बिहार राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला होता. तिथं बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यावर चारा घोटाळ्यामुळे आरोपपत्र दाखल होणार होतं. याच्यामुळेच जनता दल पक्ष फुटून लालू समर्थकांचा राष्ट्रीय जनता दल नावाचा नवीन पक्ष अस्तित्वात आला.

तुरुंगात जाण्यापूर्वी लालूंनी आपली पत्नी राबडीदेवी यांना मुख्यमंत्री बनवलं. पण अडचण अशी की त्यांच्या पक्षाकडे बहुमत नव्हतं. अशा परिस्थितीत काँग्रेस हायकमांडच्या आदेशावरून बिहार काँग्रेसने राबडी सरकारची साथ दिली आणि त्यांची खुर्ची वाचली.

पण यानंतर बिहार काँग्रेसमधल्या नाराज असलेल्या जगन्नाथ मिश्र आणि रामलखन सिंह यादव यांच्या नेतृत्वात पटना मध्ये ३ ऑगस्ट १९९७ रोजी एक बैठक बोलावली. यातील प्रमुख पाहुणे म्हणून ममता बॅनर्जी यांना आमंत्रित केले गेले. याच बैठकीत मिश्र आणि राम लखन यांनी बिहार जन काँग्रेस नावाच्या नव्या पक्षाची घोषणा केली.

ममता बॅनर्जी यांचा वागणं बघून दिल्ली काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण होतं. कोलकत्तामध्ये अधिवेशन बोलावण्यावरुन आता प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. वेगवेगळे फॉर्म्युले समोर येत होते. कोणीतरी सांगितलं काही तरी कारण सांगून कॉंग्रेसने हे अधिवेशन १ ते दीड महिना पुढे ढकलावं. तर कोणी स्थळ बदलण्यासाठी सुचवलं. ओडिसाचे तत्कालीन मुख्यमंत्री जानकी वल्लभ पटनायक यांनी भुवनेश्वरमध्ये अधिवेशन आयोजित करण्याची तयारी दाखवली होती. पण केसरी बंगालवर अडून होते.

८ ऑगस्टच्या त्या अधिवेशनाला देशभरातुन कॉंग्रेसचे १६ हजार पदाधिकारी दाखलं झाले होते. दिल्लीमधून त्यांच्यासाठी कॉंग्रेस स्पेशल रेल्वे पाठवण्यात आली होती. अधिवेशन सुरु झालं. सोमेन मित्रा आणि प्रियरंजन दास मुंशी यांच्यासारख्या मोठ्या कॉंग्रेस नेत्यांनी या पदाधिकाऱ्यांच्या खातीरदारीमध्ये कसलीच कमतरता ठेवली नव्हती. त्यांच्या मनोरंजनासाठी हरिप्रसाद चौरसिया, पंडित जसराज आणि बिस्मिल्लाह खान यांचे कार्यक्रम केले गेले.

पण दुसऱ्या बाजूला वृत्तपत्रांचे मथळे मात्र ममता बॅनर्जींच्या नावाचे होते. कॉंग्रेस अधिवेशनाच्या १ किलोमीटर अंतरावरचं ममतांची सभा सुरु होती. त्यात त्या म्हणाल्या,

आपल्या सोबत येणारे लोकच खरी ग्रासरुट काँग्रेस आहे. (हिंदीमध्ये तृणमूल कॉंग्रेस)

पुढे सभा आणि अधिवेशन दोन्ही संपलं. पण यामुळे बंगाल काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आले होते. रोज दोन्ही बाजूने होणारे आरोप-प्रत्यारोप यावरून हे स्पष्ट झालं होतं की ममता बॅनर्जी आता काँग्रेस पक्षात औटघटकेसाठी असणार आहेत.

त्याच दरम्यान सोनिया गांधी यांनी पक्षामध्ये सक्रिय होण्यास सुरुवात केली होती. नरसिंहराव यांचा काळ संपल्यानंतर १० जनपथ आणि २४ अकबर रोडच्या सर्विस लेनवरील कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची गर्दी वाढू लागली होती.

या बदलत्या परिस्थितीनुसार ममता बॅनर्जी सोनिया गांधींजवळ दाखल झाल्या. त्यांना आशा होती की सोनिया त्यांचं ऐकून घेतील. त्यांच्या जनाधाराचा आणि सार्वजनिक शक्ती प्रदर्शनाचा सन्मान करतील आणि बंगाल काँग्रेसची जबाबदारी पुन्हा त्यांच्याकडे सोपवतील किंवा तशी परिस्थिती निर्माण करतील.

सोनिया गांधी यांचा आक्रमकपणा देखील ममता यांच्याशी मिळताजुळता होता. पण राजकारणात फोटो काढण्यातील आक्रमकपणा आणि वास्तविक आक्रमकपणा यामध्ये पुसटशी रेषा होती. तीच रेषा मभता यांना समजत नव्हती किंवा समजून देखील त्या पक्षाला आपल्यावर काहीतरी कारवाई करा म्हणून संधी देत होत्या.

आणि अखेरीस तो दिवस उजाडलाच. २२ डिसेंबरच्या दुपारी एक काँग्रेसचा कार्यकर्ता आणि ममता बॅनर्जी यांचा चाललेल्या चर्चेदरम्यान तो कार्यकर्ता म्हणाला,

बहुतेक पक्ष तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई करू शकतो.

ही चर्चा चालू असतानाच टीव्हीवर बातमी फ्लॅश झाली.

‘ममता बॅनर्जी सहा वर्षासाठी काँग्रेसमधून निलंबित’

पण या बातमीचा ममतांवर विशेष परिणाम झाला नाही. १० दिवसात म्हणजे १ जानेवारी १९९८ रोजी त्यांनी तृणमूल काँग्रेसची घोषणा केली.

यानंतर काही दिवसातच ममता बॅनर्जी यांच समता पक्षाचे अध्यक्ष जॉर्ज फर्नांडिस यांच्या दिल्लीमधील निवासस्थानी येणं जाणं चालू झालं होतं. जेव्हा फेब्रुवारीमध्ये लोकसभा निवडणुका होत होत्या तेव्हा ममता यांनी समता पक्ष आणि भाजपसोबत युतीची घोषणा केली होती.

आता मुद्दा उरतो तो सोनिया गांधी यांनी या प्रकरणात लक्ष का घातले नाही?

या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी सोनिया गांधी यांच्या राजकीय वाटचालीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मार्च १९९८ मध्ये सोनिया यांनी काँग्रेस अध्यक्षाची जबाबदारी हाती घेतली होती. अध्यक्ष म्हणून राजीव गांधी यांच्या आधुनिक राजकारणाच्या जागी इंदिरा गांधी यांच्या सामाजिक दृष्टीकोन असलेला राजकारणाच्या दिशेने त्यांनी वाटचाल सुरू केली होती. त्यांच्या आजूबाजूला देखील काँग्रेसमधील डाव्या विचारसरणीचे लोक असायचे. यात मणिशंकर अय्यर, ए के एंटनी, प्रियरंजन दास मुन्शी अशा नेत्यांचा समावेश होता.

त्यामुळे डावे विरुद्ध ममता बॅनर्जी अशी जेव्हा गोष्ट समोर येते तेव्हा सोनिया गांधी या डाव्या पक्षांच्या बाजूने झुकल्याचे जाणकार सांगतात. त्यामुळे सोनिया गांधी यांच्याशी वैयक्तिक ओळख असून देखील ममता काँग्रेसमध्ये परतू शकल्या नाहीत. पण पुढे २००९ मध्ये जेव्हा काँग्रेस आणि डाव्या मधील संबंध ताणले गेले तेव्हा सोनिया यांनी ममतांना जवळ करण्यास थोडाही वेळ दवडला नाही.

सोबतच ममता यांचं काँग्रेसमधून झालेले निलंबन सोनिया गांधींच्या अध्यक्ष बनल्याच्या तीन महिन्यानंतर झालं होतं. ही गोष्ट देखील सोनियांच्या भविष्यातील राजकारणासाठी फायद्याची होती.

आणि सोनिया गांधी स्वतः देखील अशी कडक पावले उचलणे पासून स्वतःला चार हात लांब ठेवतात.

उदाहरण द्यायचं तर १९९९ मध्ये जेव्हा शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांना पक्षातून निलंबित केलं गेलं तेव्हा तो निर्णय सोनिया यांनी घेतला नव्हता (तांत्रिकदृष्ट्या). त्या नाराज होऊन घरात बसल्या होत्या. तेव्हा प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॉंग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये तिन्ही नेत्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस बनवल्यानंतर कधी भाजपला तर कधी काँग्रेस सोबत युती करून आपल्या राजकारण पुढे चालू ठेवलं.

२०११ मध्ये रायटर्स बिल्डिंग मध्ये मुख्यमंत्री म्हणून पाऊल ठेवत आपलं स्वप्न देखील साकार केलं. तेव्हापासून आजतागायत त्या पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. आता दोन महिन्यांत होणाऱ्या निवडणूकांमध्ये त्या पुन्हा एकदा आक्रमक होत आपली ताकद दाखवणार हे नक्की.

आता जाता जाता आणखी एक राजकारणातली गोष्ट सांगायची म्हणजे ज्या सोमेन मित्रा यांच्यामुळे हे सगळे महाभारत झाले त्या मित्रा यांनीच पुढे तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. कसंही असलं तरी शेवटी हेच राजकारण आहे.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.