हे तर काहीच नाही, ममता दीदी तर थेट जयप्रकाश नारायणांच्या गाडीवर चढून नाचलेल्या
बंगालच्या निवडणूका जश्या जवळ येत आहेत तस तिथलं राजकारण तापायला चालू झालयं. काल भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या गाडीवर काल दगडफेक झाली, त्यानंतर रात्री पुन्हा तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिजित बॅनर्जी यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली.
त्यावरून अभिजित बॅनर्जी यांनी भाजपला निशाणा बनवत तुम्ही १ माराल तर आम्ही ४ मारू.
त्यानंतर खुद्द राज्यपाल जगदीप धनखड यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन ममता बॅनर्जी यांना आगीशी ‘खेळू नका…माफी मागा…’ असा इशारा दिला आहे. यानंतर राज्यपालांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा अहवाल मागवत राष्ट्रपती राजवटीचे संकेत दिला आहे.
२०१९ मध्ये लोकसभा निवडणुक प्रचारावेळी बंगालमध्ये झालेल्या हिंसाचार संपूर्ण देशाने पाहिला होता.
हे झालं सध्याच्या काळातलं. म्हणजे निवडणूक जवळ आल्यावर हिंसाचार, आंदोलन होत असले तरीही बंगालच्या राजकारणातील ही आक्रमकता नवीन नाही. निवडणूक असो की नसो इथे हिंसाचार, आंदोलन आणि त्यातील आक्रमकता हे एक समीकरणच तयार झालं होत.
आधी डावे-काँग्रेस, नंतर डावे-तृणमूल आणि आता तृणमूल-भाजप. आणि सगळ्यामध्ये एक नाव अगदी ७० च्या दशकापासून कॉमन आहे ते म्हणजे बंगालच्या सध्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा,
‘ममता बॅनर्जी’
त्यांचं आपण बघत असलेलो हे आक्रमक रूप बंगालला नवीन नाही. १९७० च्या काळात इंदिरा गांधींच्या व्यक्तिमत्वांवरून प्रभावित होत १५-१६ वर्षाच्या ममता बॅनर्जी काँग्रेसच काम करू लागल्या. विद्यार्थी चळवळीत भाग घेतला. वय कमी असलं तरी आक्रमकतेची कमी नव्हती. बोलायला लागल्या तर अस्सल बंगाली भाषेत समोरच्याला शांत करायच्या.
त्यांच्या या आक्रमक स्वभावामुळे अवघ्या १८ व्या वर्षी काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्या बनल्या. त्यावेळी मतदानाचं वय २१ होते त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क नव्हता, तरी त्या तरुणांच्या प्रचारसभांमध्ये बोलायला उभ्या राहायच्या.
पुढे ममता कॉलेजला येईपर्यँत देशात आणीबाणीची घोषणा झाली होती. जोगमाया देवी कॉलेजमध्ये त्यांनी बीएसाठी प्रवेश घेतला. मात्र या कॉलेजमधून त्यांनी काँग्रेस पक्षाचं काम चालू ठेवलं होत. छात्र परिषद युनियन नावाने विद्यार्थी काँग्रेसची संघटना उभारली. आणीबाणी विषयीची काँग्रेस पक्षाची भूमिका समजावून सांगत.
त्यांचं काम आणि बोलण्यातील आक्रमकता पण मुद्देसूद आणि अभ्यासू मांडणी बघून १९७६ मध्ये अवघ्या २१ व्या वर्षी त्यांना बंगाल महिला काँग्रेसचे महासचिव बनवण्यात आलं. आणि त्या सक्रिय राजकारणात आल्या.
पुढे १९७७ ला आणीबाणी नंतर केंद्रातून काँग्रेस पक्षाचं सरकार जाऊन जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले. पंतप्रधानपदी मोरारजी देसाई विराजमान झाले. इतर राज्यांप्रमाणेच बंगालमध्ये देखील सत्ता बदल झाला. काँग्रेसचे सिद्धार्थ शंकर राय जाऊन पहिल्यांदाच डाव्यांचं सरकार सत्तेत आलं. ज्योती बसू मुख्यमंत्री झाले.
आणीबाणी नंतर इंदिरा गांधी आणि काँग्रेसच्या इतर मोठ्या नेत्यांना अटक करण्यात आली. बंगालमधून देखील अनेक नेत्यांना अटक झाली त्यापैकी एक नाव ममता बॅनर्जी यांचं देखील होत. बाहेर आल्यानंतर त्यांनी दोन्ही सत्ताधाऱ्यांवर टीका करायला सुरुवात केली. आपल्या भाषणातून त्यांनी जनता पक्ष आणि डाव्यांना लक्ष करायला सुरुवात केली.
पुढे सुटकेनंतर १९७७ मध्ये त्यांनी कोलकाता विद्यापीठामध्ये एमए साठी प्रवेश घेतला. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई कलकत्याला (कोलकाता) आले होते. त्यावेळी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने त्यांचा निषेध करण्याचे ठरले.
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तामध्ये मोरारजी देसाई कलकत्यामध्ये आले. त्यावेळी सगळी सुरक्षा यंत्रणा भेदत ममतांनी पंतप्रधानांच्या ताफ्यातील एका गाडीवर काळा झेंडा लावून घोषणा देऊन आल्या.
पुढे ममता खऱ्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या त्या जनता पक्षाचे नेते आणि इंदिरा गांधींचे कडवे विरोधक असलेले जयप्रकाश नारायण यांच्या गाडीवर चढून केलेल्या नाचा नंतर.
ममता त्यावेळी विद्यार्थी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला काँग्रेसच्या महासचिव होत्या. त्यावेळी जयप्रकाश नारायण यांच एक व्याख्यान विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आलं होतं. काँग्रेसने या व्याख्यानाचा आणि सरकारचा निषेध करण्याचं ठरवलं.
पुढे होत्या ममता बॅनर्जी. जयप्रकाश यांचं विद्यापीठामध्ये आगमन झालं. कडेकोट पोलीस बंदोबस्तात देखील विद्यार्थी संघटनेने जेपींची अँबॅसिडर गाडी अडवली. पुढे विदयार्थी निषेधाच्या घोषणा देत आहेत, झेंडे दाखवत आहेत. वातावरण चांगलंच तणावग्रस्त झालं होता.
इतक्यात ममता जेपींच्या अँबॅसिडर गाडीच्या बॉनेटवर चढल्या आणि त्यांनी हात उंचावून ,
‘निकम्मी सरकार का निषेध’
अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. २-३ घोषणा देऊन काही कळायच्या आतच त्यांनी बॉनेटवरच नाचायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना पुन्हा अटक केली. मात्र या घटनेनंतर त्या काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाच्या नजरेत आल्या.
बंगालमध्ये त्यांना पक्षात विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या. त्यांच्या कामाचा झपाटा पाहून पुढे १९८४ मध्ये जादवपुर मतदार संघातून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली. इथे त्यांनी अनुभवी आणि जेष्ठ समाजवादी नेता सोमनाथ चॅटर्जी यांना पराभूत केले. आणि अवघ्या २९ व्या वर्षी पहिल्यांदाच लोकसभेत प्रवेश केला.
त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिलेच नाही, सत्तेची एक एक पायरी चढत २०११ मध्ये डाव्यांची ३३ वर्षाची सत्ता उलथवून बंगालच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या.
हे हि वाच भिडू.
- विद्यार्थी चळवळीतून हे नेते घडले !!
- देशाच्या विजयाहून प. बंगालमधील विजय भाजपसाठी महत्वाचा आहे.
- जेव्हा जगात कम्युनिस्ट विचारसरणी ढासळत होती, तेव्हा भारतात या कम्युनिस्ट मुख्यमंत्र्यांना हरवणं अशक्य होतं.