गोवा जिंकण्यासाठी ममतादीदींचा नवा फॉर्म्युला ‘गोयंची नवी सकाळ’

काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. ज्यात सलग तिसऱ्यांदा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात तृणमूल कॉंग्रेसने सत्ता स्थापन केली. भाजपने जोरदार टक्कर देऊनही तृणमूल काँग्रेसने आपला बालेकिल्ला राखून ठेवला.

आता बालेकिल्ला हा शब्द मुद्दाम वापरलाय. कारण फक्त पश्चिम बंगाल पुरता मर्यादित असलेल्या तृणमूल काँग्रेस पक्ष आता हळूहळू राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष बनण्याची तयारी करतोय.

तशी रणनीती सुद्धा पक्षाने आखली आहे. राष्ट्रीय स्तरावरचा तिसरा मोठा पक्ष बनविण्याच्या योजनेचा भाग म्हणून पूर्वेकडील त्रिपुरा आणि पश्चिमेकडील गोवा या दोन टोकांच्या राज्यांमध्ये तृणमूल काँग्रेस आगामी विधानसभा निवडणुका लढवणार आहेत.

त्यात या दोन राज्यांपैकी गोव्यात पुढच्या वर्षीचं मतदान होत आहे. ज्यासाठी तृणमूल तेथे चांगली सुरुवात सुनिश्चित करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.

गेल्या सहा आठवड्यांत तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झालेल्या काँग्रेस, आप, शिवसेना आणि भाजपमधील वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने पक्षाने गोव्यात चांगलाच जम बसवला आहे.

एवढेच नाही तर ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि गोव्यातील सर्व 40 जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचं म्हटलंय. गोव्यात फेब्रुवारी 2022 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

राज्यातील पक्षाच्या निवडणूक तयारीवर लक्ष ठेवता यावे म्हणून पश्चिम बंगालचे मंत्री मानस भुनिया त्यांच्यासोबतच तृणमूलचे अनेेक वरिष्ठ नेते, खासदार आणि मंत्री सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने गोव्यात तळ ठोकून आहेत. तृणमूलने राज्यात आपले कार्यालय देखील उघडले आहे आणि सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तार करण्याचा विचार करत आहे.

त्यात मिळालेल्या माहितीनुसार, आता पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी या महिन्याच्या शेवटी 28 ऑक्टोबरच्या आसपास किंवा नंतर गोव्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

प्रशांत किशोर यांची भारतीय राजकीय कृती समिती (I-PAC), जी तृणमूल काँग्रेसची राजकीय-निवडणूक रणनीती सांभाळते, त्यांनी दोन महिन्यांपूर्वीचं गोव्यात आपली टीम आणि कार्यालयही स्थापन केले.

राजकीय निरीक्षकांनी तसेच सर्व पक्षांच्या नेत्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत सांगितले की, तृणमूल काँग्रेसने किनारपट्टी राज्यात आपले वर्चस्व निर्माण करण्याची सगळी रणनीती आखली आहे, संपूर्ण राज्य पक्षाच्या जाहिराती आणि होर्डिंग्जने भरून गेले आहे, गोयंची नवी सकाळ’ म्हणजेच गोव्याची नवी पहाट बॅनर खाली तृणमूल काँग्रेसची जोरदार एंट्री होणार आहे.

I-PAC सदस्य गोव्यातील प्रमुख राजकीय कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांचे संस्थापक, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार आणि संपादक आणि इतरांसोबत एक-एक-एक बैठका घेऊन समर्थन प्रयत्नांना बळकटी देत ​​आहेत.

म्हणजे तृणमूल काँग्रेस एक प्रकारे मत बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्यांना ते भेटत आहेत, माध्यमांचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचे होर्डिंग गोव्यात सर्वत्र आहेत आणि ते लोकांना प्रभावित करण्यासाठी वैयक्तिकरित्या भेटत आहेत.

तृणमूलने गोव्यात निवडणूक लढवण्याचा आपला इरादा जाहीर केल्यापासून गेल्या एका महिन्यात, पक्षाने राज्यातील विविध क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींना सामील केले आहे. यामध्ये बॉक्सर लेनी डी’गामा, माजी भारतीय फुटबॉल बचावपटू डेन्झील फ्रँको, माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अँथनी रॅबेलो, चित्रपट निर्माते टोनी डायस आणि कार्यकर्ता जयेश शेटगावकर यांचा समावेश आहे, ज्यांनी गोवा अगेन्स्ट कोल’ रोहिणी चालवतात.

या व्यतिरिक्त, तृणमूल काँग्रेसने गोव्यातील तळागाळातील काँग्रेस कार्यकर्त्यांनाही एकत्र केले आहे. मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात, आय-पीएसीने म्हटले आहे की 200 पेक्षा जास्त काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तृणमूल काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. यामध्ये गोवा काँग्रेसच्या महिला शाखेच्या सरचिटणीस प्रिया राठोड आणि उत्तर गोव्यातील विधानसभा मतदार संघ वालपोईमध्ये काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष दशरथ मांद्रेकर यांचा समावेश आहे.

आता तृणमूल काँग्रेस गोव्यात एवढी जय्यत तयारी करतयं, पण त्याला टक्कर द्यायला भाजप मंडळीही तितकीच कंबर कसून  तयारी लागलयं. आता शेवटी कोण बाजी मारतयं हे निवडणुकीच्या  निकालावेळीचं स्पष्ट होईल.

हे ही वाचं भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.