ममता दीदींचा वारसदार कोण, या प्रश्नाच उत्तर सापडलंय..

ममता दीदींचा वारसदार कोण, या प्रश्नाच उत्तर अखेर सापडलंय..

अभिषेक बॅनर्जी

मागील काही दिवसांपासून दीदींचा उत्तराधिकारी कोण असे प्रश्न लोकांना पडत होते. त्यात कालच तृणमूल काँग्रेसची व्हर्च्युअल बैठक पार पडली. या व्हर्च्युअल बैठकीला पक्षाचे आमदार, ममतांचे रणनीतीकार प्रशांत किशोर सुद्धा उपस्थित आहेत. या बैठकीतच अभिषेक बॅनर्जी यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड केल्याची घोषणा करण्यात आली. अभिषेक बॅनर्जी हे आधी पक्षाच्या युवा संघटनेचे अध्यक्ष होते. पण ‘एक नेता एक पदा’चे धोरण पाहता त्यांनी युवा संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पक्षाच्या युवा विभागाच्या अध्यक्षपदी अभिनेत्री सयोनी घोष हिची निवड करण्यात आली.

अभिषेक बॅनर्जी हे तृणमूल काँग्रेसचे प्रिन्स आहेत. पण ते प्रिन्स कसे झाले याच्या पाठीमागं एक रंजक गोष्ट आहे.

बंगाल निवडणुकांच्या दरम्यान तृणमूलमधल्या बऱ्याच मोठ्या नेत्यांचं भाजपात आऊटगोईंग सुरु होत. असेच एक बंडखोर सुवेन्दु अधिकारी यांनी भाजपात एंट्री मारत असताना अभिषेक बॅनर्जींना लक्ष्य करून म्हंटले की,

“टोलाबाज भाईपो (भ्रष्ट भतीजे) को हटाओ.”

ही सभा मिदानपूरच्या मतदारसंघात झाली होती. आणि या सभेत केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहांची प्रमुख उपस्थिती होती. या बंगाल निवडणुकीच्या काळात टीएमसीमधील बरेच नेते भाजपमध्ये गेले होते. आणि याच खापर फुटलं होत अभिषेक बॅनर्जींवर.

त्यावेळी टीएमसी सोडून जाणाऱ्या प्रत्येक नेत्यांमध्ये एक गोष्ट सामान्यपणे चर्चिली जात होती. ती म्हणजे ‘आता दीदी पार्टी चालवत नाहीत’. आपल्या प्रचारात भाजपाने अभिषेक बॅनर्जी यांना राहुल गांधींसारखंच पप्पू म्हणून हिणवलं. भाजप सतत सांगत होत की बंगालमध्येही ‘भाई-भतीजावादाच’ राजकारण सुरु आहे.

राजकारणात प्रिन्सची एंट्री

दीदींचा भाऊ अमित आणि त्यांची पत्नी लता यांचा मुलगा अभिषेक हे दीदींच्या आजवरचे सर्वात जवळचे लोक मानले गेले आहेत. अभिषेकला राजकारणाचा असा कोणता गंध ही नव्हता. कोलकाता शहरातल्या नालंदा शाळेत टीएमसीचा हा प्रिन्स शिकायला होता. शालेय शिक्षणानंतर अभिषेकने इंडियन इंस्टीट्यूट ऑफ प्लानिंग अँड मॅनेजमेंट (IIPM) मधून बीबीए आणि एमबीएची डिग्री घेतली.

हळूहळू अभिषेकाची एंट्री राजकारणात होऊ लागली. २०१४ मध्ये ममता यांचे तत्कालीन विश्वासू मुकुल रॉय यांनी अभिषेकला पक्षाच्या सत्ता केंद्रांवर आणण्यास सुरुवात केली. पण रॉय यांनी सांगितलं की, ज्या अभिषेकला मी पार्टीच्या सेंटर पॉवर मध्ये आणलं त्याच अभिषेकने मला साईडलाईन करायला सुरुवात केली. आणि तेव्हापासूनच टीएमसी आणि मुकुल रॉय त्यांच्यात अंतर निर्माण होऊ लागले. आता ते भाजपमध्ये आहेत.

त्याच दरम्यान तृणमूल युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सुवेंदू अधिकारी यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी ममता दीदींनी ‘तृणमूल युवा’ नावाची संघटना सुरु केली. आणि अभिषेकला या संघटनेचं प्रभारी पद दिल. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात असं म्हटल आहे की अभिषेकने ही संघटना एखादया कॉर्पोरेट संस्थेसारखी चालविली. आणि अल्पावधीतच त्या संघटनेची मेम्बरशिप २८ कोटी केली.

२०१४ मध्ये सोमेन मित्रा यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे डायमंड हार्बर ही लोकसभेची जागा रिक्त झाली. पक्षाने अभिषेकला या रिक्त झालेल्या डायमंड हार्बर जागेवरुन उभे केले. बॅनर्जी यांनी या निवडणुकीत बाजी मारली आणि वयाच्या २६ व्या वर्षी सर्वात तरुण खासदार झाले.

त्याच वर्षी सुवेंदु अधिकारी यांना बाजूला करून अभिषेकला तृणमूल यूथ विंगचा अध्यक्ष बनविण्यात आले. यानंतर, पक्षात अभिषेकचा प्रभाव वाढायला सुरवात झाली. जस की, संसाधन व्यवस्थापन, प्रतिनिधीमंडळ आणि निवडणुकीच्या कामांसारख्या सर्वच जबाबदाऱ्या अभिषेकला मिळत गेल्या.

पक्षात अभिषेकच वर्चस्व जसं जसं वाढत गेलं, तसचं पक्षावर खंडणी, भ्रष्टाचार आणि अवैध धंद्याचे आरोप होऊ लागले. अभिषेकवरही आरोप लावण्यात आले.

तथापि, या सर्व गोष्टी दीदींच्या आवाक्याबाहेरच्या होत्या.

या सर्व प्रक्रियेत, अभिषेकने टीएमसीतल्या बऱ्याच नेत्यांचे पंख छाटायला सुरुवात केली. हे सर्वच नेते महत्त्वाकांक्षी होते. यात मुकुल रॉय, सुवेंदू अधिकारी आणि सौमित्र खान यासारख्या नेत्यांचा समावेश होता. या सर्वांमुळे पक्षाचे ज्येष्ठ नेतेही नाराज होते. त्यांच्यामते अभिषेक कोणत्याच राजकीय उलथापालथेतून गेले नाहीत आणि त्यांना सत्ता दिली गेली. म्हणजेच हे असं झालं होत की, ‘कानामागून आला आणि तिखट झाला.’

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत टीएमसीच्या पॉलिटिकल कॅम्पेनींगची जबाबदारी अभिषेकला देण्यात आली होती. त्याला फक्त स्वतःचीच जागा वाचवता आली. पक्षाची कामगिरी मात्र एकदम खराब होती.

लोकसभेत नुकसान तर मोठं झालं होत. पुढं येणाऱ्या २०२१ च्या विधानसभेसाठी दीदींना कोणतीच रिस्क घ्यायची नव्हती. त्यामुळं केवळ अभिषेकच्याच सल्ल्यावरून दीदींनी राजकीय रणनितीकार प्रशांत किशोरची मदत घ्यायचं ठरवलं. नाहीतर दीदींचं राजकारण हे ग्राऊंडवरून सुरु होत. पण एव्हाना अभिषेकने पूर्ण टीएमसी आणि दीदींवर कब्जाच मिळवला होता.

आयपॅकची मदत

प्रशांत किशोर व त्यांची कंपनी आयपॅक यांनी पक्ष व राज्य सरकारमधील सर्व संघटनात्मक व कार्यकारी नियंत्रण आपल्या ताब्यात घेतल. यात अभिषेकचे शब्द महत्वाचे आणि शेवटचे ठरू लागले, थोडक्यात अभिषेकच्या शब्दांना वजन प्राप्त होऊ लागलं. किशोर आणि त्यांच्या टीमने ‘मास सर्व्हे’ च्या आधारावर दिग्गज असणाऱ्या जिल्हास्तरीय नेत्यांना बाजूला केले. त्या सर्व नेत्यांना बंडखोर किंवा भ्रष्ट म्हणून दूषणं देण्यात आली.

निवडणुका जवळ आल्या असताना पक्षाने जिल्ह्यातील निरीक्षक म्हणून काम करणाऱ्या वरिष्ठ नेत्यांना काढून टाकल. प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र पक्ष समिती स्थापन केली गेली. या समित्यांची देखभाल केंद्रीय समिती करीत होती आणि त्यांच नियंत्रण अभिषेककडे होत.

या सर्व प्रवासात अभिषेकने पक्षाचा एक सक्षम व्यवस्थापक म्हणून नावलौकिक मिळवला असला तरी जनतेचा नेता म्हणून त्याला स्वतःला सिद्ध करता आलं नाही. आज तो तृणमूलचा प्रिन्स जरी झाला असला तरी दीदी म्हणजे बंगाल आहेत ही खूणगाठ त्याने मनाशी बांधली म्हणजे मिळवलं.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.