भविष्याचा विचार करून अदानी समूह ममतांसोबत भेटीगाठी वाढवतंय

ज्याची सत्ता त्याचंच नाणं चालणार या धोरणाने व्यापारी त्यांचं व्यापारी धोरण ठरवत असतात. कोणताही हुशार बिसनेस करणारा व्यक्ती कुठेही गुंतवणूक करण्याअगोदर सर्व तपशिलांचा नीट अभ्यास करत असतो. यामध्ये वर्तमानाचा विचार तर असतोच मात्र येणाऱ्या काळाचा म्हणजेच भविष्याचा सुद्धा विचार करण्यात येतो. ज्या बिसनेसमॅनकडे हे कौशल्य असतं तेच उभारी घेतात.

भारतातील अशा व्यापाऱ्यांचं नाव घेतलं तर दोन नावं पहिले आठवतात ते म्हणजे अंबानी आणि अदानी. अंबानी यांचं नाव तसं खूप पूर्वी पासून घेतलं जातं पण अदानी हे गेल्या काही वर्षांमध्ये समोर आलेले व्यापारी आहे. मात्र फार कमी वेळात त्यांच्या बिजनेस स्ट्रॅटेजीने अंबानींना टक्कर ते देत आहेत. अदानी आणि अंबानी यांच्या घोडदौडीच्या बातम्या आपण नेहमी ऐकत असतो, त्यावरून हे सर्वश्रुत आहे.

अदानी यांच्या बुद्धिचातुर्याचं उदाहरण नुकतंच पाहायला मिळत आहे. गुजरात आता पश्चिम बंगालच्या मागे लागलेलं दिसतंय.

गौतम अदानी सध्या बंगालसोबत व्यापार वाढवण्याच्या तयारीत दिसत आहेत. त्यासाठी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी भेटीगाठी सुरु केल्याचं दिसतंय. गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखाली अदानी समूह पश्चिम बंगालमध्ये हळूहळू आपली पायाभरणी करतोय. बंदर, रस्ते यांच्या पायाभूत सुविधांपासून इथेनॉलपर्यंत ते तिथे रस घेताना दिसताय.

हे सर्व अंदाज बांधले जाताय ते उद्योगपती गौतम अदानी यांचा मुलगा करण अदानी आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीपासून. पश्चिम बंगालच्या नबन्ना इथे त्यांनी गुरुवारी १० फेब्रुवारीला राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि मुख्य सचिव एचके द्विवेदी यांची भेट घेतली. मिटिंग जवळपास ३० मिनिटांहून अधिक काळ चालली. या बैठकीत अदानी समूहाचे तीन उच्चपदस्थ अधिकारीही उपस्थित होते.

करण अदानी हे अदानी पोर्ट्स अँड सेझ लि. (Adani Ports & SEZ Ltd. : APSEZ) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स (Adani Airport Holdings) चे संचालक आहेत.   

बंगालमधील संभाव्य गुंतवणुकीबाबत या मीटिंगमध्ये चर्चा झाली. करणने पोर्ट कंपनीचे प्रमुख म्हणून ताजपूर खोल समुद्र बंदर (Tajpur deep sea port) प्रकल्पात अदानी समूहाच्या स्वारस्याची पुनरावृत्ती केली. योगायोगाने, ताजपूर बंदरासाठी अंतिम बोली सादर करण्याची अंतिम तारीख १४ फेब्रुवारी आहे. यासोबतच देउचा-पंचमी कोळसा खाण प्रकल्पातील संभाव्य गुंतवणुकीवरही चर्चा झाली. शिवाय अदानी समूहाच्या मते, करण अदानी सध्या ग्राहकांसाठी इंटीग्रेटेड (एकात्मिक) लॉजिस्टिक्स कंपनी बनण्यासाठी APSEZ मध्ये सुधारणा करण्याचं नेतृत्व करत आहेत. 

करण यांनी जेव्हापासून पोर्ट्सची जबाबदारी स्वीकारली आहे तेव्हापासून APSEZ मध्ये वाढ झाली आहे. त्यांच्या येण्याने दोन बंदरांपासून दहा पोर्ट आणि टर्मिनल्सच्या स्ट्रिंगपर्यंत झपाट्याने विस्तार झाला आहे. तेव्हा त्यांच्या भेटीने नक्कीच बंगालमध्ये व्यापार बदलाची आणि विकासाची लाट येणार असं बोललं जातंय. 

या घटनेला अजून एक पार्श्वभूमी आहे ती गटप्रमुख गौतम अदानी आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीची.

गेल्यावर्षी २ डिसेंबरला सीएम बॅनर्जी यांची गौतम अदानी यांनी भेट घेतली होती. तासभर चाललेल्या या बैठकीला खासदार अभिषेक बॅनर्जीही उपस्थित होते. त्या बैठकीत, अदानी वरिष्ठांनी मुख्यमंत्र्यांना आश्वासन दिले होतं की ते २० आणि २१ एप्रिल २०२२या दिवसांत होणाऱ्या ‘बंगाल ग्लोबल बिझनेस समिट’मध्ये सहभागी होतील.

तर सीएम बॅनर्जी यांनी गेल्या डिसेंबरमध्ये मुंबईत नागरी समाजाच्या सदस्यांशी संवाद साधताना सांगितलं होतं की, देशाला सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रांची गरज आहे. “अदानी, अंबानी भी चाहिये, और कृषि भी चाहिये,” असं त्या म्हणाल्या होत्या. म्हणजेच ममता बॅनर्जी देखील अदानींच्या बंगालमधील वाढत्या व्यापारी गुंतवणुकीला हिरवा झेंडा दाखवत असल्याचं दिसतंय.

बंगालमध्ये अदानी सध्या ‘अदानी विल्मार’च्या माध्यमातून उपस्थित आहेत. हा एक खाद्यतेल विभाग असून तो हल्दिया इथे आहे. समूहाने यापूर्वीच हल्दिया बंदरातील कार्गो हाताळणीत गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर किडरपोर डॉकमध्ये काही सुविधा देण्यावर चर्चा झाली आहे.

अदानी बंगालमधील NHwidening प्रकल्पांसह इतर पायाभूत सुविधा क्षेत्रातही गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये जलवाहतुकीचाही समावेश असू शकतो कारण बंगाल सरकार शहराशी चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी जलवाहतूक सुधारण्याची योजना आखत आहे.

आता करण अदानी आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीने हे तर स्पष्ट झालंच आहे की बंगालच्या सक्षमीकरणासाठी प्रायव्हेट सेक्टर यात उतरत आहे. ममता बॅनर्जी त्यांची आवभगत करत आहेत तर अदानी देखील मान देत आहेत. या वाढत्या भेटीगाठीने बंगालचा विकास कोणत्या वळणावर जाईल, हे तर येणारा काळंच सांगेल.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.