त्यादिवशी ममतांनी शपथ घेऊन सांगितलं होतं “आता पुन्हा येईन तर मुख्यमंत्री होऊनचं…”
आज ममता बॅनर्जी पुन्हा आल्या आहेत. त्या आता सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्या आहेत. भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, अनेक केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार, या सगळ्यांची तगडी प्रचार यंत्रणा या सगळ्यांना पुरून उरत त्यांनी बंगाल जिंकून दाखवलं.
पण या विजयापेक्षा आणि आजच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथेपेक्षा देखील कैक पटीनं ममतांना २०११ साली पहिल्यांदा घेतलेली मुख्यमंत्री पदाची शपथ खास होती. सगळ्या तृणमूल पक्षासाठी आणि ममतांना मानणाऱ्यांसाठी ती शपथ स्पेशल होती. यामागे डाव्यांच्या ४ दशकांच्या सत्तेला सुरुंग लावून राज्य मिळवलं होतं हे कारण तर होतचं.
पण त्याहून देखील त्यादिवशीची मुख्यमंत्री पदाची शपथ स्पेशल असण्याचं कारण होत भुतकाळातील एक शपथच.
जुलै ११९३. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांनी आपली सत्ता खुट्टा ठोकून मजबूत केली होती. गावातल्या ग्रामपंचायतीपासून, जिल्हा, राज्य आणि राज्यातील खासदार असं सगळीकडे केवळ लाल वादळं होतं. फक्त आणि फक्त ज्योती बसू. त्यांना ना काँग्रेसचं आव्हान वाटतं ना भाजपचं. भाजप तर त्यावेळी बंगालमध्ये औषधाला पण नव्हता.
अशा परिस्थितीमध्ये पश्चिम बंगालमधील नदिया जिल्ह्यामध्ये एका मूकबधीर मुलीवर बलात्कार झाला होता. आरोप झाला होता थेट सत्ताधारी पक्षातील एका व्यक्तीवर. त्यामुळे या प्रकरणातल्या दोषींचे राजकीय संबंध असल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जात नसल्याचा आरोप करतं ममता बॅनर्जी पीडितेसोबत रॉयटर्स बिल्डिंगमध्ये दाखल झाल्या.
रॉयटर्समध्ये पश्चिम बंगालच सचिवालय. संपूर्ण राज्याचा कारभार इथून चालतो. जस आपल्याकडे मंत्रालय तस.
या प्रकरणात अटकेची कारवाई करावी म्हणून तेव्हाचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांची भेट घेण्यासाठी ममतांनी रॉयटर्समध्ये मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोरच धरणं आंदोलन सुरु केलं. ममता त्यावेळी पक्षातील आघाडीच्या नेत्या होत्या. सोबतच बंगालमधील काँग्रेसचा मोठा चेहरा आणि युवक काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. पण तरी देखील ज्योती बसूंनी त्यांची भेट घेतली नाही.
मुख्यमंत्र्यांची येण्याची वेळ झाली, तसं ममतांना तिथून हटण्यास सांगण्यात आलं.
मात्र अनेकदा सांगूनही ममता तिथून हटल्या नाहीत. तेव्हा त्यांना आणि त्या पीडित महिलेला पोलिस कर्मचाऱ्यांनी पायऱ्यांवरून ओढत आणि फरफटत बाहेर आणलं आणि लाल बाजारातल्या पोलिस मुख्यालयात त्यांना नेण्यात आलं. या दरम्यान झालेल्या झटापटीत त्यांचे कपडेही फाटले होते.
त्यावेळी आंदोलनादरम्यान पोलिसांकडून गोळीबार देखील करण्यात आला. यात १३ तरूण मारले गेले. त्यावेळी ममता बॅनर्जी देखील जखमी झाल्या.
त्याच दिवशी ममतांनी शपथ घेतली
‘आता या इमारतीत परत येईन ते मुख्यमंत्री होवूनच’
यानंतर त्यांनी त्यादिशेने पावलं टाकायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात दिवस, आठवडे, महिने, वर्ष गेली. ती देखील थोडी-थोडकी नव्हे तर तब्बल १८ वर्ष उलटली.
कट टू १२ मे २०११
२०११ सालच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहिर होतं होते. दुपारनंतर जसजसे ते स्पष्ट होत गेले तसं पश्चिम बंगालमधील वातावरण बदलु लागलं. तृणमूल काँग्रेसच्या हजारो समर्थकांचा उत्साह शिगेला पोहचला होता. कारण डाव्यांच्या ४ दशकांच्या आघाडीला सुरुंग लागला होता.
बहूमतासाठी लागणारा आकडा तृणमुलने कधीच पार केला होता. पक्षाला तब्बल १८४ जागा जागांवर विजय मिळाला होता. बरोबरीला कॉंग्रेस पक्ष पण होता. त्यांना देखील ४२ जागा मिळाल्या होत्ता.
त्यानंतर ८ दिवसांमध्ये पुढचे सगळे सोपस्कार पार पाडून २० मे २०११ रोजी ममता बॅनर्जी बंगालच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्या आणि त्यांनी या ऐतिहासिक रॉयटर्स बिल्डींगमध्ये पुन्हा पाऊल टाकलं.
ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असताना त्यांनी १८ वर्षापुर्वी घेतलेली शपथ देखील पुर्ण केली होती.
हे ही वाच भिडू.